घरफिचर्सअठराशे रुपयेवाल्या काकू

अठराशे रुपयेवाल्या काकू

Subscribe

ठाकूर यांच्या ट्विटनंतर अनेकांनी या व्हिडिओला ज्या पद्धतीने प्रसिद्धी देण्यात येत होती त्यावर आक्षेप वर्तवला. काहीजणांनी तर हा व्हिडिओ तात्काळ हटवायला हवा अशी मागणी केली. तर ज्या पोरांनी काकूंच्या अज्ञानीपणाचा हा व्हिडिओ त्यांच्या नकळत काढून जगासमोर त्यांची थट्टा उडवली त्यांना शिक्षा देण्याचीही भाषा काहीजणांनी केली. विविध स्तरावर उमटलेल्या या विविध प्रतिक्रियांमुळे समाजातील एका विशिष्ट नोकरवर्गाचा अडाणीपणा व त्यामुळे त्यांची शिक्षितांकडून होणारी आर्थिक फसवणूक असे कितीतरी विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आले.

सध्या सोशल मीडियावर अठराशे रुपयेवाल्या काकूंच्या व्हिडिओने धूमाकूळ घातला आहे. #JusticeForKaku
या नावाने ट्रेंडींगमध्ये असलेल्या या व्हिडिओत पाचशेच्या तीन, दोनशेची एक आणि शंभरची एक नोट म्हणजेच अठराशे रुपये हा साधा सरळ हिशोब काकूंना समजावून देताना पोरांच्या डोक्याचं पार भजं झाल्याच यात दिसलं. पण अशिक्षित काकूंच्या डोक्यात काहीच जात नसल्याने जी धमाल उडते तीच या व्हिडिओत दाखवली गेली आहे. यातला मजेचा भाग सोडला तर काकूंची किवच येते. याच पार्श्वभूमीवर अ‍ॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी एक ट्विट केले होते. त्यात त्यांनी ‘घरकाम करणार्‍या एका महिलेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मेहनत करून घर चालवणार्‍या या महिलांचा आपण सन्मान केला पाहिजे या महिला भारतीय अर्थव्यवस्था आणि समाजव्यवस्थेचा कणा आहेत. हिशोबात चूक होणं, हा थट्टेचा विषय होऊ नये.

असे सांगत या व्हिडिओकडे आम्ही आव्हान म्हणून बघत असल्याचं सांगितलं. जे शंभर टक्के खरे असून आपल्या देशातील अशिक्षित कामगार वर्गाची वस्तूस्थिती समोर मांडणाराच हा व्हिडिओ आहे.

- Advertisement -

ठाकूर यांच्या ट्विटनंतर अनेकांनी या व्हिडिओला ज्या पद्धतीने प्रसिद्धी देण्यात येत होती त्यावर आक्षेप वर्तवला. काहीजणांनी तर हा व्हिडिओ तात्काळ हटवायला हवा अशी मागणी केली. तर ज्या पोरांनी काकूंच्या अज्ञानीपणाचा हा व्हिडिओ त्यांच्या नकळत काढून जगासमोर त्यांची थट्टा उडवली त्यांना शिक्षा देण्याचीही भाषा काहीजणांनी केली. विविध स्तरावर उमटलेल्या या विविध प्रतिक्रियांमुळे समाजातील एका विशिष्ट नोकरवर्गाचा अडाणीपणा व त्यामुळे त्यांची शिक्षितांकडून होणारी आर्थिक फसवणूक असे कितीतरी विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आले. यात प्रामुख्याने सध्या चर्चेत आहेत त्या घरकाम करणार्‍या महिला व रोजंदारीवर काम करणारे मजूर. हे दोन असे कामगार वर्ग आहेत जिथे पैशांचे व्यवहार हे केवळ कष्टावर व आश्वासनावर असतात. अठराशे रुपयेवाल्या काकूंचं पण तेच आहे.

अठराशे म्हणजे किती नोटा हे देखील त्यांना नीट कळत नाही. पाचशेच्या तीन नोटा कळतात. पण दोनशेची एक व शंभरची एक म्हणजे तीनशे रुपये हे समजण्यात त्यांचा घोळ होतो. कारण कष्ट करायचं हेच त्यांना माहीत आहे. पण त्याचा मोबदला कसा मोजून घ्यायचा हे या बाईंना माहीतच नाही. कारण गणिताचा अभ्यास त्यांनी कधी केलाच नाही. सगळे व्यवहार हाताच्या दहा बोटांवर व मालकाने दिलेल्या आश्वासनावर चालतात. त्यातही जर काकूंपेक्षाही आकड्यांच्या गणितात कच्ची असणारी व्यक्ती असेल तर ती मालक देतात तेवढेच पैसे घेऊन परतते. कारण मालक फसवणार नाही हा तिचा विश्वास. याचे उदाहरण म्हणजे ग्रामीण भागात शहरात रस्त्यांवर डांबर टाकण्याचे, खडी फोडण्याचे, रस्ते काम करणारे मजूर आणि इमारतीचं बांधकाम करणारे मजूर यांना कंत्राटदारही असेच लुटतात.

- Advertisement -

दोनशे रुपये रोज सांगून हिशोबाच्या वहीवर तीनशे रुपये मिळाल्यापुढे त्यांचा अंगठा घेतात. तेही आता नाही तर कित्येक वर्षांपासून ही फसवणुकीची परंपरा या क्षेत्रात सुरू आहे. काकूंप्रमाणेच एखादी व्यक्ती मग आपलं अर्धवट ज्ञान घेऊन मालकाचाच हिशोब घेते. त्यात गोची झाल्याने जाऊ दे द्यायचे ते द्या म्हणत कामाला सुरुवात करते.

यामुळे कंत्राटदारांचे मालकांचे आयतेच फावते. मजुरांच्या खर्‍या कमाईतील एक हिस्सा त्यांच्या नकळत कंत्राटदारांच्या खिशात जातो. पण हिशोबच कळत नसल्याने त्याला जाब विचारण्याच्या फंदात मजूरही पडत नाहीत. लुटमार सुरूच राहते. काकूंचा व्हिडिओही तेच सांगतो. जर त्या मुलांनी काकूंना फसवायचे ठरवले तर ते आरामात त्यांना फसवू शकतात. कारण काकूंना हिशोबाच्या नोटाच कळत नाहीत. दीड हजार व अठराशे म्हणजे किती नोटा हे त्यांना समजत नाही. त्या तोच हिशोब वारंवार करत राहतात. मुलं समजावून सांगतात पण काकू मात्र आत्मविश्वासाने आपला मुद्दा मांडत असतात. ज्यांनी हा व्हिडिओ व्हायरल केला. त्यांना काकूंना फसवायचे नाही हे स्पष्ट नाही.

पण त्यांना पूर्ण अठराशे रुपये पगार दिला आहे हे समजावयचे कसे हा प्रश्न पडला आहे.

अशा कितीतरी काकू आज धुणी भांडी किंवा मिळेल ते काम करत आहेत. यात मुंबईसारख्या ठिकाणी काही शिक्षितही मोलकरणीही आहे. पण ज्या अडाणी आहेत त्यांचं खरचं कठीण आहे.

मालकीनबाई त्यांना रजेचा पगार कापल्याच्या नावखाली फसवत असल्याचे अनेक जणी सांगतात. दोन दिवसांचा पगार कापल्याचं सांगत चार दिवसांचा पगार कापतात. कसं काय. विचारल्यावर मोलकरीणीलाच कामावरून काढायची धमकी देतात. त्यातच आता लॉकडाऊन आणि कोरोनामुळे ज्यांची कामे कमी झाली आहेत. त्यांचे तर सध्या हालच आहेत. काम कमी त्यामुळे मालकीनबाई कमी पैशात त्यांच्याकडून काम करून घेत आहे. सगळं कळतंय पण नाईलाज आहे. यामुळे मोलकरणीही गप्प आहेत. तर लॉकडाऊनचं कारण देत अनेक घरातल्या बायकांनी मोलकरणींचे पगार थकवले आहेत. तर काहीजणींनी जास्त काम करून घेत त्यांच्या हातात अर्धाच पगार देत त्यांची बोळवण केली

आहे. या सगळ्यांना कमीत कमी पैशांचं गणित तरी शिकायला हवं. केलेल्या कष्टाचा मोबदला तरी योग्य मिळतोय का हे समजण्यासाठी शिक्षण घ्यायला हवं.यासाठी घरकामगार संघटनांनी पुढाकार घ्यायला हवा. प्रत्येक मोलकरीणबाईला हिशोब यायलाच हवा. व्हिडिओतल्या काकूंप्रमाणे राहून चालणार नाही. आपल्या कष्टाचा योग्य मोबदला

मिळवण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. त्यासाठी नुसतचं काम चांगल करून चालणार नाही तर त्या चांगल्या कामापोटी चांगला मोबदला मिळवणं व त्यात आपली फसवणूक तर होत नाही नाहे प्रत्येकाला तपासायला यायलाचं हवं. कारण नोटांचं गणित न समजणार्‍या प्रत्येक काकूला हसण्यावारी घेऊन चालणार नाही. तर त्यांची फसवणूक कोणाकडून होणार नाही याचीही काळजी त्यांना घ्यावी लागणार आहे. त्यासाठी चार बुकं वाचायलाच हवीत.

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -