घरफिचर्सख्यातनाम कवयित्री अमृता प्रीतम

ख्यातनाम कवयित्री अमृता प्रीतम

Subscribe

अमृता प्रीतम या आधुनिक कालखंडातील एक ख्यातनाम पंजाबी कवयित्री. त्यांचा जन्म 31 ऑगस्ट 1919 रोजी गुजाराणवाला (पाकिस्तान) येथे झाला. त्यांचे मूळ नाव अमृतकौर होते, तर पतीचे नाव प्रीतम सिंह कातवाडा होते. फाळणीची झळ बसून त्यांना लाहोर सोडून दिल्लीस यावे लागले. दिल्ली येथे आकाशवाणीवर त्यांनी १९४८ ते १९६० पर्यंत ‘स्टाफ आर्टिस्ट’ म्हणून नोकरी केली. ह्या काळात त्यांनी आकाशवाणीसाठी गीत, रूपक इ. स्वरूपाचे लेखन केले. त्यांचे वडील कर्तारसिंह हितकारी हे कवी होते. त्यांच्या काव्याचा प्रभाव पडून वयाच्या सोळाव्या वर्षापासून अमृता प्रीतम यांनी काव्यरचनेस आरंभ केला.

सुरुवातीची त्यांची रचना पारंपरिक होती. तथापि लवकरच स्वतःच्या प्रगाढ अनुभूतीमुळे व वैयक्तिक भावना व्यक्त करण्याच्या उत्कट इच्छेमुळे त्यांच्या काव्यात एक परिवर्तन घडून आले. स्त्रियांची बाजू त्या हिरिरीने मांडू लागल्या. स्त्रीजातीवरील अन्यायाविरुद्ध त्यांनी आवाज उठविला व पारंपरिक मूल्यांविरुद्ध बंड पुकारले. आतापर्यंत त्यांचे बारा-तेरा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. में त्वारिख हाँ हिंद दी! या दीर्घ काव्यात त्यांनी फाळणीची दारुण व्यथा व्यक्त केली आहे. सरघी वेला (१९५१) ह्या संग्रहात मानवी मनातील अत्यंत तरल आणि कोमल भावभावना कलात्मकरीत्या व्यक्त करण्यात आल्या आहेत. त्यांनी ह्या संग्रहात उच्च कलात्मक पातळी गाठली आहे. त्यांच्या काव्यातील ओज हा गुण वास्तव परिस्थिती तसेच सर्व प्रकारची दडपशाही व बंधने ह्यांविरुद्ध बंड करण्याच्या त्यांच्या दुर्दम्य इच्छेमधून आलेला आहे.

- Advertisement -

आरंभीच्या कादंबर्‍यांतून भारतीय स्त्रियांवरील शतकानुशतकांच्या अन्यायाला त्यांनी वाचा फोडली तसेच शारीरिक किंवा मानसिकदृष्ठ्या असमाधानी असलेल्यांची व्यक्तिचित्रेही त्यांतून रेखाटली आहेत. त्यांनी पुष्कळ लघुकथाही लिहिल्या आहेत. या कथांमधूनही त्यांनी स्त्रियांच्या दुःखाला वाचा फोडली आहे. चाबी वरे बाद (१९४३), कुंजिअन (१९४४), आखरी खत (१९५६), गोजर दिअन परिअन (१९६०) हे त्यांचे उल्लेखनीय कथासंग्रह होत. त्यांच्या विविध विषयांवरील लेखांचेही संग्रह प्रसिद्ध झाले आहेत. बदलां दे पले विच (१९४३), लंबियां वाटां (१९४९), मौली ते महंदी (१९५५), सरघी वेला (१९५१), अशोक छेती (१९५७) व चानंन दा हौका (१९६२) हे त्यांचे उल्लेखनीय प्रकाशित काव्यसंग्रह व डॉ. देव (१९४९), जय श्री (१९४६), पिंजर (१९५०), आलना (१९५२) ह्या कादंबर्‍या.

याव्यतिरिक्त त्यांनी पंजाबी साहित्य दा इतिहास हा साहित्येतिहास-ग्रंथही लिहिला आहे. त्यांच्या काही साहित्यकृतींची हिंदी, मराठी, इंग्रजी, गुजराती व उर्दू या भाषांत भाषांतरे झाली आहेत. अमेरिकेतील मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीने त्यांच्या साहित्यावर Mahfil नावाचा ग्रंथ प्रसिद्ध केला आहे. साहित्य अकादमीने १९५६ मध्ये आणि पंजाब सरकारने १९५८ मध्ये त्यांना पारितोषिके देऊन त्यांच्या साहित्यसेवेचा गौरव केला. अशा या महान कवयित्रीचे 31 ऑक्टोबर 2005 रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -