घरफिचर्सजमीन‘दोस्त’!

जमीन‘दोस्त’!

Subscribe

माझगावमधील डॉकयार्ड रोडजवळील एक इमारत २०१३ च्या पावसाळ्यात सप्टेंबरच्या अखेरीस कोसळली. त्या जमीनदोस्त झालेल्या इमारतीने आमचा लाडका तरुण पत्रकार दोस्त योगेश पवार याला आमच्यापासून हिरावून नेले. त्या इमारतीच्या ढिगार्‍याखाली ६१ रहिवासी गाडले जाऊन मृत्यूमुखी पडले होते. नेहमी हसतमुख असणार्‍या योगेशला आमच्यातून असे अचानक निघून जावे लागेल, याची कल्पना ना त्याला होती ना आम्हाला. झाले ते अनपेक्षित आणि धक्कादायक होते.

माझगाव येथील बाबू गेनू मार्केट जवळील डॉकयार्ड रोडवरील महापालिकेच्या अखत्यारितील इमारत २८ सप्टेंबर २०१३ रोजी माणसं झोपेत असताना सकाळी कोसळली. त्या जुन्या इमारतीच्या ढिगार्‍याखाली ६१ रहिवासी गाडले गेले आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. आता या घटनेला पुढच्या महिन्यात ६ वर्षे होतील. मुंबईत पावसाळ्यात जुन्या इमारती कोसळतात. त्यात अनेकजण गाडले जातात. अशा इमारती कोसळल्यानंतर त्या का कोसळल्या, त्याला कोण जबाबदार होते, पालिका किंवा संबंधित संस्थेने त्याकडे दुर्लक्ष का केले, अशी चौकशी सुरू होते. पण त्यातून फारसे काही निष्पन्न होत नाही. पण एक गोष्ट मात्र निश्चित असते. या इमारतींखाली गाडले गेल्यामुळे जे मरण पावतात, ते मात्र कधीही परतून येत नाहीत. अशा दुर्घटनेत आपला कुणी जवळचा मृत्यूमुखी पडला असेल, तर त्याच्या आठवणी पुन्हा पुन्हा येत राहतात.

पावसाळा आला की धरणी हिरवीगार होते. उन्हाने काहिली होणारी मने प्रसन्न होतात. सगळे मुंबईकर पाऊस एन्जॉय करतात. मीही मुंबईकर म्हणून पावसाचा आनंद घेतो. पण पावसाळा सुरू होऊन तो पुढे सरकू लागतो आणि सप्टेंबर महिना सुरू झाला की, मात्र मला हा पावसाळा मनाला टोचू लागतो. त्याच्या जलधारा या आकाशातून वरुणराजाने मनावर मारलेले बाण वाटतात. त्यामुळे रक्तबंबाळ व्हायला होते. डॉकयार्ड रोडवरील इमारत कोसळली. तिच्या ढिगार्‍याखाली ६१ जण गाडले गेले. त्यात माझा पत्रकार मित्र योगेश पवार होता. योगेश दै. ‘सकाळ’मध्ये पत्रकार होता. सुरुवातीला आम्हा मित्रांना त्याचे असे काही झाले असेल त्याची जराशीही कल्पना नव्हती. तो त्या इमारतीत राहत होता इतकेच आम्हाला माहीत होते. आम्हाला काळजी वाटू लागली, म्हणून आम्ही मित्रांनी योगेशला फोन लावला. पण त्याचा फोन लागेना. काही दिवसांपूर्वी तो गावाला जाणार आहे, असे मला म्हणाला होता. त्यामुळे मला वाटले गावाला रेंज मिळत नसेल म्हणून त्याचा फोन लागत नसेल. पण डॉकयार्ड रोडवरील इमारतीच्या ढिगार्‍याखाली गाडले गेलेल्यांचे नातेवाईक जेव्हा जमू लागले आणि शोध घेऊ लागले तेव्हा मात्र वास्तव समोर येऊ लागले. योगेशचेही नातेवाईक इमारतीजवळ आले होते. तेव्हा आम्ही योगेशचे पत्रकार मित्र तिथे होतो. आम्ही त्याच्या नातेवाइकांना योगेशविषयी विचारले तेव्हा कळले की, तो गावी गेलेला नाही. तो त्या इमारतीतच होता. त्यावेळी मात्र आम्हा मित्रांच्या काळजाचा ठोका चुकला.

- Advertisement -

अग्निशमन दलाचे जवान ढिगारा उपसण्याचे काम करत होते. एकामागून एक माणसांना बाहेर काढत होेते. त्यातील बरेचजण मृत्यूमुखी पडले होते. योगेश कधी सापडतो यासाठी आमच्या मनाची घालमेल सुरू होती. वेळ पुढे सरकत होती. तसे आम्ही मित्र अधिकाधिक अस्वस्थ होत होतो. कारण आमचा लाडका दोस्त त्या जमीनदोस्त झालेल्या इमारतीखाली अडकला होता. दुसर्‍या दिवशी योगेशचा देह सापडला. त्याला तात्काळ इस्पितळात हलवण्याची सोय करण्यात आलेली होती. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. आमचा तरुण मित्र आम्हाला कायमचा सोडून गेला होता. त्याच्यासोबत त्याचे वडीलही होते. त्यांचाही मृत्यू झाला होता. नेहमी हसतमुख असलेल्या योगेशचा निष्प्राण देह पाहून आम्हा मित्रांच्या डोळ्यांतून अश्रूंचा पाऊस कोसळू लागला. इतक्या कमी वयात आम्हाला अचानक असा का सोडून गेलास असे आम्ही ओरडत होतो. नेहमी चुटकीसरशी उत्तर देणारा योगेश मात्र अगदी शांत होता. त्याला वाचवण्यासाठी सगळ्यांनी केलेले प्रयत्न निष्फळ ठरले होते. योगेशची आणि माझी पहिली भेट दै. ‘पुढारी’मध्ये झाली. त्याचे मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यात होते. तो पूर्वी रत्नागिरीतील ‘पुढारी’च्या आवृत्तीसाठी रिपोर्टर म्हणून काम करायचा. पत्रकारितेची त्याला सुरुवातीपासून आवड होती. मोठा भाऊ असल्यामुळे कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावर होती. तो पुढे मुंबईला आला. मुंबईत ‘पुढारी’त त्याने नोकरी मिळवली. तेव्हा ‘पुढारी’चा चर्नी रोडला वेलकर लेनमध्ये ब्युरो होता.

त्याची आणि माझी अल्पावधीत छान मैत्री जमली. कुठल्याही विषयावर सखोल विचार करण्याची त्याला आवड होती. त्याचा स्वभाव खूप विनम्र होता. त्याच्या वाढदिवशी आम्ही सगळ्यांनी कॉन्ट्रिब्युशन काढून त्याच्यासाठी एक घड्याळ घेऊन दिले होते. त्यानंतरचा त्याच्या चेहर्‍यावरचा आनंद आजही स्मरणात आहे. त्यावेळी मालवणी नाट्यसम्राट मच्छिंद्र कांबळी यांचे निधन झाले होते. योगेश आणि मी कोकणी असल्यामुळे आम्हाला खूप दु:ख झाले होते. कांबळींच्या अंत्ययात्रेत आम्ही सहभागी झालो होतो. त्यावेळी आपला कोकणी माणूस आपल्यातून असा अचानक गेला या भावनेने आमच्या दोघांच्याही डोळ्यांतून अश्रू वाहत होते. ‘मच्छिंद्र कांबळी अमरे रहे’, अशा घोषणा आम्ही दोघे कळवळून देत होतो. पण पुढे पाच वर्षांनंतर योगेश तूही आम्हाला असा अचानक सोडून जाशील असे वाटले नव्हते. आमच्या मनात तुझ्या आठवणी अमर आहेत.

Jaywant Rane
Jaywant Ranehttps://www.mymahanagar.com/author/rjaywant/
25 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. राजकीय, सामाजिक, वैचारिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -