घरफिचर्स‘योद्धा’ हरपला

‘योद्धा’ हरपला

Subscribe

एका हाकेत लाखोंच्या संख्येने कामगारांना एकवटणारा देशातील कामगार चळवळीचा अध्वर्यू, मुंबईतील कामगार चळवळीचा जनक, ‘बंदसम्राट’ अशा अनेक विशेषणांनी ओळखले जाणारे देशाचे माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचे निधन झाले. फर्नांडिस यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मंगळवारी सकाळी सात वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८८ वर्षांचे होते. गेल्या अनेक वर्षांपासून ते अल्झायमर या आजाराने ग्रस्त होते. उभ्या आयुष्यात केवळ आणि केवळ संघर्ष करीत राहणारा हा योद्धा अखेरपर्यंत मृत्यूंशीही झुंज देत राहिला. त्यांच्या निधनामुळे देशातील कामगार ‘योद्धा’ हरपल्याची भावना कामगार जगतामधून व्यक्त होत आहे. जॉर्ज यांचा मुलगा सीन फर्नांडिस अमेरिकेतून बुधवारी परतल्यानंतर त्यांच्यावर नवी दिल्ली येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

स्वतंत्र भारताच्या इतिहासातील काही मोजक्या लोकनेत्यांमध्ये जॉर्ज फर्नांडिस हे अग्रणी होते. संपूर्ण देशाचे समाजकारण व राजकारण त्यांनी व्यापून टाकले होते. ३ जून १९३० रोजी जन्मलेले जॉर्ज हे लहानपणापासूनच बंडखोर स्वभावाचे होते. त्यामुळेच पाद्री होण्यासाठी ख्रिस्ती सेमिनारमध्ये दाखल करण्यात आलेले जॉर्ज तेथून पळून गेले आणि पुढे कामगार चळवळीत सक्रिय झाले. १९७४ च्या रेल्वे संपापासून जॉर्ज फर्नांडिस यांची खर्‍या अर्थाने कामगार नेता आणि बंदसम्राट म्हणून ओळख निर्माण झाली. आणीबाणीच्या काळात त्यांच्यातील लढवय्या देशाने पाहिला. आणीबाणीच्या काळात पोलिसांना गुंगारा देण्यासाठी दाढी राखून आणि पगडी घालून शीख सरदाराचा वेष त्यांनी धारण केला होता. अटकेनंतर ते तुरुंगात कैद्यांना भगवद्गीतेचे श्लोक म्हणून दाखवायचे.

राजकारणातही कामगारहित जपले

आणीबाणी उठल्यानंतर जॉर्ज यांनी तुरुंगात असतानाच बिहारमधील मुझफ्फरपूर येथून लोकसभेची निवडणूक लढवली आणि विक्रमी मतांनी विजय मिळवला. त्या काळात काँग्रेसला हरवून सत्तेवर आलेल्या जनता पार्टीच्या काळात ते उद्योगमंत्री होते. जनता पार्टीमध्ये फूट पडल्यानंतर अनेक नेत्यांनी स्वत:चे वेगळे पक्ष काढले. जॉर्ज यांनी समता पार्टीची स्थापना करून सक्रिय राजकारण सुरू केले. अर्थात, राजकारण करत असतानाही कामगारांशी असलेली नाळ त्यांनी कधी तोडली नाही. कामगारांसाठी ते अखेरपर्यंत लढत राहिले. त्यांचे राजकारण कधी कामगारहिताच्या आड आले नाही. कामगार संघटनांचे नेतृत्व करताना जॉर्ज यांच्या नेतृत्वाखाली अनेक नेते घडले. या नेत्यांनीही पुढे जॉर्ज यांचा वारसा समर्थपणे सुरू ठेवून कामगारांना न्याय्य हक्क मिळवून देण्याचा प्रयत्न केला. केंद्रातील अटलबिहारी वाजपेयी यांच्या आघाडी सरकारमध्ये जॉर्ज यांच्या समता पक्षाचा समावेश होता. या सरकारमध्ये ते संरक्षणमंत्री होते. भाजपशी जवळीक साधण्याच्या त्यांच्या निर्णयावर टीकाही झाली. त्याकडे त्यांनी लक्ष दिले नाही. संरक्षणमंत्री असताना त्यांनी भारतीय जवानांसाठी उपयुक्त निर्णय घेतले.

पुनर्जन्मावर होता विश्वास

पुनर्जन्मासारखी गोष्ट अस्तित्वात असेल तर मला व्हिएतनाममध्ये जन्म घ्यायला आवडेल, असे जॉर्ज फर्नांडिस यांनी एकदा म्हटले होते. जवळपास 15 वर्षांपूर्वी बंगळुरूमध्ये झालेल्या ‘कर्नाटक प्लान्टर्स असोसिएशन’च्या वार्षिक संम्मेलनामध्ये संबोधित करताना फर्नांडिस यांनी पुनर्जन्मासंदर्भात विधान केले होते.

न्यायासाठी लढणारं व्यक्तिमत्त्व

जेव्हा कधी आपण जॉर्ज फर्नांडिस या नावाचा विचार करतो, तेव्हा सर्वात पहिल्यांदा डोळ्यासमोर येतं ते त्यांचं न्यायासाठी लढणारं व्यक्तिमत्त्व. भारताला अतिशय मजबूती देणारा आणि सुरक्षित ठेवणारा संरक्षणमंत्री अशी त्यांची ओळख होती नरेंद्र मोदी, पंतप्रधान

नितीशकुमारांना अश्रू अनावर

माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्या निधनाबाबत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना अतीव दुःख झाले. जॉर्ज यांना श्रद्धांजली वाहताना त्यांना अश्रू अनावर झाले. तसेच त्यांनी राज्यात दोन दिवसांचा दुखवटाही जाहीर केला आहे. आपण आपला मार्गदर्शक गमावला आहे, जॉर्ज यांच्या निधनाने कधीही भरून न येणारी मोठी पोकळी निर्माण झाली आहे, अशा शब्दांत नितीशकुमार यांनी भावना व्यक्त केल्या.

मनस्वी जॉर्ज

जॉर्जचा आणि माझा परिचय सुमारे ३७३८ वर्षांचा. महाराष्ट्रात एकाच काळात भिन्न कारणांनी आम्ही दोघे गाजत होतो. १९६७  साली जॉर्जने लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे मोठे नेते स.का. पाटील यांचा मुंबईत पराभव केला होता. .का. पाटलांचा पराभव म्हणजे जगातले आठवे आश्चर्य, असे लोकांना वाटत असे. पाटील हे काँग्रेस श्रेष्ठींपैकी एक प्रभावी नेते होते. अखिल भारतीय काँग्रेस पक्षासाठी ते एकटे मुंबईत पैसा गोळा करीत. जॉर्ज त्यावेळेला फक्त कामगार नेता होता. एक साधा लढाऊ कामगार नेता भांडवलदारांच्या गळ्यातील ताईत असलेल्या व्यक्तीला कसा पाडू शकणार? जॉर्ज पराभूतच होणार, पण एक बड्या धेंडाविरुद्ध कुणीतरी लढण्याची हिंमत करतोय, याचेच कौतुक अधिक होते.

जॉर्जने आपली प्रचारपद्धती इतक्या कार्यक्षमतेने चालवली की स.का. पाटील पराभूत झाले. खासदार झाल्यानंतर जॉर्जभोवतीचे वलय वाढले. त्याच काळात माझी जॉर्जसोबत दोस्ती झाली. त्याच्या निवडणुकीत जी तरुण मुले प्रचारात अग्रभागी होती, त्या सर्वांचे त्याने एक शिबीर बोलावले. जॉर्जने त्या शिबिरात भाषण केले, ‘मी समाजवादी पक्षाचा नेता आहे, मी त्याच पक्षाच्या तिकिटावर निवडून आलो आहे. तरीदेखील मी तुम्हा तरूणांना वेगळा सल्ला देईन. तुम्ही ‘युवक क्रांती दल’ या संघटनेत सामील व्हावे, असे माझे मत आहे. तेथे तुमच्या उर्मींना न्याय मिळेल.’ मुंबईमध्ये युक्रांदचे केंद्र नव्हते, पण या गु्रपच्या व आमच्या चर्चांना मुंबई व पुण्यात सुरुवात झाली. शेवटी युक्रांदचा पावसात भिजण्याचा म्हणा किंवा भात लावणीचा म्हणा, मळावली येथे कार्यक्रम होता. त्यात हे तरुण मुंबईहून सहभागी झाले. जेवणानंतर चिंचलीकरकाकांच्या घरात बैठक झाली. मे. पु. रेगे व राणे सर सामील झाले होते. त्या तरुणांनी युक्रांदमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मुंबईला युक्रांदचे केंद्र स्थापन झाले.

- Advertisement -

जॉर्जचे कुटुंब मंगलोर येथे राहत होते. ख्रिश्चन कुटुंबात त्याचा जन्म झाला. ख्रिश्चन कुटुंबामध्ये एक प्रथा होती. घरातला थोरला मुलगा धर्मकार्यासाठी वाहून टाकायचा, म्हणजे धर्मोपदेशक (फादर) होण्यासाठी चर्चला द्यायचा. देवाला माणसे वाहणे, ही प्रथा भारतीयांच्या रोमारोमांत आहे. सेमिनरीमध्ये (ख्रिश्चन चर्च) सर्वप्रकारचे आधुनिक शिक्षण तर दिले जातेच; परंतु ख्रिश्चन धर्मग्रंथाचा अर्थ नीट कळावा म्हणून लॅटिन भाषा शिकवली जाते. जॉर्जचे भाषाविषयक ज्ञान इतके अफाट होते की त्याला बंगाली, कन्नड, मराठी, तेलगु, तामिळ, इंग्रजी, हिंदी इत्यादी भाषा सहज अवगत होत्या. त्याची भाषा तुळु (कारवार भागातील बोली भाषा). त्याच्यामध्ये जिद्द व चिवटपणा हे विलक्षण गुण होते. मुंबईत आल्यानंतर ऑफिससमोरच्या फूटपाथवर हा तरुण झोपत असे. कधी कधी ‘माझ्या राखीव जागेवर का झोपला’ म्हणून त्याच्या आधी मुंबईत आलेल्या लोकांच्या लाथा खात असे.

जॉर्जला समाजवादी आणि कामगार नेते पी.डिमेलो यांनी मुंबईत आणले. हार्ट अ‍ॅटॅक येऊन ते अचानक निधन पावले. त्यानंतर जॉर्जने हातात सूत्रे घेतली. हॉटेल कामगारांची युनियन बांधणी रात्री १२ नंतर चालू व्हायची. हा गृहस्थ हॉटेलसमोर रात्री १२ ते पहाटे ५ या वेळात जाऊन कामगारांसोबत चर्चा करण्यासाठी मीटिंग घ्यायचा. जॉर्जने 8-9 महिने असे दीर्घकाळ हॉटेल कामगारांचे संप चालवून ते यशस्वी केले. जॉर्ज ‘कामगार नेता’ म्हणून प्रसिद्ध झाला. अपार कष्ट, उत्तम अभ्यास व मनस्वी जिद्द या गुणांच्या जोरावर जॉर्ज मुंबईचा ‘बंदचा बादशहा’ झाला. जॉर्जच्या युनियनमधील एखाद्या कामगारावर अन्याय झाला तर त्याच्या युनियनमध्ये संप चालू व्हायचा, टॅक्सी बंद व्हायच्या, अख्ख्या मुंबईचा कचरा काढणे बंद व्हायचे. कामगार एकमेकांना पाठिंबा द्यायचे, श्रमिकांची एकजूट असायची व त्या सर्वांचा विश्वास साथी जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर असायचा.

- Advertisement -

मी एकदा जॉर्जला विचारले ‘कामगारांची युनियन बांधून मुंबईसारख्या राक्षसी आकाराच्या शहराला मुठीत ठेवण्याची कल्पना तुम्हाला कशी सुचली?’ त्यावर त्याने उत्तर दिले की, ‘लहानपणापासून माझ्या मनात एक कल्पना रुंजी घालत होती. चाकात गती आहे. चाक थांबले की सर्वांचीच गती थांबते, म्हणून जिथे चाक असेल त्याचा ताबा आपल्याकडे असला तर आपण जगाचे नियंते होऊ. ताबा आपल्याकडे राहावा असे वाटायचे’

जॉर्जचे सेमिनरीमध्ये धार्मिक शिक्षण पूर्ण झाले. त्याने भाषा प्रभुत्व संपादन केले. पण तो धर्मोपदेशक झाला नाही. त्याला कारण घडले. त्याच्या मानेवर एक फोड झाला होता. त्याच्या अडाणी गुरूने (फादरने) त्याला टीबी (क्षय) झाला म्हणून सेमिनरीतून हाकलून दिले. त्या काळात टीबी हा भयंकर संसर्गजन्य रोग मानला जायचा. त्याच्या वडिलांचे आपल्या मुलाला धर्मोपदेशक करायचे स्वप्न भंगले. निराश होऊन ते जॉर्जला घेऊन दवाखान्यात गेले. तेव्हा कळले की ते साधे इन्फेक्शन होते. अ‍ॅन्टिबायोटिक गोळ्या घेऊन ते बरे झाले. तोपर्यंत या धार्मिक गोष्टीवरून जॉर्जचा विश्वास उडाला. तो तेथून पळाला व डिमेलो यांच्याकडे गेला. त्यांच्यासोबत तो मुंबईत आला.

काळाच्या ओघात क्रमाक्रमाने जनता पक्षाची वाट लागत गेली तसे जॉर्ज फर्नांडिस यांचे राजकारण भरकटत गेले. एकदा उदगीर येथील कार्यक्रमात जॉर्ज व मी असे मुख्य पाहुणे होतो. प्राचार्य ना.. डोळे सर सभेचे अध्यक्ष होते. त्या सभेत जॉर्जच्या हस्ते स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार झाला. त्या कार्यक्रमानंतर त्यांच्या गाडीतून मध्यरात्री आम्ही पुण्याला निघालो. माझ्या घरी आंघोळ, जेवण इत्यादी झाल्यानंतर त्यांनी माझ्याजवळ विषय काढला की, ‘मी त्यांच्या समता पार्टीचे महाराष्ट्राचे अध्यक्षपद स्वीकारावे.’ या विषयावर आमची प्रदीर्घ चर्चा झाली. समता पार्टी व भारतीय जनता पार्टी एकत्रितपणे काँग्रेसच्या विरोधात लढत होते. जॉर्ज फर्नांडिस यांना ‘अ‍ॅन्टी क्राँग्रेसिझम’ ही स्वतंत्र विचारसरणी वाटत होती आणि मला मात्र तसे वाटत नव्हते. काँग्रेसचा पर्याय ‘अ‍ॅन्टी काँग्रेसिझम’ हा नाही. ‘डावीकडे झुकलेला मध्यमार्गी पक्ष’ हाच काँग्रेसला एकमेव पर्याय आहे, असे माझे मत होते. आमच्यामध्ये मतभेद होण्याचा प्रश्नच नव्हता. आमच्या नात्याला थोडा चरा गेला तो गुजरात प्रकरणानंतर झालेल्या चर्चेनंतर, राजकीय अपरिहार्यतेमुळे जॉर्ज नरेंद्र मोदींचे समर्थन करू लागले, ही बाब सहन करणे माझ्या शक्तीबाहेर होते. तसे मी त्यांना सुनावलेदेखील. त्यांना स्मृतिभ्रंश हा आजार होण्यापूर्वी मी भेटलो होतो. खूप गप्पाही मारल्या. डॉक्टर असल्यामुळे त्यांच्या प्रकृतीमध्ये काहीतरी गडबड होत आहे, हे मला जाणवले.

जॉर्ज फर्नांडिस यांचे धोरण चुकले असे आपण म्हणू शकतो. पण त्यांच्या इतका अफाट बुद्धीचा व असीम परिश्रमाची तयारी असलेला दुसरा नेता मी पाहिलेला नाही. अशी माणसे समाजात वारंवार जन्माला येत नाहीत. एखाद्यात असे गुण असले तर त्यांना भांडवलशाही व्यवस्था उचलून दत्तक घेते. जॉर्जबद्दल माझ्या मनात नेहमीच प्रेम आणि आदर राहील.

जॉर्जला समाजवादी आणि कामगार नेते पी.डिमेलो यांनी मुंबईत आणले. हार्ट अ‍ॅटॅक येऊन ते अचानक निधन पावले. त्यानंतर जॉर्जने हातात सूत्रे घेतली. हॉटेल कामगारांची युनियन बांधणी रात्री १२ नंतर चालू व्हायची. हा गृहस्थ हॉटेलसमोर रात्री १२ ते पहाटे ५ या वेळात जाऊन कामगारांसोबत चर्चा करण्यासाठी मीटिंग घ्यायचा. जॉर्जने 8-9 महिने असे दीर्घकाळ हॉटेल कामगारांचे संप चालवून ते यशस्वी केले. जॉर्ज ‘कामगार नेता’ म्हणून प्रसिद्ध झाला. अपार कष्ट, उत्तम अभ्यास व मनस्वी जिद्द या गुणांच्या जोरावर जॉर्ज मुंबईचा ‘बंदचा बादशहा’ झाला.

डॉ. कुमार सप्तर्षी

 

 

कथाजॉर्जच्या एका पुस्तकाची

 

सत्ताकांक्षा आणि पराकोटीची विधिनिषेधशुन्यता या दोन गोष्टींमुळे देशावर 43 वर्षांपूर्वी आणीबाणी लादली गेली. आणीबाणीमुळे उच्चार, विचार व आचारसंहितेवर गदा आली. त्याविरुध्द जो लढा दिला गेला त्या लढ्यात अग्रणी असलेल्या नेत्यांमध्ये जॅार्ज फर्नांडिस होते.

25 जून 1975 रोजी बॉम्बे लेबर युनियनच्या गिरगावातील कचेरीत जॉर्ज फर्नांडीस यांचे विश्वासू शरद राव यांचा फोन आला, मी येईपर्यंत जाऊ नका. मी, सतिश वगळ आणि हॉकर्स युनियनचे तत्कालीन सेक्रेटरी जगन्नाथ पाठक, शरद रावांची रात्री उशिरापर्यंत वाट पाहत राहिलो. ते रात्री उशिरा आले ते आणीबाणीचा निषेध करणारी पोस्टर्स घेऊनच. आम्ही ती पोस्टर्स गेट वे अ‍ॅाफ इंडियापासून मध्य मुंबईपर्यंत मोक्याच्या ठिकाणी लावत फिरलो.

आणीबाणीत जॉर्ज फर्नांडिस मुंबईत फक्त शरद राव आणि रणजीत भानु याच्याशी संपर्क ठेऊन होते. प्रभूभाई संघवी यांचेकडेही ते आणीबाणी विरोधी पत्रकांचा मजकूर पाठवत असत. आणीबाणीचे साहित्य तयार करण्यासाठी त्या काळात प्रभूभाईंनी आपल्या सहकार्‍यांसह यंत्रणा राबवली. जॉर्ज फर्नांडिस यांचे आणीबाणी विषयीचे ‘‘एका हुकूमशाहीची कुळकथा’’ हे पुस्तक कोणी प्रिंटर छापण्यास तयार होईना. ते काम जोखमीचे खरे, पण विचार व सत्यस्थिती लोकांपुढे जाण्यासाठी ते छापायला हवे. प्रभूभाईंनीच त्यातून मार्ग काढला. त्यांनी ते माझ्याकडून सुवाच्छ अक्षरात लिहून घेतले. लिहिण्यासाठी जी जागा निवडली ती ही मुंबईच्या एका निर्जन वस्तीत. घराचे अंतरंगच हे कुणा कलावंताचे घर असावे याची साक्ष देतात! होय, सुप्रसिध्द चित्रकार व्ही.एन. ओके यांचेच ते घर. त्या घरातच जॉर्ज फर्नांडिसांची ‘‘एका हुकूमशाहीची कुळकथा’’ काळ्या शाईने माझ्याकडून लिहिली गेली.

मुखपृष्ठ लाभले तेही व्ही.एन. ओकेंच्या कुंचल्यातून साकारलेले. मी लिहिलेली ती पाने मग गोविंद सावंतने तशीच्या तशी छापली. स्वतःचे अक्षर असलेली ती असंख्य पुस्तके पाहून त्या क्षणाचा आनंदच काही वेगळाच होता. भीतीच्या सावटालाही न जुमानता त्या छोटेखानी प्रेसमधून पुस्तकांचे गठ्ठे राजाभाऊ पाटील आणि मी एका टॅक्सीत भरले. कुणीही कार्यकर्ता आपल्या घरात ठेऊन घेईल या भावनेने कोर्टातून सुटलेली ती टॅक्सी काही कार्यकर्त्याच्या घरी थांबवत गेलो. जॉर्जच्या त्या पुस्तकाच्या प्रती कुणीही आपल्याकडे ठेऊन घेण्यास तयार झाले नाही. शेवटी मीच त्या माझ्या घरी माळ्यावर ठेवल्या.

पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी एका रात्री माझ्या भावाने 

जॉर्ज फर्नांडिसांची ‘‘एका हुकूमशाहीची कुळकथा’’ काळ्या शाईने माझ्याकडून लिहिली गेली. मुखपृष्ठ लाभले तेही व्ही.एन. ओकेंच्या कुंचल्यातून साकारलेले. मी लिहिलेली ती पाने मग गोविंद सावंतने तशीच्या तशी छापली. स्वतःचे अक्षर असलेली ती असंख्य पुस्तके पाहून त्या क्षणाचा आनंदच काही वेगळाच होता. भीतीच्या सावटालाही न जुमानता त्या छोटेखानी प्रेसमधून पुस्तकांचे गठ्ठे राजाभाऊ पाटील आणि मी एका टॅक्सीत भरले.

भास्कर सावंत

 

जॉर्ज नावाचे वादळ

आणीबाणीच्या तुरुंगवासानंतर जेव्हा जनता पार्टीचे सरकार सत्तेवर आले, तेव्हा स्वाभाविकपणे मंत्रिमंडळामध्ये जॉर्ज फर्नांडिस यांचा समावेश झाला. उद्योगमंत्री म्हणून त्यांनी काँग्रेसच्या धोरणांना लगाम लावण्याचे काम मोठ्या हिमतीने केले आणि उद्योगपतींच्या सभेमध्ये उद्योगपती कसे आणीबाणीच्या काळात सरपटू लागले होते, यांचे अत्यंत मार्मिक वर्णन केले. अत्यंत यशस्वी व कर्तबगार मंत्री म्हणून त्यांची कारकीर्द देशभर गाजली आणि समाजवादी हा सत्तेवर गेल्यावर काय करू शकतो, हेही त्यांनी अनेकांना दाखवून दिले.

जॉर्ज कारवारमधून मुंबईला का आला आणि त्यावेळच्या बॉम्बे लेबर युनियन या कामगार संघटनेच्या चर्नी रोडवरील कार्यालयात कसा पोहोचला, हे मला सांगता येणार नाही. त्या युनियनचे काम करणारे कामगार नेते होते दंडवते, अण्णा साने व जगन्नाथ जाधव. मला जगन्नाथ जाधव यांनी सांगितले की ‘तुळु’ ही मातृभाषा असलेल्या, पण इंग्रजी व हिंदी भाषा बोलू शकणार्‍या या तरुणास सर्वांनी कार्यालयात आसरा दिला आणि एक नवीन मदतनीस म्हणून सर्वजण त्याकडे पाहू लागले. अधूनमधून चहा आण, सिगरेट आण अशा आज्ञाही नेते मंडळी त्याला देत असत व सांगितलेले काम तो पटकन पार पाडत असे. ही जॉर्जच्या सार्वजनिक कार्याची सुरुवात विलक्षणच मानावी लागेल. बहुधा डॉ. लोहियांच्या विचाराने भारले गेल्यामुळे तो इतक्या दूर मुंबईला या कार्यालयात उमेदवारी करण्यासाठी आला असण्याची शक्यता आहे. ती उमेदवारी करताना हळूहळू त्याने सुरुवातीला सहाय्यक म्हणून, पुढे सहकारी म्हणून आणि अखेरच्या टप्प्यावर नेता म्हणून केव्हा सुरुवात केली. हे ‘सिगरेट आण’ असे सांगणार्‍या नेत्यांनाही कळले नाही.

1957 साली मुंबई महानगरपालिकेची निवडणूक संयुक्त महाराष्ट्र समितीने जिंकून आपले बहुमत प्रस्थापित केले आणि मुंबईचे महापौर संयुक्त महाराष्ट्र समितीचे बनले. त्याकाळात जेव्हा पावसाळा आला त्यावेळी जॉर्ज फर्नांडिस यांनी आपल्या सफाई कर्मचार्‍यांचा संप जाहीर केला. संयुक्त महाराष्ट्र समितीचे अनेक नेते संतापले व त्यांनी जॉर्ज फर्नांडिस यांच्या युनियनला धडा शिकवण्याचे ठरवले. त्यावेळी समितीचे नेते एस. एम. जोशी यांनी समितीच्या सर्व नेत्यांना समजावून सांगितले, की युनियनने आपल्याला खिंडीत गाठले असले तरी त्याबद्दल त्यांच्या डावपेचाला दोष न देता आपण कामगारांच्या न्याय मागण्या स्वीकारल्या पाहिजेत. त्यामुळे महानगरपालिका व महानगरपालिका युनियन यांच्यामध्ये वाटाघाटी सुरू झाल्या आणि योग्य मागण्या स्वीकारल्या गेल्यामुळे युनियने संप मागे घेऊन विजयोत्सव साजरा केला. यावेळी जॉर्ज फर्नांडिस हे नाव देशभर गाजले आणि मुंबईमध्ये एका कामगार नेत्याचा उदय झाल्याची भावना सर्वत्र निर्माण झाली.

कॉ. डांगेसारख्या ज्येष्ठ व मुरलेल्या कामगार नेत्यालाही जॉर्ज फर्नांडिस यांच्या सांगण्यानुसार ‘मुंबई बंद’च्या त्यांनी जाहीर केलेल्या तारखा बदलाव्या लागल्या. जॉर्ज फर्नांडिस विविध पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांशीही समानतेच्या पातळीवर वाटाघाटी करू लागले. राज्य शासनाशी वाटाघाटी करताना त्यांचे वागणे नेहमीच आक्रमक राहू लागले. बाळासाहेब देसाई यांच्यासारखा गृहमंत्रीही जॉर्ज फर्नांडिस यांना दबकू लागला. त्यांनी जॉर्जबरोबर सलोख्याचे संबंध प्रस्थापित करून स्वतःची पुरोगामी प्रतिमाही निर्माण केली. हळूहळू संबंध देशभर जॉर्ज फर्नांडिस या लढाऊ व झुंजार नेत्याची मागणी सुरू झाली. त्यामुळे स्वाभाविकपणे सोशॅलिस्ट पार्टीचेही नाव गाजू लागले.

आणीबाणीच्या तुरुंगवासानंतर जेव्हा जनता पार्टीचे सरकार सत्तेवर आले, तेव्हा स्वाभाविकपणे मंत्रिमंडळामध्ये जॉर्ज फर्नांडिस यांचा समावेश झाला. उद्योगमंत्री म्हणून त्यांनी काँग्रेसच्या धोरणांना लगाम लावण्याचे काम मोठ्या हिमतीने केले आणि उद्योगपतींच्या सभेमध्ये उद्योगपती कसे आणीबाणीच्या काळात सरपटू लागले होते, यांचे अत्यंत मार्मिक वर्णन केले. अत्यंत यशस्वी व कर्तबगार मंत्री म्हणून त्यांची कारकीर्द देशभर गाजली आणि समाजवादी हा सत्तेवर गेल्यावर काय करू शकतो, हेही त्यांनी अनेकांना दाखवून दिले.

समता पार्टीची निर्मिती हाही सत्तेजवळ राहण्याचाच डावपेच होता. त्याला मधू लिमये यांची अजिबात मान्यता नव्हती, हे मला माहीत आहे. त्याकाळात मी मधू लिमये यांना विचारले तेव्हा ते म्हणाले ‘जॉर्ज मला गेल्या ६ महिन्यांत भेटलाच नाही’ लिमये समता पार्टी निर्मितीला पाठिंबा देणार नाहीत, हे जॉर्ज फर्नांडिस यांना माहितच होते. दुर्दैवाने समाजवादी आंदोलनाच्या अत्यंत प्रखर झुंजार अशा व्यक्तित्वाच्या जीवनाची अखेर सत्तावादामध्ये झाली, हे समाजवादी आंदोलनाचेच दुर्भाग्य आहे, असे मला वाटते.

भाई वैद्य

साधी राहणी, उच्च विचार

जॉर्ज फर्नांडिस यांनी १९७४ साली संपूर्ण देशातील रेल्वेसेवा बंद केली होती. आजवरच्या इतिहासातला तो सर्वात मोठा रेल्वे संप होता. हा संप फसलेला आहे हे दाखवण्यासाठी रेल्वे गाड्या सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र, त्याला विरोध करत जॉर्ज फर्नांडिस नेहरू शर्ट, लेंगा आणि गांधी टोपी अशा वेशात माहिमला गेले आणि थेट रुळांवर उडी घेत त्यांनी वाहतूक थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी त्यांना उचलले आणि सरळ प्लॅटफॉर्मवर टाकून बेदम मारहाण केली. ते दृश्य बघितल्यानंतर तिथे उपस्थित लोकही रडायला लागले होते. मात्र, त्यावेळी आणि नंतरही अनेकदा जॉर्ज फर्नांडिस सरकारला पुरून उरले.

जॉर्ज फर्नांडिस हे नाव ऐकल्यावरच अनेक लोक हसायचे. जॉर्ज नावाचा माणूस समाजासाठी काही करू शकेल, असा विश्वास लोकांना वाटत नव्हता. मात्र अल्पावधीतच जॉर्ज यांची समाजासाठी काहीतरी करण्याची धडपड, त्यांचे खमके नेतृत्व आणि जिद्द लोकांना समजली.

आपली गार्‍हाणी हा मनुष्य ठामपणे सरकारसमोर मांडू शकतो याची लोकांना कालांतराने जाणीव झाली. ऑर्गनायझर कसा असावा हे जॉर्ज यांच्याकडून शिकण्यासारखे होते. जॉर्ज मराठी भाषा उत्तम बोलत असत. त्यामुळे मुंबईतील लोकांना ते आपल्या जवळचे नेते वाटत असत. जॉर्ज लोकांशी नेहमीच अत्यंत साधेपणाने आणि नम्रतेने वागत असत. त्यामुळे लोकांना त्यांच्याविषयी आपुलकी आणि विश्वास वाटत असे. त्यांनी कधी शोभाही केली नाही. ते न्याहरी करण्यासाठी, जेवण्यासाठीही अगदी साध्या हॉटेलमध्ये जात असत. त्यामुळे लोकांना ते आपल्यातलेच एक वाटत असत.

जॉर्ज फर्नांडिस, बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्यातील संबंध खूप चांगले होते. हे तिघेही समकालीन नेते. संबंध कसे ठेवावे किंवा मैत्री कशी जपावी? हे जॉर्ज फर्नांडिस यांच्याकडून शिकण्यासारखे होते. महापालिका अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या वेतनवाढीसाठीही जॉर्ज फर्नांडिस लढले होते. त्यांनी नेहमीच लोकांच्या हिताचा विचार केला, त्यामुळे लोकही त्यांच्या पाठीशी उभे राहिले.

दिनू रणदिवे

असा बंदसम्राट आता होणे नाही

७० ते ८० च्या दशकातील मुंबई वेगळी होती. देशाला नुकतेच स्वातंत्र्य मिळाले होते. जॉर्जचे मुंबईत कोणीही नातलग नव्हते. त्याला फक्त कारवारकडची तुळू, कन्नड व कोकणी भाषा बोलता येत होती. इंग्रजीही मोडकीतोडकी होती. सुरुवातीला (व्ही.टी.) आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या बाहेर जॉर्ज झोपायचा. पडेल ते काम करायचा, हा असा संघर्षाने भरलेला दिनक्रम होता. त्यावेळी दादा लोक गुंड फुटपाथवर झोपलेल्यांकडून पाच, सहा पैसे हप्ते वसूल करायचे. जॉर्जलाही हा अनुभव आला. १९४९ च्या दरम्यान त्यावेळी गोदी कामगारांच्या कार्यालयात जॉर्ज मिळेल ते काम करू लागले. येथेच त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणार्‍या घटना घडल्या. अर्थात आपल्यातील उणीवा भरून काढण्याची संधीही त्यांना इथेच मिळाली. तत्कालीन गोदी कामगारांचे नेते प्लासिड डिमेलो व कामगार नेते पिटर अल्वारिस यांनी जॉर्ज यांना मदत केली. चर्नी रोडच्या लेबर युनियनच्या कार्यालयात जॉर्ज यांच्या झोपण्याची सोय झाली. दिवसभर कामगार नेत्यांना चहा, सिगारेट आदी आणून देण्याचे काम ते करत होते. त्यातून डिमेलो आणि अल्वारिस यांच्याशी त्यांचे काम त्यांनी पाहिले.

गोदी कामगारांप्रमाणेच जॉर्ज यांनी पुढे मुंबईतील महापालिका कर्मचारी, बेस्ट, टॅक्सी, रिक्षावाले, हॉटेल कर्मचारी यांचे नेते बनले. मुंबई महापालिकेत चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांना सुविधा नव्हत्या. पगारही पुरेसा नव्हता. जॉर्ज यांनी त्यांच्यासाठी पहिला संप केला. त्यानंतर दरवर्षी पावसाळ्यानंतर दिवाळीआधी जॉर्ज यांचा संप होणार असे मानले जायचे. मुंबईतील टॅक्सी आणि बेस्ट बसेस बंद करून जॉर्ज यांनी सरकारला मागण्या मान्य करण्यासाठी भाग पाडायचे. १९६२ साली संयुक्त महाराष्ट्र समितीची सत्ता होती. समाजवाद्यांचा आणि कम्युनिस्टांच्या हातात सत्ता असताना जॉर्ज यांनी पालिका कामगारांचा संप करून प्रशासनाला वठणीवर आणले. जॉर्ज यांच्या संपामुळे कामगारांना चांगला पगार आणि मान मिळू लागला.

जॉर्ज फर्नांडीस यांचे गुरू पीटर अल्वारिस नॅशनल मजदूर युनियनचे अध्यक्ष होते. १९६० व १९६२ मध्ये पुकारण्यात आलेले संप सरकारने चिरडून टाकले. साहजिकच पराभवामुळे रेल्वे कामगार अस्वस्थ होते. अशा स्थितीत गोदी कामगारांचे लढे यशस्वी केलेल्या जॉर्ज यांच्यावर रेल्वे कामगारांनी विश्वास टाकला. त्यामुळे रेल्वे कर्मचार्‍यांनी जॉर्ज यांनी आपले नेतृत्व करावे, अशी मागणी केली. त्यामुळे जॉर्ज यांना नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे अध्यक्षपद मिळवण्यासाठी आपले गुरू पीटर अल्वारिस यांच्या विरोधात निवडणूक लढवावी लागली. या निवडणुकीत जॉर्ज यांनी अल्वारिस यांचा पराभव केला. १९७४ मध्ये नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे अध्यक्ष होताच ३० लाख रेल्वे कर्मचार्‍यांनी आपल्या मागण्यांसाठी सरकारदरबारी निवेदने दिली. सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे जॉर्ज यांनी ५ मे १९७४ रोजी रेल्वेचा देशव्यापी संप केला. २१ दिवस हा संप चालला. हा संप थांबवण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १३ लाख कामगारांना तडकाफडकी कामावरून काढून टाकले. तर जवळपास ५० हजार कर्मचार्‍यांना तुरुंगात डांबले. तरीही संप सुरूच होता. जॉर्ज फर्नांडीस यांनाही तुरुंगात डांबले. अखेर २६ मे रोजी जॉर्ज यांनी रेल्वेचा संप मागे घेतला. २९ मे रोजी रेल्वे कामगार कामावर गेले. या संपामुळे सर्व स्तरातील जनता अस्वस्थ होती. त्यामुळे काँग्रेसची सत्ता अस्थिर होण्याचा धोका होता. त्यानंतर १९७५ मध्ये इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी जाहीर केली.

त्याचबरोबर जॉर्ज फर्नांडीस भूमिगत झाले. मात्र त्यांना शोधून काढून तुरुंगात डांबण्यात आले. पुढील काळात जॉर्ज राजकारणात सक्रिय झाले. केंद्रात जॉर्ज फर्नांडीस रेल्वे मंत्री झाले. त्यांच्याच काळात कोकण रेल्वेचा प्रश्न मार्गी लागला. पुढे वाजपेयी सरकारच्या काळात ते देशाचे संरक्षण मंत्री झाले. संरक्षण मंत्री असतानाही त्यांनी सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात राहाणे नाकारले. पी.व्ही. नरसिंह राव पंतप्रधान असताना हर्षद मेहता याने ३० हजार कोटी रुपयांचा शेअर घोटाळा केल्याचे प्रकरण गाजले होते. या मेहताने पंतप्रधान राव यांच्या बंगल्यावर १०० कोटींची भरलेली सुटकेस नेल्याचे आरोप झाले होते. त्यावेळी एकच खळबळ उडाली होती. त्यावेळी जॉर्ज यांनी संसदेत ऐतिहासिक भाषण करून काँग्रेसवर टीका केली. त्यावेळी काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांच्याशी त्यांची जुगलबंदी मोठ्या चर्चेचा विषय झाली होती.

गोविंद कामतेकर

 

जॉर्ज आणि क्रिकेट

साधारणत: १९८५ सालची ही गोष्ट असेल. मी त्यावेळी शाळेत नववीत होतो. ताडदेवला, आर्यनगरात रहात होतो. एका रविवारी सकाळी, आम्ही काही मित्र ठाकूरद्वारच्या स. का. पाटील उद्यानात फिरायला गेलो होतो. गार्डनमध्ये असणार्‍या घसरगुंडी, झोपाळ्यांवर मस्त खेळून झाल्यावर आम्हाला क्रिकेट खेळायचे होते. पण गार्डनमध्ये क्रिकेट खेळायला मनाई करण्यात आली. त्यामुळे आम्ही स. का. पाटील उद्यानाच्या मागे म्हणजे मराठी ग्रंथ संग्रहालयाची इमारत आहे, त्या इमारतीच्या आडव्या रस्त्यावर क्रिकेट खेळण्यासाठी गेलो. आमच्याकडे अर्थात बॅट आणि चेंडू होता. ज्या रस्त्यावर खेळायला गेलो होतो त्याच्यावर रविवार असल्यामुळे गाड्याही नव्हत्या. काही क्षणातच आमचे क्रिकेट सुरू झाले.

आम्ही आरडाओरडा आणि खेळण्यात गुंतलेलो असताना ग्रंथसंग्रहालयाच्या इमारतीच्या तळमजल्यावरून डोळ्याला चष्मा, लेंगा, कुर्ता घातलेले एक गृहस्थ बाहेर आले. ते आमच्या दिशेने येत होते. आता ते आम्हाला ओरडणार, क्रिकेट खेळू देणार नाही, याची खात्री झाली होती. त्यामुळे आमचे क्रिकेट थांबले होते. पण ते आमच्या दिशेने आले आणि मीपण खेळू का, असे त्यांनी विचारले. त्यावेळी मात्र आमचा जीव भांड्यात पडला. आम्ही अर्थातच त्यांना आमच्यासोबत सहभागी करून घेतले. त्यानंतर तब्बल अर्धा तास ती व्यक्ती आमच्यासोबत क्रिकेट खेळली.

मस्त बॉलिंग, बॅटिंग आणि किपिंगही केली. आमचा खेळ संपल्यावर त्यांनी आम्हाला जबरदस्तीनेच ठाकूरद्वार नाक्यावर असलेल्या इराण्याच्या हॉटेलमध्ये नेले आणि आम्हा सात जणांना मस्त मस्का पाव खाऊ घातला. पण तोपर्यंत काकांचे नाव, गाव, पत्ता काहीच माहीत नव्हते.

मस्का पाव खाऊन झाल्यावर मी भीतभीत त्यांना त्यांचे नाव विचारले. ‘मला जॉर्ज फर्नांडिस म्हणतात,’ असे त्यांनी मिश्किलपणे सांगितले. त्यावेळी माझा एक मित्र, ‘म्हणजे जॉर्ज काका’ असे म्हणाला. ‘ठिक आहे तुम्ही जॉर्जकाका म्हणा’, असे पुन्हा त्यांनी सांगितले. त्यानंतर आम्ही, आमच्या जॉर्जकाकांना ग्रंथसंग्रहालयाच्या इमारतीजवळ सोडून घरी निघालो असता, ‘पुन्हा खेळायला या’, असे एका मित्राने त्यांना सांगितले. त्यावेळी, फक्त ‘बघू…’ म्हणत जॉर्ज काका, त्या इमारतीत शिरले. आम्हीही घरी गेलो. जॉर्जकाकांचा विषय बहुतेक सर्वांच्याच विस्मरणात गेला. त्यानंतर साधारणत: महिन्याभराने जॉर्जकाकांचा फोटो एका पेपरमध्ये छापून आला होता.

पेपरमध्ये जॉर्जकाकांचा फोटो तेही पहिल्या पानावर, ते बघून मला आश्चर्यच वाटले. कुठल्या तरी आंदोलनाचा तो फोटो होतो. मी तो पेपर खरेदी केला आणि धावत जाऊन माझ्या मित्रांना दाखवला. रविवारी आमच्यासोबत क्रिकेट खेळलेल्या जॉर्ज काकांना पेपरमध्ये बघून माझे इतर मित्रही थक्क झाले. त्यानंतर अनेकवेळा ग्रंथसंग्रहालयाच्या इमारतीबाहेरील रस्त्यावर आम्ही क्रिकेट खेळलो; पण जॉर्जकाका काही आमच्यासोबत खेळायला आले नाहीत. ते वृत्तपत्रात, टीव्हीवर मात्र सातत्याने दिसत राहिले आणि आमची कॉलर उगाचच टाईट होत होती.

आबा माळकर

मुंबई ते बिहार व्हाया दिल्ली!

नोकरीच्या शोधात १९४९ साली ते मुंबईत आले होते. मुंबईतील एका वृत्तपत्रामध्ये त्यांनी प्रुफ रिडर म्हणून काम केले होते. या ठिकाणी ते कामगार नेते प्लासिड डी मेलो आणि समाजवादी राममनोहर लोहिया यांच्या संपर्कात आले. यांच्या विचारांचा जॉर्ज यांच्या जीवनावर परिणाम झाला. यानंतर ते समाजवादी व्यापार संघाशी जोडले गेले.

जॉर्ज फर्नांडिस यांनी सर्वप्रथम १९६७ मध्ये दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते स.का.पाटील यांचा

पराभव करून लोकसभेत प्रवेश केला. मात्र १९७१ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला. इंदिरा गांधी सरकारला त्यांनी कडाडून विरोध केला. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एकमेव रेल्वे कर्मचारी संपाचे त्यांनी १९७४ मध्ये नेतृत्व केले. आणीबाणीच्या कालावधीत एक आरोपी म्हणून त्यांनी तुरुंगवासही भोगला. १९७७ साली मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत आलेल्या जनता सरकारमध्ये त्यांनी उद्योगमंत्री म्हणून काम बघितले.

जुलै १९७९ मध्ये लोकसभेत काँग्रेस नेते यशवंतराव चव्हाण यांनी मांडलेल्या अविश्वास ठरावावर त्यांनी जनता सरकारच्या बाजूने प्रभावी भाषण केले. पण, दुसर्‍या दिवशीच पंतप्रधान मोरारजी देसाईंच्या नेतृत्वावर आपला विश्वास राहिला नाही असे जाहीर करून मंत्रिमंडळातून राजीनामा दिला. १९८४ च्या निवडणुकीत त्यांचा मंगलोर लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला.पण, १९८९ मध्ये ते बिहार राज्यातील मुझफ्फरपूर लोकसभा मतदारसंघातून जनता दलाच्या तिकिटावर लोकसभेवर निवडून गेले.विश्वनाथ प्रताप सिंह यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात स्थापन झालेल्या संयुक्त आघाडी सरकारमध्ये ते रेल्वेमंत्री होते. १९९१ च्या लोकसभा निवडणुकांतही त्यांनी मुझफ्फरपूर लोकसभा मतदारसंघातून जनता दलाचे उमेदवार म्हणून विजय मिळवला.

१९९४ मध्ये बिहार राज्याचे मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्याशी झालेल्या मतभेदांमुळे त्यांनी आणि जनता दलाच्या नितीशकुमार आणि रवी रे यांच्यासारख्या नेत्यांनी समता पक्ष या स्वतंत्र पक्षाची स्थापना केली. १९९६ च्या लोकसभा निवडणुकीसाठी समता पक्षाने भारतीय जनता पक्षाबरोबर युती केली. फर्नांडिस यांनी बिहारमधील नालंदा मतदारसंघातून विजय मिळवला. पुढे १९९८ आणि १९९९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी नालंदा मतदारसंघातूनच विजय मिळवला. १९९९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी समता पक्ष आणि रामकृष्ण हेगडे यांचा लोकशक्ती या पक्षांचे विलीनीकरण होऊन जनता दल (संयुक्त) हा नवा पक्ष अस्तित्वात आला. १९९८ मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या भाजप आघाडी सरकारमध्ये त्यांनी संरक्षणमंत्री म्हणून काम बघितले.

२००१ मध्ये त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्यामुळे ते मार्च ते ऑक्टोबर २००१ मंत्रिमंडळाबाहेर होते. पण, ऑक्टोबर २००१ मध्ये त्यांची परत संरक्षणमंत्रीपदी नेमणूक झाली. २००४ च्या लोकसभा निवडणुकीत जॉर्ज फर्नांडिस यांनी बिहार राज्यातील त्यांच्या पूर्वीच्या मुझफ्फरपूर मतदारसंघातून विजय मिळवला. नंतरच्या काळात ते आजारपणामुळे लोकसभेत फारसे सक्रिय राहिले नाहीत. समता पक्षाच्या नेत्या जया जेटली यांच्याशी त्यांची खास मैत्री होती. आजारपणाच्या सुरुवातीच्या काळात जया जेटली यांनी त्यांची खूप काळजी घेतली. मात्र त्यानंतर त्यांची पत्नी लैला यांनी जॉर्ज यांची अखेरपर्यंत शुश्रुशा केली.

 

जॉर्ज आणि मी

एनडीएमध्ये समता पक्ष किंवा जनात दल (युनायटेड) हा मोठा घटक पक्ष होता. आज युपीएमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. जसे एनडीएमध्ये जॉर्जचे स्थान होते तसेच स्थान युपीएमध्ये पवारांचे आहे. वाजपेयी बर्‍याचदा परदेशी जात. अशा वेळी अडवाणी आणि जॉर्ज हे दोन तीन नंबरला असत. प्रणव मुखर्जी राष्ट्रपती झाल्यावर आता दोन नंबरला कोण होणार यावर वादंग माजले. पवार रुसले. यात जॉर्ज आणि इतर यांच्यातला फरक आपल्याला जाणवतो. तहलकामध्ये जॉर्जवर काहीही आरोप नसतानासुद्धा त्याने मंत्रीपदाचा स्वत:हून राजीनामा दिला. पवारांच्या बाबतीत अशा प्रकारचे किती आरोप झाले? बीइइआय, लवासा इत्यादी प्रकरणे झाली; पण राजीनाम्याचा प्रश्न आला तो आपण दोन नंबर नाही म्हणून. २००४ मध्ये एनडीएचे सरकार येऊ शकले नाही. युपीएचे सरकार आले. पण जॉर्ज पुन्हा मुझप्फरपूरमधून (अल्प बहुमताने) निवडून आला. त्यानंतर मला एकदा राज ठाकरेंकडून निरोप आला. बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यंगचित्रांचे पुस्तक काढायचे राजच्या मनात आले. या पुस्तकाला जॉर्जने प्रस्तावना लिहावी, असे त्याने ठरवले. ही प्रस्तावना मी दिल्लीला जाऊन जॉर्जकडून लिहून घ्यावी, असे त्याने सुचवले. मी जॉर्जला फोन केला. तो म्हणाला, ‘तुच लिही. मी सही करतो’. पण तसे करण्यात अर्थ नव्हता. ठाकरे आणि जॉर्जचे संबंध मी कसे वर्णन करणार? मग मी एक प्रश्नावली तयार केली आणि त्याची उत्तरं या स्वरुपात जॉर्जने प्रस्तावना लिहिली.

 

अरूण नाईक  

 

मी तलवार घेऊन उभा आहे

थोडा वेळ आम्ही काहीच बोललो नाही. तेवढ्यात जया जेटली पचकल्या. ‘आप को पता नहीं, दिल्ली, यूपी, बिहार वगैरा में इस निर्णय के लिये कितने लोग जॉर्जसाहब की तारीफ कर रहें हैं ।’ माझे डोकेच सणकले. मी थोडा चिडून आणि उंच आवाजात म्हणालो, जयाजी, और आप को पता नही हैं की महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश वगैरा में, कितने लोग जॉर्ज को गालियाँ दे रहे हैं ।’ मग जॉर्जने पुन्हा चर्चा पुढे सुरू केली. ‘जयंत, मी तुला प्रत्यक्ष वस्तुस्थिती सांगितली, ती ऐकल्यावर तुम्हाला काय वाटते?’ माधव, हळबे काहीच बोलले नाहीत. पण मी म्हणालो, तुम्ही सांगताय तशी परिस्थिती आहे हे खरेच आहे. तुमची त्यामुळे किती कोंडी होत असेल, तुमच्या मनात विचारांचा किती संघर्ष होत असेल, हे मला कळतंय.’ जवळजवळ तास दोन तास ही चर्चा चालली होती. जॉर्जही थकल्यासारखे वाटत होते आणि खरे म्हणजे, आणखी बोलण्यासारखे काही उरलेही नव्हते. आम्ही हळूहळू जॉर्जचा निरोप घेऊ लागलो. आतापर्यंत शांतपणे ऐकत असलेल्या प्रभाकर मोरेंनी मला विचारले, ‘आता तुझ्या तलवारीचे कायजयंत …’ सगळेच हसले. आम्ही बाहेर पडलो. पण, ‘माझ्या तलवारीचे काय?’ हा प्रश्न माझ्या मनात आता आतापर्यंत घोंघावत होता. कधी वाटायचे, ती आपली होती का? बहुतेकवेळा वाटायचे की, सैद्धांतिकदृष्ठ्या आपली ती प्रतिक्रिया योग्यच होती.

जयंत धर्माधिकारी

 

एक वैयक्तिक अनुभव

त्या घटनेलाही १५ पेक्षा अधिक वर्षे होऊन गेली होती. तोही थोड्या वस्तुनिष्ठपणे तिच्याकडे बघत असे. पण व्ही.पी.सिंग हा कुठल्याही दृष्टिकोनातून पाहिला तरी एक ‘बनावट मसीहा’ होता. मंडल अहवाल त्याने कुणालाही न सांगता कसा आणला, हे तो चिडून सांगायचा. त्या सांगण्याचे तात्पर्य असायचे ‘इतका खोटा आणि अप्रामाणिक माणूस मी उभ्या आयुष्यात पाहिला नाही.’ पण हे त्याने सार्वजनिकरित्या सांगितले नाही. मी एकदा विचारले तर तो म्हणाला, सगळ्याच गोष्टी अशा उघड सांगता येत नाहीत. इथे एक मजेशीर उदाहरण देण्यासारखे आहे. संगणकाविरुद्ध त्याने एक मोहीमच उभारली होती. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तो त्याचा विरोध करायचा. कामगारांची रोजीरोटी जातेय, असा समज करून भरपूर टीका करायचा. मोठे आंदोलन करणार आहे म्हणून धमक्या द्यायचा. मी मुंबईहून त्याच्याकडे एक संगणक घेऊन गेलो. त्याआधी त्याच्याकडे एक डबल सायक्लोस्टाईलचे मशिन होते. महिनाभरातच संगणक त्याच्या इतका अंगवळणी पडला की त्याने संगणकाच्या विरोधात बोलणे बंद केले.

श्रीपाद हळबे

 

एका वादळी पर्वाचा अस्त

जॉर्ज फर्नांडिस भारतीय राजकारणातील एक वैशिष्ठ्यपूर्ण व्यक्तिमत्त्व होते. देशातील कामगार चळवळीला त्यांनी संघर्षाचा एक धगधगता आयाम दिला. त्यात त्यांच्या नेतृत्वाखाली सत्तरच्या दशकात झालेला रेल्वे कर्मचार्‍यांचा अभूतपूर्व संप एक महत्त्वाचा अध्याय आहे. मुंबईसारख्या देशाच्या आर्थिक आणि औद्योगिक राजधानीतील संघटित कामगार हे त्यांच्या लढाऊ संघटन कौशल्याचे फलित आहे. देशाचे संरक्षणमंत्री म्हणून जबाबदारी बजावताना त्यांनी अणुचाचण्या घडवून आणण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. याशिवाय केंद्रीय मंत्रिमंडळात विविध महत्त्वाच्या विभागांच्या जबाबदार्‍या यशस्वीपणे सांभाळल्या. कोकण रेल्वेच्या उभारणीत त्यांचे मोलाचे योगदान होते.

देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

 

कष्टकरी वर्गाचे धुरंधर नेते

जॉर्ज फर्नांडिस हे स्वातंत्र्योत्तर काळातील कामगार आणि कष्टकरी वर्गाचे धुरंधर नेते होते. कामगारांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी अनेक यशस्वी आंदोलने केली. अभूतपूर्व लोकप्रियता लाभलेले जॉर्ज फर्नांडिस यांनी केंद्रातील विविध सरकारांमध्ये जबाबदारीची पदे भूषविली होती. दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात जॉर्ज फर्नांडिस मंत्री असताना त्यांचेसमवेत काम करण्याची मला संधी लाभली. माझ्या विनंतीवरून त्यांनी तेलंगण राज्यातील करीमनगर येथे परमवीर चक्र विजेते शहीद कॅप्टन विजय रघुनंदन राव यांच्या पुतळ्याचे उद्घाटन केले होते. करीमनगर येथील ख्रिश्चन मिशनरी हॉस्पिटल येथे ‘अंतिम संस्कार’ मृतवाहिकेचे लोकार्पणदेखील फर्नांडिस यांनी केले होते. त्यांच्या निधनाने देशाने एक थोर संसदपटू व सच्चा कामगार नेता गमावला आहे.

सी.विद्यासागर राव, राज्यपाल, महाराष्ट्र

 

संघर्षयोध्दा गमावला

जॉर्ज फर्नांडिस यांच्या निधनाने देशाने महान संघर्ष योद्धा गमावला आहे. ते हाडाचे कामगार नेते होते. बंदसम्राट होते. कामगारशक्तीच्या बळावर मुंबई बंद करण्याची क्षमता असलेले ते एकमेव नेते होते. देशातली कामगार चळवळ आज पोरकी झाली आहे. केंद्रिय रेल्वेमंत्री, संरक्षणमंत्री म्हणून त्यांनी केलेले कार्य सदैव स्मरणात रा हील. जॉर्ज नावाचा झंझावात आता पुन्हा घोंगावणार नाही, याचं दुःख आहे. त्यांना माझी विनम्र श्रद्धांजली.

धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेते

 

संवाद साधणारा नेता

जॉर्ज साहेबांच्या निधनाने या देशाचे फार मोठे नुकसान झाले आहे. शरद राव साहेबांना या चळवळीमध्ये आणण्यामागे जॉर्ज साहेबांचा मोठा हात होता. हे कधीही न भरून निघणारे नुकसान आहे. नेहमी आपले पाय जमिनीवर ठेवावे अशी त्यांची शिकवण होती. कितीही मोठा नेता असला तरीही लोकांशी योग्यरित्या संवाद साधणारा नेता आज आपण गमावला आहे.

शशांक राव, कामगार नेते

 

कामगारांसोबत

घट्ट नाळ असलेला नेता

देशातील आणि मुंबईतील विशिष्ट कामगारांसाठी आपले आयुष्य झिजवणारा एक कामगार नेता आज हरवला आहे. मी त्यांच्या अनेक चळवळी पाहिल्या आहेत. त्यांच्या विचाराची बैठक पक्की होती आणि कामगारांमध्ये त्यांना ओलावा होता. कामगारांसोबत घट्ट नाळ असलेला नेता गेला आहे.

कपिल पाटील, आमदार शिक्षक भारती

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -