घरफिचर्ससध्या लावणी आयटम साँग झालीये - नृत्य समशेर माया जाधव

सध्या लावणी आयटम साँग झालीये – नृत्य समशेर माया जाधव

Subscribe

‘माय महानगर’च्या ‘महानगर आणि मी’ या स्पेशल शोमध्ये कला, मनोरंजन क्षेत्रातील विविध मान्यवरांना आमंत्रित करण्यात येतं. यावेळी प्रसिद्ध लावणी क्वीन आणि नृत्य समशेर म्हणून ज्यांना ओळखलं जातं, अशा माया जाधव यांना बोलावण्यात आलं होतं. यावेळी सरकारकडून घेतली जाणारी दुर्लक्षाची भूमिका आणि बॉलिवूडमुळे प्रेक्षकाकडून बदलत जाणारी मागणी यावर त्यांनी त्यांची भूमिका मांडली.

‘गेल्या काही वर्षांमध्ये लावणीचं स्वरूप बदलत चाललं आहे. सध्याची लावणी आयटम साँगकडे वळली आहे. पण प्रेक्षकांकडूनच तशी मागणी होत असल्यावर कलाकार काय करणार? मागणीनुसार लावणीचं स्वरूप बदलत चाललं आहे. प्रेक्षकांमुळे कलाकारांना बदलावं लागत आहे’, अशा शब्दांत महाराष्ट्राच्या नृत्यसमशेर माया जाधव यांनी खंत व्यक्त केली आहे. mymahanagar.comच्या फेसबुक लाइव्हवर ‘महानगर आणि मी’ या स्पेशल शोमध्ये माया जाधव यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांनी सध्याचं लावणीचं बदलतं स्वरूप, प्रेक्षकांचा दृष्टीकोण आणि सरकारची अनास्था या मुद्द्यांवर त्यांची स्पष्ट मतं मांडली.

‘बुकिंगच मिळालं नाही तर करणार काय?’

लावणी हल्ली फारच कमी दिसते यावर बोलताना माया जाधव यांनी आर्थिक गणिताची बाजू समोर ठेवली. ‘सध्या प्रेक्षकांकडूनच बॉलिवूड स्टाईल लावणीची मागणी केली जाते. त्यामुळे कलाकारांना देखील त्यानुसार बदलावं लागतं. यामुळे एक लोककला म्हणून लावणीचं नुकसान होतंय हे मान्य आहे. पण पर्याय नाही. पारंपरिक पद्धतीनं लावणी केली आणि थिएटरला बुकिंगच मिळाली नाही तर करणार काय?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

- Advertisement -

लावणी कशी असायला हवी?

दरम्यान, यावेळी प्रेक्षकांच्या मागणीनुसार कलावंताला बदलावं लागत असल्याचं सांगतानाच लावणी कशी असायला हवी, यावर देखील माया जाधव यांनी भूमिका मांडली. ‘लावणीतल्या श्रृंगार रसाला जास्त पसंती मिळत गेली. पण जेव्हा तुम्ही श्रृंगार रस सादर करता, त्यालाही दर्जा असायला हवा. लावणीत नऊवारीत सबंध भरलेले कपडे असायला हवेत. पण आता तसं होत नाही. श्रृंगार रसासाठी अंग उघडं टाकायची गरज नाही. डोळ्यातून सगळं बोला. भाव डोळ्यांतून सांगा. शिवाय कोलांट्या उड्या कधीच लावणीत नसतात. कथ्थक लावणीशी संबंधित आहे. पायातून तुम्ही ते तोडे काढू शकता. आम्हीसुद्धा ते केलं. आम्हाला नाही का प्रतिसाद मिळाला? पण हल्ली ते सगळं बदललं आहे’, असं यावेळी माया जाधव म्हणाल्या.

सरकारचा पाठिंबा मिळत नाही

एकीकडे लावणीचा प्रेक्षकांना विसर पडत चाललेल असतानाच दुसरीकडे सरकारकडून देखील पाठिंबा मिळत नसल्याबद्दल माया जाधव यांनी नाराजी व्यक्त केली. ‘लावणीचा प्रसार होण्यासाठी सरकारकडून हवा तसा पाठिंबा मिळत नाही. बॉलिवूडकडेच सरकारचं जास्त लक्ष असतं’, असं त्या म्हणाल्या. ‘लावणीच्या प्रसारासाठी, तिचं प्रशिक्षण देण्यासाठी मॅनपॉवर, जागेची अडचण असते. लावणी जतन करण्यासाठी व्हीसीडी अल्बम करण्याचं देखील काम करणं आवश्यक आहे. पण त्यासाठी मोठ्या प्रमाणात पैशाची आवश्यकता असते. पैसा असेल तरच सगळं होऊ शकतं. त्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यायला पाहिजे,’ अशी अपेक्षा त्यांनी यावेळी बोलून दाखवली.

- Advertisement -
Maya Jadhav
माया जाधव

तरूण वर्ग लावणीकडे का येईना?

दरम्यान, तरुण वर्गाचा लावणीकडे कमी होत असलेला ओढा याविषयी माया जाधव यांनी तोडगा सांगितला आहे. ‘सध्या सगळ्या डान्स स्टाईल बदलल्या आहेत. हिपहॉप, बॅले, कंटेम्पररी असे डान्सचे अनेक प्रकार आले आहेत. नवी पिढी जुन्या गोष्टी नाकारत आहे. पण त्यांना लावणी शिकवण्यासाठी त्यांना आक्रमकपणे लावणी कशी चांगली आहे? हे शिकवावं लागेल’, असं त्या म्हणाल्या.

‘लावणीला दारुच्या बाटल्या ही अधोगतीच’

‘पूर्वी लावणीत धम्माल यायची. पण आता लावणी आणि डान्स बार हे सारखंच झालंय की काय असं वाटायला लागलंय,’ असं माया जाधव यावेळी म्हणाल्या. ‘लावणी सुरू असताना प्रेक्षकांनी वेडेवाकडे हावभाव करून नाचणं, हातात दारूच्या बाटल्या घेऊन बसणं ही काय लावणी आहे का? ही लावणी या कलाप्रकाराची अधोगती आहे’, अशा शब्दांत त्यांनी प्रतिक्रिया दिली.


हेही वाचा – नटले मी तुमच्यासाठी

लावणी पहिल्यांदा थिएटरमध्ये आणली तेव्हा…

लावणी हा कलाप्रकार पहिल्यांदा स्टेजवर ज्यांनी आणला त्या काही मोजक्या लावणी कलावंतांपैकी माया जाधव एक आहेत. ‘१६ हजारात देखणी ही लावणी मी चर्चगेटच्या यशवंतराव चव्हाण थिएटरमध्ये आणली. तिथे प्रमोद नवलकरांनी तमाशा महोत्सव भरवला होता. त्याचं आयोजन आमच्याकडे होतं. त्यात सुरेखा पुणेकर देखील होती. ती बैठकीची लावणी सुरेख करायची. तेव्हा मी म्हटलं तिची एक बैठकीची लावणी आणि माझी डान्सची लावणी असं एक चांगलं कॉम्बिनेशन होईल. त्याआधी डान्सची लावणी फक्त तमाशाच्या फडात व्हायची. पण तिथे पहिल्यांदा लावणी थिएटरमध्ये आली,’ अशी आठवण यावेळी त्यांनी मुलाखतीदरम्यान सांगितली.

पाहा संपूर्ण मुलाखत:

खरी लावणी कशी असते? लावणीतले बारकावे कोणते?

#Live :खरी लावणी कशी असते? लावणीतले बारकावे कोणते? लावणीचं स्वरूप बदलतंय का? आणि असेल तर त्याची कारणं काय? महाराष्ट्राची नृत्य समशेर माया जाधव यांची थेट मुलाखत! तुमचे प्रश्न विचारा कमेंट बॉक्समध्ये आणि त्यांची उत्तरं देतील स्वत: माया जाधव! | #MyMahanagar

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Friday, January 18, 2019

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -