Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर पालघर वसई-विरार शहराच्या क्षितिजावर उदय पावलेलं नवनेतृत्व... क्षितिज ठाकूर!

वसई-विरार शहराच्या क्षितिजावर उदय पावलेलं नवनेतृत्व… क्षितिज ठाकूर!

Subscribe

वर्ष 2009. वारे निवडणुकीचे होते, पण वसई-विरार शहरात नेहमीप्रमाणे हवा होती ती बहुजन विकास आघाडीचीच. त्याला कारणही तसंच होतं. गेली तीन दशकं राजकारणावर ठसा आहे तो आमदार हितेंद्र ठाकूर यांचा. बहुजन विकास आघाडी नावाच्या रोपट्याचं त्यांनी वटवृक्षात रूपांतर केलं होतं. या वटवृक्षाच्या छायेत अनेकांची राजकीय आणि सामाजिक कारकीर्द घडली. अनेकांना नावलौकिक आणि संपन्नता लाभली. राज्याच्या राजकारणातील अनेक उलथापालथींतदेखील बहुजन विकास आघाडीचा गड चिरेबंद राहिला. साहजिकच या वर्षातही त्यांचीच सत्ता कायम राहणार होती, हे सांगायला कोणी भविष्यवेत्ता नको होता. अशा वेळीच आमदार हितेंद्र ठाकूर यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला. निर्णय होता राजकारणातून काही काळ निवृत्ती घेण्याचा. कार्यकर्त्यांच्या मनात खळबळ होणं, प्रश्न उठणं साहजिक होतं, पण या प्रश्नांची सर्व उत्तरंही अर्थातच आमदार हितेंद्र ठाकूर यांच्याकडे होती. त्यादिवशीचा सूर्य अस्ताला चालला होता, पण दुसर्‍यादिवशी पुन्हा उगवण्याचा निरोप देऊनच तो अस्ताला गेला.

दुसर्‍या दिवशी वसईच्या एका मैदानावर भरगच्च सभा होती. आमदारांचा निर्णय आधीच कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचला होता. आमदार हितेंद्र ठाकूर अर्थात कार्यकर्त्यांचे लाडके ‘आप्पा’. त्यांच्या निर्णयाने खरं तर कार्यकर्त्यांचा हिरमोड झालेला, पण या निर्णयाचं उत्तरही याच सभेत मिळेल, या आशेने या सभेला कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी लोटली होती. अखेर तो निर्णायक क्षण आला… आप्पांनी आपला निर्णय पक्का असल्याचं सांगतानाच, आपला मुलगा क्षितिज ठाकूर राजकारणात प्रवेश करत असल्याची घोषणा केली आणि नालासोपारा विधानसभा मतदारसंघातून त्याची उमेदवारीही! कार्यकर्त्यांना प्रश्नाचं उत्तर मिळालं होतं आणि आपलं नवं नेतृत्वही. आप्पांचाच निर्णय तो. विचाराअंतीच घेतलेला. बरोबरच असणार. आप्पांच्या भाषणानंतर एक नवा, उमदा, नवविचारांचा तरुण त्या सभेपुढे उभा राहिला. कार्यकर्त्यांचीही उत्सुकता वाढली. तो काय बोलणार… कोणत्या स्वप्नांनी निवडणुकीला सामोरं जाणार… या सर्व प्रश्नांची उत्तरं सभेला अनपेक्षित का होईना हवी होती आणि थोडी अडखळत का होईना…या युवकाने त्यावेळी ती दिलीही….

- Advertisement -

पप्पांनी आपल्या निवृत्तीची घोषणा करताना माझ्या उमेदवारीचीही घोषणा केली आहे. त्यांनी घोषणा केली म्हणजे मी आमदार झालोच, हे मलाही माहीत आहे, पण तुमच्यासारखे कार्यकर्तेच आमदार निर्माण करत असतात, याची मला त्यांनी जाणीव करून दिली आहे. त्यामुळे मी जरी आमदार झालो तरी तो तुमच्यामुळेच असेन. तुम्ही त्यांना जसं प्रेम दिलं, तसं ते मलाही द्याल, अशी मला आशा आहे. त्यांच्या निवृत्तीच्या घोषणेने आपल्यातील कित्येकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते. यातून आमच्याप्रती असलेलं आपलं प्रेमच व्यक्त होतं … या अवघ्या चार ओळींच्या भाषणाने त्यावेळी या तरुणाने उपस्थित आणि कार्यकर्त्यांची मनं जिंकली होती, पण त्यानंतर तो आपल्या या कार्यकर्त्यांना आणि जीवाभावाच्या लोकांना एक स्वप्न द्यायला आणि या स्वप्नासाठी झटण्याची ऊर्जा द्यायलाही विसरला नव्हता.

ते स्वप्न होतं… आपल्या समाजासाठी चांगले रस्ते, आरोग्य सेवा, नोकरी-व्यावसाय संधी उपलब्ध करून देणं आणि त्यासोबतच मनोरंजनाची साधनं निर्माण करून देणं. शिवाय आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या प्रयत्नांमुळे साकारत असलेल्या साडेअकरा हजार कोटींच्या सूर्या पाणी प्रकल्पाच्या कामाचा पाठपुरावा आपण करायचा आहे, हे आश्वासनही हा तरुण त्यावेळी द्यायला विसरला नव्हता. त्या सभेत आमदार हितेंद्र ठाकूर यांनी घेतलेल्या निर्णयाचं उत्तर कार्यकर्त्यांना मिळालं होतं आणि त्यांच्या मनातील शंकाही दूर झाल्या होत्या. सोबतच वसई-विरार शहराच्या क्षितिजावर एक नव्या दृष्टीचं, नव्या विचारांचं आणि सर्वांना सोबत घेऊन पुढे जाईल, असं नेतृत्वही उदयास आलं होतं. ते नेतृत्व होतं… क्षितिज ठाकूर नावाचं. पुढे कामांसोबतच हेच स्वप्न या तरुणाने आपल्या मनात कायम ठेवत त्यासाठी आपले प्रयत्नही सुरूच ठेवले होते.

- Advertisement -

प्रचंड आत्मविश्वास, दुर्दम्य इच्छाशक्ती, विचारांची परिपक्वता आणि स्वत:चा दृष्टिकोन या जोरावर क्षितिज ठाकूर यांनी स्वतःचा वेगळा ठसा उमटवला आहे. निवडणुकांमध्ये जनतेशी संवाद साधण्यावर आणि छोट्या छोट्या सभा घेण्यावर प्रचंड भर देण्याचं काम क्षितिज ठाकूर करताना दिसतात. यातून आपल्यासारख्याच तरुणांचा कल जाणून घेण्याचा, त्याला दिशा देण्याचा त्याचा उद्देश असला तरी प्रत्येक सभेत त्याने आपण पाहिलेलं स्वप्न जनतेसमोर ठेवलं आणि जनतेलाही तशी स्वप्नं पाहण्यासाठी प्रवृत्त केलं. बहुजन विकास आघाडीच्या कार्यबाहुल्यामुळे व आमदार हितेंद्र ठाकूर यांचे सर्वच पक्ष आणि पक्षनेतृत्वांशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध यामुळे कोणत्याही निवडणुकाही त्यांना जड गेल्या नाहीत.

आपल्या कारकीर्दीत सूर्या पाणी प्रकल्पाचा तिसरा टप्पा मार्गी लावण्यातही त्यांनी हातभार लावला. शहराची वाढती लोकसंख्या पाहता पाणी कमी असले तरी वसई-विरार शहरात झपाट्याने सुरू असलेली कामे पाहता भविष्यात ही तहानही निश्चितच भागवली जाईल, या दृष्टीने त्यांचे कार्य सुरू आहे. दुसरीकडे नालासोपारा व वसई महापालिकेमार्फत अद्ययावत रुग्णालये देऊन शहरातील जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा देण्याचा प्रयत्नही त्यांनी केला आहे. आज वसई-विरार शहरात काही ठिकाणी झालेले सुसज्ज रस्ते हेदेखील आमदार क्षितिज ठाकूर यांच्याच स्वप्नाचा भाग आहेत, हे विसरून चालणार नाही.

रस्त्यारस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी कायमस्वरूपी कशी सोडवावी, यावर प्रशासकीय पातळीवर त्यांचे विचारमंथन सुरू आहे. महामार्गाजवळ शिरगाव येथे हरणे, काळवीट, ससे आणि तत्सम प्राण्यांसाठी एक खासगी अभयारण्य बनवावे, अशी संकल्पनादेखील या युवा आमदाराने मांडली आहे. आपल्या जिल्ह्यातील तरुणांना दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून क्षितिज यांनी मुंबई विद्यापीठातील सर्वाधिक कोर्सेस विवा कॉलेजच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले आहेत. डबल एमबीए असलेले क्षितिज ‘एज्युकेशन रिफॉर्मेशन’मध्ये पीएच.डी. करत आहेत, ते केवळ याच कारणासाठी!.

कोणतंही नेतृत्व हे त्याच्या दूरदृष्टीवरून ठरतं. नव्या विचारांवर ठरतं आणि हीच दूरदृष्टी आणि विचार ज्या नेत्यांकडे असतात, तेच त्यांना इतरांपासून वेगळे ठरवतात. क्षितिज ठाकूर यांचे पदव्युत्तर शिक्षण विदेशात झालेले असल्याने त्यांच्याकडे ही दूरदृष्टी आणि विचार असणं साहजिकच होतं. त्यांनी तिथे जे पाहिलं… अनुभवलं… ते जगले… त्यातील शक्य ते ते आपल्या इथल्या लोकांनाही मिळालं पाहिजे, यासाठी त्यांनी हे कार्य योजिले आहे. त्यांचे हे कार्य सिद्धीस गेल्यास त्यांच्या कारकीर्दीचे ते सुवर्णपान ठरेल!.
० संजय राणे

- Advertisment -