घरफिचर्सगिरे तो भी टांग उपर 

गिरे तो भी टांग उपर 

Subscribe

इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया यांचे दौरे आशियाई क्रिके्रट संघांसाठी नेहमीच खडतर आव्हान असते. विराट कोहलीच्या संघाने द.आफ्रिका, इंग्लंडमध्ये मालिका गमावल्या. या दोन्ही देशांत भारताने 1-1 कसोटी जिंकली तर 6 कसोटी गमावल्या. कसोटी मालिका गमावूनही कर्णधार कोहली आणि खास करुन प्रशिक्षक रवी शास्त्री विराट गर्जना करत आहेत. त्यांचा आव असा की जणू काही भारतानेच मालिका जिंकली आहे.

दक्षिण आफ्रिकेपाठोपाठ इंग्लंड दौर्‍यातही रवी शास्त्री-विराट कोहली या जोडगोळीला पराभवाला सामोरे जावे लागले. कर्णधार विराट कोहलीचा अपवाद वगळता फलंदाजीतील ढिसाळपणा, अनफिट अश्विनचे अपयश तसेच संघ निवडीतील गफलतींचा फटका भारताला बसला. जो रुटच्या इंग्लंड संघाने मालिकेत 4-1 अशी सरशी साधत पतौडी ट्रॉफी पटकावली.

इंग्लड दौर्‍यावर चार वर्षांपूर्वी (2014) विराट कोहली फलंदाजीत सपशेल अपयशी ठरला होता. दहा डावात अवघ्या 134 धावा अशी त्याची दयनीय कामगिरी होती. परंतु यंदाच्या मालिकेत कर्णधार विराटने 593 धावा फटकावल्या, परंतु संघ सहकार्‍याची साथ न लाभल्यामुळे भारताला पराभवाला सामोरे जावे लागले. ओव्हल कसोटीत सलामीवीर राहुल (149) व यष्टीरक्षक -फलंदाज रिशभ पंतने (114) शतके झळकावताना 204 धावांची भागीदारी रचली. त्याआधी राहुलने उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या साथीने शतकी भागी गेली. पण खराब सलामी तसेच शेपटाने वळवळ न केल्यामुळे ओव्हलच्या पाचव्या कसोटीत भारताला 118 धावांनी मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले.

- Advertisement -

प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी बढाया मारण्याची खोडच आहे. अलिकडे 4-5 वर्षातच आम्ही इतकी सरस कामगिरी केली आहे की, गेल्या 15-20 वर्षात परदेश दौर्‍यात भारतीय संघांनी इतके यश मिळाले नव्हते याचा उल्लेख शास्त्री सदोदित करत असतात. विराट कोहलीच्या भारतीय संघाने श्रीलंका, वेस्ट इंडीज या तळाच्या संघांवर विजय मिळविले आहेत हेदेखील विसरता येणार नाही. ऑस्ट्रेलिया, द-आफ्रिका, इंग्लड या तुल्यबळ संघांविरुध्द भारताला परदेशात मालिका जिंकता आलेली नाही हेच निर्विवाद सत्य आहे.

इंग्लड दौर्‍यात विराट कोहलीची बॅट तळपली, परंतु संघाचे नेतृत्व करताना विराटने अक्षम्य चुका केल्या. त्याची किंमत भारतीय संघाला मोजावी लागली. संघ निवडीतील चुका, गोलंदाजीतील बदल, तसेच क्षेत्रव्यूह रचताना कोहलीने वारंवार चुका केल्या. एजबॅस्टन कसोटीच्या दुसर्‍या डावात इंग्लंडची 7 बाद 87 अशी बिकट अवस्था झाली असताना नौजवान सॅम करनने चौैफेर फटकेबाजी करुन इंग्लंडची सुटका केली. कर्णधार कोहलीला सामन्यावर पकड राखता आली नाही परिणामी भारताला पराभवाला सामोरे जावे लागले.

- Advertisement -

लॉर्ड्स कसोटीत ढगाळ वातावरणातही अश्विन, कुलदीप यादव ही फिरकी जोडगोळी मैदानात उतरवण्याची कोहलीची चालही चुकलीच. परिणामी भारताला डावाच्या मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले. साऊदॅम्प्टन कसोटीत इंग्लंडची 6 बाद 86 अशी हालत झाली असताना सॅम करनने पुन्हा एकदा इंग्लंडला डाव सावरला. कर्णधार म्हणून विराटमध्ये परिपक्वतेचा अभाव जाणवतो. गेली 4 वर्ष (ऑस्ट्रेलिया दौरा 2014) विराट कोहली भारतीय संघाचे नेतृत्व करतो आहे. परंतु कसोटी क्रिके्र्रटमध्ये खास करुन परदेश दौर्‍यात त्याच्याकडून होणार्‍या चुकांची किंमत भारतीय संघाला मोजावी लागल्याचे वारंवार दिसून आले आहे. कर्णधार विराटप्रमाणे संघ व्यवस्थापकाकडेही (प्रशिक्षक, सहाय्यक, प्रशिक्षक इत्यादी) याचा दोष जातो. मानसिक कणखरतेत भारतीय खेळाडू कमी पडतात हे इंग्लंड दौर्‍यात स्पष्टपणे जाणवले.

सलामीवीरांची समस्या भारतीय क्रिकेे्रटला सदैव जाणवते. सुनील गावस्करचा अपवाद वगळता भारताला खमका सलामीवीर क्वचितच लाभला. गावस्कर, चेतन चौहान ही भारतीय क्रिक्रेटमधील यशस्वी सलामीची जोडी वीरेंदर सेहवाग, गौतम गंभीर ही दिल्लीकर बिनीची जोडीही भारतासाठीही अल्पकाळ यशस्वी ठरली. यंदा इंग्लंड दौर्‍यात मात्र कोहलीला सलामीवीरांच्या निवडीसाठी बराच खटाटोप करावा लागला. मुरली विजय, शिखर धवन यांना यश लाभले नाही. धवन, लोकेष राहुल यांना ट्रेंट ब्रिज कसोटीचा अपवाद वगळता दमदार सलामी देता आली नाही. मुरली विजयला तर तिसर्‍या कसोटीनंतर मायदेशी पाठवण्यात आले. मुरली विजयने चार वर्षापूर्वी इंग्लंड दौर्‍यात भारतातर्फे 400 हून अधिक धावा फटकावल्या होत्या. परंतु त्याला यंदा सूरच गवसला नाही. कसोटी क्रिक्रेटमध्ये चष्मा (दोन्ही डावात भोपळाच) मिळण्याची नामुष्की त्याच्यावर ओढवली. शिखर धवन परदेश दौर्‍यात क्वचितच यशस्वी ठरतो. हे पुन्हा एकदा सिध्द झाले. संघ व्यवस्थापनाने लोेकेश राहुलवर भरवसा ठेवला, परंतु मालिकेत त्याने जवळपास 30 च्या सरासरीने 299 धावा केल्या त्यापैकी 149 तर मालिकेतील अखेरच्या ओव्हल कसोटीतील अखेरच्या डावात !

अडखडत्या सलामीमुळे मधल्या फळीवर दडपण आले. एजबॅस्टन कसोटीसाठी चेतेश्वर पुजाराला वगळण्यात आले. त्याच्याऐवजी राहुल, तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजीला आला. मुरली विजय, शिखर धवन, लोकेश राहुल, अजिंक्य रहाणे हे अव्वल फलंदाज अपयशी ठरले. कर्णधार विराट कोहलीला फलंदाजीत इतरांची साथ लाभली नाही. पुजाराबाबत सांगायचे तर यंदा तो इंग्लिश कौंटी स्पर्धेत यॉर्कशायरकडून खेळत होता. यंदाच्या मोसमात त्याच्या फारशा धावा झाल्या नव्हत्या तरी इंग्लंडमधील वातावरणात तो रुळला होता. परंतु सलामीच्या कसोटीसाठी त्यालाच वगळण्यात आले. चौथ्या कसोटीत त्याने शतक झळकावले. पण तो भारताचा पराभव काही टाळू शकला नाही.

उपकर्णधार अजिंक्य रहाणेने या दौर्‍यात सपशेल निराशा केली. परदेशात चांगला खेळ करणारा खेळाडू असा अजिंक्यचा लौकिक, परंतु इंग्लंड दौर्‍यात त्याला सूर गवसलाच नाही. केवळ दोन अर्धशतके हीच त्याची इंग्लंंड दौर्‍यातील फलश्रुती. कसोटी क्रिक्रेटमध्ये भागीदार्‍यांना महत्व असते. परंतु मालिकेच्या अखेरच्या डावात एक द्विशतकी तसेच एक शतकी भागीदारी वगळता भारतीय फलंदाजांनी निराशाच केली. परिणामी भारताला मालिकेत 1-4 अशा पराभवाला सामोरे जावे लागते. तेज, मध्यमगती, स्विंग गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजांची भंबेरी उडते ही बाब सर्वश्रुत आहे. परंतु दाढीधारी मोईन अलीच्या फिरकीसमोर भारतीय फलंदाजांनी नांगी टाकल्याचे विदारक द़ृश्य साऊदॅम्प्टनच्या चौथ्या कसोटीत दिसले. सामन्यात 9 मोहरे टिपणारा मोईन सामनावीर किताबाचा मानकरी ठरला. ओव्हल कसोटीत निर्णायक क्षणी लेग स्पिनर रशीदने राहुल, रिशभ पंत या शतकवीरांचा अडसर दूर करुन इंग्लंडला विजयपथावर नेले. इंग्लंड निवड समितीचे प्रमुख एड स्मिथ यांच्या धाडसी निर्णय स्वागतार्हच. रशीदने अलिकडे यॉर्कशायर कौंटीतर्फे केवळ वनडे, टी-20 क्रिकेटलाच प्राधान्य दिले होते. परंतु स्मिथ यांच्या आग्रहाखातर रशिदला संपूर्ण मालिकेत खेळवण्यात आले आणि अखेरच्या कसोटीत दोन महत्वपूर्ण बळी मिळवून त्याने आपली निवड सार्थ ठरविली.

दक्षिण आफ्रिकेपाठोपाठ इंग्लंडमध्येही भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. इशांत शर्मा, जसप्रित भुमरा, महमद शमी या तेज त्रिकुटाने इंग्लंडच्या फलंदाजांना सतावले. अपवाद फक्त ओव्हलच्या पाचव्या व अखेरच्या कसोटीचा. इशांतने 24.3 च्या सरासरीने मालिकेत 18 मोहरे टिपले तर नवोदीत भूमराने 14 तर शमीने 16 बळी मिळविले. शमी महागडा ठरला खरा, पण ब्रेकथ्रू मिळवून देण्यात यशस्वी ठरला. उमेश यादवला फारशी संधी मिळाली नाही. हार्दिक पंड्या अष्टपैलू खेळाडूच्या भूमिकेला न्याय देऊ शकला नाही. अश्विनची फिरकी एजबॅस्टन कसोटीत चालली, बुजुर्ग कुकला दोन्ही डावात त्याने चकवले, परंतु त्यानंतर तो अभावानेच चमकला. तो फिट नसल्याची चर्चा होती. परंतु संघ व्यवस्थापनाने त्याबाबत अळीमिळी गुपचूप असे धोरण स्वीकारले. रवींद्र जाडेजाच्या डावखुर्‍या फिरकीला वाव मिळालाच नाही. मालिकेत 1-3 अशी पिछाडी असताना ओव्हल कसोटीत त्याने आपली छाप पाडताना विकेट्स काढल्या तसेच फटकेबाज अर्धशतक झळकावले. फलंदाजी, गोलंदाजी क्षेत्ररक्षणात माहिर असणार्‍या जाडेजाला अखेरच्या कसोटीत उशिराने संधी दिल्याबद्दल इंग्लंड संघाचे सहाय्यक प्रशिक्षक पॉल फार्ब्रेस यांनी कोपरखळी मारत आनंद व्यक्त केला.

यजमान इंग्लंडचीही फलंदाजी ढिसूळच. सलामीवीर, मधली फळी यांचे अपयश झाकोळले गेले ते तळाच्या फलंदाजांच्या दमदार कामगिरीमुळे. निम्मा संघ झटपट गारद करण्यात भारतीय गोलंदाज यशस्वी ठरले. परंतु तळाच्या फलंदाजांनी (7 ते 9) इंग्लंडला तारले. वेळप्रसंगी उपयुक्त भागीदारी करुन संघांची धावसंख्या फुगवली. सामन्याला आणि पर्यायाने मालिकेला कलाटणी देणारे हे क्षण इंग्लंडने अचूक टिपले. अव्वल फलंदाजांना गारद केल्यानंतर शेपटाने तडाखा देण्याचे प्रसंग भारतीय क्रिक्रेटमध्ये वारंवार दिसून येतात, हा दौराही त्याला अपवाद नव्हता.

ओव्हल कसोटीचा अपवाद वगळता अ‍ॅलिस्टर कुकसारखा बुजुर्ग खेळाडूही अपयशी ठरला होता.आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीच्या अखेरीच्या कसोटीत त्याने (71 आणि 147) धावा केल्या. कर्णधार जो रुटही फलंदाजीत फारशी चमक दाखवू शकला नाही. 5 कसोटीतील 9 डावात 35 च्या सरासरीने 319 धावा त्यापैकी 125 धावा तर ओव्हल कसोटीतील दुसर्‍या डावात ! कुकचा साथीदार सलामीवीर जेनिंग्ज अपयशी ठरला, परंतु स्मिथ यांच्या निवड समितीने जेनिग्ंजला झुकते माप दिले.

इंग्लंडसाठी जमेची बाजू म्हणजे युवा अष्टपैलू सॅम करनसारखा उमदा खेळाडू त्यांना गवसला. रवी शास्त्री, विराट कोहली यांनी करनलाच मालिकावीराचा किताब दिला. शास्त्री यांच्या मते भारत आणि इंग्लंड या दोन संघांतील फरक म्हणजे करनची अष्टपैलू कामगिरी. मोक्याच्या क्षणी करनने आपला खेळ उंचावत संघासाठी भरीव कामगिरी केली. त्यामुळेच मालिकेत इंग्लंडने 4-1 अशी बाजी मारली.

भारताला मात्र मालिकेत अष्टपैलू खेळाडूची उणीव प्रकर्षाने जाणवली. हार्दिक पंड्याला 5 पैकी 4 कसोटीत संधी मिळाली, पण त्याला आपला प्रभाव पाडता आला नाही. रवींद्र जडेजाने अखेरच्या कसोटीेत 86 धावांची खेळी केली तसेच 4 मोहरेही टिपले. त्याला केवळ एकाच कसोटीत संधी लाभली तीदेखील मालिका गमावल्यावर.

आशिया चषक वन-डे स्पर्धा दुबईत खेळली जात असून ऑक्टोबरमध्ये विंडींजचा संघ भारताचा दौरा करेल. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत यजमान भारताचे पारडे जड आहे. परंतु भारतीय संघाची खरी कसोटी लागेल ती ऑस्ट्रेलियात गावस्कर-बॉर्डर ट्रॉफीसाठी. द.आफ्रिका, इंग्लंड दौर्‍यांचा अनुभव लक्षात घेता भारतीय संघ व्यवस्थापनाने ऑस्ट्रेलियात सराव सामने खेळण्याबाबत मागणी केली आहे.

शरद कद्रेकर

(लेखक क्रीडा विषयाचे अभ्यासक आहेत.)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -