अमृता वहिनींचा धडा!

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एका महिलेचा प्रचंड बोलबाला आहे. कोण्या मान्यवर राजकारण्याने एखाद्या विषयावर टिपण्णी केली की त्याचे पडसाद सर्वदूर उमटतात आणि पुढच्या कृतींना तशी चालना मिळते. तसे त्यांनी व्यक्तिगत केलेल्या टिपण्णीचं होत आहे. त्यांच्या या टिपण्णींची दखल सर्वच जण घेतात पण ती नकारार्थाने. यामुळे त्यांची ही प्रतिक्रिया इतक्या संकटाची बनते की त्यामुळे अनेकांची अडचण होते. या महिला आहेत माजी मुख्यमंत्री देवेंद्र यांच्या पत्नी अमृता फडणवीस. सातत्याने चर्चेत राहण्याची अनेकांना हौस असते. त्यासाठी ते काहीबाही बोलत राहतात. तसं केलं की माध्यमांचा रोख आपल्याकडे येत असल्याचा त्यांचा समज असतो. अमृता वहिनींचं सध्या तसंच झालंय. चर्चेत राहिलंच पाहिजे, हा त्यांचा पण आहे. यासाठी त्या नको त्या विषयाचा आधार घेतात आणि टीकेच्या धनी होतात. दोन दिवसांपूर्वी त्यांनी महाविकास आघाडीतील पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर अत्यंत शेलक्या शब्दांत टीका केली. एव्हाना त्यांच्या टीकेला जमेत घेण्याचं काही कारण नव्हतं, पण त्यांचं तोंड आवरा म्हणून आता संघातल्या मान्यवरांनाच सांगावं लागत असल्याने याची दखल घेणं आवश्यक वाटू लागलं आहे.

महाराष्ट्राच्या पुरोगामीत्वाने महिलांना अनन्य असं महत्त्वाचं स्थान दिलं आहे. पुरुषांच्या बरोबरीने त्यांना सन्मान मिळावा, म्हणून धुरीणांनी विविध शिक्षणाच्या चळवळी केल्या. स्त्रियांनी राजकारण आणि समाजकारणात पुरुषांच्या बरोबरीने पुढाकार घेतला पाहिजे, अ्रसं प्रामाणिक मत राज्यातल्या मान्यवरांनी यापूर्वी अनेकदा व्यक्त केलं. राज्याची धुरा महिलांच्या हाती द्यावी, असा प्रयत्न अनेकदा झाला, पण त्याला अपेक्षित असं प्रोत्साहन मिळालं नाही. असं असलं तरी इंदिरा गांधींच्या रूपाने देशाच्या पंतप्रधान पदाची माळ महिलांच्या गळ्यात पडल्याचं भारतवर्षाने पाहिलं. प्रतिभाताईंच्या रूपाने देशाच्या राष्ट्रपती या सर्वोच्च पदाचा मान महिलेला प्राप्त झाला. इंदिरा गांधी यांची तर जगातल्या करारी नेत्या म्हणून सर्वदूर ओळख पोहोचली आणि राष्ट्रपती म्हणून महिला तितक्याच करारीपणाने पदाचं महत्त्व वाढवू शकते, हे प्रतिभाताईंनी जगाला दाखवून दिलं. देशात महिलांचा सन्मान आज होतो असं नाही, हे या दोन महिलांच्या कर्तबगारीने याआधीच सिद्ध केलंय. अशी ही महिला उत्कर्षाची परंपरा असताना एका महिलेने दुसर्‍या महिलेचा दुस्वास करावा, याला काय म्हणावं? ते ही एका माजी मुख्यमंत्री असलेल्या आणि आज विरोधी पक्षनेते असलेल्या नेत्याच्या पत्नीने करावं हे अजब म्हटलं पाहिजे. अनेक महिला तोंडाला येईल ते बोलून आपला बाष्कळपणा उघड करतात तेव्हा त्यांना कोणी जमेत घेत नाहीत. कारण यातल्या अनेक जणी एकतर फारशा वकुबीच्या नसतात वा सामाजिक वा शैक्षणिक खोट त्यांच्यातलं हे उणंपण दाखवून देत असतं.

अमृता फडणवीस यांचं तसंही नाही. त्या उच्च शिक्षाविभूषित महिला आहेत. याच शिक्षणामुळे त्यांना एका बँकेचं कॉर्पोरेट उपाध्यक्ष पद मिळालं आहे. इतक्या मोठ्या पदावर बसलेल्या महिलेचा वकूबही तितकाच हवा. तो वकूब कमी झाला की पदाची गरीमाही लोप पावते. समाज माध्यमांमध्ये आज अमृता फडणवीस यांची होणारी अवहेलना हा याच लोप पावत चाललेल्या गरीमेचा परिणाम होय.सौभाग्यवती फडणवीस यांनी आदित्यसंबंधी काढलेल्या वक्तव्याने त्या पुन्हा एकदा अडचणीत सापडल्या आहेत. आदित्यांसाठी रेशमचा किडा, असा शब्द प्रयोग करून नाहक राजकीय स्तरावर टीका टीपण्णी करून देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणले आहे. महाराष्ट्राला अत्यंत हुशार अशा राजकीय नेत्यांचा वारसा लाभला आहे. या नेत्यांच्या पत्नीही राजकारणात सजग असताना आपल्या पतीच्या आड त्यांनी कधीच इतरांची उणीदुणी काढली नाही. अगदी शरद पवार यांच्या विरोधात भाजपच्या नेत्यांनी प्रचंड आगपाखड करणारी असंख्य वक्तव्यं केली, पण त्यांच्या पत्नी प्रतिभाताईंनी कधीही भाजप आणि त्या पक्षाच्या नेत्यांविरोधी ब्र काढला नाही. विलासराव देशमुख असोत की सुशिलकुमार शिंदे. गोपीनाथ मुंडे असोत की प्रमोद महाजन. अशा असंख्य नेत्यांची राजकीय आणि वैचारिक बैठक स्वतंत्र होती.

या नेत्यांचे पक्ष आणि विचार यांचं कधीच जमलं नाही. म्हणून या नेत्यांच्या पत्नींनी इतरांवर टीका टिपण्णी केली नाही. हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ठावूक नाही? या महिलांना काहीच बोलता येत नाही, असा समज अमृता फडणवीस यांचा असेल तर ते त्यांचं अज्ञान आहे. सौजन्यासह सौभाग्य कसं उतरवलं जातं हे मराठी महिलांकडून कोणी शिकण्याची आवश्यकता नाही. त्या केवळ बोलत नाहीत, याचा गैर अर्थ काढण्याची गल्लत फडणवीस करत आहेत. आपल्या पतीवर झालेल्या टीका त्यांनी निमूट सहन केल्या असं नाही. आपल्यामुळे आपल्या पतीला मान खाली घालावी लागू नये, इतका मनाचा मोठेपणा त्यांनी दाखवला. यामुळे आपल्या पतीची किंमत होते, याची जाण त्यांना होती. ज्या ठाकरेंचं नाव घेऊन अमृता यांनी उद्धव यांच्यावर टीका केली त्या बाळासाहेब ठाकरेंनी शरद पवारांना अनेक शब्दांनी टीका केली, पण पवार कधी त्यांना उलटून बोलले नाहीत. याचा अर्थ पवारांना काही बोलता येत नाही, असा होत नाही. जे पवारांना जमू शकतं ते देवेंद्रांना का जमू नये? सत्ता ही काही कायमचा शिरपेच घेऊन आलेली व्यवस्था नाही. ती क्षणभंगूर असते, याची जाणीव फडणवीस द्वयींना केव्हा होईल?

ज्या बँकेच्या अमृता या कार्पोरेट उपाध्यक्ष आहेत त्या अ‍ॅक्सीस बँकेत वळवण्यात आलेली सरकारी खाती पुन्हा राष्ट्रीयकृत बँकांमध्ये वळवण्याच्या सरकारच्या निर्णयानंतरही अशीच टीका टीपण्णी केली होती. उद्धव ठाकरे यांना उद्देशून महाराष्ट्राला असे वाईट नेते मिळणं हा या राज्याचा दोष नाही, असं त्यांनी म्हटलं होतं. अपेक्षा असूनही आपले पतीराज देवेंद्र फडणवीस यांना सत्तेची खुर्ची न मिळाल्याने अमृता फडणवीसांचा तिळपापड झाला असला तरी तो व्यक्त करण्याच्या काही पद्धती आहेत. त्यांनी या सार्‍या पद्धती गुंडाळल्या आणि नको तो मार्ग अवलंबला. फडणवीस यांची मुख्यमंत्री म्हणून वसती असलेला ‘वर्षा’ खाली करावा लागत असल्याची सल बोचण्यामागे अमृता यांची राजकीय अपरिपक्वता कारण ठरली असल्यास नवल नाही. भाजप आणि फडणवीसांचा उदोउदो करणारी वाक्य रेखाटणार्‍या व्यक्तीने ठाकरेंना उद्देशून नालायक ठरवून टाकलं. शेकडो पोलिसांच्या गराड्यात हे काम कोण्या ऐर्‍यागैर्‍याचं कसं असू शकेल? पोटात असेल ते ओठात येतं, तसंच ते ‘वर्षा’च्या भींतीवर रेखाटलं गेलं, असं कोणी म्हटलं तर त्याला दोष कसा देणार? कोणी ठाकरे अडनाव लावून ठाकरे होत नसतं, या अमृता यांच्या ट्विटचा अर्थ त्यांना कधीच कळला नाही. कोण हे ठाकरे, असा प्रश्न भर नाक्यावर लोकं फडणवीस यांना विचारू लागले तरी त्यांना त्याचं काही वाटलं नाही. लोकांच्या डोक्यावर मारून त्यांचे नेतृत्व करता येत नाही, तो हल्ला होतो, नेतृत्वगूण नव्हे, असा आणखी एक ट्विट करून अमृता यांनी सेनेवर हल्ला चढवला. आता तर आदित्य ठाकरे यांना रेशमी किड्याची उपमा देत अमृता यांनी पुढची पायरी गाठली आहे. हे करताना लोकं आपलं कौतुक करतील, असं अमृता यांना वाटत असेल तर त्या गोड स्वप्नात आहेत. त्यांना रश्मी उद्धव ठाकरे कदाचित विचारणारही नाहीत, कारण ठकास महाठक होण्याचे संस्कार त्यांच्याकडे नसावेत. सगळेच तसे असतील, असं समजून अमृता या स्वत:ची समज करून घेत असाव्यात, पण यामुळे एका समृद्ध राज्याचं मुख्यमंत्री पद भूषवलेल्या देवेंद्र फडणवीस यांची मानहानी होते, याचं भान त्यांनी राखावं इतकंच…

ट्विट
‘ठाकरे’ आडनाव असल्यामुळे कोणी ‘ठाकरे’ होत नाही. एक ‘ठाकरे’ ज्यांनी नेहमीच सत्याचा विचार केला, तसेच आपली तत्वे आणि लोकांचा कायम विचार केला. यासाठी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा विचार करत असताना त्यांनी नेहमीच आपले कुटुंब आणि सत्ता याला दुय्यम स्थान दिले.

ट्विट 
रेशमी किड्याला आयुष्यातील ‘उपहास’ समजणार नाही. कारण पूर्वजांनी विणलेल्या सुखासीन ‘रेशमी’ आयुष्याचा उपभोग घेत त्यांची भरभराटी होते. देवेंद्र फडणवीसजी, तुमच्या संघर्षाचा आणि भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मेहनतीचा अभिमान वाटतो.’