घरफिचर्सखरंच आजची तरूण पिढी मॉडर्न आहे?

खरंच आजची तरूण पिढी मॉडर्न आहे?

Subscribe

तरूण पिढी म्हणजे देशाच्या विकासाची एक मोठी आणि महत्वाची पाऊलवाट. तरूण पिढी म्हणजे देशाचा भलामोठा दीपस्तंभ. तरूण पिढी म्हणजे देशाची आशा आणि अपेक्षा. परंतु, हे आजच्या जगात कितपत सत्य आहे? आजची तरूणाई खरोखरच समाजासाठी आणि येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी आदर्श आहे? असेल तर मग कितपत? याचाही विचार करणे तितकेच महत्वाचे आहे. भारताच्या २००१ च्या जनगणनेनुसार तरूण पिढीची संख्या ही सर्वात जास्त आहे.

आजच्या काळात अर्थातच 21 व्या शतकात विज्ञान आणि तंत्रज्ञानात झालेली प्रगती ही उल्लेखनीय आहे. लोकांचं राहणीमानच या तंत्रज्ञानाने बदलून टाकलंय. अगदी घरात चपाती बनविणाऱ्या यंत्रापासून ते कारखान्यात शंभर लोकांच्या जागी काम करणाऱ्या यंत्रांपर्यंत औद्योगिक क्रांतीने अगदी या विश्वाला व्यापूनच टाकले आहे. दूरदर्शन, मोबाईल, विविध प्रकारच्या दुचाकी व चारचाकी वाहनांनी तर या संपूर्ण जगाच्या संस्कृतीत आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. आणि या नव्या युगाला आता ‘मॉर्डन युग’ म्हणून संबोधले जातंय. मॉडर्न झालेल्या या युगाची वाढ होते ती आजच्या तरूण पिढीमुळे. मोबाईल, संगणक, इंटरनेट व अनेक प्रकारच्या चैनीच्या वस्तूंबद्दलची आकर्षकता आणि त्यातील तंत्र आत्मसात करून तरूणाई स्वतःला मॉडर्न समजू पाहते आहे. परंतु, ही तरूणाई स्वतःला जितकी मॉडर्न म्हणून दाखवू पाहते, तितकीच ती मनाने व विचारांनी मॉडर्न आहे का? याचाही विचार करणे महत्त्वाचे आहे. आणि नसेल तर त्याची कारणेही जाणून घेणे महत्त्वाचे आहेत अर्थातच ही काळाची गरज आहे.

- Advertisement -

आजची तरूण पिढी ही पुढारलेली, हुशार आणि अॅडव्हान्स आहे. काहीतरी करून दाखविण्याची धमक या तरूणाईच्या नसांनसांमध्ये भिनली आहे. अगदी विज्ञानाने देखील सिद्ध केलंय की, मागील तरूण पिढीपेक्षाही आजची तरूण पिढी ही दहा पटीने हुशार आहे. म्हणूनच तर त्याचे पडसाद हे प्रगतीपथावर दिसून येत आहेत. अगदी अंतराळात जाणारी अनिमा पाटील पासून ते ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण, कांस्य पद जिंकून आपल्या देशाचा ठसा उमटविणारी तरूणाई व आपल्या कामांतून पुरस्कार प्राप्त करणाऱ्या तरूण मंडळींमध्येही या गोष्टी सहजच दिसून येतात. परंतु, या व्यतिरिक्तही आणखीन भल्या मोठय़ा संख्येतील तरूणाईसाठी हे मॉडर्न जग कदाचित शापही ठरते आणि त्याचे पडसाद कोपर्डी सारख्या घटनांमधून दिसून येतात. आजच्या या मॉडर्न जमान्यातील तरूण पिढीकडून कळत-नकळत घडणाऱ्या या विकृतीच्या कारणांचा सखोल अभ्यास करणेही तितकेच महत्वाचे आहे.

लहानपणापासूनच प्रत्येक तरूणाच्या आयुष्याला योग्य वळण लावण्याचे महत्वाचे काम असते ते आई-वडिलांचे. लहान मुलं ही अनुकरण करतात आपल्या आई-वडिलांचे. म्हणूनच मुलांसमोर अनैतिक वागणूक करणे हे अतिशय चुकीचे. कारण आई-वडिलांच्या वाईट वागण्याचा परिणाम मुलांच्या मनावर होत जातो आणि मग एके दिवशी अचानक त्याचे परिणाम समाजाला व कुटूंबाला अनुभवायला मिळतात. मी शाळेत असताना मी देखील या गोष्टींना डोळ्यासमोरून जाताना पाहिलंय. राजेश हा माझा वर्गमित्र . तो पूर्वी खूपच विचित्र वागायचा. आणि त्याला जर कुणी विचारले तर तो अंगावरच धावून यायचा. पण मग नंतर स्वतःच रडायला लागायचा . मला त्याचे रडण्यामागचं कारण पुसटसं कळलं . मी त्याच्याशी शांतपणे बोललो आणि त्याला जबरदस्ती माझ्या घरी नेलं. घरी आई ,आजीने व बाबांनी त्याची समजूत घातली. त्यांची वागणूक पाहूण तो शांत झाला व रडू लागला. शेवटी त्याच्याशी गोड बोलून, त्याची समजूत काढून वास्तव काय आहे, हे मी जाणून घेतलं. त्याच्या घरात मागील दोन वर्षांपासून आई आणि वडीलांमध्ये सततचे वाद चालू होते. आता त्याच्या आई-वडिलांनी अगदी टोकाची भूमिका घेतली. ती म्हणजे घटस्फोटाची. घटस्फोटानंतरही राजेश कोणाकडे राहील ,यावरूनही त्यांच्यात सकाळ-संध्याकाळ भांडणं सुरूच होती. त्यामुळे राजेश सतत अस्वस्थ असायचा. बाबा त्यादिवशी संध्याकाळी राजेशला घेऊन त्याच्या घरी गेले. बाबांनी त्याच्या आई-वडिलांना व्यवस्थित समजून त्यांच्या वागण्यातील चुका समजावून दिल्या . राजेशच्या आई-वडिलांनी शरमेने मान खाली घातली. त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली व पुन्हा असं घडणार नाही, असंही आश्वासन राजेशच्या आई-वडिलांनी बाबांना दिले. ठिक आहे आज राजेश माझा मित्र होता आणि बाबांमुळे त्याच्या आई-वडिलांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली . परंतु, आज मी अशा सगळ्याच राजेशपर्यंत पोहचू शकेल? त्यांच्या आई-वडिलांपर्यंत पोहचणं बाबांसाठी शक्य आहे? त्यामुळे असे हजारो राजेश आज या मॉर्डन जगात भरडले जाताहेत. कारण या मॉर्डन जगाने पायदळी तुडवली आहे ती कुटुंबसंस्था. आणि त्यातून पुढे आलेली संस्कृती. आजच्या या मॉर्डन जगात घरात असतात तर फक्त तीन व्यक्ती . त्यातही आई-बाबा रोज जातात ऑफिसला. घरात ना आजी ना आजोबा. मग मुलांकडे लक्ष कुणी दयायचे? विभक्त झालेल्या नातलगांनी ? जे नेहमी घडणाऱ्या वाईट गोष्टींवर हसण्यासाठी टपून बसलेले असतात. आई-वडिलांच्या अशा वागण्यामुळे मुलं एकटी पडतात आणि त्यांना ते एकटेपण खायला उठते. म्हणून ते वळतात विविध प्रकारच्या व्यसनांकडे. आणि यातूनच हळूहळू प्रकट होते ती सडकी पुरुषार्थता, ज्याचे दर्शन कोपर्डी सारख्या घटनांमधून पालकांना आणि समाजाला पाहायला मिळते. आणि मग हा मॉर्डन जमानाच मॉर्डन यंगस्टार्सला खायला उठतो.

- Advertisement -

खरतर तरूण पिढीशी पालकांनी अत्यंत मनमोकळेपणे बोलले पाहिजे. त्यामुळे पालक आणि पाल्य यांच्यात जनरेशन गॅप दिसणार नाही. आपली मुलं कुठे जातात?, कुणाशी बोलतात? इंटरनेट, मोबाईलचा उपयोग कुठल्या गोष्टींसाठी करतात, याची जाणीव पालकांना योग्य वेळी होणे अपेक्षितच आहे. परंतु, जर काही विपरित आढळल्यास ते योग्य प्रकारे हाताळल्यानेही प्रश्न सुटतात आणि तरूण मुलं योग्य मार्गाला लागतात. अशा या भरकटत चाललेल्या तरूणांना योग्य मार्गदर्शनच मॉर्डन बनवू शकते, ही काळया दगडावर कोरलेली रेघ आहे .

Chetan Patilhttps://www.mymahanagar.com/author/chetan/
writer, poet, journalist, copy writer, theater artist
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -