घरक्रीडा‘साथी हाथ बढाना’

‘साथी हाथ बढाना’

Subscribe

लॉर्ड्स कसोटीत डावाने मार खाणार्‍या विराट कोहलीच्या भारतीय संघाने ट्रेंट ब्रिज कसोटीत यजमान इंग्लंडवर २०३ धावांनी विजय मिळविला. ५ कसोटी सामन्यांच्या पतौडी ट्रॉफी मालिकेत इंग्लंडकडे २-१ अशी आघाडी असली तरी पुढच्या दोन्ही कसोटी जिंकून मालिका ३-२ अशी खिशात घालण्याची उमेद शास्त्री-कोहली बाळगून आहेत. १४१ वर्षांच्या कसोटी किक्रेटच्या इतिहासात असा पराकम (३-२) केवळ एकदाच घडला आहे. तो देखील ऑस्ट्रेलियाने अ‍ॅशेस मालिकेत इंग्लंडचा ३-२ असा पराभव करून १९३६-३७ मध्ये.

कसोटी सामने जिंकण्यासाठी प्रतिस्पर्धाला दोनदा गारद करण्याची क्षमता (२० विकेटस) गोलंदाजीत असायला हवी. विराटच्या संघाने दक्षिण आफ्रिकेतील मालिका २-१ अशी गमावली, परंतु या मालिकेत ६० मोहरे टिपण्याची कामगिरी इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, अश्विन या प्रभूतींनी केली होती. इंग्लंडविरूध्द एजबॅस्टन कसोटीतही हा सिलसिला कायम राहीला. लॉर्ड्स कसोटीत मात्र यात खंड पडला. परंतु ट्रेंट ब्रिज कसोटीत बुमराह, पांडया, इशांत शर्मा, शमी या तेज चौकडीने इंग्लंडला दोनदा गारद करण्याची किमया केली.

- Advertisement -

ट्रेंट ब्रिज कसोटीत हार्दिक पांडया, इशांत शर्मा, शमी, बुमराह यांनी अवघ्या ३९.४ षटकांत इंग्लंडचा डाव १६१ धावात संपवला. विशेष म्हणजे उपहार ते चहापान दरम्यानच्या सत्रात इंग्लंडचे १० मोहरे गारद करण्यात तेज चौकडीला यश लाभले. कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणार्‍या यष्टीरक्षक रिषभ पंतने पहिल्या डावात ५ झेल टिपले तर स्पिलमधील लोकेश राहुलने ३ झेल पकडून गोलंदाजांना छान साथ दिली.

गोलंदाजीला धार आली असताना ट्रेंट ब्रिज कसोटीत फलंदाजांनाही कर्णधार कोहलीला छान साथ दिली. धवन-राहुल या सलामीवीरांनी दोन्ही डावात अर्थशतकी सलामी देताना भारताला दमदार सुरूवात करून दिली. कर्णधार विराट कोहलीने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत एजबॅस्टनप्रमाणे (१४९ आणि ५१) ट्रेंट ब्रिज कसोटीतही (९७ आणि १०३) २०० धावा फटकावून आपली भूमिका चोख पार पाडली. उपकर्णधार अजिंक्य रहाणेचे शतक हुकले पण कर्णधाराला तोलामोलाची साथ देत त्याने शतकी भागिदारी रचली. तर दुसर्‍या डावात शतकवीर कोहलीला साथ लाभली ती चेतेश्वर पुजाराची. कोहली-पुजारा जोडीने शतकी भागीदारी रचली. हार्दिक पांडयाने बर्‍याच दिवसांनी फलंदाजीत छाव पाडताना फटकेबाज अर्धशतक झळकावले. दोन्ही डावात त्रिशतकी मजल मारणार्‍या भारताने इंग्लंडला विजयासाठी ५२१ धावांचे आव्हान दिले.

- Advertisement -

इशांत शर्माने कूक-जेनिंग्स या सलामीवीरांचा अडसर झटपट दूर केला. बुमराहने इंग्लंडचा कर्णधार जो रूटला बाद केले तर शमीने ओली पोपला बाद करत इंंग्लंडची अवस्था ४ बाद ६२ अशी केली. बटलरने बेन स्टोक्सच्या साथीने शतकी भागीदारी करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु बटरलचे पहिले कसोटी शतक इंग्लंडचा पराभव टाळू शकले नाही. दुसर्‍या नवीन चेंडूवर जसप्रीत बुमराहने अप्रतिम स्पेल टाकून इंग्लंडची दाणादाण उडविली. आदिल रशीदने किल्ला लढविल्यामुळे सामना पाचव्या दिवसापर्यंत गेला. गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही बाबतीत कोहलीच्या संघाने सरस खेळ करून ट्रेंट ब्रिज कसोटीत इंग्लंडवर कुरघोडी केली. रिषभ पंत, लोकेश राहुल यांनी ७-७ झेल टिपले. कसोटी क्रिक्रेटच्या इतिहासात एकाच संघातील दोन खेळाडूंनी प्रत्येकी ७ झेल टिपण्याची ही एकमेव घटना. इंग्लंडमधील ५१८ कसोटी सामन्यात ७ झेल टिपणारा राहुल हा एकमेव क्षेत्ररक्षक. ट्रेंट ब्रिजवर लागोपाठ दुसर्‍या वर्षी इंग्लंडवर कसोटी गमावण्याची आफत ओढवली. गेल्या वर्षी ट्रेंट ब्रिजवरच द.आफ्रिकेने इंग्लंडचा ३४० धावांनी दणदणीत पराभव केला होता. परंतु यजमान इंग्लंडने मालिकेत मात्र ३-१ अशी सरशी साधली होती.

ट्रेंट ब्रिज आणि अँडरसन यांचे अतूट नाते आहे. या मैदानावर तब्बल ६० मोहरे टिपणार्‍या अँडरसनला यंदा ट्रेंट ब्रिजवर भारताविरूध्द अपेक्षित यश लाभले नाही. त्याने या सामन्यात केवळ ४ मोहरे टिपले. अर्थात क्षेत्ररक्षकांनी झेल सोडल्याचा फटका त्याला बसला. तब्बल डझनभर झेल सोडणार्‍या इंग्लंडच्या क्षेत्ररक्षणाचा फायदा भारताला झाला. पंत, राहुल यांच्या अप्रतिम क्षेत्ररक्षणाची जोड बुमराह, शमी, इशांत शर्मा, हार्दिक पांडया यांच्या तेज मार्‍याला लाभली. त्यामुळे कोहलीच्या संघाने इंग्लंडमधील भारताचा सातवा विजय साजरा केला. २००७ मध्ये झहीर खानच्या तेज मार्‍यापुढे इंग्लंडची त्रेधातिरपीट उडाल्यामुळे राहुल द्रविडच्या संघाने इंग्लंडवर १-० अशी मात करून पतौडी ट्रॉफीवर प्रथमच आपले नाव कोरले होते. लॉर्ड्स, लीड्सप्रमाणेच ट्रेंट ब्रिजवर भारताने २ विजय संपादले आहेत. रॉबिनहूडच्या नॉटिंगहॅममध्ये विराट कोहलीच्या सहकार्‍यांनी इंग्लंडला चारी मुंडया चीत केले असून विजयाचा सिलसिला असाच कायम राखून त्यांना मालिका विजयाची अनोखी संधी साधता येईल का याकडे सार्‍या क्रिकेट चाहत्यांचे लक्ष असेल.



-शरद कद्रेकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -