Thursday, July 29, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर फिचर्स गायक विनायकराव पटवर्धन

गायक विनायकराव पटवर्धन

Related Story

- Advertisement -

विनायकराव पटवर्धन अथवा पटवर्धनबुवा हे ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक होते. प्रसिद्ध गायक पंडित दत्तात्रेय विष्णू पलुसकर यांचे ते गुरू होत. विनायकराव पटवर्धन यांचा जन्म २२ जुलै १८९८ रोजी महाराष्ट्रातील मिरज या गावी झाला. त्यांनी आपले काका केशवराव यांच्याकडून संगीताचे प्राथमिक शिक्षण घेतले. त्यानंतर मिरज संस्थानाच्या शिष्यवृत्तीवर ते लाहोर येथे गेले व तिथे त्यांनी पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांचे शिष्यत्व पत्करले. पलुसकर बुवांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे गाणे अधिक संपन्न झाले. त्यांनी मिरज येथे पंडित बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर व पुणे येथे रामकृष्णबुवा वझे यांच्याकडेही काही वर्षे संगीताचा अभ्यास केला. विनायकरावांनी पुण्यात ८ मे १९३२ रोजी गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली. त्यांनी अनेक शिष्य तयार केले. त्यातील काही जण उत्कृष्ट गायक तर काही जण उत्तम शिक्षक बनले. त्यांच्या शिष्यांतील काही निवडक मंडळी म्हणजे पंडित दत्तात्रेय विष्णू पलुसकर, पं. एस. बी. देशपांडे, पं. व्ही. आर. आठवले, पं. विष्णू घाग व पं. व्ही. डी. घाटे हे होत. १९४२ मध्ये त्यांनी भारतीय संगीत प्रसारक मंडळ या ट्रस्टची स्थापना केली व गांधर्व महाविद्यालयाचे कामकाज ट्रस्टकडे सोपविले.

ग्वाल्हेर शैलीच्या गायनाचे वैशिष्ठ्य असलेल्या संगीत रागांना सहज सोप्या पद्धतीने गाण्याचा कल त्यांच्या गायनातून अधोरेखित होत असे. विनायकराव हे त्यांच्या तराण्यांसाठी प्रसिद्ध होते. त्यांची भजन गायनाची शैलीही निराळी होती. त्यांनी ‘राग विज्ञान’ (सात खंड), ‘नाट्य संगीत प्रकाश’ आणि ‘महाराष्ट्र संगीत प्रकाश’ ही पुस्तके लिहिली. त्यांनी जवळपास १० वर्षे अनेक मराठी संगीत नाटकांमध्ये वेगवेगळ्या भूमिका केल्या. प्रख्यात कलाकार बालगंधर्व यांच्या जोडीने ते रंगमंचावर वावरले. विनायकराव पटवर्धन यांच्या नेतृत्वाखालील भारतीय सांस्कृतिक प्रतिनिधी मंडळ सोव्हियेत संघ, पोलंड व चेकोस्लोव्हाकिया या राष्ट्रांचा दौरा करून आले होते. विनायकरावांना १९६५ मध्ये संगीत नाटक अकादमीची फेलोशिप मिळाली. १९७२ मध्ये त्यांना भारत सरकारच्या पद्मभूषण या पुरस्काराने गौरविण्यात आले.

- Advertisement -

विनायकराव पटवर्धन यांच्या गायनाने रागांकडे सोपा आणि सरळ दृष्टिकोन प्रतिबिंबित केला, जी ग्वाल्हेर घराण्याच्या शैलीचे वैशिष्ठ्य आहे. विनायकराव यांनी अशा क्षेत्रात विशेष कार्य केले जे देश-विदेशातील प्रेक्षकांसाठी लोकप्रिय ठरले. त्याच्या आवडत्या रागांमध्ये ‘बहार’, ‘अडाणा’, ‘मुलतानी’, ‘मल्हार’, ‘जयजयवंती’, ‘हॅमर’ आणि ‘भैरव-बहार’ यांचा समावेश होता. बहुतेक महत्वाच्या संगीत महोत्सवांमध्ये त्यांनी हे राग सादर केले. संगीतावर पाठ्यपुस्तके लिहिणार्‍या त्या काळातल्या काही अभ्यासू संगीतकारांपैकी ते एक होते. त्यांच्या सात भागांच्या ‘राग विज्ञान’ मालिकेत विनायकरावांनी विविध रागांचे महत्त्वाचे पैलू व त्यांचे वर्णन केले. 1972 मध्ये त्यांना भारताच्या राष्ट्रपतींनी पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. त्यांनी भारतीय सांस्कृतिक प्रतिनिधींचे नेतृत्व युएसएसआर आणि इतर देशांमध्ये केले. अशा या महान गायकाचे २३ ऑगस्ट १९७५ रोजी निधन झाले.

- Advertisement -