बेफिकीरीचा विषाणू करोनाहून धोकादायक

प्रत्येकाने घरात बसूनच करोनाविरोधातील ही लढाई लढायची आहे. पोलीस किंवा वैद्यकीय यंत्रणेचे काम आपण वाटून घेऊ शकत नाही. मात्र त्यांचे काम वाढेल, असे वर्तन आपल्याकडून होता कामा नये. आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या रक्षणासाठीच पोलीस आणि डॉक्टर्स तसेच इतर सुरक्षा यंत्रणा त्यांचा जीव धोक्यात घालून करोनाविरोधातील या युद्धात सर्वात पुढे लढत आहेत. करोनाचे होणारे अदृश्य वार झेलत आहेत. अशा परिस्थितीत आपण त्यांचा तणाव आणि काम वाढवता कामा नये.

कोविड १९ मुळे जगावर संकट आलेले असताना अजूनही अनेकांना या आजाराचे गांभीर्य नाही. त्यामुळेच पोलिसांना अशा बेजबाबदारांना आवरण्यासाठी कठोर पावले उचलावी लागत आहेत. पुण्यात आणि ठाण्यातील रस्त्यांवर विनाकारण आपल्या मोटारसायकली फिरवणार्‍यांची वाहने ताब्यात घेण्याची कारवाई पोलिसांनी सुरू केली आहे. राज्यातील किंवा देशातीलच एकूण सुरक्षा यंत्रणा आणि पोलिसांनाही अशा साथीच्या फैलावाबाबत केल्या जाणार्‍या बंदोबस्ताची आणि उपाययोजनांचा हा पहिलाच प्रत्यक्ष अनुभव आहे. याआधी दंगली किंवा पुरासारख्या नैसर्गिक आपत्तीत काम करण्याचा अनुभव आणि आजाराशी थेट रस्त्यावर उतरून लढण्याची गरज यात मोठा फरक आहे. सद्य स्थितीत डॉक्टर आणि पोलीस या देशातील दोन घटकांवर मोठी जबाबदारी आहे. दवाखान्यात करोनाला संपवण्यासाठी डॉक्टर्स लढत आहेत. तर रस्त्यावरून करोनाचा फैलाव रोखण्यासाठी पोलीस सज्ज आहेत. अशा परिस्थितीत महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्था आणि सामाजिक संस्थांची साथही या यंत्रणांना मिळत आहे.

परंतु अशा परिस्थितीत आपली नागरीक म्हणून पहिली जबाबदारी हीच आहे की, या यंत्रणांना शक्य तेवढी मदत करणे, मग ही मदत कशी करावी…तर त्यासाठी आपल्याला रस्त्यावर उतरण्याची गरज नाही. प्रत्येकाने घरात बसूनच करोनाविरोधातील ही लढाई लढायची आहे. पोलीस किंवा वैद्यकीय यंत्रणेचे काम आपण वाटून घेऊ शकत नाही. मात्र त्यांचे काम वाढेल, असे वर्तन आपल्याकडून होता कामा नये. आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या रक्षणासाठीच पोलीस आणि डॉक्टर्स तसेच इतर सुरक्षा यंत्रणा त्यांचा जीव धोक्यात घालून करोनाविरोधातील या युद्धात सर्वात पुढे लढत आहेत. करोनाचे होणारे अदृश्य वार झेलत आहेत. अशा परिस्थितीत आपण त्यांचा तणाव आणि काम वाढवता कामा नये. परंतु ठाणे, नागपूर, पुणे तसेच राज्याच्या इतर भागातही रस्त्यावर मोकाट फिरणार्‍या झुंडी, दुचाकीस्वारांची फेरफटका मारण्याची हौस, आठवडी बाजार बंद करण्याचे प्रशासनाचे आदेश असतानाही असा बेकायदा बाजार भरवणारी मंडळी ही करोनाच्या बाजूने या लढाईत उतरली आहेत का, असा प्रश्न आहे.

नालासोपारासारख्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडवून बाजारात लोकांची गर्दी झाली. तर नाशिक आणि राज्यातील काही भागांत सकाळच्या वेळेत सकाळी फेरफटका मारण्यासाठी आलेल्यांना पकडण्यात आले. ही बेजबाबदारी जीवघेणी ठरण्याची भीती आहे. करोनाचा फैलाव होत असताना आणि महाराष्ट्र तिसर्‍या टप्प्याच्या उंबरठ्यावर असताना प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक टाकावे लागणार आहे. मुंबईसारख्या शहरात लोकसंख्येची दाटी असलेल्या धारावी, कोळीवाडा किंवा इतर ठिकाणीही करोनाचे संशयित रुग्ण सापडत आहेत. मुंबईची लोकसंख्या लक्षात घेता या गवताच्या गंजीवर बसलेल्यांनी आगीच्या ठिणगीचा धोका वेळीच ओळखण्याची गरज आहे. थोडासा बेजबाबदारपणाही धोकादायक ठरू शकतो. त्यासाठी सुरक्षा यंत्रणा आणि पोलीसही वारंवार आवाहन करून सांगत आहेत. घराबाहेर पडू नका, गर्दी करू नका, मात्र लोकांना त्यांच्या जीवापेक्षा फेरफटका मारण्याचे मोल मोठे वाटत आहे. भिवंडीमध्ये एका मशिदीतून काही आजारी माणसांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले.

दिल्लीच्या तबलिगी कार्यक्रमाला ही मंडळी गेली असल्याचा संशय आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीच्या प्रकरणाची पुनरावृत्ती महाराष्ट्रात व्हायला नको, असे स्पष्ट केले आहे. त्यासाठी तबलिगी कार्यक्रमासाठी गेलेल्यांनी स्वतःहून समाजापासून आणि कुटुंबापासून विलग राहावे आणि आपली माहिती सुरक्षा यंत्रणांना कळवावी, असे आवाहन केले आहे. मुंबईतही पाचशेपेक्षा जास्त व्यक्ती दिल्लीतील या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्याची शक्यता वर्तवली जात आहे. करोनाचे सावट असताना आणि समूहाचे कार्यक्रम आयोजित करणे धोक्याचे असताना दिल्लीतील कार्यक्रमाच्या आयोजकांनी ही गंभीर चूक केली आहे. ही पहिली चूक झाली, मात्र या कार्यक्रमातील सहभागी होणार्‍यांनी स्वतःची माहिती लपवून त्यापेक्षा मोठी गंभीर चूक सुरू केली आहे. त्यामुळे पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांवरील ताण वाढला आहे. दिल्लीतील जमातवाद्यांच्या कार्यक्रमात परदेशातील व्यक्तीही सहभागी झाल्याची माहिती आहे. राज्यातीलच नव्हे तर देशातील कानाकोपर्‍यातून या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी लोक गेले होते. त्यामुळे हा धोका सर्वदूर वाढला आहे.

असे असताना संबंधितांनी स्वतःहून सुरक्षा यंत्रणांना स्वतःची माहिती देऊन आपले नागरिक म्हणून देशकर्तव्य पार पाडायला हवे. यातील ज्या ज्या व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. ज्यांचा शोध लागला आहे. त्यांची कोविड १९ आजाराची तपासणी केल्यानंतर त्यातील अनेकजण हे निगेटिव्ह असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही, जरी यातील काही व्यक्ती स्थानिक संसर्ग झालेल्या तपासणीत आढळल्यास त्यांच्यावर वेळच्या वेळी उपचार करणे शक्य होईल. तातडीने आणि योग्य उपचार केल्यास करोनाला वेळीच रोखणे शक्य आहे. मात्र त्यासाठी नागरिक आणि एक सूज्ञ माणूस म्हणून जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. आणखी एका प्रकरणात ठाण्यातील वैद्यकीय व्यवसायात असलेल्या एका नागरिकाने त्याची मुलगी परदेशातून आल्यानंतरही याबाबतची माहिती स्थानिक प्रशासनाकडून लपवली. तसेच या व्यक्तीने त्यानंतर स्वतः काही रुग्णांवर नेहमीप्रमाणे तपासणी केली.

या प्रकरणातही ही बेजबाबदारी उघड झाली आहे. स्वतः डॉक्टर असल्याने याबाबतचे गांभीर्य आपल्याला नव्हते असे ही व्यक्ती म्हणू शकत नाही. हे प्रकरण उघड झाल्यावर आता त्याबाबत स्थानिक सुरक्षा यंत्रणांची धावपळ उडाली आहे. करोनाची तपासणी टाळण्यासाठी त्याची लक्षणे आढळू नयेत, म्हणून परदेशातून येणार्‍या प्रवाशांनी ताप किंवा सर्दी अशी लक्षणे मिटवणारी तात्पुरती औषधे घेतली असल्याची शक्यताही वर्तवली जात होती. ही स्वतःच्या आरोग्याची फसवणूक तर होतीच, सोबत ती समाज आणि देशाच्या विश्वासाचाही घात करणारी होती. या अशा बेजबाबदारांना कायद्यानुसार कठोर शासन व्हायलाच हवे, मात्र सध्या करोनाविरोधातील ही लढाई महत्त्वाच्या टप्प्यावर आली असताना आपल्या बेफिकीर वागण्याने करोनाला बळ मिळणार नाही, एवढी जरी काळजी इथल्या प्रत्येकाने घेतली तरी ते पुरेसे आहे.