पवारांचा ‘कोल्हापूर पॅटर्न ’

भाजप एकाच वेळी तीन पक्षांना अंगावर आणि राजकीय भाषेत शिंगावर घेण्याचा जो प्रयत्न करत आहे तो कोठेतरी फसत चालला आहे हे उत्तर कोल्हापुरातील पोटनिवडणुकीवरून अधोरेखित होत आहे. यालाच देवेंद्र फडणवीस यांच्या भाषेत ‘पवार पॅटर्न’ असे म्हणता येईल. महाराष्ट्राची जर राजकीय घडी लक्षात घेतली तर त्यामध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे चार प्रमुख पक्ष राज्यातील राजकीय चित्र घडवण्यात तसेच बिघडवण्यातदेखील मोलाची भूमिका पार पडत असतात हे 2019 मध्ये शरद पवार यांच्यासारख्या मुरलेल्या राजकीय नेत्याने देवेंद्र फडणवीस यांना दाखवून दिले.

– सुनील जावडेकर
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक अनेक अर्थाने गाजली. वास्तविक हा मतदारसंघ शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांचा होता. मात्र 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत येथे काँग्रेस उमेदवार चंद्रकांत जाधव निवडून आले. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना काँग्रेसतर्फे महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे सहाजिकच राजेश क्षीरसागर हे नाराज झाले आणि त्यांची नाराजी त्यांनी जाहीररीत्या व्यक्तदेखील केली होती, मात्र त्यानंतर मातोश्रीवरून चक्रे फिरली आणि स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजेश क्षीरसागर यांची नाराजी दूर केली. निवडणुकीतील आघाडीमधील हे वातावरण पाहता भाजपला येथे विजय खेचून आणण्याची चांगली संधी होती. मात्र भाजपने या पोटनिवडणुकीतील प्रचारात सर्व ताकद पणाला लावल्यानंंतरदेखील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षांच्या आघाडीपुढे भाजपचा निभाव लागला नाही हे यातील एक कटू सत्य भाजपने स्वीकारण्याची गरज आहे. भाजपच्या झंजावातामध्ये टिकायचे तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला यापुढील प्रत्येक निवडणुका आघाडीची सर्व क्षमता पणाला लावून लढवाव्या लागणार आहेत. भाजपचे प्रचंड आव्हान लक्षात घेता काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीनही पक्षांच्या अस्तित्वासाठी आघाडी विजय होणे नितांत गरजेचे आहे. या तीनही पक्षांनी काळाची ही गरज ओळखली आहे असे कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीच्या निकालावरून तरी स्पष्ट होत आहे. त्यामुळे 2024 मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जर या तिन्ही पक्षांनी आघाडी करून लढवल्या तर कोल्हापूर पोटनिवडणुकीच्या निकालाची पुनरावृत्ती झाल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.
कोल्हापूर पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांना 96226 मते पडली. तर भाजप उमेदवार सत्यजित कदम 77426 मते मिळाली. दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे त्यांची सहानुभूती ही निश्चितच त्यांच्या पत्नी व महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांना मिळाली यात शंकाच नाही. मात्र त्याचबरोबर शिवसेना आणि राष्ट्रवादी या आघाडीतील दोन्ही घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण ताकद पणाला लावत जयश्री जाधव यांच्या विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले. महाराष्ट्रातील राजकीय वातावरण लक्षात घेता कोल्हापूरची पोटनिवडणूक ही आघाडी आणि भाजपने प्रतिष्ठेची केली होती. एकीकडे शिवसेनेने भाजपची साथ सोडल्याने आणि सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर हातमिळवणी केल्याने शिवसेना हिंदुत्वापासून दूर गेल्याचा प्रचार भाजपने या काळात जोरदारपणे केला होता तर दुसरीकडे मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आक्रमक हिंदुत्वाचा सूर आळवत शिवसेनेला खिंडीत गाठायला सुरुवात केली होती. मात्र तरीदेखील शिवसेना या निवडणुकीत भाजपाविरोधात काँग्रेसबरोबर खांद्याला खांदा लावून लढले असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरू नये.
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल हा केवळ कोल्हापूर पुरता सीमित समजण्याची घोडचूक कोणीही करू नये. कारण या निवडणुकीमध्ये भाजपला विजयाच्या आशा आणि अपेक्षा या आघाडीपेक्षा अधिक होत्या. त्यामुळे भाजपचा झालेला पराभव हा या पुढील निवडणुकांमध्ये जर भाजपचा सामना शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांच्या एकत्रित आघाडीबरोबर झाला तर राज्यातील चित्र काय असेल हे दर्शवणारा कोल्हापूर पोटनिवडणुकीचा निकाल आहे हे समजून घेण्याची गरज आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपच्या बाजूने अधिक संधी होती याचे कारण म्हणजे केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून राज्यातील सत्ताधारी आघाडीतील मंत्र्यांना, नेत्यांना कोंडीत पकडण्यात आले होते. तर दुसरीकडे हा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्यात आल्यामुळे शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर आणि त्यांचे समर्थक हे नाराज होते. तिसरी अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे महाविकास आघाडीची जर रचना पाहिली तर त्यामध्ये शिवसेना ही संख्याबळानुसार प्रथम क्रमांकावर आहे. राष्ट्रवादी ही दुसर्‍या स्थानी आहे तर काँग्रेस तिसर्‍या स्थानी आहे. आघाडी सरकारचा गेल्या सव्वा दोन वर्षांतील जर राज्य कारभार पाहिला तर शिवसेना आणि राष्ट्रवादी यातही विशेष करून राष्ट्रवादी ही काँग्रेसला अनुकूल भूमिका घेताना आढळून येत नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यात हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला गेल्यामुळे इथे राष्ट्रवादी अंतर्गत अथवा छुपी मदत भाजपला करेल अशा शंका-कुशंका निवडणुकीआधी घेतल्या जात होत्या. मात्र निवडणुकीच्या प्रचारामध्ये ज्याप्रकारे कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील आणि राष्ट्रवादीने काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांना निवडून आणण्यासाठी अपार कष्ट घेतले ते भाजपसाठी भविष्यात नक्कीच धोकादायक आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये मतभेदांची दरी जितकी रुंदावता येईल तितकी रुंदावली गेली तरच राष्ट्रवादीची छुपी अथवा अंतर्गत मदत भाजपला मिळत असते हेदेखील या निकालावरून स्पष्ट झाले. त्यामुळे सर्वात महत्वाची म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये दुफळी निर्माण करण्यात भाजपने त्यांना या वेळी यश आले नाही.
एकंदरीतच जे काही राजी के चित्र सद्य:स्थितीत पहावयाला मिळत आहे ते असे आहे की भाजपला एकाच वेळी काँग्रेसबरोबरही लढावे लागत आहे. राष्ट्रवादीबरोबर लढावे लागत आहे आणि त्याचबरोबर आता शिवसेनेसारख्या हिंदुत्ववादी पक्षाशीदेखील लढावे लागत आहे. एकाच वेळी एक पक्ष जेव्हा तीन-तीन पक्षांशी लढतो तेव्हा सहाजिकच तीनही राजकीय पक्षांचे पाठबळ हे एका राजकीय पक्षाच्या पाठबळापेक्षा अधिक वजनदार होते. त्यामुळे भाजपला या निवडणुकीमध्ये विजयाची अनुकूल स्थिती असूनदेखील आघाडीच्या एकरुपतेपुढे भाजपचा निभाव लागू शकला नाही ही वस्तुस्थिती आहे आणि ती भाजपने खुल्या मनाने स्वीकारण्याची गरज आहे.
राज्यातील आघाडी सरकारच्या मंत्र्यांच्या आणि नेत्यांच्या पाठी केंद्रीय तपास यंत्रणा हात धुऊन मागे लागले आहेत. त्यामुळे राज्यातील आघाडी ही भाजपपुढे दुबळी आणि कमजोर ठरत असल्याचे जे चित्र भाजप राज्यात आणि देशात उभे करू पाहत आहे त्या रणनीतीला तडा देणारा कोल्हापूर पोटनिवडणुकीचा निकाल आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या ससेमिर्‍यामुळे राज्यातील राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसचे नेतेही अक्षरश: हवालदिल आहेत. त्यामुळे कोल्हापूर पोटनिवडणुकीत पहिल्यांदाच हे तीनही पक्ष भाजपच्या पराभवासाठी त्वेषाने आणि चवताळून प्रचाराला लागले होते. वास्तविक तसे बघायचे झाल्यास शिवसेनेतील अंतर्गत नाराजी आणि आघाडी सरकारमधील राष्ट्रवादीकडून काँग्रेसबाबत स्वीकारले जाणारे असहकाराचे धोरण लक्षात घेतले तर कोल्हापुरात काँग्रेसचा पराभव ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ होती. मात्र आघाडीमध्ये अस्वस्थता आणि असुरक्षितता असूनदेखील केवळ भाजप वरचढ ठरू नये याकरता आघाडीतील तीनही पक्षांनी केवळ भाजपचा पाडाव करण्यासाठी एकत्र येत केलेला पराभव हा भाजपसाठी धोक्याचा अलार्म वाजवणारा आहे. थोडक्यात भाजपची निवडणूक रणनीती ही कोठे तरी चुकत आहे हे दर्शविणारा हा निकाल आहे. कोल्हापुरात झालेल्या पराभवाचा दोष चंद्रकांत पाटील यांच्याकडे कसा जाईल, असा देवेंद्र फडणवीसांचा कल असला तरी त्यामुळे एकूणच पक्षाचे नुकसान झालेले आहे, हे फडणवीसांनी लक्षात घ्यायला हवे. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना जे संभाव्य स्पर्धक ठरू शकतात, त्यांचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे, हे मागील काळात दिसून आलेले आहे. महाराष्ट्रात मराठा समाजातील नेत्याला जास्त पसंती असते. फडणवीसांसोबत संभाव्य मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून चंद्रकांत पाटील यांचे नाव घेतले जाते. फडणवीसांना तीच डोकेदुखी वाटत आहे. म्हणून पराभवाचे माप चंद्रकांत पाटलांच्या पदरात कसे पडेल आणि त्यांना हिमालयात पाठवणे शक्य नसले तरी त्यांचे महत्व कसे कमी होईल, याचा प्रयत्न होताना दिसत आहे.
भाजप एकाच वेळी तीन पक्षांना अंगावर आणि राजकीय भाषेत शिंगावर घेण्याचा जो प्रयत्न करत आहे तो कोठेतरी फसत चालला आहे हेदेखील यावरून अधोरेखित होते. यालाच देवेंद्र फडणवीस यांच्या भाषेत ‘पवार पॅटर्न’ असे म्हणता येईल. महाराष्ट्राची जर राजकीय घडी लक्षात घेतली तर त्यामध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे चार प्रमुख पक्ष राज्यातील राजकीय चित्र घडवण्यात तसेच बिघडवण्यातदेखील मोलाची भूमिका पार पडत असतात हे 2019 मध्ये शरद पवार यांच्यासारख्या मुरलेल्या राजकीय नेत्याने देवेंद्र फडणवीस यांना दाखवून दिले. महाराष्ट्रात भाजपचे तब्बल 106 आमदार स्वबळावर असतानादेखील केवळ 56 आमदार असलेल्या शिवसेनेचा मुख्यमंत्री हा शरद पवार यांनी भाजपच्या डोक्यावर बसवला ही घटना महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाला मोठी कलाटणी देणारी घटना आहे हे लक्षात घेण्याची गरज आहे. वास्तविक राष्ट्रवादीने 2019 ची विधानसभा निवडणूक एक काँग्रेसबरोबर आघाडी करून लढवली होती. त्यावेळी राष्ट्रवादी तर राज्यात अत्यंत दयनीय स्थितीत तर होतीच मात्र त्याहीपेक्षा अत्यंत हलाखीची परिस्थिती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या लाटे पुढे काँग्रेस सारख्या मातब्बर पक्षाची झाली होती. सातार्‍याची भरपावसातील शरद पवारांची वादळी सभा अत्यंत गाजली आणि या वादळी सभेने ज्याप्रमाणे राष्ट्रवादीचा लाभ करून दिला तसाच लाभ यामुळे राज्यात काँग्रेसचादेखील झाला हे नाकारून चालत नाही. त्यामुळे महाराष्ट्रात जेव्हा सत्तांतराची घडामोड सुरू होती त्यावेळी वास्तविक शरद पवार हे मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडे सहजगत्या घेऊ शकले असते. कारण या दोन्ही पक्षांच्या आघाडीचे मिळून संख्याबळ हे 54 आणि 44 मिळून 98 इतके होते. मात्र योग्य वेळी योग्य निर्णय करण्याची शरद पवारांची जी नीती आहे ती लक्षात घेता शरद पवार यांनी भाजप आणि शिवसेना यांच्यातील दुफळी अधिकाधिक कशी वाढेल आणि हे दोन्ही पूर्वाश्रमीचे मित्र पक्ष पुन्हा राजकीय पटलावर एकत्र येण्याच्या शक्यता कशा धुळीस मिळतील याची पुरेपूर दक्षता मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे यांनाच बसवून शरद पवार यांनी त्यावेळीच दाखवून दिली हे आता हळूहळू आघाडीतील मित्रपक्षांच्या आणि त्याच बरोबर भाजपच्या ही लक्षात आले असेल. कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीचा निकाल पाहता शरद पवार यांची ही खेळी भाजपच्या वर्मी बसली आहे असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरू नये.
दुसर्‍या दृष्टिकोनातून बघायचे झाल्यास शरद पवार यांच्या या चक्रामध्ये राज्यातील भाजप नेतृत्व पूर्णपणे अडकले आहे हेदेखील यावरून स्पष्ट होते. त्यामुळे महाराष्ट्रात जोपर्यंत शरद पवार आहेत तोपर्यंत तरी देवेंद्र फडणवीस यांना ‘पवार पॅटर्न’चे उत्तर सापडणे कठीण आहे.