घरफिचर्समोरूचा डिजिटल दिवाळी अंक!

मोरूचा डिजिटल दिवाळी अंक!

Subscribe

सकाळी थोडी उशिरा जाग आल्यानंतरही मोरू गादीवरच लोळत पडला होता. रविवार असल्यामुळं त्याला उठून आवरण्याची कसलीही गडबड नव्हती. नेहमीप्रमाणं अंथरुणातच पडून मोरू मोबाईलवर काहीतरी बघत होता. तसं सोशल मीडिया, व्हॉट्सअ‍ॅपवर मोरू नेहमीच अ‍ॅक्टिव्ह असतो. सकाळी जाग आल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्याचं सतत मोबाईलकडं लक्ष असतंच. आज सकाळी सर्फिंग सुरू असताना त्याच्या डोक्यात एक आयडिया आली. यंदा दिवाळीमध्ये आपण आपलाच ‘डिजिटल अंक’ काढायचा. दुसर्‍यांच्या दिवाळी अंकांमध्ये आपण लेख लिहिणं खूप झालं आणि ऑफिसच्या दिवाळी अंकाचं काम करणंही खूप झालं. यावेळी आपण आपलाच अंक काढू. जगाला हेवा वाटेल असा दिवाळी अंक काढू, इथपर्यंत विचार मोरूच्या डोक्यात यायला लागले. हे सगळं सुरू असतानाच मोरूच्या बापानं त्याला हाक मारली.

मोर्‍या, आज काय दिवसभर अंथरुणातच लोळत पडणारेस का? रविवार असला म्हणून काय झालं, काही कामं आहेत की नाही?

- Advertisement -

बापाच्या या टोमण्यानंतर मोरूनं अंथरूणातून बाहेर येत आवरायला सुरुवात केली. त्याच्या डोक्यातून ‘डिजिटल दिवाळी अंका’चा विचार काही जात नव्हता. लॉकडाऊनमुळं अनेक गोष्टी ऑनलाईन किंवा डिजिटली विकल्या जाऊ लागल्याचं त्याला आठवत होतं. खुद्द मोरूनंही ऑफिसमधल्या फुकटच्या इंटरनेटच्या साह्यानं अनेक वस्तू ऑनलाईन मागवल्या होत्या. आता तर घरीही तो अधून-मधून फूड डिलिव्हरी अ‍ॅप्सवरून काहीतरी मागवायचाच. एवढं सगळं ऑनलाईन झालंय मग दिवाळी अंक का डिजिटल झाला नाही, असा प्रश्नार्थक विचार मोरूच्या मनात आला. या प्रश्नामुळंच ‘डिजिटल दिवाळी अंक’ काढायचाच, या आधी आलेल्या विचारावर त्यानं शिक्कामोर्तब केलं.

पटापट आवरून मोरूनं त्याच्या नेहमीच्या ग्राफिक डिझायनरला गाठलं. मोरूचा चेहरा बघितल्यावरच हा काहीतरी नवी आयडिया घेऊन आलाय, हे डिझायनरच्या लक्षात आलं होतं. त्यानं क्षणाचाही विलंब न लावता विचारलं. काय मोरूशेठ, आज रविवारी एवढ्या सक्काळी सक्काळी आमच्याकडं आलात? नवी आयडिया आलीये वाटतं डोक्यात? आपल्याला डिजिटल दिवाळी अंक काढायचाय?, मोरून फारसे आढेवेढे न घेता त्याला सांगून टाकलं. हे काय नवीन? दिवाळी अंक माहितीये. पण डिजिटल दिवाळी अंक हा काय प्रकार?, डिझायनरनं थोड्याशा उत्सुकतेनं मोरूला विचारलं. मोरूनं त्याच्या डोक्यातली आयडिया थोड्याशा विस्तारानं सांगायला सुरुवात केली. एवढी वर्षे मी माध्यमांमध्ये काम करतोय. किती दिवस आमच्याच ब्रँडच्या दिवाळी अंकाचं काम करायचं? आपलं स्वतःचं काहीतरी वेगळं हवं की नको? आपण डिजिटल दिवाळी अंक काढायचा. मोरू सांगत होता.

- Advertisement -

अरे दिवाळी अंक काढायचा ते कळलं. पण हे डिजिटल दिवाळी अंक काय प्रकार?, ग्राफिक डिझायनरनं प्रश्न विचारला. अरे, दिवाळी अंक आपण नेहमी लावतो, तसाच लावायचा फक्त तो प्रिंट करायचा नाही. अंकाच्या मुखपृष्ठावर मोठ्या अक्षरात लिहायचं ‘डिजिटल दिवाळी अंक’. आपला प्रिटिंगचा खर्चही वाचेल आणि सध्याच्या काळात सगळंच डिजिटल झालंय तर आपला अंकही डिजिटल होईल. म्हणजे वाचकांनाही डिजिटल दिवाळी अंक वाचल्याचा आनंद…, मोरू सांगत होता.

डिजिटल दिवाळी अंकाचं कळलं, पण तो वाचकांपर्यंत घेऊन कसा जायचा?, डिझायनरच्या या नव्या प्रश्नानं मोरूला थोडा रागच आला होता. काय हा माणूस आहे… याला इतकं साधंही कळत नाही, असं मोरू मनातल्या मनात म्हणत होता. पण त्यानं रागाला आवर घालत शांतपणे उत्तर दिलं. अरे सोप्प आहे. व्हॉट्सअ‍ॅप, सोशल मीडियावरून सगळीकडं आपल्या अंकाची पीडीएफ पानं पाठवायची. अंकाच्या प्रकाशनासाठी एक मस्त इव्हेंट करू. एखाद्या सेलिब्रिटीला बोलवू. अंकाची पीडीएफ कॉपी पहिल्यांदा त्या सेलिब्रिटीलाच पाठवू आणि झोकात डिजिटल अंकाचे वितरण सुरू करू…, हे सगळं सांगत असताना मोरूचा चेहरा एकदम प्रफुल्लित झाला होता. जणू काही तो एखाद्या सेलिब्रिटीजवळ उभा राहून ‘डिजिटल दिवाळी अंका’चं प्रकाशन करतोय, असेच भाव त्याच्या चेहर्‍यावर दिसायला लागले होते.

मोरूचा डिझायनर मित्र पुण्यातच लहानाचा मोठा झाला असल्यानं त्यानं या सगळ्यामध्ये आपल्याला काय काम करायचंय, एवढं बरोब्बर हेरलं होतं?

म्हणजे दिवाळी अंकाची पानं लावून झाल्यावर ती पीडीएफमध्ये तुमच्याकडं द्यायची, एवढंच काम मला करायचंय ना? त्यानं मोरूला विचारलं. होय रे… आणि तू तुझ्याकडच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्सवरही आपला डिजिटल दिवाळी अंक पाठवू शकतोस., मोरूनं विनंतीवजा सूचना केली. बरं… बरं… करू की… तुमच्या या महान कामाला तेवढीच माझीही मदत. हां पण मोरूशेठ अंकाचं प्रिटिंग करायच नाही म्हणून माझे चार्जेस काही बदलणार नाहीत. 150 पानी अंक लावण्यासाठी मी किती पैसे घेतो हे तुम्हाला माहितीच आहे, तेवढं तुम्ही लक्षात ठेवा. डिझायनरच्या या बोलण्यानं मोरूचा पारा थोडा चढलाच. हो रे… देतो तुझे पैसे… मी काही पळून जाणार नाही., तो उत्तरला.

डिझायनरच्या ऑफिसमधून बाहेर आल्यावर मोरूच्या डोक्यात एकामागून एक विचार येऊ लागले होते. डिजिटल दिवाळी अंकात लेख कोणाकोणाचे घ्यायचे, विषय कोणते निवडायचे, कविता घ्यायच्या की नाहीत? कथा कोणाकडून मागवायच्या वगैरे वगैरे. आठवड्याची उरलेली काम आटोपून मोरू संध्याकाळच्या वेळी घरी परतला. मोरू घरात आल्याचं बघितल्यावरच बापानं त्याला विचारलं. मोर्‍या, कुठं गेला होता दिवसभर? सुटीच्या दिवशीही तू घरात थांबणार नाही का? अरे, घरातल्या कामाचीही जबाबदारी तुझीच आहे. सगळं आमच्यावर ढकलून अजून किती दिवस बाहेर भटकत राहणारेस.

तीर्थरुप रागात असल्याचं मोरुला लक्षात आलं होतं. पण कशामुळं एवढा राग आलाय हे काही त्याला समजलं नव्हतं. इतक्यात बापानं त्याला पुन्हा एकदा बोलावून घेतलं. लॉकडाऊन पडल्यापासून तुमच्या अंकातील लेखांच्या पीडीएफ रोज आम्हाला पाठवतात. हाताच्या पंज्या एवढ्या मोबाईल स्क्रिनवर तो लेख कसा वाचायचा हे तुमच्या संपादकांनीच सांगायला हवं. तुम्हाला असं वाटतं असेल की, आम्ही 800-1000 शब्दांचा लेख मोबाईलवर वाचावा तर त्याची मांडणी मोबाईल स्क्रिनचा विचार करून करायला हवी ना? अंकासाठी केलेल्या मांडणीचा लेख तसाच मोबाईलवर कसा काय पाठवतात? आम्ही किती दिवस बोटाच्या चिमटीनं तो लेख मोठा आणि लहान करून वाचत बसायचे. आधीच डोळ्यांना कमी दिसतंय. त्यात तुमचे लेख मन लावून वाचणारे फक्त आमच्या पिढीतले वाचकच उरलेत. तू स्वतः तुमचा अंक सकाळी उठल्यावर मन लावून वाचतोय, असं मी गेल्या 3-4 वर्षांत बघितलं नाही., तीर्थरुप तावातावनं बोलत होते. आता याला काय उत्तर द्यायचं मोरूला खरंच समजत नव्हतं.

बरं बरं… बोलतो उद्या संपादकांशी., असं म्हणत मोरूनं वेळ मारून नेली. बापाच्या बोलण्यात पॉईंट आहे, हे मोरूच्या लक्षात आलं होतं. ज्या वाचकांसाठी आपण इतका चांगला आशय निर्माण करतो आहोत, त्यांच्यापर्यंत तो नीट पोहोचतच नसेल तर काय उपयोग? नेहमीच्या सवयीप्रमाणे मोरूनं ब्राऊजरवर ‘डिजिटल रिडिंग’ शब्द टाकून गुगलवर सर्च करायला सुरुवात केली. उत्तरांमध्ये कॉग्निटिव्ह इंटेलिजन्स, इमोशनल इंटेलिजन्स, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, मशिन लर्निंग समजावून सांगणारा आणि येत्या काळात जग कुठल्या दिशेने जाईल, याचं भाकीत वर्तविणारा एक लेख मोरूपुढं स्क्रिनवर दिसला. मोरूनं लेख वाचायला सुरुवात केली. समोर जे काही वाचतोय ते समजून घेऊन मोरूची मती गुंग झाली होती.

जवळच असलेल्या मोबाईलची रिंगटोन वाजत होती. मोरूनं फोन घेतला. पलीकडून डिझायनर मोरूला ‘डिजिटल दिवाळी अंक’ कधीपासून लावायला घ्यायचा, असं विचारत होता…
थांब रे जरा… इथं भलतंच सुरू आहे. उद्या येतो मी तुझ्याशी बोलायला., असं म्हणत मोरूनं फोन कट केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -