Saturday, September 18, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स कर्मप्रधान काव्यनिर्माते श्रीधर पाठक

कर्मप्रधान काव्यनिर्माते श्रीधर पाठक

Related Story

- Advertisement -

श्रीधर पाठक यांचा आज स्मृतिदिन. ते प्रसिद्ध हिंदी कवी होते. त्यांचा जन्म 11 जानेवारी 1858 रोजी उत्तर प्रदेशातील जोंधरी (जि. आग्रा) नावाच्या गावी एका सारस्वत ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे घराणे मूळचे पंजाबचे. वडिलांचे नाव लीलाधर. ते कृष्णभक्त आणि धर्मपरायण होते. श्रीधर पाठक यांनी घरीच संस्कृतचे अध्ययन सुरू केले. कौटुंबिक कलहामुळे लीलाधर पाठकांनी जोंधरी सोडले व ते सोंठीको नगरा या गावी आले. त्यामुळे श्रीधर पाठकांचे शिक्षण खंडित झाले. वयाच्या अकराव्या वर्षी त्यांचा विवाह झाला.

चौदाव्या वर्षी पुन्हा त्यांचे शिक्षण सुरू झाले. १८८१ मध्ये ‘प्रवेश’ परीक्षा पास होऊन ते महाविद्यालयात प्रविष्ट झाले, तथापि तेथे प्राचार्यांशी भांडण झाल्यामुळे त्यांनी शिक्षण सोडले ते कायमचेच. त्यांची वृत्ती अध्ययनशील असल्यामुळे त्यांचा व्यासंग मात्र चालूच राहिला. मध्यंतरी त्यांनी काही काळ कायद्याचाही अभ्यास केला. परंतु परीक्षा मात्र ते देऊ शकले नाहीत. त्यांनी विविध खात्यांत सरकारी नोकरी केली. सेवानिवृत्तीनंतर ते अलाहाबाद येथे येऊन स्थायिक झाले. हिंदी, संस्कृत व इंग्रजी या भाषांवर त्यांचे चांगले प्रभुत्व होते. 1995 मध्ये लखनौ येथे भरलेल्या पाचव्या हिंदी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले.

- Advertisement -

श्रीधर पाठक यांनी गोल्डस्मिथच्या हरमिट काव्याचा एकान्तवासी योगी (१८८६) व ट्रॅव्हलरचा श्रांत पथिक या नावाने अनुवाद केला. हे दोन्ही अनुवाद खडी बोलीत असून पहिल्यात लावनी छंदाचा वापर आहे, तर दुसरा रोला छंदात आहे. गोल्डस्मिथच्या डेझर्टेड व्हिलेजचा व्रज भाषेत केलेला ऊजड ग्राम (१८८९) हा अनुवाद अधिक सरस आहे. कालिदासाच्या ऋतुसंहाराचा सवैया छंदात त्यांनी केलेला अनुवादही फार सुरेख आहे. श्रीधर पाठक यांची मौलिक काव्यरचना जगत सचाई सार (१८८७) ही असून त्यात जीवनाकडे पाहण्याचा गंभीर व कर्मप्रधान दृष्टिकोन परिणामकारकपणे प्रकट झाला आहे.

श्रीधर पाठक यांचे एक वैशिष्ठ्य म्हणजे निसर्गाविषयीचे त्यांचे अकृत्रिम आकर्षण व त्याकडे पाहण्याचा त्यांचा अभिनव दृष्टिकोन. काश्मीर सुषमा (१९०४) हे काव्य त्याचे निदर्शक म्हणता येईल. मनोविनोद, घन विनय, गुनवंत हेमंत, वनाष्टक, देहरादून, गोखले गुणाष्टक , गोखले प्रशस्ति, गोपिकागीत, भारतगीत, स्वर्गीय वीणा, तिलस्माती सुंदरी इत्यादी त्यांचे काव्यसंग्रह उल्लेखनीय होत. निसर्गसौंदर्य, देशभक्ती व समाजसुधारणा हे विषय त्यांच्या काव्यात प्रामुख्याने आले आहेत. हिंदी खडी बोलीचा काव्यात उपयोग करण्यास त्यांनी विशेष हातभार लावला. ते वृत्तीने स्वच्छंदतावादी असले, तरी त्या वेळच्या परंपरावादी विचारांचा पगडाही त्यांच्या मनावर खूप होता. निसर्गप्रेम, खडी बोलीचा उपयोग आणि स्वच्छंदतावादी वृत्ती या तीन वैशिष्ठ्यांमुळे ते भारतेंदु युग, द्विवेदी युग व पुढचे छायावादी युग यांच्यातील महत्त्वाचा दुवा मानले जातात. अशा या महान कवीचे १३ सप्टेंबर १९२8 रोजी निधन झाले.

- Advertisement -