घरफिचर्सकैफी आझमी मानवमुक्तीचं गाणं!

कैफी आझमी मानवमुक्तीचं गाणं!

Subscribe

चित्रपटात गीतकार म्हणून ओळख होण्याच्या बराच काळ आधी कैफींची एक उर्दू शायर म्हणून प्रसिध्दी झालेली होतीच. ‘झनकार’ आणि ‘आखिर-ए-शब’ हे त्यांचे काव्यसंग्रह स्वातंत्र्यपूर्व काळातच प्रसिध्द झाले होते. त्यातल्या त्यांच्या कवितेची महती इथे फक्त भारतातच नव्हे तर सोव्हिएत रशिया आणि इतरही काही देशांत पोहोचली होती.

जागतिकीकरणाने जन्माला घातलेला चंगळवाद वयात येण्याच्या खूप आधीचा तो काळ!स्वातंत्र्य चळवळीचा, त्यानंतरच्या फाळणीचा तो काळ. तेव्हा डाव्या विचारसरणीशी बांधिल असलेले लेखक-कवी बहरात होते. त्यांच्या लेखनाला बहुसंख्येने मानणारे लोक तेव्हा होते. अशाच एका काळात ते नाव सर्वांच्या परिचयाचं झालं. ते नाव होतं कैफी आझमी. लेखक, कवी म्हणून नावारूपाला आलेलं. साहित्यिक, कामगार, श्रमिक यांच्यात कवी म्हणून लोकप्रिय झालेलं हे नाव हळूहळू रुपेरी पडद्यावर गीतकार म्हणून झळकू लागलं.

- Advertisement -

वक्त ने किया क्या हसी सितम,
तुम रहे न तुम, हम रहे न हम.

जाएंगे कहाँ, सुझता नहीं.
चल पडे मगर रास्ता नहीं.
क्या तलाश है, कुछ पता नही,
बुन रहे हैं दिल ख्वाब दम-ब-दम.

- Advertisement -

गुरूदत्तसारख्या कसबी कलावंताच्या ‘कागज के फूल’मधलं कैफी आझमींनी लिहिलेलं हे गाणं रेडिओमधून त्या वातावरणात तरळू लागलं आणि त्या काळच्या साहित्य, कवितेसाठी जीव टाकणार्‍या मनाला स्तब्ध करू लागलं. अत्यंत सोपी शब्दकळा, मानवी मनाच्या आतबाहेर होणारी आंदोलनं सहजपणे, तरलपणे मांडण्याची हातोटी यामुळे कैफी आझमींच्या गाण्यांची निराळी ओळख प्रस्थापित होत गेली.

चित्रपटात गीतकार म्हणून ओळख होण्याच्या बराच काळ आधी कैफींची एक उर्दू शायर म्हणून प्रसिध्दी झालेली होतीच. ‘झनकार’ आणि ‘आखिर-ए-शब’ हे त्यांचे काव्यसंग्रह स्वातंत्र्यपूर्व काळातच प्रसिध्द झाले होते. त्यातल्या त्यांच्या कवितेची महती इथे फक्त भारतातच नव्हे तर सोव्हिएत रशिया आणि इतरही काही देशांत पोहोचली होती. त्यानंतरही त्यांचे अनेक काव्यसंग्रह लोकांसमोर आले. त्यासाठी त्यांना साहित्य अकादमी, सोव्हिएत लॅन्ड नेहरू अ‍ॅवॉर्ड, आफ्रो एशियन रायटर्स कमिटीच्या आंतरराष्ट्रीय ज्युरीने प्रदान केलेला लोटस अ‍ॅवॉर्ड असे कित्येक प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळाले. पण पुढे चित्रपटगीतांचा सुवर्णकाळ सुरू झाला आणि त्यात कैफी आझमींची चित्रपट गीतकार म्हणून एक वेगळी वाटचाल सुरू झाली.

त्यांची संहिता असलेला ‘गर्म हवा’ हा चित्रपट आजही लोकांच्या आठवणीत आहे. कारण तो चित्रपट भारत-पाकिस्तान फाळणीवर भाष्य करणारा होता. कैफी आझमींचं त्या चित्रपटातलं देणं हे सांप्रदायिक विचारांच्या विरोधातलं टोकदार भाष्य होतं. कोणत्याही प्रकारच्या चळवळीत आधी माणूस महत्त्वाचा, शेवटच्या स्तरावरचा शेवटचा माणूस महत्त्वाचा, त्याचे श्रम महत्त्वाचे, त्याचंही अस्तित्व महत्त्वाचं, हे सांगणारा तो चित्रपट होता.

पुढे ‘हकिकत’ या युध्दपटात कैफींनी सैनिकाच्या मनोवस्थेचं वर्णन आपल्या गाण्यातून अतिशय संवेदनशीलतेने केलं. रणांगणावर जीवावर उदार होऊन लढताना, उद्या आपण या जगात असू की नसू, असा विचार मनात तरळणार्‍या जवानाच्या मनात आपल्या पत्नीची मनोवस्था कशी असेल, हे चितारताना कैफींनी लिहिलं-

होके मजबूर मुझे किस ने भुलाया होगा,
जहर चुपके से दवा जान के खाया होगा,
दिल ने कुछ ऐसे भी अफसाने सुनाए होंगे,
अश्क आँखों ने पिए और बहाए होंगे,
बंद कमरे मे जो खत मेरे जलाए होंगे,
एक-एक हर्फ जबीं पर उभर आया होगा,
होके मजबूर मुझे किस ने भुलाया होगा

कैफी आझमींनी एका बाजूला धगधगत्या युध्दभूमीवरच्या तरण्याबांड सैनिकाची ही मनोवस्था मांडली तर दुसर्‍या बाजूला त्या सैनिकाच्या पत्नीच्या मनातली हुरहूरही आपल्या गाण्यातून कमालीच्या हळूवारपणे व्यक्त केली, ती हुरहूर लिहिताना त्यांचे शब्द आहेत-

जरा सी आहट होती है,
तो दिल सोचता है,
कही ये वो तो नही,
कही ये वो तो नही.
छुप के सीने में कोई
जैसे सदा देता हैं,
शाम से पहले दिया
दिल का जला देता हैं,
हैं उसी की सदा,
हैं उसी की ये अदा,
कही ये वो तो नही.

कैफींनी स्त्री-पुरुषांच्या मनातील भावभावनांची स्थिती अशा प्रकारे आपल्या लेखनातून सतत तपासून पाहिली. शेवटच्या माणसाचं मन हा त्यांच्या लेखनात जिव्हाळ्याचा विषय ठरला. त्यांच्या गाण्यात असो की त्यांच्या गझलमध्ये, त्यांनी कायम मानवमुक्तीचं स्वप्न पाहिलं. ‘कर चले हम फिदा जानो-तन साथियों’सारखं त्यांचं गाणं आज स्वातंत्र्य दिनाला हमखास लागतं, पण कैफी आजही तेवढ्यापुरतेच मर्यादित नाहीत हे नक्की!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -