घरफिचर्सएआयएडीएमकेच्या सर्वेसर्वा जयललिता

एआयएडीएमकेच्या सर्वेसर्वा जयललिता

Subscribe

देशाच्या आणि तामिळनाडूच्या राजकारणात आपल्या कर्तृत्वाची छाप सोडणार्‍या एआयएडीएमकेच्या सर्वेसर्वा, तामिळनाडूच्या मुख्यमंत्री आणि सर्वांच्या लाडक्या ‘अम्मा’ म्हणजेच जयललिता. त्यांचा जन्म 24 फेब्रुवारी 1948 रोजी कर्नाटकातील मैसूर येथे अय्यर कुटुंबात झाला. त्या दोन वर्षांच्या असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. घराचा आधारच गेल्याने त्यांच्या कुटुंबाला गरिबीचे चटके सहन करावे लागले. त्यामुळे जयललिता यांच्या आई बंगलोरला आई-वडिलांच्या घरी आल्या. त्यानंतर जयललिता यांच्या आईने तामिळ चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली.

जयललिता या अभ्यासात हुशार होत्या. गरिबीचे चटके सोसतच त्यांनी आधी बंगलोर आणि नंतर चेन्नईत शिक्षण घेतले. चेन्नईच्या स्टेला मॉरिस कॉलेजातून पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळविली होती. त्यांना वकील व्हायचे होते. वयाच्या १५ व्या वर्षापासून त्यांनी सिने कारकिर्दीला सुरुवात केली. एका निर्मात्याच्या आग्रहावरुन त्यांनी सिनेमात काम करण्यास सुरुवात केली. वयाच्या १५ व्या वर्षी त्यांनी एपिसल या इंग्रजी चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आणि तिथून त्यांच्या फिल्मी करियरला सुरुवात झाली.

- Advertisement -

कन्नड, तमिल, इंग्रजी आणि हिंदी भाषेतील सुमारे ३०० चित्रपटात त्यांनी काम केले. ‘चिन्नाडा गोम्बे’ हा कन्नड भाषेतील त्यांचा पहिला चित्रपट होता. चित्रपटात स्कर्ट परिधान करणार्‍या त्या पहिल्या तमिळ अभिनेत्री होत्या. २० वर्षाच्या आपल्या फिल्मी कारकिर्दीत त्यांनी ‘इज्जत’ या एकमेव हिंदी चित्रपटात काम केले. या चित्रपटात धर्मेंद्र त्यांचे नायक होते.

१९८२ मध्ये जयललिता यांनी एमजी.रामचंद्रन यांच्या नेतृत्वाखालील अन्ना द्रमुकमध्ये प्रवेश करत राजकारणाला सुरुवात केली. त्यांच्यावर पक्षाच्या प्रचार सचिवाची जबाबदारी सोपविण्यात आली. नंतर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत त्या विजयी झाल्या आणि त्यांच्या राजकीय जीवनाला सुरुवात झाली. त्यानंतर १९८४ ते १९८९ दरम्यान त्या राज्यसभेवर निवडून गेल्या. १९८४ मध्ये त्यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र रामचंद्रन यांनी त्यांना पक्षातील उपनेते पदावरुन काढून टाकले.१९८७ मध्ये एमजी.रामचंद्रन यांच्या निधनानंतर जयललिता यांनी स्वत:ला रामचंद्रन यांचे उत्तराधिकारी घोषित केले. १९८९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत २७ जागा जिंकून जयललिता यांचा पक्ष विधानसभेतील प्रमुख विरोधी पक्ष बनला. १९९१ मध्ये तत्कालिन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येनंतर काँग्रेसबरोबर युती करुन त्यांनी सरकार बनविले.

- Advertisement -

२४ जून १९९१ मध्ये मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन तामिळनाडूतील सर्वात कमी वयाच्या मुख्यमंत्री बनण्याचा मान त्यांनी मिळविला. 1995 मध्ये त्या पहिल्या महिला मुख्यमंत्री झाल्या. सर्वात लहान वयात मुख्यमंत्री होण्याचा मान त्यांना मिळाला. 1996 च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. 2001 मध्ये त्या दुसर्‍यांदा मुख्यमंत्री झाल्या. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध निकाल दिल्याने मुख्यमंत्रिपद सोडणे भाग पडले. 2011 मध्ये त्या तिसर्‍यांदा मुख्यमंत्री झाल्या. 2014 मध्ये त्यांना 4 वर्षांची शिक्षा झाल्याने पद सोडावे लागले. 2015 मध्ये बेहिशेबी मालमत्ता प्रकरणातून त्यांची सुटका झाल्यावर त्या पुन्हा मुख्यमंत्री झाल्या. 2016 मध्ये त्या मुख्यमंत्री झाल्या. 32 वर्षात पुन्हा सत्तेवर येणार्‍या त्या पहिल्याच मुख्यमंत्री ठरल्या. मुख्यमंत्रिपदासाठी त्या अवघे एक रुपया वेतन घेत होत्या. अशा या सर्वांच्या लाडक्या अम्माचे 5 डिसेंबर 2016 रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -