घरफिचर्सएशियाडमध्ये भारताला सुवर्णसंधी

एशियाडमध्ये भारताला सुवर्णसंधी

Subscribe

आशिया खंडातील सर्वात मोठी स्पर्धा मानल्या जाणार्‍या एशियाडला १८ ऑगस्टपासून जकार्ता येथे सुरुवात होणार आहे. एशियाडमध्ये आजवर भारताचे प्रदर्शन चांगले राहिले आहे. भारतीय खेळाडू या स्पर्धेत नेहमीच चांगला खेळ करतात. तसेच भारतीय खेळाडूंसाठी हे वर्ष चांगले राहिले आहे. काही नवे खेळाडू प्रकाशझोतात आले आहेत, तर काही जुन्या खेळाडूंनी आपले प्रदर्शन आणखी सुधारले आहे. त्यामुळे भारतीय क्रीडा चाहत्यांच्या खेळाडूंकडून अपेक्षा खूप वाढल्या आहेत. तर खेळाडूंना या अपेक्षांवर खरे उतरण्याची एशियाडमध्ये सुवर्णसंधी आहे.

इंचॉन येथे झालेल्या २०१४ एशियाडमध्ये भारताने एकूण ५७ पदकांची कमाई केली होती. जी म्हटली तर खूप आहेत; पण चीनच्या ३४५ पदकांच्या तुलनेत फारच कमी. त्यामुळे भारतीय खेळाडू आपले प्रदर्शन अजून सुधारण्यासाठी उत्सुक असतील हे निश्चित. त्यातच काही खेळांत भारताला हमखास पदक मिळण्याची अपेक्षा आहे. त्यापैकी एक म्हणजे कबड्डी.
आपल्या मातीतला खेळ कबड्डी इतर देशांनी आत्मसात करण्याचा प्रयत्न केला आहे. पण भारतीय संघ समोर येताच त्याचा खेळ फिका पडतो. मोठ्या स्पर्धांत भारतीय संघाला हरवणे फारच अवघड. मात्र, इराणने भारतीय संघाला टक्कर देण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांना भारताला हरवण्यात यश आलेले नाही. त्यामुळे चाहत्यांना कबड्डीमध्ये सुवर्ण पदकाची अपेक्षा आहे.

बॅडमिंटनमध्ये यावर्षी भारतीयांनी चांगला खेळ केला आहे. पी. व्ही. सिंधू यावर्षी बर्‍याच स्पर्धांच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहोचली; पण तिला एकही स्पर्धा जिंकण्यात यश आलेले नाही. त्यामुळे एशियाडमध्ये हे चित्र बदलण्याचा ती प्रयत्न करेल. हल्लीच झालेल्या जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्याही अंतिम सामन्यात ती खेळली होती. त्यामुळे ती चांगली फॉर्मात आहे. दुसरीकडे सायना नेहवालला नजीकच्या काळात चांगले प्रदर्शन करता आलेले नाही. तरीसुद्धा ती आपला खेळ योग्य वेळी उंचावण्यात सक्षम आहे. पुरूषांमध्ये पदक मिळवण्याची जबाबदारी किदाम्बी श्रीकांत आणि एच.एस.प्रणॉय यांच्या खांद्यावर असणार आहे.

- Advertisement -

तर हॉकीमध्येही भारतीय संघाकडून चांगल्या खेळाची अपेक्षा आहे. भारतीय पुरूष संघाने ४ वर्षांपूर्वी सुवर्ण पदकाची कमाई केली होती. तसेच त्यांनी हल्लीच झालेल्या मालिकेत न्यूझीलंडचा ३-० असा धुव्वा उडवला होता. त्यामुळे त्यांनी एशियाडसाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले होते.यावर्षी जर भारतीय क्रीडाप्रेमींसाठी सर्वात मोठा सुखद धक्का असेल तर ते म्हणजे भारतीय खेळाडूंचे अ‍ॅथलेटिक्समधील प्रदर्शन. युवा धावपटू हिमा दास, मोहम्मद अनास आणि भालाफेकपटू नीरज चोप्रा या नव्या दमाच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यामुळे त्यांना एशियाडमध्ये पदकासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे.

तसेच भारतीय कुस्तीपटूंकडूनही पदकाच्या अपेक्षा आहे. पुरूषांमध्ये संदीप तोमर आणि सुशील कुमार हे आपल्या वजनी गटात चांगले प्रदर्शन करू शकतील. पण खासकरून बजरंग पुनियाच्या या स्पर्धेतील प्रदर्शनावर सगळ्यांची नजर असेल. त्याने यावर्षी सलग तीन सुवर्णपदकांची कमाई केली आहे. त्यामुळे तो एशियाडमध्येही सुवर्ण पदक मिळवायचे प्रयत्न करणार हे निश्चित. तर महिलांमध्ये पिंकी, साक्षी मलिक या कुस्तीपटूंना पदक मिळविण्याची संधी आहे.
एकूणच भारतीय खेळाडूंनी यावर्षी दाखवलेले सातत्य जर एशियाडमध्येही दाखवले तर भारतीय चाहत्यांसाठी ही एशियाड स्पर्धा अविस्मरणीय राहील हे निश्चित.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -