घरफिचर्सकोरड्या आश्वासनांचा पाऊस !

कोरड्या आश्वासनांचा पाऊस !

Subscribe

राज्यातील कमी पर्ज्यन्यमान असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यात नुकत्याच सरी बरसल्या आहेत. मात्र, जलसिंचनाच्या नियोजनाचा अभाव असल्याने पाण्यासाठी दाहीदिशा अशी परिस्थिती जिल्ह्यात आहे. भूम, परांडा, कळंब, वाशी, उमरगा, तुळजापूर अशा सर्वच तालुक्यात पाणीटंचाईचा प्रश्न नवा नाही. सरकारी योजनेतील शेततळ्यांची परिस्थिती आणखी भयावह आहे. ज्या ठिकाणी शेतकर्‍यांनी शेततळी खोदली आहेत, ती कोरडीठाक आहेत. पठारावर जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत रानात उकरलेली ढेकळं पाण्याच्या एका थेंबासाठी आसुसलेली असल्याचं चित्र आहे. अवर्षणप्रवण जिल्हा ही उस्मानाबादची ओळख पुसण्याचे प्रयत्न सरकारी आणि राजकीय पातळीवरही पुरेसे यशस्वी झालेले नाहीत. हेकेखोरी, हिंसेचा सत्तासंघर्ष, अंतर्गत राजकारणाचा फटका या जिल्ह्याला कायम बसला आहे.

उजनी धरणाचे पाणी उस्मानाबादला आणण्याच्या योजनेचे कायमच राजकारण झाले. त्यामुळे उजनी माय उस्मानाबादच्या रान शिवारात आली नाहीच, तर ती घरातल्या डेर्‍यातही दाखल झाली नाही. लगतच्या सोलापूरमध्ये सुशीलकुमार शिंदे आणि लातूरमध्ये दिवंगत विलासराव देशमुख ही महत्वाची सत्ताकेंद्रे असताना उस्मानाबाद मात्र अंतर्गत सत्तासंघर्ष आणि राजकारणाच्या कमालीच्या उदासिनतेमुळे राजकीयदृष्ठ्या कमालीचा दुर्लक्षित जिल्हा राहिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे पद्मसिंह पाटील हे तीन दशकांपूर्वी शरद पवार यांच्या खास मर्जीतले म्हणून ओळखले जात होते. मात्र उस्मानाबाद सहकारी बँकेचे तत्कालीन अध्यक्ष पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येनंतर पद्मसिंह पाटील यांच्यावरील बारामतीची माया पातळ झाली. त्यानंतर या रक्तरंजित राजकारणाचा फटका जिल्ह्यातील मुख्य असलेल्या पाणीप्रश्नाला बसला. उस्मानाबादमधील तेरणा साखर कारखाना, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, दूध संघांवरील आर्थिक पाठबळावरच या जिल्ह्यातील राजकारण मागील चार दशके खेळले गेले आहे. या संस्था ज्यांच्या ताब्यात असतील त्यांच्याच ताब्यात जिल्ह्यातील लोकसभा आणि विधानसभेची सत्ता असल्याचे चित्र दोन दशकांपूर्वी होते. स्थानिक राजकीय सत्तेला पाठबळ पुरवणार्‍या या संस्था पवनराजे निंबाळकर यांच्या देखरेखीखाली होत्या. परंतु या संस्थेतील घोटाळ्यांच्या मालिका माध्यमातून उघडकीस येऊ लागल्यावर डॉक्टर पद्मसिंह पाटील आणि निंबाळकर यांच्यातील बेबनावही वाढू लागला. त्यातूनच त्यांची हत्या झाल्याचा आरोप डॉक्टरांवर सीबीआयने ठेवला. मात्र या हिंसक राजकारणात जिल्ह्यातील दुष्काळी स्थिती, पाणी, चारा, सिंचन आदी प्रश्नांकडे कायमच दुर्लक्ष झाले. सुडाचे राजकारण ही उस्मानाबादची नवी ओळख बनू लागली.

- Advertisement -

दरम्यानच्या काळात जिल्हा मध्यवर्ती बँकेतील घोटाळ्यांमुळेही ही संस्थाही संशयाच्या भोवर्‍यात सापडली. त्यात सामान्य शेतकरी आणि ठेवीदार भरडले. जिल्ह्यातील आर्थिक स्त्रोताला हा मोठा फटका होता. सहकार चळवळीतील बेपर्वाई, भ्रष्टाचार आणि कमालीची बेशिस्तीमुळे अनेक गोरगरीब शेतकर्‍यांच्या ठेवी अडकल्याने या बँकेच्या कारभारावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. निर्ढावलेल्या कर्जदारांवर पुरेशी कारवाई न झाल्याचा रोष ठेवीदारांचा होता. त्यामुळे सामान्य ठेवीदारांच्या रकमा देण्यास टाळाटाळ करणार्‍या बँकेने कर्जदारांना मात्र खुले सोडल्याच्या बातम्यांनी वर्तमानपत्रांचे रकाने भरू लागले. सहकार, साय आणि साखर या तिघांकडूनही फटका बसलेला सामान्य शेतकरी पुरता बेजार झाल्याने पाण्यासारख्या प्रश्नावर रान उठवायला त्याच्यात त्राण राहिले नाहीत.

यंदा राज्यात दुष्काळ पडल्याचे सांगितले जात असले तरी उस्मानाबादमध्ये अशी स्थिती दरवर्षी कायमच राहिली आहे. आठवडा, पंधरा दिवसांतून येणारे पाण्याचे टँकर, त्यासाठी होणारी झुंबड, हाणामारी, हे चित्र दरवर्षीचे आहे. यंदा दुष्काळ जाहीर झाल्याने नियमानुसार सरकारी अनुदानाची वाढलेली अपेक्षा हाच काय तो थोडाफार दिलासा. नजर जाईल तिथपर्यंत करपलेलं पीक, हेच चित्र आहे. जळालेल्या रानाचे पंचनामे होताहेत. कृषी आणि महसूल विभागाकडून त्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, पाणी किंवा सिंचनाचा प्रश्न सोडवण्यासाठी कायमस्वरुपी ठोस असे उपाय आजपर्यंत करण्यात आलेले नाहीत. उजनी किंवा स्थानिक जलाशयांच्या प्रकल्पांचे गाजर दरवर्षी दाखवले जाते. त्यातून राजकीय उद्दीष्ट साध्य केल्यावर शेतकरी आणि सामान्य जनतेच्या तोंडाला पानं पुसली जाणं आता या ठिकाणी नवं राहिलं नाही, कोरड्या आश्वासनांच्या पावसाने रान ओलं कसं करावं, असा प्रश्न इथं आहे.

- Advertisement -

जिल्ह्यातील एक दोन एकरवर पोट संभाळण्यासाठी तीन महिन्यात येणारं सोयाबिन काढणारा शेतकरी या परिस्थितीला जबाबदार नाही. साखर सम्राटांचा उसाने ओढलेल्या पाण्यामुळे उस्मानाबादच्या जमिनीचे पाणी केव्हाच पळवलेले आहे. तूर, भुईमूग, तेलबिया किंवा प्रयोगशील शेतीसाठी माफक सिंचनाची इथल्या शेतकर्‍याची अपेक्षा आहे. ठिबकसाठीही पुरेसं रान ओलं होत नसल्याने ही भीषण परिस्थिती ओढावली आहे. शेकडो एकरवर करपलेलं रान ठिकठिकाणच्या चारा छावण्यांकडे जनावरं घेऊन निघालेला हतबल शेतकरी असं भयावह चित्र उस्मानाबाद ग्रामीण भागातलं आहे. शेतातले बोअरही आटलेत, कडबा ओला करायलाही पाणी नसल्याचं शेतकरी सांगताहेत. ‘मानसाच्या नरड्याची कोरड मिटवता येती, पर जनावराचं काय करावं’ असा आकांत शेतकरी करताहेत. शेकडो फूट खोलातूनही धुरळ्याशिवाय हापशाला पाण्याचा टिपूस लागत नाही. त्यामुळे बायाबापड्यांची घागरी घेऊन वणवण कायमची झाली आहे. रस्त्याच्या कडेकडेला पाण्याचे मोठाले पिंप, घागरी, हंड्यांची रांग लावून टँकरची वाट पाहणार्‍या बायाबापड्या हे चित्र उस्मानाबादमधील गावपाड्यातलं आहे. ही अशी बिकट परिस्थिती असताना या जिल्ह्याचं नाव उस्मानाबाद का धाराशिव असावं, असे निव्वळ राजकीय प्रश्न चर्चिले जात आहेत. स्थानिक जनता पाण्याच्या एकेका थेंबासाठी तळमळत असताना अस्मितांच्या शाब्दीक राजकारणात इथल्या मुख्य प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्याची खेळी धोकादायक ठरणार आहे.

उजनीमाय दारात आली नाय, मांजरा आणि तिच्या उपनद्याही कोरड्या ठाक पडल्या आहेत. दुसरीकडे २० ते ५० रुपये किमतीला पिण्याच्या पाण्याचा जार विकला जातोय. तर एक दोन एकरवर आपली गुजराण करणारे शेतकरी आधीच उसतोडणी कामगार म्हणून सातारा सांगलीत दाखल झाले आहेत. या वेळेला तरी आभाळ बरसेल, या आशेने ते जिल्ह्यात परतीच्या वाटेकडे डोळे लावून आहेत. परंतु पावसाने ओढ दिल्यानं इथला मूळ छोटा शेतकरी हवालदिल झाला आहे. ज्याचं रान थोडंफार ओलं आहे. तो शेतकरी राजाही शेतात पाण्याची मोटर लावण्याची धास्ती घेतोय, असलेलं पाणीही संपलं तर आणि आभाळ बरसलं नाहीच तर, ही भीती त्यांच्या डोळ्यात आहे. अस्मानी आणि सुलतानी तसेच राजकारणी अशा तिघांकडूनही दुर्लक्ष झालेल्या बालाघाटावरील या पठाराला आता वरुणराजाच्या प्रेमळ ओलाव्याची गरज आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -