घरफिचर्सकोकण... पर्यटन आणि चित्रपटनिर्मिती

कोकण… पर्यटन आणि चित्रपटनिर्मिती

Subscribe

कोकण म्हटलं की नेत्रसुखद निसर्ग आठवतो. कोकण कलावंतांची भूमी त्यामुळेच ही परंपरा आजही कायम आहे. मात्र कालचा कोकण आणि आजचा यात निसर्ग, कला यांचा अपवाद वगळता खूप बदल झालाय. एवढं मात्र निश्चितच आहे की, कोकणची साहित्य, कला, रंगभूमीशी असलेली नाळ आजही तेवढीच घट्ट आहे. कोकणातील निसर्गसौंदर्य आणि चित्रपट व्यावसाय यांचा योग्य मेळ साधल्यास त्यातून रोजगाराच्या संधी, पर्यटनव्यावसायासाठी अनुकूल वातावरण निर्माण करता येणे शक्य आहे. त्या दृष्टीने प्रयत्न होण्याची गरज आहे.

गेल्या शतकाचा विचार केला तरी येथील राजकारण, समाजकारण, अर्थकारणात अनेक स्थित्यंतरे झाली आहेत. काही आश्वासक आहेत तर काही निराशाजनकही आहेत. येथील रंगभूमी, लोककला आणि साहित्याशी निगडीत छोटे-मोठे प्रवाह आणि त्यांची धडपड आजही सुरू आहे. विशेषतः येथील नाटकं आणि साहित्य लेखन आता गांभीर्याने घेतलं जाऊ लागलं आहे.

- Advertisement -

कोकणातील सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर होऊन एक तप लोटले आहे. पर्यटनाचा विचार करता सुधारणा होतेय पण मूलभूत सुविधा आजही पुरेशा उपलब्ध नाहीत. असे असतानाही येथील कलाविश्व मात्र मोठी झेप घेण्याचा प्रयत्न करत आहे. कोकणी माणसाचा पिंड कलेचा आहे. त्यातही कोकणी माणूस नाटकवेडा आहेच. रुपेरी पडद्याचं आकर्षण कोणाला नसतं ? ते तर सर्वांनाच असतं. म्हणूनच मुळातच नाटकवेडा कोकणी माणूस प्रकर्षाने चित्रपटाच्या रुपेरी आणि मायावी कलेला आणि जगाला भुलला तर नवल नाही. हा लेखन प्रपंच त्यासाठीच.

कोकणात पर्यटन आणि चित्रपटनिर्मिती, चित्रिकरणाला पोषक वातावरण आहे. त्यामुळेच मागील दशकभरापासून विशेषतः सिंधुदुर्गात अनेक मान्यवर बॅनर्सच्या मराठी-हिंदी चित्रपटांचे चित्रिकरण झाले आहे. कोकणाचे भुरळ पाडणारे सौंदर्य कॅश करण्याच्या धारणेतून अनेक निर्माते आज इथे येत आहेत.

- Advertisement -

कोकणचे सौंदर्य अर्थातच अतुलनीय आहे. कुठल्याही कमी किंवा मोठ्या बजेट्सचे चित्रिकरण करण्यासाठी आवश्यक ती लोकेशन्स कोकणात मुबलक आहेत. मात्र, त्या प्रमाणात आवश्यक त्या पायाभूत सुविधा येथे आहेत का? हा प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी आहे. एखादा चित्रपट चित्रित होत असताना त्याशी निगडीत असणार्‍या, मनुष्यबळ, तांत्रिक सुविधा, त्यांची उपलब्धता आणि व्यवस्थापन शिवाय त्याला आवश्यक असणारे घटक जसे की काम करणार्‍या माणसांच्या निवास, जेवणंखाणं याबाबतचे नियोजन त्याचे योग्य व्यवस्थापन आणि संबंधितांचे समाधान यांचा मेळ येथील पर्यटन व्यावसायात लागू शकतो का? हा प्रश्न महत्वाचा आहे. त्याचा दर्जा कसा असेल? याचाही विचार व्हावा. पर्यटनाबरोबरच चित्रपटनिर्मितीसाठी निर्माते कोकणात यावेत अशी इच्छा असेल तर येथील पर्यटकांना पायाभूत सुविधा उपलब्धतेबाबत विचार करावा लागेल. निर्माते, पर्यटकांना इतर देश, प्रदेशात मिळणार्‍या सुविधांच्या तोडीस तोड सुविधा कोकणात उपलब्ध करून द्याव्या लागतील.

सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर झाल्यावर त्याची प्रगती दिसू लागली आहे. मात्र, सिंधुदुर्गापासून हाकेच्या अंतरावर असणारं गोवा राज्य हेही आज जागतिक दर्जाचं संपन्न असं पर्यटन राज्य आहे. अर्थातच पर्यटक आणि निर्माते गोव्याचा पर्याय निवडतात. त्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीने या राज्याचेही आव्हान आहे. मात्र, कोकणातील निसर्गसौंदर्य, समुद्रकिनारे, चित्रिकरणाचे लोकेशन्स, धार्मिक स्थळं ही चित्रपटनिर्मितीसाठी सुसंगत आहेत. त्यामध्ये चित्रपटाला आवश्यक असे पोटेन्शियल पुरेपूर भरले आहे.म्हणूनच एक लेखक आणि दिग्दर्शक म्हणून निर्मात्यांसाठी कोकण ही पहिली पसंती असायला हवी, असं मला वाटतं. मात्र, पर्यटक, पर्यटन आणि व्यावसाय याचा मेळ आणि कस्टमरला हवा असणारा तो प्लिझंट फिल साधला जावा इतपत येथील पर्यटन विकसित होणं ही काळाची गरज आहे. पर्यटक अथवा चित्रपटसृष्टीतील निर्माते कोकणात चित्रपटनिर्मिसाठी खेचले जावेत, अशी स्थिती निर्माण करणे हे सरकारच्या संबंधित खात्याचे महत्तवाचे काम आहे. कोकणात चित्रपट उद्योगाची मुळे रुजावीत यासाठीही आजच असा विचार करणे हे दूरदृष्टीचे ठरेल.

ओरॉन प्रस्तुत काहूर या चित्रपटाची निर्मिती करत असताना मला काही अनुभव आहे आहेत. विशेषतः कमी बजेट असणार्‍या फिल्म्स येथे करणे ही मोठी कसरत आहे. मॅनपॉवर, व्यवस्थापन, जेवणखाणं, निवास या गोष्टी तुम्हाला परवडणार्‍या बजेटमध्ये एकाच ठिकाणी मिळण्याची स्थिती आजही येथे नाही. लो बजेट निर्मात्यांना परवडेल अशी हॉटेल्स, रेस्टॉरन्ट आणि संपूर्ण टीमचे पॅकेज देण्याची व्यवस्था येथील हॉटेल चालकांनी केल्यास पर्यटन व्यावसायात मोठी वाढ होऊ शकते. मराठी चित्रपटसृष्टीत मोठ्या प्रमाणात लो बजेट चित्रपटांची निर्मिती होत आहे. याचा विचारही करणे गरजेचे आहे. काहूर बनवताना माझ्या टीमला आवश्यक त्या सुविधा देताना अनेक ठिकाणी अश सुविधा देणार्‍या महागड्या रेट्सना सामोरे जावे लागले. त्याचा भार निर्मात्याला डोईजड झाला हे ओघाने आलेच. त्यामुळे छोटी हॉटेल्स आणि तत्सम काहींनी परवडणार्‍या दरात संपूर्ण टीमला योग्य ती सेवा दिल्यास हा व्यावसाय वाढू शकतो.

कोकणात कलाकारांचीही मोठ्या प्रमाणात उपलब्धता आहे. येथील कलावंतांना चित्रपट कलेच्या विविध विभागांचे आवश्यक ते बेसिक प्रशिक्षण मिळाले तर आपल्या अंगभूत प्रतिभेच्या बळावर ते मोठी झेप घेऊ शकतात. चित्रपट कलेच्या सर्व विभागात रस असणारी, कलाकार तंत्रज्ञांची मोठी फळी येथे तयार होत आहे. हे काहूर चित्रपट बनवताना मला लेखक, दिग्दर्शक म्हणून प्रकर्षाने जाणवले. पर्यटन हा व्यावसाय आहे तसाच चित्रपट निर्मिती हा सुद्धा…कोकणच्या अद्भूत सौंदर्याच्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही व्यावसाय एकमेकांच्या हातात हात घालून पुढे गेले तर कोकणचे भाग्य उज्ज्वल आहे.

-अनिल सरमळकर
(लेखक कथालेखक आणि चित्रपट दिग्दर्शक आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -