घरफिचर्सपौरुषत्वाचा खरा अर्थ जाणून घ्या!

पौरुषत्वाचा खरा अर्थ जाणून घ्या!

Subscribe

समाज पुरुषाला अजूनही एका चौकटीत बसवतोच. आपल्याला पुरुष स्त्रीचा सन्मान करणारा हवा, तिला स्वातंत्र्य देणारा हवा, कधी तिच्यासाठी लढणारा तर कधी ती लढत असताना तिला बळ देणारा, कधी तिचे डोळे पुसणारा तर कधी चार चौघात तिला स्वतःची लढाई लढू देणारा हवा, मुलींची काळजी घेणारा बाबा हवा आणि त्यांना मोकळीक देणारा मित्रही हवा, मुलाला रडलं म्हणून न हिणवता समजवून घेणारा बाबा हवा आणि त्याला पुरुषार्थाचा खरा अर्थ समजवून सांगणारा पुरुषही हवा!

१९ नोव्हेंबर हा जागतिक पुरुष दिन! ह्या दिवसाची मूळ संकल्पना Thomas Oaster ह्यांची . १९९२ साली ७ फेब्रुवारी रोजी जागतिक पुरुष दिन साजरा करण्यात आला. पुढे Dr. Jerome Teelucksingh ह्यांनी १९ नोव्हेंबर ही तारीख पक्की केली आणि मग IMD ( International Men’s Day ) जगभरात साजरा केला जाऊ लागला. भारतामध्ये २००७ सालापासून हा दिवस साजरा केला जातो. खरं पाहता एकूणच महिला दिन , पुरुष दिन वगैरे साजरे करून लिंग समानता साध्य होते का हा वादाचा मुद्दा होऊ शकतो; पण त्या पलीकडे जाऊन ह्या पुरुषांचे, मुलांचे प्रश्न सोडवणे, लिंग समानता प्रस्थापित करणे आणि मुलगा, पुरुष म्हणून समाजामध्ये कित्येकदा ह्या जेंडरला कलंक लावला जातो तो पुसून काढण्याचा प्रयत्न करणे असा हा दिवस साजरा करण्यामागचा अजेंडा आहे.

कुठल्याही जेंडरला एका विशिष्ट अँगलमधून बघणं मला नेहमीच गैर वाटत आलं आहे. जसं की सगळ्याच बायकांवर अत्याचार होतो किंवा बायकांना हवं तसं स्वातंत्र्य हा समाज देत नाही.तसंच सगळेच पुरुष अत्याचारी असतात किंवा बायकांचं चारित्र्यहनन करतात वगैरे. असं जनरलाईज्ड स्टेटमेंट बर्‍याचदा सहज आपण करून जातो. आजकाल बायकांना बर्‍यापैकी मोकळीक मिळते आहे (हा वादाचा मुद्दा होऊ शकतो कारण शहरी बायका, ग्रामीण बायका, किती टक्के बायकांना अशी मुभा आहे, त्या खर्‍या अर्थाने स्वतंत्र आहेत का असे अनेक मुद्दे आहेतच) बाई आणि पुरुष हे दोन्हीही जेंडर इव्हॉल्व होत आहेत. जशी बायकांची मानसिकता बदलते आहे तशी पुरुषांचीही बदलते आहेच की. जसं बायकांच्या प्रश्नांवर आपण बोलतो, लिहितो तसं जर आपण खरंच जेंडर इक्वेलिटी मानत असू तर पुरुषांच्या प्रश्नांवर बोलणं तितकंच गरजेचं नाही का? भले प्रमाण कमी असो पण शेवटी मुलांच्या, पुरुषांच्या बदलत्या मानसिकतेबाबत, इव्होल्यूशन बाबत सजगता येणंही गरजेचं आहेचकी.

- Advertisement -

पालकत्वाच्याबाबतीत बोलायचं झालं तर जसं मुलीला वाढवताना चॅलेंजेस आहेत तसं मुलाला वाढवतानाही आहेतच. मुलाला समंजस, जबाबदार, संवेदशील बनवताना त्याच्या मूळ पुरुषी स्वभावाला जपणं ही तसं पाहता अवघड गोष्ट. रडू येणं, भीती वाटणं ह्या सगळ्या नैसर्गिक उर्मी आहेत हे समजावून सांगताना निडरता, करारी वृत्ती हेही असणं गरजेचं आहे हेही अवघडच. समाज पुरुषाला अजूनही एका चौकटीत बसवतोच. आपल्याला पुरुष स्त्रीचा सन्मान करणारा हवा, तिला स्वातंत्र्य देणारा हवा, कधी तिच्यासाठी लढणारा तर कधी ती लढत असताना तिला बळ देणारा, कधी तिचे डोळे पुसणारा तर कधी चार चौघात तिला स्वतःची लढाई लढू देणारा हवा, मुलींची काळजी घेणारा बाबा हवा आणि त्यांना मोकळीक देणारा मित्रही हवा, मुलाला रडलं म्हणून न हिणवता समजवून घेणारा बाबा हवा आणि त्याला पुरुषार्थाचा खरा अर्थ समजवून सांगणारा पुरुषही हवा!

किती अपेक्षा असतात आपल्या पुरुषांकडून! बायकोला स्वयंपाकात मदत करणारा, मुलीची वेणी घालून देणारा, मुलाबरोबर दंगा मस्ती करणारा, मैदानी खेळ खेळणारा, बायको पोरींबरोबर तासन्तास शॉपिंगच्या बॅगा सांभाळत फिरणारा, रविवारी भाजी घेऊन येणारा, मुलीचा मित्र बनून राहणारा, पोरगी वयात आल्यावर तिच्या मित्रांमुळे मनातून इन्सिक्युअर झालेला; पण बाहेरून तसं न दाखवता कुल बाबा म्हणून वावरण्याचा प्रयत्न करणारा, बायकोचं कामाच्या ठिकाणी होणारी प्रमोशन मनापासून सेलिब्रेट करणारा, बायकोला तिच्या कामात पाठिंबा देणारा, बायको मुलीने त्यांना हवं तसे कपडे घातल्यानंतर त्यांच्याकडे हपापल्या नजरेने बघणार्‍या इतर लंपट पुरुषांकडे दुर्लक्ष करायला शिकणारा, तू तर बायकोला घाबरतो अशा कुजकट कमेंट हसत हसत स्वीकारणारा, बायकोचं स्वत्व जपणारा,बायकांवर होणार्‍या बलात्काराची, छळाची बातमी ऐकून शरमेने मान खाली घालणारा, मुलीशी पाळीपासून ते वयात येतानाच्या शारीरिक बदलांवर चर्चा करणारा, समाज बदलू पाहणारा, मूल गर्भात न वाढवता त्याच्यावर जीवापाड प्रेम करू शकणारा, स्वतः वेगळा असूनही बायकांकडून सतत अपराध्याच्या नजरेतून पाहिला जाणारा, स्वतःच्या मुलाला आपल्या वर्तनातून एक चांगला म्हणून व्यक्ती घडवू इच्छिणारा, बाईला तिच्या शरीरापलीकडे बघू शकणारा अशा कित्येक छटा आहेत पुरुषाच्या आयुष्यातही. जरा कुठे तो सोशिक झाला, संवेदनशील झाला तर त्याच्या पौरुषत्वावर बोट ठेवणारा समाज आहे हा. ह्या सगळ्यामध्ये तो जेव्हा आपल्या बायकोला, मुलीला वा मुलाला एक माणूस म्हणून बघू पाहतो, घडवू पाहतो तेव्हा तोही प्रवाहा विरुद्ध जातोच की!त्याची होणारी घुसमट, चौकटी बाहेर जाताना केलं जाणारं हसं ह्या सगळ्यांमधून जाताना होणारा मनस्ताप आणि ह्या परिस्थितीतही कुठेही न डगमगता, असह्य न होता एक पुरुष म्हणून केल्या जाणार्‍या साहसाची अपेक्षा… हे अतीच ना? कधी समंजसपणा दाखवायचा, कधी एक पाऊल मागे घ्यायचं, कधी आधार द्यायचा कधी मोकळीक द्यायची हे सगळं कसं काय बुवा मॅनेज करत असतील पुरुष? असं मला एक स्त्री म्हणून खूपदा वाटतं.

- Advertisement -

तसं बघायला गेलं तर बाईला खर्‍या अर्थाने परिपूर्ण करतो तो पुरुषच आणि पुरुषाला बाई! दोघांना एकमेकांची तितकीच गरज आहे. स्वतःचं पौरुषत्व उमगलेला पुरुष बाईचं आयुष्य अक्षरशः उमलू शकतो, उजळवू शकतो. जेव्हा एका स्त्रीला असा जोडीदार मिळतो तेव्हा एक वेगळंच तेज तिच्या सभोवताली असतं . इतका महत्त्वाचा आहे पुरुष प्रत्येक बाईच्या आयुष्यात. आजचा हा लेख अशा तमाम पुरुषांसाठी ज्यांना पौरुषत्वाचा खरा अर्थ उलगडला आहे, जे कुठेही पुरुषी अहंकार न बाळगता वागू शकतात, जे तिला चुका करू देतात आणि वेळ प्रसंगी सावरूनही घेतात, ज्यांना जेंडर इक्वेलिटी हवी आहे आणि जे स्त्रीचं चारित्र्य, शरीर ह्या पलीकडे जाऊन एक माणूस म्हणून तिला बघू शकतात. आमच्या आयुष्यात असलेल्या अशा सजग आणि विचारी पुरुषांना पुरुष दिनाच्या शुभेच्छा!

सानिया भालेराव

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -