घरफिचर्सहिंदुत्त्वाच्या भीतीने बिशप गर्भगळीत !

हिंदुत्त्वाच्या भीतीने बिशप गर्भगळीत !

Subscribe

– जयवंत राणे

दिल्लीचे आर्चबिशप अनिल काऊटो यांनी देशात निर्माण झालेल्या अस्थिरतेमुळे लोकशाही आणि सर्वधर्मभावाला धोका निर्माण झालेला आहे, त्यामुळे २०१९ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीतून येणाऱ्या नव्या सरकारसाठी प्रार्थना करा, असे पत्र सगळ्या चर्चना पाठवले आहे. केंद्रात नरेंद्र मोदी यांचे बहुमतातील सरकार सत्तेत आल्यामुळे ख्रिस्ती मिशनऱ्यांनी धसका घेतला आहे. कारण नरेंद्र मोदींच्या बहुमतातील सरकारमुळे देशातील हिंदुत्त्ववादी शक्ती आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखा वाढत आहेत. त्याचीच चिंता देशातील आर्चबिशपांना सतावत आहे. हिंदुत्त्ववादाच्या वाढत्या प्रभावामुळे गर्भगळीत झालेल्या ख्रिस्ती धर्मगुरुंना आता येशूची करूणा भाकण्याशिवाय अन्य पर्याय नाही, असे वाटू लागले आहे, असेच या पत्रप्रपंचातून उघड होत आहे.

- Advertisement -

दिल्लीचे आर्चबिशप अनिल काऊटो यांनी देशातील सर्व चर्चना आवाहन स्वरुपाच्या लिहिलेल्या पत्रामुळे सध्या खळबळ उडालेली आहे. काऊटो यांनी आपल्या पत्रात देशातील लोकशाही धोक्यात आली आहे. लोकसभेची निवडणूक आता जवळ आली आहे. पुढील वर्षी देशात नवीन सरकार स्थापन होईल, यासाठी प्रार्थना करा. देशात राजकीय अशांतता पसरवली जात आहे. देशातील सर्वधर्मसमभाव धोक्यात येताना दिसत आहे. आपला देश आणि राजकीय नेत्यांसाठी प्रार्थना करणे ही आपली जुनी परंपरा आहे. नव्या सरकारसाठी देशातील ख्रिस्ती धर्मगुरूंनी चर्चमध्ये प्रार्थना करावी आणि प्रत्येक शुक्रवारी उपवास करावा, असे पत्रात म्हटले आहे.

अशा प्रकारचे नव्या सरकारसाठी खिस्ती धर्मगुरुंनी चर्चना आणि त्या माध्यमातून एकूणच देशातील खिस्ती समाजाला प्रार्थना करण्यासाठी आवाहन करण्याची ही काही पहिली वेळ नाही. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीही असे आवाहन करण्यात आले होते. इतकेच नव्हे तर काही महिन्यांपूर्वी गुजरातमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झालेली असताना गांधीनगरचे आर्चबिशप थॉमस मॅकवान यांनी असेच पत्र लिहून गुजरातमधील चर्चना आवाहन केले होते की, राष्ट्रवादी शक्तींचा पराभव करा, त्यांना देश ताब्यात घेण्यापासून दूर ठेवा. त्यानंतर निवडणूक अधिकाèयांनी आर्चबिशप मॅकवान यांना नोटीसही पाठवली होती.

- Advertisement -

दिल्लीचे आर्चबिशप अनिल काऊटो यांच्या पत्रावर उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी या देशात धर्माच्या आधारावर कुठलाही भेदभाव केला जात नाही, असे स्पष्ट केले. भारतात सर्वधर्मसमभाव आहे. सर्वधर्मीय लोक इथे आनंदाने राहतात, असे सिंग यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जाती धर्माच्या पलीकडे जाऊन सर्वसमावेशक विकास साध्य करत आहेत, त्यामुळे आर्चबिशप यांनी अधिक व्यापक दृष्टिकोनातून विचार करण्याची गरज आहे, असे आवाहन केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी केले आहे. काऊटो यांच्या विधानावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडूनही नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. देशातील अस्थिर वातावरणामुळे लोकशाही आणि सर्वधर्मसमभावाला धोका निर्माण झाल्याबद्दल आपण लिहिले आहे. नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात आपले पत्र नाही, असे स्पष्टीकरण अनिल काऊटो यांनी दिले आहे.

मुद्दा असा आहे की, अलीकडच्या काळातच या बिशप मंडळींना देशाची आणि या देशातील लोकशाहीची इतकी चिंता कशी काय वाटू लागली, असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी, गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी आणि आता २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी यांना का जागा आली. भाजपाची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे. हिंदुत्त्ववादी विचारसरणी असलेल्या संघाचे विचारप्रसाराचे कार्य देशभर चालत असते. अगदी दूरवर पूर्वांचलापासून ते विविध राज्यांमधील आदिवासी वनवासींपर्यंत, तसेच तळागाळातील गरीबांपर्यंत संघाचे स्वयंसेवक जातात. त्यांच्यामध्ये देव, देश, धर्म याविषयी जागृती निर्माण करतात. त्यांच्यावर हिंदुत्त्वाच्या विचाराचा संस्कार करतात.

२०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी यांनी ‘काँग्रेसमुक्त भारताचा नारा दिला होता. केंद्रात दहा वर्षे काँग्रेसच्या नेतृत्वाखाली युपीए दोनच्या सरकारमध्ये भ्रष्टाचाराची बजबजपुरी माजली होता. तसेच त्यांच्याकडे केंद्रीय पातळीवर नरेंद्र मोदी यांचा सामना करू शकेल, असे भक्कम नेतृत्व नव्हते. गुजरातचे विकास पुरुष म्हणून मोदींचा जगभर बोलबाला होत होता. मोदींनी सुरू केलेल्या झंजावाती प्रचाराला देशातील जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत होता. त्यामुळे भाजपचे आणि मित्र पक्षांचे सरकार येण्याची चिन्हे दिसू लागली होती. पुढे तर मोदींच्या नेतृत्त्वाखाली भाजपचे बहुमतातील सरकार केंद्रात आले. त्यामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढला, पण त्याच सोबत देशभरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांवरील उपस्थिती मोठ्या प्रमाणात वाढली आणि अनेक नव्या शाखा सुरू झाला. संघाच्या शाखा ही संघाची ताकद असते. कारण त्या माध्यमातून लोकांना एकत्र करून त्यांना हिंदुत्त्वाच्या विचारप्रवाहात आणले जाते. भाजप आणि संघाचा प्रभाव हा मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रातील बहुमताच्या सरकारमुळे वाढलेला आहे. हीच भारतातील ख्रिस्ती धर्मगुरूंसाठी मोठी डोकेदुखी होऊन बसलेली आहे.

पूर्वी हे धर्मगुरू शहरी भागासोबतच दूरवर खेडोपाडी तसेच वनात राहणाऱ्या गरीब लोकांपर्यंत जाऊन त्यांना आर्थिक मदत करून ख्रिस्ती करून घेत असत. आताही हे काम सुरूच आहे. त्यासाठी त्यांच्या चर्चना विदेशातून मोठ्या प्रमाणात आर्थिक निधी मिळतो. या निधीचा उपयोग करून ख्रिस्ती धर्मगुरू गरजूंसाठी अनेक सेवा कार्ये करत असतात. त्या माध्यमातून ते ख्रिस्ती धर्माचा प्रसार करतात. एकविसाव्या शतकात आम्हाला सगळा आशिया ख्रिस्ती करायचा आहे, असा निर्धार पोप जॉन पॉल दुसरे यांनी व्यक्त केलेला होता. भारतातील ख्रिस्ती धर्मगुरू त्याच दिशेने वाटचाल करत असताना हिंदुत्त्ववादी नरेंद्र मोदी यांचे सरकार त्यांना अडथळा ठरत आहे.

मोदी सरकारमुळे देशातील हिंदुत्त्ववाद्यांची शक्ती वाढली आहे. त्यामुळे ख्रिस्ती मिशनऱ्यांची कुचंबना झाली आहे. कारण भारतात हिंदुत्ववादाचा प्रभाव वाढला तर त्यांना विदेशातून येणारी आर्थिक मदत कमी होते. त्यामुळे एका बाजूला नरेंद्र मोदी आणि दुसèया बाजूला विदेशातून येणारा दबाव याच्या कचाट्यात हे ख्रिस्ती धर्मगुरू अडकले आहेत. त्यामुळे त्यांना आता मोदी सरकार नको म्हणून ‘नव्या सरकारसाठी प्रार्थना आणि उपवास करून प्रभू येशूची करूणा भाकण्यावाचून अन्य पर्याय राहिलेला नाही. मोदींमुळे हिंदुत्त्वाच्या वाढत्या प्रभावाने ख्रिस्ती धर्मगुरू गर्भगळीत झालेले आहेत. त्यातूनच ही मंडळी निवडणुकांपूर्वी चर्चना पत्रे पाठवून मोदींना म्हणजे हिंदुत्त्ववादाला रोखण्याचा आटापिटा करत आहेत.

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -