घरमहाराष्ट्रनाशिकआंतरराष्ट्रीय ‘लेफ्ट हॅण्डर्स डे’ विशेष : डावखुरेच ‘राईट’; नाशकात अभिनव चळवळ

आंतरराष्ट्रीय ‘लेफ्ट हॅण्डर्स डे’ विशेष : डावखुरेच ‘राईट’; नाशकात अभिनव चळवळ

Subscribe

नाईक शिक्षण संस्थेच्या नयना आव्हाड करतात चौदा वर्षांपासून जनजागृती

आपल्या बाळाच्या नटखट हालचाली प्रत्येक पालकाला हव्याहव्याशा वाटतात.. पण बाळ मोठे होते, ते हातात पेन्सिल धरू लागते तेव्हा मात्र पालकांचे लक्ष प्रथमत: त्याच्या हाताकडे जाते. तो उजवा असला तर सुटकेचा नि:श्वास सोडला जातो. पण डावखुरा असल्यावर मात्र ते कमालीचे अस्वस्थ होतात. त्यानंतर सुरु होते डावखुर्‍याला उजवा करण्याची धडपड. पण त्यामुळे मुलाचे मानसिक खच्चीकरण होऊ शकते, याची कल्पना देखील नसते. हीच कल्पना देण्याचे काम नाशिकमधील व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेच्या नयना प्रमोद आव्हाड या गेल्या चौदा वर्षांपासून अव्याहतपणे करीत आहेत. त्यासाठी त्यांनी लेफ्ट हॅर्ण्डस क्लबची स्थापनादेखील केली आहे.

नवीन नाशिक येथील हिंदी माध्यमिक विद्यालयात शिक्षीका म्हणून कार्यरत असलेल्या नयना आव्हाड यांची एकुलती एक कन्या सिद्धी ही डावखुरी. तिला वाढवताना डावखुरे लोकांना नेमक्या कोणत्या समस्या भेडसावतात याची जाणीव त्यांना झाली. या समस्यांच्या सोडवणुकीसाठी त्यांनी संबंधित विषयांच्या पुस्तकांचे वाचन वाढवले. त्यातून काही मार्ग सापडले. हे मार्ग आपल्या पुरतेच मर्यादीत न ठेवता त्यांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना आणि पालकांना विशेष मार्गदर्शन करण्याचे काम हाती घेतले. यासाठी त्या पालकांशी वेळोवेळी संवाद साधतात. शाळेतील डावखुर्‍या विद्यार्थ्यांच्या पालकांशी चर्चा करुन डावखुरेपणाचे महत्व विशद करतात. इतकेच नाही तर प्रत्येक 13 ऑगस्टला डावखुरे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून त्या विशेष कार्यक्रमही घेतात.

- Advertisement -

ऑक्सफर्ड विद्यापीठातील संशोधक अँड्रू्यू ब्रिस्टॉल आणि हॉलंडमधील मॅक्स ब्लॅक इन्स्टिट्यूटमधील संशोधकांच्या संशोधनानुसार गर्भाशयामध्ये विकसित होत असलेल्या गर्भाच्या गुणसूत्रात असमतोलपणा निर्माण झाल्यास त्याचा परिणाम संबंधित व्यक्ती डावखुरी किंवा उजवी होण्यावर होतो. मेंदूला डावे व उजवे यातील फरक जाणून घेण्यासाठी गुणसूत्रांची मदत होते. जगात जवळपास 90 टक्के लोक हे उजवे आहेत पण यामागील कारण अद्याप गुढ आहे. गुणसूत्रांचा जैविक प्रक्रियेमध्ये महत्त्वाचा सहभाग असतो. गर्भाशय हे पेशींनी तयार झालेला एक पुंजका असतो. यात गर्भ विकसित होताना उजवा किंवा डावखुरा होत असतो. डावे किंवा उजवे ठरवण्याची प्रक्रिया ही ‘पीसीएसके-६’ या गुणसूत्रावरून ठरत असते. हे गुणसूत्र अस्थिर असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. या गुणसूत्रावर झालेल्या संशोधनातून अनेक बाबी उघड झाल्या आहेत. शरीरात विचित्र परिस्थिती निर्माण होण्यास हे गुणसूत्र कारणीभूत असते. काही जणांचे हृदय उजव्या बाजूला आणि यकृत डाव्या बाजूला असल्याच्या घटना दिसून येतात. त्याला ‘पीसीएसकएस-6 हे गुणसूत्र कारणीभूत असल्याचे मत संशोधकांनी व्यक्त केले आहे.

नयना आव्हाडांनी नोंदवलेली निरीक्षणे

  • नृत्य करताना (भरतनाट्यम किंवा कथन) बर्‍याच स्टेप्स उजव्या बाजूने शिकवल्या जातात. डावखुर्‍यांना या स्टेप्स करणे अवघड जाते.
  • शाळा-महाविद्यालयातील खुर्चीचा डेस्कवर लिहिण्यासाठीची जागा उजव्या बाजूने असते. त्यामुळे डावखुर्‍यांना या डेस्कवर लिहीतांना अडचण येते.
  • प्रसाद घेणे, आचमण करणे, आरती ओवाळणे यांसारख्या धार्मिक क्रिया उजव्या हाताने कराव्यात असे मानले जाते. अशा वेळी डावखुर्‍यांची फजिती होते.
  • डाव्या हाताने लिहिणार्‍यांचा हात शब्दांवरुन फिरतो. त्यामुळे अक्षर पुसण्याची वा धुसर होण्याची शक्यता असते.
  • शाळेत बेंचवर उजव्या बाजूला बसल्यास विद्यार्थ्यांच्या उजव्या हातास संबंधितांच्या डावा हात लागू शकतो.
  • हस्तांदोलन करताना समोरचा माणूस उजवा हात पुढे करतो. डावरी माणसं आपला डावा हात पुढे करतात. तेव्हा गोंधळ उडतो.
  • सर्वच यंत्र आणि साहित्यांची रचना उजव्या हात वापरणार्‍यांच्या सोयीची केलेली असते. त्यामुळे डावखुर्‍यांना काम करताना वेळ लागू शकतो.
  • वाहनाची बनावट उजव्यांसाठीच असते. त्यामुळे डावखुर्‍यांना वाहन चालवताना अडचण येऊ शकते.

या उपाययोजना शक्य

  •  सगळी मुले एकत्र असताना जाणीवपूर्वक ‘डावखुरे किती आहेत’ याची गणना करावी. त्यामुळे आपल्यासारखे बरेच आहेत, याचा संबंधितांना अंदाज येईल.
  • डावखुर्‍या विद्यार्थ्यांना शाळेत बाकाच्या डावीकडे बसवावे
  • लिहिताना कागद रेषेच्या डावीकडे धरावा. तो उजवीकडे कललेला असावा. पेन्सिल किंवा पेनाची पकड उलटी नसावी.
  • डावखुर्‍या मुलांना उंचावर बसवले की त्यांना स्वत: लिहिलेले वाचायला सोपे जाते.
  • डावखुर्‍या बालकांना जेवणाचे थोडे अधिक प्रशिक्षण द्यावे.

नामवंत डावखुरे

महात्मा गांधी, बराक ओबामा, चार्ली चॅप्लीन, सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, युवराज सिंग, सौरव गांगुली, जहीर खान, इरफान पठाण.

- Advertisement -

डावखुरेपणाविषयीचे गैरसमज दूर व्हावेत

प्रत्येक वर्गात साधारणपणे तीन ते चार डावखुरे विद्यार्थी असतात. माझ्या अनुभवानुसार डाव्या हाताने काम करणार्‍यांचा उजवा मेंदू मुळातच तल्लख असतो. त्यामुळे अशी माणसं भावनाप्रधान आणि कल्पक असतात. डावखुरेपणाविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठी मी प्रयत्न करते. गेल्या तीन वर्षांपुर्वी मी डावखुर्‍यांचा क्लब स्थापन केला आहे. त्यात डावखुरेपणावर चर्चा होते. – नयना आव्हाड, शिक्षिका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -