घरफिचर्सभारतीय महिलांची संशोधनावरील छाप!

भारतीय महिलांची संशोधनावरील छाप!

Subscribe

करोना विषाणूने सध्या जग बेजार झाले असून अनेक देशांच्या अर्थव्यवस्था डळमळीत झाल्या आहेत, अशा परिस्थितीत अनेक देशातील संशोधक करोनावर लस शोधण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. अमेरिकेतील मेरीलँड येथील महिला संशोधकांच्या एका चमूने या करोना विषाणूवर लस शोधण्यासाठी कंबर कसली आहे. विशेष म्हणजे या महिला संशोधकांच्या चमूचे नेतृत्व भारतीय वंशाच्या महिला डॉक्टर नीता पटेल करत आहेत. मूळ भारतीय वंशाच्या कोलकाताच्या चंद्राबाली दत्ता याही जेनिफर इन्स्टिट्यूटच्या क्लिनिकल बायोमॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी विभागात करोना लसीवर काम करत आहेत. यांच्यासोबतच सुनेत्रा गुप्ता, मंगला नारळीकर, आदिती पंत, परमजीत खुराणा, रोहिणी गोडबोले या भारतीय महिलांनी विविध क्षेत्रांमधील संशोधनात आपली छाप पाडलेली आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून करोना नावाच्या जीवघेण्या व्हायरसने संपूर्ण जगालाच वेठीस धरले आहे. गरीब देशाचे तर सोडाच पण सर्वाधिक अत्याधुनिक वैद्यकीय यंत्रणांनी सुसज्ज असलेल्या देशांमध्येही करोनाचा कहर सुरूच आहे. यामुळे जगभरातील संशोधकांपुढे करोना नावाचे आव्हान उभे राहिले आहे. सार्स, मर्स, इबोला यासारख्या अनेक संसर्गजन्य आजारांवर लस शोधण्यात यश मिळवणार्‍या संशोधकांचीही करोनाने झोप उडवली आहे. आजच्या तारखेला तब्बल १०० देश करोनावरची लस शोधण्यात गुंतले आहेत, पण रोज त्यांच्या चाचण्यांना अपयश येत असल्याच्या ब्रेकींग न्यूज येत असल्याने जगभरात अनिश्चिततेचे वातावरण आहे. मात्र, याच अनिश्चिततेच्या वातावरणात अमेरिकेतील मेरीलँड येथील महिला संशोधकांच्या एका चमूने या करोना विषाणूवर लस शोधण्यासाठी कंबर कसली असून जगभऱातील संशोधकांचे लक्ष वेधले आहे. विशेष म्हणजे या महिला संशोधकांच्या चमूचे नेतृत्व भारतीय वंशाच्या महिला डॉक्टर नीता पटेल करत आहेत. दरम्यान, पटेल यांच्याप्रमाणेच अनेक भारतीय महिलांनी विविध क्षेत्रात संशोधन केले असून तमाम भारतीयांसाठी ही निश्चितच अभिमानाची बाब आहे.

डॉक्टर नीता पटेल या मेरीलँड येथील गॅथरबर्गमधील नोव्हावॅक्स प्रयोगशाळेच्या प्रकल्प व्यवस्थापक आहेत. वैद्यकीय क्षेत्राच्या आपल्या २५ वर्षांच्या कारकिर्दीत पटेल यांनी अनेक वेगवेगळ्या वैद्यकीय प्रकल्पांचे नेतृत्व केले आहे. लंडनमधील क्विन एलिझाबेथ कॉलेजमधून त्यांनी बायोकेमिस्ट्रीची पदवी संपादन केली असून लंडन विद्यापीठात Yeast Genetics and Molecular Biology या विषयात डॉक्टरेट मिळवली आहे. तब्बल ११ वर्षं त्यांनी विविध वैद्यकीय प्रकल्पावर काम केल्याने करोनासारख्या जीवघेण्या व्हायरसवरील लसी शोधणार्‍या संशोधकांना मार्गदर्शनाबरोबरच संशोधनातील बारकावे शिकवण्याची जबाबदारी त्यांना देण्यात आली आहे. करोना लसीवरील महिला टीमला त्या मार्गदर्शन करत असल्याने संपूर्ण जगाचे या टीमकडे लक्ष लागले आहे. ही लस तयार करण्यास १८ महिन्यांचा कालावधी लागणार आहे.

- Advertisement -

यादरम्यान, पटेल यांनीही इतर क्षेत्राप्रमाणेच पुरुषांचे क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणार्‍या संशोधन क्षेत्रात महिलांचे असलेले अल्प प्रमाण बोचत असल्याचे सांगितले आहे. तसेच जर तुम्ही महत्वाकांक्षी असाल, मानव जातीसाठी काहीतरी अतुलनीय काम करण्याची तुमची जबर इच्छाशक्ती असेल तर संशोधन क्षेत्रात या असे आवाहनही पटेल यांनी महिलांना केले आहे. या क्षेत्रात पैसा कमावणे हे ध्येय न ठेवता याल तर हे क्षेत्र तुमच्यासाठीच आहे. कारण संशोधकांना इतर क्षेत्रातील कर्मचार्‍यांपेक्षा कमीच मानधन असते, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. पटेल या संशोधकांच्या कार्यशाळाही घेतात. या कार्यशाळेत त्या विविध संशोधनावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात.

पटेल यांच्याप्रमाणेच लंडनमधील ऑक्सफोर्ड विद्यापीठात प्राध्यापक असलेल्या मूळ भारतीय वंशाच्या कोलकाताच्या चंद्राबाली दत्ता याही जेनिफर इन्स्टिट्यूटच्या क्लिनिकल बायोमॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी विभागात करोना लसीवर काम करत आहेत. या लसीला ChAdOx१ nCoV-१९ असे नाव देण्यात आले असून सध्या मानवावर दोन टप्प्यात या लसीची चाचणी करण्यात येणार आहे. पंचवीस संशोधकांची टीम या संस्थेत काम करत असून चौतीस वर्षीय दत्ता यांच्यावर या प्रकल्पाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. जी या प्रयोगात अत्यंत महत्त्वाची समजली जात आहे. दत्ता यांच्या मतेही भारतीय महिलांनी संशोधन क्षेत्राकडे वळणे आवश्यक आहे. ज्यांना आव्हानांचा सामना करणे आवडते अशा जिगरबाज महिलांचे संशोधन क्षेत्र नेहमीच स्वागत करत असल्याचे दत्ता यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

कादंबरीकार व प्राध्यापक असलेल्या डॉक्टर सुनेत्रा गुप्ता या ऑक्सफॉर्ड विद्यापीठातील संसर्गजन्य विभागात काम करत आहेत. संसर्ग करणार्‍या व्हायरसच्या मुळाशी जाणे, त्यावर संशोधन करणे हे त्यांचे ध्येय आहे. मलेरिया व इन्फुएन्झासारख्या अनेक आजारावर त्यांनी अभ्यास केला आहे. लंडन येथील झुलॉजी सोसायटीने त्यांना सायन्टीफिक मेडल देऊन गौरवले आहे.

दुसरीकडे पटेल व दत्ता यांच्याप्रमाणेच संशोधनाच्या विविध क्षेत्रातही भारतीय महिलांनी आपला ठसा उमटवलाच आहे. यात मंगला नारळीकर यांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल. मुंबई व पुणे विद्यापीठात त्यांनी आधुनिक गणितावर संशोधन केले आहे. लग्न झाल्यावर १६ वर्षांनंतर त्यांनी गणित विषयात पीएचडी मिळवली. त्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिर्सचमध्ये कार्यरत होत्या. त्यांनी गाणित विषयावर अनेक पुस्तके मराठी व इंग्रजीत लिहली आहेत. गणितासारखा किचकट विषय सोप्या पद्धतीने शिकवण्यात नारळीकर यांचा हातखंडा आहे. देशातील महिला गणित संशोधकांमध्ये त्यांचाही समावेश आहे. २००२ साली विश्वनाथ पार्वती गोखले पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.

आदिती पंत या भारतातील पहिल्या महिला समुद्रशास्त्रज्ञ आहे, ज्या १९८३ साली अंटार्क्टिकावर गेल्या होत्या. भूगर्भ व समुद्रतळातील रहस्यांच्या त्या अभ्यासक. एलिस्टर हार्डे यांच्या The open Sea या पुस्तकावरून प्रेरणा घेत पंत यांनी समुद्रशास्त्राचा अभ्यास केला होता. हवाई विद्यापीठात त्यांनी समुद्रशास्त्राचा अभ्यास पूर्ण केला, यासाठी अमेरिकेन सरकारने त्यांना स्कॉलरशिप दिली होती. त्यानंतर लंडन येथील वेस्टफिल्ड कॉलेजमधून त्यांनी पीएचडी मिळवली. नंतर त्या मायदेशी परतून गोव्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीमध्ये त्या कार्यरत होत्या.

भारतीय महिला संशोधकांमध्ये परमजीत खुराणा यांचे नाव आवर्जून घेतले जाते. दिल्लीतील प्लान्ट बायोटेक्नॉलॉजी, जेनोमिक्स अँड मॉलिक्यूलर बायोलॉजी विभागात त्या प्राध्यापक होत्या. त्यांनी संशोधन विषयावर तब्बल १२५ पेपर प्रसिद्ध झाले होते. अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले.

रोहिणी गोडबोले या बंगळुरू येथील सेंटर फॉर हाय एनर्जी फिजिक्स ऑफ द इंडीयन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या प्राध्यापक. पार्टीकल फिजिक्सिवर त्यांचे संशोधन आहे. रोहिणी या इंडियन सायन्स अ‍ॅकेडेमिज अँड द सायन्स अ‍ॅकेडमी ऑफ डेव्हलपिंग वर्ल्डसाठी निवडण्यात आलेल्या तीन जणांमध्ये यांचाही समावेश आहे.

विविध क्षेत्रात संशोधन करणार्‍या या व यांच्यासारख्या भारतीय महिलांचा देशाला कायम अभिमान तर असणारच आहे, पण स्त्री म्हणून या क्षेत्रात टिकण्यासाठी त्यांनी केलेले परिश्रम आणि दाखवलेली चिकाटीही वाखाणण्याबरोबरच खूप काही शिकवणारी आहे. ज्यातून आजच्या तरुणींना नक्कीच नवी दिशा मिळेल अशी आशा आहे.

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -