घरफिचर्सभारतीय महिलांची गगन भरारी

भारतीय महिलांची गगन भरारी

Subscribe

जग बदलतंय, सत्तांतरणही होतंय, तंत्रज्ञानाप्रमाणे माणसं हायटेक होत आहेत. मात्र, महिलांची स्थिती बदलतेय का?, यावर आजही समाजात मत-मतांतरे आहेत. त्यामुळे एकीकडे महिला सबलीकरणाची चर्चा करायची, आणि दुसरीकडे महिला नेतृत्वाला नाकारायचे हे आजही घडत आहे. त्यामुळे स्त्रियांसाठी हे सरते वर्षे निश्चित सोपं नव्हतं. विशेषत: भारतीय महिलांसाठी संघर्ष कधी संपलाच नाही, पुरुष प्रधान संस्कृती जपणार्‍या भारतात आजही महिला केवळ चूल आणि मूल या पलीकडे मोठं काही करू शकत नाही, असा एक समज आहे. मात्र, या समजुती मोडीत काढत एक भारतीय महिला काय करू शकते हे 2021 या वर्षातील काही कर्तृत्वान महिलांनी दाखवून दिले. 2021 या वर्षात भारतीय स्त्रियांनी विविध आंतरराष्ट्रीय क्षेत्रात कर्तृत्व गाजवलं.

भारतात 2021 मध्ये महिलांसाठी एक चांगली गोष्ट घडली म्हणजे भारतीय महिलांना केवळ सार्वजनिक जीवनातच नव्हे तर लष्कराच्या महत्वाच्या संस्थांमध्ये संधी देण्यात आली. राष्ट्रीय संरक्षण अकादमीमध्ये आणि नौदलात महिलांना काम करण्याची संधी देण्यात आली. त्यामुळे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आता भारतीय महिला देशाच्या रक्षणासाठी कार्य करणार आहेत. महिलांसाठी या आनंददायी घटनेपाठोपाठ वर्षाच्या शेवटाला पंजाबी गुडी हरनाज संधू या भारतीय सौंदर्यवतीने जवळपास 21 वर्षांनंतर भारताला मिस युनिव्हर्स 2021 ताज जिंकवून दिला. त्यामुळे भारतासाठी ही घटना खुपच अभिमानास्पद आहे. पंजाबच्या चंढीगडमध्ये जन्मलेली हरनाज हीदेखील एका सामान्य मुलीप्रमाणे जीवन जगत होती. मात्र, मॉडेलिंग क्षेत्रातील आवड आणि त्यासाठी घेतलेल्या मेहनतीमुळे हरनाज संधू आज भारतासाठीच नाही तर जगासाठी रिअल ब्युटी आयकॉन ठरली आहे.

- Advertisement -

भारताच्या आणखी एका महिलेने जागतिक स्तरावर भारताचे नाव अभिमानाने उंचावले. त्यांचं नाव आहे लीना नायर. फॅशन जगताशी निगडीत असलेल्या शेनेल लक्झरी फॅशन ब्रँडबद्दल तुम्ही कधी ना कधी ऐकलं असेलच. लीना नायर याच कंपनीच्या ग्लोबल चीफ एक्झिक्युटिव्ह बनल्या आहेत. त्यामुळे एखाद्या कंपनीच्या जागतिक स्तरावर सीईओ पद मिळवणार्‍या इंद्रा नुई यांच्यानंतर भारतीय वंशाच्या लीना नायर दुसर्‍या महिला ठरल्या आहेत. लीना नायर या मूळच्या कोल्हापूरच्या असून 2013 मध्ये त्या लंडनला स्थायिक झाल्या.

आर्थिक क्षेत्रातही 2021 मध्ये भारतीय महिलांनी मोठी भरारी घेतली. जागतिक स्तरावरील सर्वात आघाडीच्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटनेच्या मुख्य अर्थतज्ज्ञ म्हणून भारतीय-अमेरिकन गीता गोपीनाथ यांची निवड करण्यात आली. गोपीनाथ या 21 जानेवारीला आयएमएफच्या पहिल्या उपव्यवस्थापकीय संचालकपदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. शिकागो विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. त्यांनी 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ज्ञ म्हणून जबाबदारी सांभाळली होती. हॉर्वर्ड विद्यापीठात जॉन झ्वान्स्त्र आंतरराष्ट्रीय अभ्यास, अर्थशास्त्राच्या प्राध्यापक होत्या. हॉवर्डने त्यांना अधिकची 3 वर्षे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये सेवा करण्याची संधी दिली.

- Advertisement -

रोजच्या जगण्यात गणिताशी जरी थेट संबंध येत असला तरी या विषयाची अनेकांनाच भीती वाटते. मात्र, याच विषयाचा ध्यास घेत, पाठपुरावा करत नीना गुप्ता या भारतीय महिलेने प्रतिष्ठीत ‘रामानुजन युवा गणितज्ञ पुरस्कार’ जिंकला. बीजगणितीय भूमिती आणि ‘कम्युटेटिव्ह अल्जेब्रा’ या विषयांत त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची जागतिक पातळीवर दखल घेण्यात आली. गणित क्षेत्रात ठसा उमटवणार्‍या 24 वर्षांखालील तरुण गणितज्ञांना आंतरराष्ट्रीय स्तरावर रामानुजन पुरस्कार दिला जातो. यंदा या पुरस्काराने भारतीय महिला नीना गुप्ता यांना सन्मानित करण्यात आले.
जानेवारी 2021 साली स्थापन झालेल्या अमेरिकेच्या बायडेन प्रशासनात अनेक भारतीय वंशाच्या महिलांना संधी देण्यात आली. यात सर्वाधिक चर्चेत असलेले नाव म्हणजे कमला हॅरिस. कमला हॅरिस या अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्रपती बनल्या. कमला हॅरिस यांच्या आई मूळ भारतीय आहेत. त्यामुळे कमला हॅरिस यांचे नाते भारताशी जोडले जाते. यापाठोपाठ भारतीय वंशाच्या नीरा टंडन यांच्यासह जवळपास 13 भारतीय वंशाच्या महिलांना बायडेन प्रशासनात स्थान देण्यात आले.

संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाच्या सहाय्यक सरचिटणीसपदीही एक भारतीय महिला विराजमान झाली. ही भारतीय अर्थशास्त्रज्ञ म्हणजे लिगिया नॉरोन्हा. लिगिया नॉरोन्हा यांनी आजवर शाश्वत विकास क्षेत्रातील विकासावर अनेक भरीव कामगिरी केली. त्यांच्याकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करण्याचा 30 वर्षांचा एक तगडा अनुभव आहे. दी एनर्जी अँड रिसोर्स इन्स्टिट्यूटमध्ये कार्यकारी संचालिकेपासून ते यूएनईपीच्या आर्थिक विभागात संचालिका म्हणून त्यांनी काम पाहिले. तसेच त्यांनी संसाधन, नियमन आणि ग्लोबल सिक्युरिटी सेक्शनच्या संचालिका म्हणूनही काम पाहिलं आहे.
खेड्यापाड्यात वाढलेली एक सावित्रीची लेक काय करू शकते हे बारामतीच्या डॉ. अनुपमा जगन्नाथ हिंगणे हिने सिद्ध केले. डॉ. हिंगणे या कन्येला ऑस्ट्रियाच्या व्हिएन्नामधील युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेनच्या इंटरनॅशनल अ‍ॅटॉमिक एनर्जी एजन्सी या संस्थेमध्ये शास्त्रज्ञ म्हणून काम करण्याची मोठी संधी मिळाली.

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय महिलांची सर्वोत्तम कामगिरी पाहायला मिळाली. ऑलिम्पिकमधील अनेक पदकांवर भारतीय महिलांनी आपले नाव कोरले. यंदा ऑलिम्पिक स्पर्धेच्या सुरुवातीलाच भारतीय मीराबाई चानूने वेटलिफ्टिंगमध्ये पहिले रौप्यपदक जिंकून इतिहास रचला. यानंतर भारतीय कन्या पी. व्ही. सिंधूने बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर 2021 फायनलमध्ये रौप्यपदक जिंकले. तर ऑलिम्पिकच्या बॅडमिंटन स्पर्धेत कांस्यपदक पदक जिंकत भारताची मान अभिमानाने उंचावली. दोन वैयक्तिक पदके जिंकणारी सिंधू ही पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली. यापाठोपाठ अंजू बॉबी जॉर्ज हिने जागतिक अ‍ॅथलेटिक्सचा वुमन ऑफ द इयर पुरस्कारावर आपले नाव कोरले. भारतीय नेमबाज अवनी लेखरा हिनेही टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये पहिले सुवर्णपदक जिंकले. पॅरालिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी अवनी ही पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली. याशिवाय जागतिक कॅडेट कुस्ती स्पर्धेत भारताच्या प्रिया मलिकने सुवर्णपदक जिंकले. तर जागतिक कुस्ती स्पर्धेत रौप्यपदक जिंकणारी अंशू मलिक ही पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली.

त्यामुळे संघर्ष, कर्तृत्व, निर्धार आणि स्वतंत्र वृत्तीच्या जोरावर 2021 मध्ये अनेक भारतीय महिलांनी देशाला अभिमान वाटेल, असे कार्य केले. मात्र, या दशकात महिलांनी कोणत्या संधी गमावल्या, यातून शिकताना पुढचा मार्ग कसा पाहिजे, यावर लक्ष देणे आवश्यक आहे. मात्र, सरत्या वर्षातील स्त्रियांचे विविध क्षेत्रातील योगदान पाहता हे नव वर्ष महिलांसाठी अधिक समृद्धीचे असेल अशीच आशा!


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -