घरफिचर्सनेता अभिनेता पण आमचा कोण आय्कता...?

नेता अभिनेता पण आमचा कोण आय्कता…?

Subscribe

जनतेचा स्वार्थ त्योच आमचाबी स्वार्थ.’ वा रं पठ्ठ्या. तुम्ही आमचा नेता. पण आम्हाला कुठं नेता, याचा इचार केलाय? जनतेचा स्वार्थ कशात हाय, याचा इचार केलाय? घटनेचा अर्थ समजायला घटनेचा अभ्यास कधी केलाय? असो. अभ्यासावर नको जायला. आमच्यासारखा सामान्य माणूसही घटना कधी वाचत नाही. आम्ही निव्वळ झेंडे घेऊन मर्कटासारखे नाचण्यासाठी. तुम्ही मदारी आमच्या नाचावर पैसे कमावणारे. आम्ही दंगे करायचे, सोशल मीडियावर रक्तपात करायचा. तुम्ही मुखवटे बदलून एकाच थाळीत बसून खायचं. हे फार आधीपासून चालत आलंंय. ते ‘संभवामी युगे युगे’ सारखं.

त्या दिवशीचीच गोष्ट. आमचा काळ्या अजून घरी आला नव्हता. (काळ्या म्हणजे आमचा काळ्या रंगाचा बैल). संध्याकाळ होऊन गेली होती. दिवे लागणीची वेळ झाली होती. सगळे चिंतेत होतो. सारं रान धुंडाळून झालं होतं. पण कुठे हालचाल दिसत नव्हती. तसं पाहिलं तर आमचा गाव गुराढोरांनी समृद्ध असणारा, दुधदुभतं बर्‍यापैकी असणारा. म्हणजे साहजिकच बहुतेकांजवळ जनावरं आहेत. अशा विविधतेने नटलेल्या गावात जनावरं अदलाबदलीचं प्रमाण हल्ली खूप वाढलंय. काळ्याही असाच कुठंतरी गेला असावा, असा विचार करत असताना बाजूच्या आळीतून सदाभाऊ ओरडत आले, ‘वो तुमचो काळो थय परबांच्या वाड्यात इलो हा. लवकर जाव्न घेव्न येवा. ढोरांका खाव्क देय्त नाया.’ काय समजायचं ते समजून गेलो. कालच त्याला चार दंडुके पाठीत घालून चारा पाणी दिलं नव्हतं.

कारण त्या परबांच्याच परसात त्यानं धुमाकूळ घातला होता. त्याचाच राग डोक्यात ठेवून त्यानं आज विद्रोह केला. डायरेक्ट सर्जिकल स्ट्राईक. कसंतरी त्याला नंतर घरी घेऊन आलो. काकानं त्याला नंतर थोडाफार प्रसाद दिलाच. मी आता विचार करतोय, की हा उद्या कोणाच्या परसात जाईल? खरंतर हे जनावर. त्याला चारा मिळेल तिकडे हे जाणार. प्रत्येकाला पोटं महत्त्वाचं असतं. जनावरांचे मालक जरी वेगवेगळे असले तरी त्यांच्या दुधावर पोट भरायला सगळ्यांनाच जमतं.

- Advertisement -

काही उदाहरणं वास्तविकतेच्या एवढी जवळ जाणारी असतात, की समजत नाही, हे काल्पनिक आहे की वास्तविक. आपल्या महान लोकशाही असणार्‍या देशाचा विचार केला तर आज अशीच परिस्थिती सगळीकडे दिसते. या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून या पक्षात चाललेली भयंकर मोठी घोडदौड (हा खूपच मोठा आणि सभ्य शब्द वाटतो. त्यापेक्षा बेडूकउड्या म्हटलं तर ते चपखल जुळेल.) मला काळ्या बैलाची आठवण करून देते. पावसाळ्यात सगळे बेडूक मिळून जेवढ्या उड्या मारत नाहीत, तेवढ्या बेडूकउड्या या पावसाळ्यात या माणसांनी मारल्यात. (खरंतर लोकप्रतिनिधी म्हणणार असतो, पण ती पात्रताच कुठं दिसून आली नाही. म्हणून निव्वळ लोक). ‘आरं बाबा व्यक्तीस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य, पक्षस्वातंत्र्य असं समदं स्वातंत्र्य तुझ्याच या लोकशाहीच्या घटनेत दिलंय ना. मग आमचं काय चुकलं? आमी जनतेच्या भल्यासाठीच पक्षांतर केलंया. जनतेचा स्वार्थ त्योच आमचाबी स्वार्थ.’ वा रं पठ्ठ्या. तुम्ही आमचा नेता.

पण आम्हाला कुठं नेता, याचा इचार केलाय? जनतेचा स्वार्थ कशात हाय, याचा इचार केलाय? घटनेचा अर्थ समजायला घटनेचा अभ्यास कधी केलाय? असो. अभ्यासावर नको जायला. आमच्यासारखा सामान्य माणूसही घटना कधी वाचत नाही. म्हणून इथं ‘घटना’ घडून गेल्यावरच सामान्य माणसाचा विचार केला जातो. तोपर्यंत आमचं नामोनिशाणंही कुठं नसतं. आम्ही निव्वळ झेंडे घेऊन मर्कटासारखे नाचण्यासाठी. तुम्ही मदारी आमच्या नाचावर पैसे कमावणारे. आम्ही दंगे करायचे, सोशल मीडियावर रक्तपात करायचा. तुम्ही मुखवटे बदलून एकाच थाळीत बसून खायचं. हे फार आधीपासून चालत आलंंय. ते ‘संभवामी युगे युगे’ सारखं.

- Advertisement -

हल्लीच काही दिवसांपूर्वी एका प्रतिष्ठित न्यूज चनेलच्या कार्यक्रमात चर्चेसाठी बोलावलं होतं. आम्ही नवमतदार एका बाजूला आणि दुसर्‍या बाजूला ‘सर्वधर्मी राजकारणी’. (वोटर बँक सर्वधर्मी असते म्हणून). आम्ही आमचे प्रश्न मांडायचे, आमची मतं मांडायची आणि त्यावर हे उत्तरं देणार, असा काहीसा कार्यक्रम. आम्ही आमचे प्रश्न मांडत होतो आणि हे दाण्यासाठी कोंबडे जसे तुटून पडतात तसे एकमेकांवर तुटून पडत होते. आमचे प्रश्न बाजूलाच राहिले होते आणि नको तेच विषय चर्चेला येत होते. तेवढ्यात त्या अँकरनं एका कार्यकर्त्याला एक प्रश्न विचारला. ‘तुमचे साहेब आता दुसर्‍या पक्षासोबत जाण्याचं म्हणताहेत. ज्या पक्षासोबत त्यांचं कधी पटलं नाही, सदानकदा विरोध राहिला, तोच पक्ष त्या दुसर्‍या पक्षासोबत युतीमध्ये आहे. आता कसं होणार? तुम्ही त्या पक्षाचा प्रचार करणार का?’ ‘नाही. मुळीच नाही. आमचं सुरुवातीपासूनच त्याच्याशी वैर आहे. आम्ही प्रचार करणार नाही.’ नेत्याचं उत्तर. ‘मग तुमच्या उमेदवाराचा प्रचार ते करतील?’ दुसरा प्रश्न. ‘करावा लागेल.

सत्ताधारी पक्षाचा निर्णय पाळावाच लागेल.’ याचं उत्तर. ‘निर्णय तुमच्या विरोधात असेल तर? तुम्हालाच त्यांच्या उमेदवाराचा प्रचार करावा लागला तर काय कराल? ब्रेकअप पॅकअप कराल?’ तिसरा प्रश्न. ‘आता आमचे साहेब काय निर्णय घेतील तो आमचा. त्यांनी म्हटलं तर करावा लागेल प्रचार. काळजावर दगड ठेवून आम्ही त्यांच्यासोबत काम करू.’ त्याचं हे उत्तर ऐकून आम्ही चकीतच झालो. शेवटच्या श्वासापर्यंत विरोध करायच्या शपथा घेणारा ‘हाय कमांडरची’ ऑर्डर आल्यावर ‘यस सर’ म्हणत बॉर्डरवर लढायला जाणार्‍या जवानासारखा तत्वनिष्ठ कसा काय बरं झाला? अर्ध्या एक तासानं चर्चा संपली आणि तोच कार्यकर्ता कम नेता आमच्याजवळ येऊन सांगू लागला, ‘खूप छान बोललात मुलांनो. खरंतर मलाही हे पटत नाही. पण आम्हाला काय फक्त टीव्हीवर राडा घालायचा असतो. बाकी आमचं कुठं देणं घेणं नाय. कितीही पक्ष बदलले तरी आमचं पोट मात्र भरतंय. अजून काय हवंं ना.’ असं म्हणून नंतर डोळा वाकडा करून तो निघून गेला. जाताना वाटेत चहाच्या टपरीवर ही सगळी नेतेमंडळी हसतखेळत चहा पिताना दिसली. आणि आम्हाला समजलं, की आपल्या देशाची लोकशाही अजून सुस्थितीत कशी काय राहिलीय ते.

आमच्या पाचवी सहावीच्या पुस्तकात एका घटपर्णी वनस्पतीबद्दल माहिती होती. अशी वनस्पती, जी तिच्याभोवती आलेल्या किड्यांना जिवंत गिळून खाते. तिच्याभोवती असणारी जेलीसारखी दलदल किड्यामुंग्यांना खोलखोल रुतत नेते आणि वरून झापडं बंद करून घटपर्णी आपली शिकार नेते. त्या घटपर्णीचा आत्मा असा डायरेक्ट एखाद्या राजकीय पक्षात घुसेल आणि बाकीचे नेते नव्हे अख्खेच्या अख्खे राजकीय पक्षच गिळंकृत करेल असं वाटलंच नव्हतं वो. विज्ञानाचा विषय असा राजकारणाशी जोडला जाईल, याची शक्यता नव्हती. परंतु म्हणतात ना, सगळे विषय एकमेकांशी जोडलेले असतात म्हणून, तेच खरं. 1967 चं ‘आयालाल गयालाल’ चं प्रकरणही एवढं गाजलं नाही. तेवढ्या या बेडुकउड्या गाजल्या. त्यानं बिचार्‍यानं एकाच दिवशी तीन पक्षांत प्रवेश केला होता. पण आज अख्खा पक्षच दुसर्‍या पक्षात विलीन करण्याची वेळ येऊन ठेपलीय. मला तर आता असं वाटतंय, की ते बँकांचं विलीनीकरण आता थांबवावं आणि उरलेले बारिकसारीक पक्षच असे विलीनीकरण करून टाकावेत.

निदान डिपॉजिट जप्त व्हायची तरी वेळ येणार नाही. ‘आमचा पक्ष म्हणजे एक भलामोठा वटवृक्ष आहे. आम्ही सर्वांना आमच्यात सामावून घेतो.’ असं म्हणणार्‍यांनी हा वटवृक्ष कसा काय फोफावत चाललाय आणि त्याच्या खाली कित्येक लहानमोठ्या वनस्पतींचा खच पडलाय, ते सारं सविस्तर नमूद करावं. म्हणजे आमच्याही ज्ञानात थोडी भर पडेल. मागे एक मसेज फिरत होता. अजूनही फिरतोय. त्यात असं होतं, की दर पाच वर्षांनी नेत्यांचा IPL सारखा लिलाव केला जावा. तिथे प्रत्येक पक्षाने बोली लावून आपल्याला हवा तो नेता विकत घ्यावा. निदान त्यातून त्या नेत्यांची खरी किंमत तरी कळेल. खरंच, असं IPL म्हणजेच Indian Political League यायला हवं. निदान लोकांना त्यांच्या लोकप्रतिनिधींची बाजारू किंमत तरी कळेल.

दोन दिवसांपूर्वीच एका प्रतिष्ठित अभिनेत्रीने ज्या पक्षाने तिला लोकसभेचं तिकीट दिलं, त्याच पक्षाला रामराम केला. त्या निवडणुकीत ती भलामोठ्या फरकानं पराभूत झाली ही गोष्ट वेगळी. पक्षांतर्गत राजकारण, बंडाळी आपणास सहन न झाल्यास्तव आपण पक्षाला ‘हात’ दाखवला, ही तिची प्रामाणिक भावना. आता कदाचित तिला दुसर्‍या पक्षातून विधानसभेचं तिकीट मिळेल, तर आश्चर्य व्यक्त करण्यासारखं काहीच नाही. यही तो राजकारण है ना! या नटनटींचा राजकारणासाठी वापर करून घेणं, ही काय नवीन गोष्ट राहिली नाही. त्यांची लोकप्रियता पक्षाच्या लोकप्रियतेलाही हातभार लावतेच. त्यामुळे हल्ली अनेक अभिनेते राजकारणात एण्ट्री करतात. अगदी आमदार, खासदारही होतात. अनेक अभिनेत्यांनी स्वतःचा राजकीय पक्षच खोललाय. त्याचा उपयोग मग सिनेमाच्या खिडकीवर तिकीटासाठी गल्ला वाढवण्यात होत असेल, तर त्यावर प्रश्न उपस्थित करण्याचा ‘सव्वालच’ येत नाही.

खरंतर, नेता आणि अभिनेता या एकाच नाण्याच्या दोन बाजू. दोन्ही ठिकाणी अभिनय महत्त्वाचा आणि तो नट जर थिएटर आर्टिस्ट असेल तर दुधात साखरच. कारण रिटेक घ्यावे लागत नाहीत. पण राजकारणात ‘रिटेक’ असतात. पाच वर्षांचा अभिनय काहीसा आवडला नाही आणि ‘नट’ जर ‘ऑस्कर’ लेव्हलचा असेल, तर काही वेळा अजून एक रिटेक दिला जातो. पण रिटेकवर रिटेक होत राहिले आणि काहीच ‘प्रोग्रेस’ होत नसेल तर जशी नटाची ‘इमेज’ खालावते, तशीच नेत्याचीही. मग दुसरा ‘नट’ जन्माला येतो. असे कित्येक ‘नटसम्राट’ आलेत आणि गेलेतही. त्यांची गणती करणं तसं अवघड होईल.

आपल्या सर्वांना रामायण माहीत असेल. तेच तर पाहत आम्ही लहानाचे मोठे झालो. त्यात एक हनुमान होता. ज्याच्या स्वामिभक्तीचं उदाहरण अजूनही दिलं जातं. तिथं पाहिलं होतं, हनुमान अशी आपली छाती फाडतो आणि त्यात रामसीतेचा फोटो दिसतो. हल्लीचे नेतेही असंच करतात. आपली स्वामीभक्ती दाखवण्यासाठी छाती फोड करत असतात. अशी छातीफोड कितीवेळा होते सांगू शकत नाही. दरवेळी नवनवीन फोटो छातीवर चिकटवले जातात. पण हल्ली कितीही छाताडं फोडली, तरीही ती ‘छप्पन इंच की छाती’च बहोत हार्ड ठरते. कमालच आहे. पण असे जनतेतून येणारे सर्वसामान्य छातीफोड आवाज मात्र अशा कुठल्याच छातीला ऐकू जात नाहीत, ही शोकांतिकाच आहे. मग ती छाती कितीही इंचाची का असूदे. शेतकरी मरत असला तरी त्याचा टाहो खुर्चीपर्यंत पोहोचत नाही.

खुर्चीचा खडखडाट मात्र सगळीकडे पोहोचतो. पण आवाजापेक्षा कित्येक पटींनी चपळ असणारी वीज अजून गावोगाव पोहोचत नाही. ‘वीजबाई, कुठं घोडं अडतं तुझं? की तुलाही गावात यायला डिजिटल सिस्टीम, हायफाय रस्ते, हायप्रोफाइल माणसंच लागतात?’ काही कळत नाही. कोणी एखाद्या नेत्याला विचारलं, ‘पोटापाण्याचं काय करतोस?’ तो म्हणेल ‘बिजनेस करतो.’ आपण म्हणू, ‘वा पण नक्की काय?’ नेता म्हणेल, ‘राजकारण करतो.’ आता बाकी काय उरतच नाही बोलायला. राजकारण एक बिझनेस झालाय. पाच वर्षे पोट फुटेपर्यंत ‘समाजसेवा’ केली की नंतरही चाळीस पन्नास हजाराची पेंशन हातात पडते. सामान्य लोकांना मात्र कर्जावर कर्ज फेडायचीच असतात. सामान्य लोकांचा कळवळा आहे म्हणून मी पक्षांतर केलं, असं उत्तर देणार्‍यांनी सत्तेत असताना काय काय दिवे लावलेत, याचा विचार आपण कधी केलाय का?

शोले… माझा आवडता चित्रपट. आवडायचं कारण म्हणजे त्यातील डायलॉग्ज. त्यात थोडाफार बदल करून भारतीय राजकारणाची सद्य:स्थिती दाखवता येईल. ‘अरे ओ सांभा, कितने आदमी थे?’ ‘चार थे सरदार.’ ‘आदमी चार और गोलियाँ दो. बहोत नाइंसाफी है रे. अब कोई दो आदमीओं को मारना पडेगा. मार दिया जाय या छोड दिया जाय बोल तेरे साथ क्या सुलूख किया जाय.’ मग कोणी छोड दिया जाय म्हटलं तर त्यांना मोठं पद, गाडी, बंगला सारं काही मिळतं आणि जे झुकायला तयार नसतात, त्यांच्यामागे इडी, सीबीआय अशांचं लटांबर लावलं जातं. मग अशा अडलेल्यांना समजून येतं, की ‘गब्बर के ताप से हमे एक ही आदमी बचा सकता है, एक ही आदमी, खुद गब्बर.’ मग वावटळ परत उठते आणि ‘ए रे माझ्या मागल्या’ करत पुन्हा रांग मारुतीच्या शेपटासारखी वाढत जाते. राजकीय स्वार्थासाठी बेडुकउड्या मारणारे तथाकथित नेते लोकांच्या स्वार्थासाठी दलबदलू राजकारण करत असतात, हे स्वप्नातही कधी खरं वाटणार नाही.

हे सगळं असं चालू असताना युवकांचा अर्थात मतदारांचा विचार किती केला जातो, हा प्रश्नच आहे. मतदारांच्या मागण्या अर्ध्याअधिक अपूर्णच राहतात. कारण पाच वर्षांनंतर याच मागण्या आश्वासनांचं गाजर म्हणून समोर पेरता येतात. तरीही माझा गाव, माझे गाववाले अज्ञानाच्या खाईतच. गाव अंधारातच. एक प्लेट भजी बाटलीच्या करारावर आम्ही गाव विकून टाकतो आणि आयुष्यभर आमचा ‘झेंडासंग्राम’ चालू असतो. ‘हातात’ ‘भगवा’ फडकवून ‘वेळ’ पडल्यास ‘चिखलातूनही’ धावणारे आमच्या पोरांचे ‘इंजिनाचे डबे’ आणि त्या धुराने ग्रासलेला माझा अंधार गाव… अजूनही अंधारातच. आमच्या मागण्या विचारात कोण घेतो? ‘अच्छे दिन’ चं राजकारण करत असताना विकास कुठं गायब झाला, तेच कळत नाही. विकासाची खरी संकल्पनाच बदलली. माणसाचा विचार बाजूला ठेवून धर्म, जात, लिंग याविषयांभोवती फिरणारा विकास जन्माला आला. आणि मग समजलं की नेता असो की अभिनेता आमचं कोणीच ऐकत नाही. आता पिक्चर फ्लॉप व्हायचा नसेल तर रिटेक बंद करायची वेळ आलीय. डोळे उघडून पहायला हवं.असो. चला आता निघतो. नाहीतर आमचा काळ्या अजून कोणाच्यातरी परसात जाईल.

-श्रेयश अरविंद शिंदे.
-कळसुली-कणकवली-सिंधुदुर्ग

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -