घरफिचर्सइराणी हॉटेल्स

इराणी हॉटेल्स

Subscribe

मुंबईचं बदलतं समाज जीवन, राजकारण, अर्थकारण, औद्योगिकीकरण, शैक्षणिक घडामोडी यांचे जिवंत साक्षीदार म्हणजे इराणी हॉटेल्स. जागतिकीकरणाच्या गदारोळात नव्वदीच्या दशकात या इराणी हॉटेलांनी माना टाकल्या. हॉटेलच्या जागेचे भाव करोडोंच्या घरात गेले. नवी पिढी हॉटेल्सच्या धंद्यात रमेना, त्यांना परदेशाची ओढ लागली. जुनी इराणी हॉटेल्स जाऊन तिकडे मोठमोठी रेस्टॉरंट झाली आणि मुंबईची एकेकाळी असणारी मध्यमवर्गीय संस्कृती लोप पावली.

मुंबई सोडून आलो आणि बर्‍याच गोष्टींना मुकलो, असं म्हणायला हरकत नाही. जेव्हा उपनगरात राहायला आलो तरी जुनी मुंबई नेहमी संपर्कात राहिली ती मी शिकत असलेल्या कॉलेजमुळे. पण कॉलेज संपलं आणि नवी मुंबईकर झालो आणि मुंबईशी होता नव्हता तेवढा देखील संपर्क तुटला. क्वचित कधीतरी जुन्या मुंबईत जाणं होतं तेव्हा त्या आठवणी डोळ्यासमोर तरळून जातात. म्हणजे मॉलसंस्कृती मुंबईत मूळ धरत नव्हती तेव्हाची जुनी सिनेमा थिएटर्स, त्या थिएटर्सच्या बाहेर सिनेमाची तिकिटे घेण्यासाठी लागलेली रांग, त्या रांगेतून तीस का चालीस करत हमखास फिरणारे ब्लॅकवाले. आमच्यासारखे कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थी शेवटची लेक्चर्स बंक करून एखाद्या भिडूला तिकीट काढायला पुढे पाठवून तिकीट पदरात पाडून फस्ट शो सिनेमा बघणारे. या सर्वात अजून एक गोष्ट अधोरेखित करावीशी वाटते ती म्हणजे सिनेमा बघून झाल्यावर त्या सिनेमावर चर्चा करायला आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना आश्रय देणारी इराणी हॉटेल्स.

दिल्लीपासून ते गल्लीपर्यंतच्या राजकारणाची चर्चा असो, काल झालेल्या वन डे मॅचची चर्चा असो किंवा एखाद्या भाईने दुसर्‍या दादाला कसं टपकवलं या विषयांची तासन्तास केवळ एका चहाच्या मोबदल्यात चर्चा करण्याचे ठिकाण म्हणजे नाक्यावरची इराणी हॉटेल्स. काळ्या किंवा पांढर्‍या संगमरवरी दगडाची चकचकीत टेबले आणि त्याच्या बाजूला तितक्याच टापटीप काळ्या शिसवी रंगाच्या खुर्च्या या त्या हॉटेल्सची वैभवी परंपरा. टेबलावर गरगर फिरणारा तो जुन्या स्टाइलचा पंखा कितीही वेळ बसा तरी बंद होत नसे, या हॉटेल्सच्या भिंतीवर कामाशिवाय बसू नये, असा कडक शिस्तीचा बोर्ड कधी लावला नसे. किंवा आजचा मेनू हा लक्षवेधी बोर्डदेखील कधी दिसत नसे. इराणी हॉटेल्समध्ये मिळणारे पदार्थ म्हणजे पाणीकम चहा, मस्का ब्रेड, फारतर केक, पारलेची बिस्किटं. हे सगळे पदार्थ त्या हॉटेलच्या काचेच्या कपाटात ठेवलेले असत आणि त्या कपाटात वरून साठचा एक बल्ब सोडलेला असायचा. म्हणजे इराणी हॉटेल्सच्या व्यवहारात असणारी पारदर्शकता जिज्ञासूंच्या लक्षात आली असेल.

- Advertisement -

मी कॉलेजमध्ये शिकत असताना अनेक एकांकिकेचे वाचन या हॉटेलात बसून केले होते, त्या एकांकिकेवर चर्चा करताना तीन चार तास सहज निघून जायचे तोपर्यंत समोरचा चहा आणि बनमस्का कधीच संपून गेलेला असायचा. काहीवेळा तर स्वतः हॉटेलचा मालक आमच्या समोरची खुर्ची घेऊन एकांकिका ऐकायला बसे. अंगात सफेद बिनबाह्याचा सदरा खाली लेंगा आणि डोक्याला पारशी टोपी घालून तो मालक बसायचा आणि ये डिकरा वाच ना वाच, काय लिवला ता वाच ना … म्हणायचा. त्या मराठी एकांकिका त्याला किती समजतं हे कळायला मार्ग नसे, पण वाचन संपल्यावर आम्हाला मिळणारी दाद आणि सूचना या ऐकून या इराण्याला मराठी कळत असावं हा अंदाज आला. बरीचशी इराणी मंडळी हिंदी सिनेमा बघायला गर्दी करायची. गाण्या बजावण्यात तर ही मंडळी शौकिन. पूर्वी म्हणे या इराण्याच्या हॉटेलमध्ये ग्रामोफोनसारखं एखादं यंत्र बसवलेलं असायचं, एखादा गिर्‍हाईक यायचा आपल्याला हवं असलेलं गाणं लावण्यासाठी त्या यंत्रात पैशाचं नाणं टाकायचा आणि इराणी चहाचा आस्वाद घेत गाणी ऐकत बसायचा. रेडिओ किंवा टीव्ही येण्याअगोदर मुंबईतील लोकांची करमणूक करायची असा जणू या इराणी हॉटेलांनी विडाच उचलला होता.

शंभर एक वर्षांपूर्वी इराणी इलाख्यात झालेल्या दुष्काळानंतर इथले काही इराणी मुंबईत आले. प्रथम त्यांनी कामाठीपुरात बेकरी सुरू केली. पुढे या बेकरीतील खाद्यपदार्थ विकण्यासाठी बहुतेक हॉटेल्स सुरू केली असावीत. एकूण मुंबईतल्या इराणी हॉटेलची त्याकाळची संख्या बघता निम्मी हॉटेल दादर-परळ भागात होती. मुंबईतल्या नाक्यावर कोपर्‍यात एखादं तरी इराणी हॉटेल सापडायचं. इराणी लोकांमध्ये कोपर्‍यातील जागा शुभ मानतात. आम्हाला प्रश्न पडायचा हा इराणी चहा एवढा घट्ट का होतो? यावर आमच्यातील कोणीतरी पूर्वीआधी कधी पडलेली मिथ प्रस्तुत करायचा आणि म्हणायचा हे इराणी चहामध्ये अंड्याचा बलक टाकतात म्हणून चहा घट्ट होतो, पण ही मिथ खरी नसल्याची पुढच्या घटकेला नांदी मिळायची. त्याकाळी फ्रीज ही चैनीची वस्तू कुठे नाही, पण इराणी हॉटेलात जरूर दिसायची. महिन्याच्या सात तारखेला कामगार वर्गाचे पगार झाले की इराणी हॉटेलातून आपल्या मुलाबाळांसाठी आईस्क्रीम इथूनच घेतले जाई.

- Advertisement -

भारताची क्रिकेटची मॅच असेल तर इराणी हॉटेलात तर चिक्कार गर्दी व्हायची, रेडिओवर कॉमेंट्री ऐकण्यासाठी इराणी हॉटेल जीवाचं कान करायचं. एखाद्यावेळी हमरीतुमरीवर येऊन चर्चा रंगात यायची. आपला संघ जिंकला की कोणीतरी दानशूर आजकी चाय मेरे तरफसे म्हणत आनंद व्यक्त करायचा. हे इराणी वृत्तीने मुळचेच खूप गोड म्हणावे असे. यांनी इराण सोडलं, पण जन्माची गाठ मात्र इराणशीच कायम म्हणजे या इराणी हॉटेलची नावं बघितली तर पारशीन किंवा कयानी. मुंबईतल्या एकाच एरियात डझनभर या नावाची हॉटेल्स पूर्वी पहायला मिळायची. कयानी म्हणून पूर्वी इराणचा कोणी राज्यकर्ता होता, त्याच्याच नावानं ही हॉटेल चालायची. एखादा गिर्‍हाईक इराणी हॉटेलमध्ये चहा पिता पिता मध्येच तिथल्या वेटरला स्वतःसाठी सिगारेट आणायला पाठवायचा, तेव्हा तो वेटर बरोबर त्या गिर्‍हाईकाचा ब्रँड घेऊन यायचा, सोबत उरलेले पैसे आणि त्याला लागणारी आपल्याकडची काडेपेटी समोर धरायचा.

रात्रीच्यावेळी घरातला साबण, काडेपेटी संपले की नाक्यावरच्या इराण्याकडे ती मिळण्याची सोय होती, एकूण मुंबईच्या क्रायसेस सिच्युएशनला ही इराणी हॉटेल्स कामाला यायची. कधीकधी ही मुंबईतली इराणी हॉटेल बदनाम व्हायची. एखाद्या भाईला मारायचा प्लान अमुक अमुक इराण्याच्या हॉटेलात झाला, हे कळताच या हॉटेलांवर गिर्‍हाईक काट मारत असे.

मुंबईचं बदलतं समाजजीवन, राजकारण, अर्थकारण, औद्योगिकीकरण, शैक्षणिक घडामोडी यांचे जिवंत साक्षीदार म्हणजे ही इराणी हॉटेल्स. जागतिकीकरणाच्या गदारोळात नव्वदीच्या दशकात या इराणी हॉटेलांनी माना टाकल्या. हॉटेलच्या जागेचे भाव करोडोंच्या घरात गेले. नवी पिढी हॉटेल्सच्या धंद्यात रमेना, त्यांना परदेशाची ओढ लागली, जुनी इराणी हॉटेल्स जाऊन तिकडे मोठमोठी रेस्टॉरंट झाली आणि मुंबईची एकेकाळी असणारी मध्यमवर्गीय संस्कृती लोप पावली.

हल्ली कुठे तरी रस्त्यावर चहाच्या टपरीसारखी इराणी चहा लिहिलेली टपरी दिसते. टपरीच्या समोर प्लास्टिकचं चौकोनी टेबल मांडून चार प्लास्टिकच्या खुर्च्या मांडतात. इराणी चहा घेऊन चायवाला येतो; पण रस्त्यावर असं इराणी चहा पिणं म्हणजे त्या इराणी चहाचाच अपमान वाटावा. इराणी चहा प्यावा तर इराण्याच्या हॉटेलमध्ये बसूनच. ती ऐटच काय भारी आहे. हल्ली रस्त्यावर कोणी मित्र भेटला की चल बसून चहा घेऊ आणि गप्पा मारू असं म्हणत एखाद्या हॉटेलमध्ये जातो. चहा येतो. गप्पा सुरू होतात. त्या सुरू होतात तोपर्यंत कपातला चहादेखील संपतो. आणि वेटर जवळ येऊन साब और कुछ? आपण बिल देना एवढं म्हणतो आणि डोक्यावरचा पंखा बंद होतो. अशावेळी या इराणी हॉटेलांची जागोजागी आठवण येत राहते. आजही जुन्या मुंबईत ती बनमस्का आणि इराणी चहा मिळणारी इराणी हॉटेल्स दिसतात, तेवढीच जुन्या संस्कृतीची शान मुंबईने जपली आहे…

– वैभव साटम

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -