घरफिचर्सउद्योजक घनश्यामदास बिर्ला

उद्योजक घनश्यामदास बिर्ला

Subscribe

आपल्या देशामध्ये अनेक असे उद्योजक होऊन गेले, ज्यांनी देशाचं भविष्य घडवण्यासाठी कठोर मेहनत घेतली. घनश्यामदास बिर्ला हे त्यांच्यापैकीच एक नाव. घनश्यामदास बिर्ला यांचा जन्म 10 एप्रिल, 1894 मध्ये राजस्थानच्या पिलानी गावात एका मारवाडी कुटुंबात झाला. शून्यातून विश्व निर्माण करणार्‍या व्यक्तींमध्ये हे नाव प्रामुख्याने घेतले जावे अशा पद्धतीचे त्यांचे कार्य होते. त्यांनी भारतामध्ये अनेक प्रकारच्या शिक्षण संस्था तसेच धार्मिक संस्थांची स्थापना करून भारताला प्रगतीकडे वाटचाल करण्यासाठी मदत केली. ज्याने एकेकाळी गरिबीचे चटके सहन केलेले आहेत, ज्याला गरिबी काय असते याची पूर्णपणे जाणीव होती, पण यामुळे त्यांनी परिस्थितीला कधीच दोष दिला नाही.

त्यांनी त्यांचा संघर्ष नेहमीच चालू ठेवला. त्यांना स्वतःवर विश्वास होता. त्यांना माहिती होते की आपण आयुष्यामध्ये काहीतरी मोठे नक्कीच करून दाखवू शकतो. जेव्हा त्यांचा मृत्यू झाला त्यावेळी त्यांच्या बिर्ला ग्रुपच्या मालकीच्या दोनशे कंपन्या अस्तित्वात होत्या आणि या संपूर्ण कंपन्यांची एकूण संपत्ती दोन हजार कोटीच्या आसपास होती. पण हे सत्य खूप कमी जणांना माहिती असेल की घनश्यामदास बिर्ला त्यांच्या बंधूसोबत एका लहानशा खोलीमध्ये राहत असत. त्याच खोलीमध्ये स्वयंपाक करत असत आणि स्नानही त्याच खोलीमध्ये करत असत.

- Advertisement -

घनश्यामदास बिर्ला यांच्याबद्दल अजून एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे, त्यांचे शिक्षण पाचवी पर्यंतच झालेले होते. ज्यावेळी त्यांचे मोठे बंधू त्यांना असे सांगत की आपलं नशीब आपल्या सोबत नाही, त्यावेळी घनश्यामजी त्यांच्या मोठ्या बंधूंना समजावून सांगत की नशीब आपल्या हातामध्ये असते आणि आपल्या कष्टाने आणि कर्मानेच आपण एक दिवस या जगाला काहीतरी नेत्रदीपक करून दाखवू. या सर्व प्रवासात त्यांचा स्वतःवरील विश्वास हीच त्यांची सर्वात मोठी ताकद होती. त्यांनी काही दिवसांनी त्यांच्याकडील काही पैशांची जमवाजमव करून स्वतःचा सुती व्यवसाय सुरू केला.

ज्यावेळी त्यांनी हा व्यवसाय चालू केला, त्यावेळी या पूर्ण व्यवसायावर फक्त इंग्रजांचा एकाधिकार होता, त्यामुळे इंग्रजांनी त्यांना या व्यवसायामध्ये अनेक अडचणी उत्पन्न करण्याचा प्रयत्न केला. या परिस्थितीतही घनश्यामजी खचले नाहीत, त्यांना आशा होती की याही परिस्थितीतून ते मार्गक्रमण करतील आणि इतिहास साक्षी आहे, की त्यांनी या सर्व संकटांवर मात करत एक विशाल कार्य भारताच्या प्रगतीसाठी करून दाखविले. त्यांनी अशा परिस्थितीतही त्यांचा व्यवसाय यशस्वीरीत्या केला. त्यांनी एक नव्हे तर दोनशे कंपन्यांची स्थापना केली. त्यांची प्रगती इंग्रज थांबवू शकले नाहीत. बिर्ला यांनी अनेक मंदिरांची स्थापना केली, अनेक ट्रस्ट स्थापन केले, जे लोकांना गरजेच्या वेळी मदत करतात.

- Advertisement -

घनश्यामजींनी स्थापन केलेली पिलानी येथील बिट्स संस्था आज भारतातील अग्रगण्य अभियांत्रिकी संस्थांपैकी एक मानली जाते. त्यांनी समाजाचे देणे म्हणून मुंबईमध्ये एक विशालकाय इस्पितळ बनवून घेतले. त्यांनी देशभरामध्ये अनेक ठिकाणी शाळा आणि महाविद्यालयांची स्थापना केली. अशा या महान उद्योजकाचे 11 जून 1983 रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -