रोटा…

Subscribe

कोकणात मुख्यतः तळकोकणात माडाच्या झाडाला आतून मुंग्यांनी पोखरलं की माडाक भवतेक रोटो लागलोसो वाटता असं म्हणायची वहिवाट आहे, पण रोटा लागणे ही प्रक्रिया लगेच दिसून येत नाही. प्रथम माडाची आतली बाजू शुष्क होतं जाते मग हळूहळू त्या रोट्याची लक्षणे बाहेरच्या म्हणजे खोडाकडे दिसू लागतात, असं करता करता झाडाचे संपूर्ण अस्तित्व नष्ट होते. शेवटी ह्या झाडावर कुर्‍हाड चालवण्याशिवाय काही पर्याय उरत नाही. असाच घाला माणसाच्या अस्तित्वावर घातला जात आहे. रोटा लागलेल्या आयुष्यात एक एक घटक व्यवस्थेला शरण जातो.

हल्लीच भगवंत क्षीरसागर यांनी अनुवादित केलेली हेन्री थोरो याची केपकॉड याचे प्रवासवर्णन वाचण्यात आले. याच्या आधी वॉल्डन हा थोरोचा ग्रंथ वाचला होता. वॉल्डनच्या किनारी त्याने केलेलं वास्तव्य हे खूप प्रसिद्ध आहे. वॉल्डनच्या किनारी त्याने दोन वर्षे घालवली. ती दोन वर्षे त्याने शब्दबद्ध करताना काय शब्दकळा वापरली म्हणून सांगू!. ह्या हेन्री थोरोबद्दल मला अनेक बाबतीत अप्रूप वाटते, त्यातील महत्वाची गोष्ट म्हणजे त्याची संग्राह्यवृत्ती. थोरोच्या भटकंतीत कुठेच मला एका ठिकाणी पोचायचे आहे किंवा मला इथे ठरवून जायचे आहे असा कुठेच उल्लेख नाही. एक मात्र गोष्ट खरी की, जिथे जिथे त्याने वास्तव्य केले त्या शब्दबद्ध केलेल्या गोष्टी पुढील पिढीला सहज उपलब्ध होताना दिसतात. तेथील साहित्यच नाही तेथील सांस्कृतिक वारसा सांगणार्‍या कितीतरी गोष्टी एखाद्या अमेरिकन संग्रहालयात सहज हाती लागतात. थोरोच्या ह्या पुस्तकाने खूप दिवस वेड लावलं होतं. मी झपाटल्यासारखं ते पुस्तक वाचलं. थोरो आणि थोरोचे एकूण साहित्य समजून घेण्यासाठी हे पुस्तक एखाद्या वाटाड्यासारखे काम करते. याबद्दल भगवंत क्षीरसागर यांचे आभार मानावे तेवढे थोडेच. केपकॉडमधील समुद्र वाचताना तिथल्या माणसांचे जीवनाचे अनुभव वाचताना अंगावर शहारा येतो. ह्या थोरोला ही माणसं कशी दिसली?, ह्या माणसांचे वेगळेपण थोरोच्या नजरेतून कस सुटलं नाही? असे अनेक प्रश्न पुस्तक वाचल्यावर मनात येतात. अमेरिकेतल्या कुठल्याशा छोट्या गावात रहाणार्‍या थोरोला ही वृत्ती कशी जमली. अनेक घटना शब्दबद्ध करत असताना ह्या माणसांना जोडलेली अफाट संग्राह्यवृत्ती वेळोवेळी अधोरेखित होते. जुने संदर्भ शोधण्यासाठी ह्या देशात फार कष्ट पडत नाहीत. याला कारण इथल्या लोकांमध्ये एक उपजत संग्राह्यवृत्ती आहे. ही वृत्ती फक्त साहित्याशी निगडीत नाही. इथल्या प्रत्येक क्षेत्रात ती दिसून येते. जुन्या गोष्टी आणि त्यावरील एक आस्था ह्या लोकांमध्ये असेलच यात शंका नाही. क्रीडा,कला,साहित्य अगदी राजकारण ह्या प्रत्येक क्षेत्रात ही वृत्ती एकदम जोरकस आहे. जी वृत्ती आमच्यात का नाही?
अनेकवेळा माझ्या मनात असे विचार येतात. एखादा संदर्भ किंवा आपल्या क्षेत्रात आपण ज्यांच्या खांद्यावर उभे आहोत तो इतिहास आपल्याला माहीत असतो का?. गेल्यावर्षी कवी अजय कांडर आणि मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नवोदित कवींचा प्रातिनिधिक संग्रह तयार करण्याचा गडबडीत होतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यात म्हणजे तत्कालीन रत्नागिरी जिल्ह्यातील कवींनी 1958च्या मालवण येथे भरलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे औचित्य साधून आरती प्रभू आणि सी. श्री. उपाध्ये या दोघांनी पल्लवी नावाचा एक प्रातिनिधिक कविता संग्रह संपादित केला होता त्या संग्रहाची एखादी प्रत मिळाली तर आपले संपादन कसे असावे याला चालना मिळेल म्हणून सिंधुदुर्गातील अनेक जुन्या वाचनालयात याबद्दल चौकशी केली.

सगळीकडून बहुतेक नकारघंटा मिळाली. काय दुर्दैव आहे ना! आजच्या तळकोकणातील साहित्यपरंपरेला ज्या पुस्तकाने सुरुवात झाली. त्या पुस्तकाची प्रत आम्हा आजच्या काळातल्या लिहित्या लोकांच्या हाती लागू नये?. त्या त्या काळातील लेखनाचा एक विशिष्ट बाज आजच्या नवख्या डोळ्यांना बघता आला असता तर आपण कोणाच्या खांद्यावर उभे आहोत हे आज कळले नसते का?. ही फार छोटी गोष्ट आहे. आम्ही पुतळे, स्मारके बाधण्यात इतके गुंतले आहोत की अशा संघटित वृत्तीने एखादे कार्य केले की पुढे त्याचा फायदा होईल हे आमच्या लक्षात येतच नाही. आम्ही पुतळ्यासाठी निविदा मागवा. ती मंजूर करून घ्या. त्या निविदा मंजूर झाल्या की त्यावर मल्लीनाथी करून त्यातून वाद कसा निर्माण करता येईल याचा विचार करा. अगदीच पुतळा उभारला की त्याची विटंबना करून जातीय दुही किंवा धार्मिक तंटे कसे वाढवता येतील यावर आमची सगळी उर्जा नष्ट होत आहे याचा विचार आपण कधीच केलेला नसतो.

- Advertisement -

कुठल्यातरी वैभवी संस्कृतीचे लेणं आपल्या हाती लागू नये हा करंटेपणा नव्हे का?. वीसएक वर्षापूर्वी शिवाजीपार्कवर क्रिकेटच्या कांगा लीग मॅचेस चालू होत्या. आम्ही सगळेच अठरा विशीच्या वयात होतो. पुढे मिळणार्‍या संधीची वाट बघत होतो. मॅच संपल्या. कॅन्टीनच्या दिशेने जात असताना अनेक जेष्ठ खेळाडू भेटत होते. माझ्याबरोबर एक जलदगती गोलंदाज होता. त्याने त्या सामन्यात तुफानी गोलंदाजी केली होती. त्याला बघून बाजूला उभे असलेले एकनाथ सोलकर जवळ आले म्हणाले, अरे बॉलिंग मस्त टाकलीस. एकदा रमाकांत देसाईच्या बॉलिंगची क्लिप मिळाली तर बघ. त्याचा रनअप बघ. नक्की मदत होईल. झालं तो रविवार गेला आणि सोमवार, मंगळवार दोन दिवस आम्ही दोघे आणि इतर दोघे असे चारजण रमाकांत देसाईच्या बॉलिंगची क्लिप कुठे मिळते का म्हणून जिथे जिथे शक्य होईल तिथे प्रयत्न केला. कुठेच यश येईना. कोणी सांगितलं की साठच्यादशकातल्या ह्या क्लिप्स तुम्हाला फिल्म डिव्हिजनकडे मिळतील. अनेक संदर्भ आणि ओळखी काढल्या पण कुठे त्या क्लिप्स मिळाल्या नाहीत. पुढच्यावेळी पुन्हा एकनाथ सोलकर भेटले तेव्हा त्यांना भेटून त्या क्लिप्ससाठी किती प्रयत्न केले हे सांगितलं तेव्हा सोलकरांनी मान हलवत आम्ही ह्या इंग्रजांकडून क्रिकेट नुसता खेळ घेतला, पण त्याचा इतिहास कसा जपायचा हे मात्र शिकून नाही घेतलं. इंग्लंडच्या प्रत्येक क्रिकेट स्टेडियमला एक गॅलेरी आहे. तिथे त्या प्रदेशातले खेळाडू, त्यांचे विक्रम, त्यांच्या मौल्यवान गोष्टी एवढा इतिहास जमवला आहे. जमलेच तर त्या खेळाडूची छायाचित्रे हा खजिना जतन करून ठेवला आहे.

सगळ्या स्थरावर आम्ही हातचं सोडून पळत्याच्या मागे लागलो आहोत की काय अशा एका विलक्षण काळाच्या मध्यावर आपण उभे आहोत असा क्षणाक्षणाला मला भास होतो आहे. ह्या संग्राह्यवृत्तीच्या अभावाने आम्ही आपले किती नुकसान करून घेत असतो. आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात बेळा, वालय, रत्नागिरी 24 ही पारंपारिक बियाणी. इथल्या वातावरणाला आणि जमिनीला पोषक राहून मुबलक पीक देणारी पण खतांच्या कोलाहालात आपले अस्तित्व गमावलेली. भोपळा, तौसा, पडवळ, भेंडी, दोडक्याची किती मोठ्या प्रमाणावर गावठी बियाणी होती. पण आम्हीच ती आपल्या हाताने घालवली. हल्ली इथल्या भूमीचे मार्दव जपणारी ही बियाणी आम्ही नामशेष केली आणि भूमी नापीक होईल कि काय अशी कोणती बियाणी आणि खतांची निर्मिती केली. हीच तर्‍हा आमच्या जनावरांची जर्सी गायी गावठी गायींपेक्षा अधिक दुध देतात म्हणून गावठी गायींच्या वंश आम्ही नष्ट केला. जर्सी गायींना न मानवणारे इथले वातावरण त्यांना लागणारे खाद्य यांचा मेळ कुठे बसत होता?. आधुनिकीकरण आणि यांत्रिकीकरण याला सहसा कोणी विरोध करत नाही पण त्यातून ह्या भूमीचे मार्दव टिकणार नसेल तर काय फायदा?. ह्या सगळ्याच्या मुळाशी एक संग्राह्य वृत्ती आहे तिचं आम्हाला नकोशी झाली आहे.
आज समाजात वावरत असताना अनेकवेळा उगाचच जाणवत राहत की आपली अवस्था ही रोटा लागलेल्या माडाच्या झाडासारखी तर होणार नाही ना?. कोकणात मुख्यतः तळकोकणात माडाच्या झाडाला आतून मुंग्यांनी पोखरलं की माडाक भवतेक रोटो लागलोसो वाटता असं म्हणायची वहिवाट आहे, पण रोटा लागणे ही प्रक्रिया लगेच दिसून येत नाही. प्रथम माडाची आतली बाजू शुष्क होतं जाते मग हळूहळू त्या रोट्याची लक्षणे बाहेरच्या म्हणजे खोडाकडे दिसू लागतात, असं करता करता झाडाचे संपूर्ण अस्तित्व नष्ट होते. शेवटी ह्या झाडावर कुर्‍हाड चालवण्याशिवाय काही पर्याय उरत नाही. असाच घाला माणसाच्या अस्तित्वावर घातला जात आहे. रोटा लागलेल्या आयुष्यात एक एक घटक व्यवस्थेला शरण जातो. असल्या कोलाहालात कोणाला कसल्या संग्राह्य वस्तूचे देणे घेणे आहे. वस्तू ती शाश्वत असो की नश्वर कशाला हवी आहे. दत्तो वामन पोतदार म्हणायचे की घरातल्या वस्तूंचा आपल्याला काय भार?. ह्या वस्तूंचा भार झालाच तर तो घडवच्यांना किंवा कपाटांना.

- Advertisement -

गावी गेलो की मुंबईला निघताना कसेही कणकवलीहून ट्रेन पकडायला यावे लागते, मग अजय कांडरकडे गप्पांचा फड जमतो. कधीतरी ट्रेनमध्ये बसवून देण्यासाठी कोकण रेल्वेत नोकरीला असणारे आणि हवी तेव्हा रेल्वेच्या तिकिटाची सोय करून देणारे मधुकर मातोंडकर येतातच नव्हे आम्ही त्यांना बोलावून घेतो. बोलता बोलता असाच कुठल्या कुठल्या पुस्तकांचा संग्रह करू या यावर चर्चा होतं होती. उद्या आपण हे जग सोडून गेलो तर कोण आपल्याला लक्षात ठेवणार आहेत. आपण संग्रहित केलेलं पुस्तक काळाच्या पडद्याआड जाईल आणि हळूहळू आपण देखील असंच बोलणं चालू होतं तेव्हा मातोंडकर थोडं गंभीर झालेलं वातावरण हलकं व्हावं म्हणून उगाच जास्त विचार करू नका. अजून थोड्या दिवसांनी आपण इथे जागा विकत घेऊ आणि आपणच आपलं स्मारक बांधू. तिथेच ठेऊ आपणच लिहिलेली पुस्तक केवळ आपल्यासाठी. वातावरण हलकं झालं. काळ पुढे जाताना वाळूच्या घड्याळातली वाळू हळूहळू जशी निसटून जाते तसं काहीसा वाटण्याचा हा काळ. काळाच्या ह्या अशा एका घटकेवर आम्ही उभे आहोत की काही करू नये असे वाटून निराश व्हायला होते. कदाचित मातोंडकर म्हणतात तसे आपले अस्तित्व टिकवण्यासाठी आपणच आपली स्मारके बांधण्याचे दिवस येतील का की आपणच आपणाला संग्राह्य करून घेऊ?


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -