संक्रमणाचे स्थित्यंतर

दिनांक 25 मार्च पासून भारत 21 दिवसांसाठी लॉकडाऊन झाला. तेव्हा कुठं, ‘क्या फरक पडताय’ नावाची जमात जागी झाली. तशी ती 22 मार्चला थाळीनाद केल्यामुळं जागी झाली होतीच. भारत विकसनशील, मागास, प्रतिगामी देश आहे, असं कितीही समज असले तरी भारताने लॉकडाऊनच्या कृतीतून अख्ख्या जगाला जमलं नाही ते करून दाखवलं. 20 मार्च ते 10 एप्रिल या 20 दिवसांत अमेरिकेत साडेचार लाख करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत, तर त्यापैकी 14 हजार रुग्णांचा मृत्यू झालाय. इटली 18 हजारांपर्यंत पोहोचलीय. तर स्पेन 15 हजारांवर आहे. आकडेवारी देण्याचे कारण एवढेच की लॉकडाऊनच्या सतरा दिवसांत भारताने आपल्या लोकसंख्येच्या तुलनेने आतापर्यंत बरंच नियंत्रण मिळवलेलं आहे.

मागच्याच महिन्यातली गोष्ट. 22 मार्चला मोदींनी जनता कर्फ्यू लावण्याआधी 20 मार्चला शेवटचं ऑफिसमध्ये बसून काम केलं होतं. त्या आठवड्यात करोनानं भारतात एन्ट्री केली होती. थिएटर, जिम असं असं हळूहळू करत एक एक गोष्ट बंद होत होती. 20 मार्चला बातम्यांसाठी करोनाच्या ग्लोबल डॅशबोर्डवर नजर टाकली तेव्हा इटली-चीन मृतांच्या आकड्यात बरोबरीत होते. जवळपास 3200. स्पेन 833. अमेरिकेत तेव्हा 150 बळी गेले होते. त्याचदिवशी ट्रम्पनी आम्ही करोनावर लस शोधल्याची बातमी धडकली होती. आज 10 एप्रिल आहे. 20 दिवसांचा काळ लोटलाय. करोनाचं संक्रमण चीन सोडून इतर कुठंच थांबायचं नाव घेत नाही. अख्खं जग करोनाच्या संक्रमणाच्या स्थित्यंतरातून चाललंय.

दिनांक 25 मार्च पासून भारत 21 दिवसांसाठी लॉकडाऊन झाला. तेव्हा कुठं, ‘क्या फरक पडताय’ नावाची जमात जागी झाली. तशी ती 22 मार्चला थाळीनाद केल्यामुळं जागी झाली होतीच. भारत विकसनशील, मागास, प्रतिगामी देश आहे, असं कितीही समज असले तरी भारताने लॉकडाऊनच्या कृतीतून अख्ख्या जगाला जमलं नाही ते करून दाखवलं. 20 मार्च ते 10 एप्रिल या 20 दिवसांत अमेरिकेत साडेचार लाख करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत, तर त्यापैकी 14 हजार रुग्णांचा मृत्यू झालाय. इटली 18 हजारांपर्यंत पोहोचलीय. तर स्पेन 15 हजारांवर आहे. आकडेवारी देण्याचे कारण एवढेच की लॉकडाऊनच्या सतरा दिवसांत भारताने आपल्या लोकसंख्येच्या तुलनेने आतापर्यंत बरंच नियंत्रण मिळवलेलं आहे.

20 मार्च जागतिक स्तरावर दोन-अडीच लाख असलेले करोनाबाधित रुग्ण आता पंधरा लाखाच्या वर गेलेत. हे आकडे वाढत जात असतानाच इटलीतील प्रसिद्ध लेखिका फ्रान्सेसका मेलँड्री यांनी लिहिलेले फ्रॉम द फ्युचर हे पत्र समोर आले. अभिनेत्री मुक्ता बर्वेने आपल्या सहज अभिनयाने ते वाचल्यामुळे त्याची तीव्रता आपल्यापर्यंत पोहोचते. भारतात आज जेवढे करोनाचे आकडे दिसतायत तेव्हापासूनचा अनुभव मेलँड्री सांगतेय. त्यावेळी इटलीतले लोक जे करत होते, तेच आपण इथे करतोय, असा आपल्याला त्यातून भास होतो. तीच निगरगट्टता, हटवादी वृत्ती, सब चलताय.. अशी स्पेशल भारतीय वृत्ती तेव्हा इटलीवासीयांनी दाखवली. मग हळूहळू त्याचे विपरीत परिणाम दिसू लागले. आज इटली जे भोगतेय तेवढा त्रास कोणत्याच देशाला मिळू नये. अमेरिकेचे बंडलबाज अध्यक्ष ट्रम्प यांनीही सुरुवातीच्या काळात कमालीची बेफिकीरी दाखवली. परिणामस्वरुप आज त्यांना भारतासारख्या विकसनशील देशाकडून औषधांची मदत मागावी लागतेय. इटली, अमेरिकेचे जिथे चालले नाही. तिथं आण काय चीज? विषय हार्डये. पण आपला नेता देखील स्मार्टये. केंद्रातला आणि राज्यातला देखील.

संकट समान, परिणाम मात्र असमान

पण विषय आहे, मेलँड्रीच्या पत्राचा. करोनाच्या संकटात आपण सगळेच एकाच नावेचे प्रवासी आहोत. असं मेलँड्रीच्या पत्रात एक वाक्य आहे. नंतर ती त्या वाक्याचा उलगडा करते. संकट ओसरल्यानंतर काय? यात वर्क फ्रॉम होम करणारे, करोनामुळे काम गमावून बसलेले आणि संकटानंतर काम गमावणारे. असे विभिन्न घटक एका नावेत आहेत. संकट जरी सर्वांवर एकसमान असलं तरी त्याचा परिणाम एकसारखा नाही. भारतातही तीच परिस्थिती आहे. उलट आपल्याकडं हे चित्र आणखी भेसूर असू शकतं.

क्रयशक्ती एका टप्प्यावर पोहोचलेल्या आपल्या देशाला हा ब्रेक खूप मागे नेणारा ठरू नये, म्हणजे झालं. आज आपण पोलीस, डॉक्टर, स्वच्छतादूत, पत्रकार, शेतकरी यांचे कौतुक करतोय. आपल्यासाठी ते लढतायत. पण या लढाईनंतर काय? किंवा ही लढाई संपणार तरी आहे का? ज्या देशात सोशल शिवाय काहीच नाही. त्या देशात सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी बळाचा वापर करावा लागतोय. निश्चितच उठसूठ सामाजिक आयुष्य रस्त्यावर घालण्याची सवय लागलेल्या आपल्या देशातील लोकांना हे 21 दिवस शिक्षेपेक्षा कमी वाटत नाहीत. म्हणूनच टीव्हीवर रोज पोलिसांचे दांडके घातलेले व्हिडिओ पाहत असलेले तरी लोक घराबाहेर पडतातच. कधी त्याला जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीचा मुलामा देतात, कधी मेडीकल इमर्जन्सी. पण भारतीय घराबाहेर पडणारच.

मग प्रश्न उरतो की 21 दिवसांनंतरही करोनाचं संक्रमण थांबलंच नाही तर? त्यानंतर तरी सोशल होण्यापासून किती काळ थांबणार? मग एक दिवस जरी लोक मोकळी झाली तर आपली अवस्था अमेरिका, इटली सारखी तर होणार नाही ना? असे अनेक प्रश्न आहेत. ज्याची चर्चा आज केली जात नाही. अर्थात लढाई नंतर काय? या प्रश्नाचे उत्तर शोधायचे नसते. तसे केले तर लढाई लढण्याची उमेद आधी मरते, मग लढणारा. पण हे संक्रमण थांबलेच नाही तर काय. मेलँड्री म्हणते त्याप्रमाणे हा संस्कृती र्‍हासाचा तर काळ नाही ना? जगातील संस्कृती अशा महामारीमुळेच तर नष्ट नाही ना झाल्या? की हा नियतीनेच दिलेला ब्रेक आहे.

करोनाची उत्पत्तीच्या मागचं कारण, त्याच्यावरील उपचार येईल तेव्हा येतील; पण भारताची मात्र बरीच हानी होईल. 2008 साली जागतिक मंदी आल्यानंतर भारतातल्या शहरातला एक ठराविक वर्ग नैराश्येच्या गर्तेत गेला होता. त्यानंतर 2016 साली झालेल्या नोटबंदीनेही ग्रामीण आणि शहरी भागाचं चांगलंच नुकसान केलं होतं. संकटाच्या काळात माणूस कासव होतो. कासव जशी आपली मान कवचाच्या खाली दडवून घेतो. तसं माणूस संकटाच्या काळात हातचं राखून ठेवतो. ज्याच्या जवळ जेवढी रसद, तेवढी जगण्याची त्याची ताकद. रसद नसलेल्या लोकांचं करोनामुळं नाही पण भुकेमुळं हालहाल होतील.

करोनाचा विषाणू कायम नाही.
याआधी देखील देवी, प्लेग, स्वाईन फ्लू अशा कित्येक महामारी आल्या आणि गेल्या. त्यांच्यावर औषधं मिळाली; पण करोनानं माणसातली माणुसकी, त्याची दानत आणि त्यातला भंपकपणा नेमका दाखवलाय. करोनाचं संक्रमण आणि त्यातून येणारं लॉकडाऊन जसं वाढत जाईल तसं माणसातले आतले गुण आणखी ठळक होत जातील. अध्यात्माच्या भाषेत बोलायचं झाल्यास स्वार्थ आणि परमार्थही दिसून येईल. संकट जर वाढत गेलं, तर परमार्थ फार काळ टिकत नसतो. प्रत्येकालाच आपल्या जीवाची काळजी असते. जशी पुराच्या पाण्यात उभी असलेली गोष्टीतली माकडीण. पाणी चढू लागतं तसं आपल्या पिल्लाला खाली घेऊन त्यावर उभी राहण्याचा प्रयत्न करते. संकट कोणता चेहरा घेईल काहीच सांगता येत नाही.

असं होईल, तसं होईल. आज जरी काहीच सांगता येत नसलं तरी माणूस म्हणून आपण कद्रू आहोत, शूद्र आहोत की फक्त माणूस आहोत. हे दाखविण्याची वेळ नक्की येईल. सोशल डिस्टन्सिंग पाळा, घरात बसा, काळा बाजार करू नका, साठा करू नका, जिन्नसाचा अतिवापर करू नका… या सूचना आज खूप महत्त्वाच्या वाटत असल्यातरी पुढील काळात स्वतःमधलं माणूसपण जपा, माणसाला जपा आणि जगवा… असे सांगण्याची वेळ आल्याखेरीज राहणार नाही.