घरफिचर्सस्वातंत्र्य चळवळीतील अग्रणी नेते

स्वातंत्र्य चळवळीतील अग्रणी नेते

Subscribe

चित्तरंजन दास यांचा जन्म १६ जून १९२५ रोजी झाला. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक अग्रगण्य बंगाली नेते, प्रसिद्ध कायदे पंडित व प्रभावी वक्ते. देशबंधू या उपाधीनेच ते ओळखले जातात. स्त्रियांना पूर्ण स्वातंत्र्य असावे आणि स्त्रीशिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी प्रयत्न केले. विधवाविवाह व आंतरजातीय विवाह यांचा त्यांनी प्रचार व प्रसार केला आणि स्वतःच्या दोन मुलींच्या आंतरजातीय विवाहास संमती दिली.

चित्तरंजन दास यांचा जन्म १६ जून १९२५ रोजी झाला. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक अग्रगण्य बंगाली नेते, प्रसिद्ध कायदे पंडित व प्रभावी वक्ते. देशबंधू या उपाधीनेच ते ओळखले जातात. त्यांचा जन्म कलकत्ता येथील उच्च मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. दासांचे मूळ घराणे विक्रमपूर परगण्यातील. वडील भुवनमोहन कलकत्त्यात वकिली करीत. ते ब्राह्मो समाजाचे होते. चित्तरंजनाचे शिक्षण कलकत्त्यात झाले. बी. ए. झाल्यावर १८९० मध्ये ते आय. सी. एस. परीक्षेकरिता इंग्लंडला गेले. इंग्लंडमध्ये त्यांनी दादाभाई नवरोजी यांच्या निवडणूक प्रचारसभांतून भाषणे दिली. याच वेळी मॅक्लिन नावाच्या एका इंग्रजाने हिंदी जनतेविषयी अनुद्गार काढले. तेव्हा हिंदी लोकांची सभा घेऊन चित्तरंजनांनी मॅक्लिनचा निषेध केला. एवढेच नव्हे, तर त्यांनी चळवळ करून त्याचे संसदेतील सभासदत्व रद्द करविले. याचा परिणाम म्हणूनच आय. सी. एस. परीक्षेत ते यशस्वी होऊ शकले नाहीत व अखेर बॅरिस्टर होऊन त्यांना भारतात परतावे लागले. चित्तरंजनांचा वकिलीत हळूहळू जम बसत होता. या सुमारास वंगभंगाची चळवळ सुरू झाली.

अरविंद घोष व इतर काही तरुणांवर खटले भरण्यात आले. अलीपूर बॉम्बकेस म्हणून हा खटला गाजला. अरविंदांकडे पैसे नव्हते. तेव्हा चित्तरंजनांनी आपली घोडा-गाडी विकून स्वेच्छेने हा खटला चालविला. अरविंदबाबू निर्दोष सुटले. त्यानंतर चित्तरंजनांची मोठ्या वकिलांत गणना होऊ लागली. असाच ढाका-कटाचा खटला त्यांनी चालविला. त्यांना प्रतिष्ठा आणि पैसाही भरपूर मिळू लागला. यातच ते स्वातंत्र्यलढ्यातील अनेक खटले विनामूल्य चालवीत. अनेक शैक्षणिक, सामाजिक व राजकीय संस्थांना त्यांनी लक्षावधी रुपयांच्या देणग्या दिल्या. विद्यार्थी असल्यापासूनच ते सार्वजनिक व राष्ट्रीय कार्यांत भाग घेत. त्यांच्या राजकीय विचारांवर सुरुवातीस टिळक वगैरे जहालमतवाद्यांची छाप होती. अनुशीलन समिती या क्रांतिकारक संघटनेचे ते सदस्य होते. बंगाल फाळणीविरुद्ध झालेल्या चळवळीत बिपिनचंद्र पाल व अरविंद घोष यांच्या बरोबरीने त्यांनी काम केले. १९१७ मध्ये ते प्रांतिक परिषदेचे अध्यक्षही झाले. तेव्हापासून अखिल भारतीय राजकारणात त्यांना महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले. १९१८ मध्ये त्यांनी माँटेग्यू-चेम्सफर्ड सुधारणांना विरोध केला.

- Advertisement -

कलकत्ता येथील १९२० च्या काँग्रेस अधिवेशनात त्यांनी गांधीच्या असहकार चळवळीला प्रथम विरोध केला; पण पुढे नागपूर काँग्रेसमध्ये ते पूर्णतः गांधीवादी झाले. एवढेच नव्हे, तर त्यांनी आपली वकिली सोडली व पुढे आपली राहती वास्तू आणि इतर मालमत्ताही काँग्रेसला व पर्यायाने देशास समर्पण केली. प्रिन्स ऑफ वेल्सच्या भेटीवर बहिष्कर टाकावा म्हणून जी चळवळ झाली, त्यात त्यांना सहा महिने तुरुंगात डांबण्यात आले. पुढे असहकाराची चळवळ शिथिल करण्यात आल्यावर त्यांनी काँग्रेस अंतर्गत स्वराज्य पक्षाची स्थापना केली. कायदेमंडळात जाऊन तेथे असहकाराचे धोरण चालविण्याच्या कार्यक्रमाला प्रथम त्यांचा विरोध होता; पण दिल्ली येथील अधिवेशनात त्यावर शिक्कामोर्तब झाले. विधिमंडळात त्यांनी सरकारचे अंदाजपत्रक नामंजूर करून आपले म्हणणे सिद्ध केले. १९२४-२५ या साली ते कलकत्ता महानगरपालिकेचे महापौर होते. त्या वेळी सुभाषचंद्र बोस त्यांचे साहाय्यक होते. स्वराज्य हे लोकांचे व लोकांसाठी असावे हे त्यांचे सूत्र होते. त्यांनी हिंदू-मुस्लीम ऐक्यासाठी सतत प्रयत्न केले आणि १९२३ मध्ये हिंदू-मुस्लीम करार घडवून आणला. ग्रामीण भागात रचनात्मक कार्य करण्यावर त्यांचा भर होता. पूर्वीप्रमाणे आपली खेडी सुसंघटीत आणि समृद्ध व्हावीत, असे त्यांना वाटे. भारतीयांनी राष्ट्रीय शिक्षण व मातृभाषेचा वापर यांचा अंगीकार करावा, हे मत त्यांनी १९२१ मध्ये विक्रमपूरच्या राष्ट्रीय शिक्षण परिषदेच्या अध्यक्षस्थानावरून व्यक्त केले.

कलकत्ता विद्यापीठ व गौरिय सर्व विद्यायतन या शैक्षणिक संस्थांशी त्यांचे निकटचे संबंध होते. चित्तरंजन जरी एक नामांकित कायदेपटू होते, तरी त्यांचे ह्रदय हे कवीचे होते. गोरगरीब, पददलित यांबद्दल त्यांना सहानुभूती होती. मालंचनंतर त्यांनी माला, सागर संगीत, किशोर-किशोरी व अन्तर्यामी हे काव्यसंग्रह प्रसिद्ध केले. यांतून त्यांनी आपल्या उत्कट भावना व्यक्त केल्या आहेत. अन्तर्यामी हा काव्यसंग्रह मालंचनंतर बरोबर दहा वर्षांनी प्रसिद्ध झाला. या दहा वर्षांच्या काळात त्यांच्या मनात आशानिराशांचा झगडा चालू होता व अखेर आशेचा, श्रद्धेचा आणि प्रेमाचा विजय झाला. निराशेचे आणि कष्टाचे ते दिवस संपले, असा अन्तर्यामी पुन्हा त्यांना भेटला. त्यांनी काही लहानमोठ्या कथाही लिहिल्या. त्यांच्या काव्यास बंगाली साहित्यात आज मानाचे स्थान दिले जाते. नारायण या नावाचे साहित्यविषयक मासिक त्यांनी काढले. याशिवाय बांगला कथा हे बंगाली सायंदैनिक व स्वराज्य पक्षाचे मुखपत्र फॉर्वर्ड हे दैनिक त्यांनी सुरू केले. कलकत्ता महापालिकेचे महापौर असताना त्यांनी म्युनिसिपल गॅझेट हे पालिका मुखपत्र सुरू केले. चित्तरंजनांवर प्रथम ब्राह्मो समाजाच्या विचारांची छाप होती; पण पुढे ते शाक्त व वैष्णव धर्मांकडे आकृष्ट झाले. जातीयता आणि अस्पृश्यता त्यांना मान्य नव्हती. स्त्रियांना पूर्ण स्वातंत्र्य असावे आणि स्त्रीशिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी प्रयत्न केले. विधवाविवाह व आंतरजातीय विवाह यांचा त्यांनी प्रचार व प्रसार केला आणि स्वतःच्या दोन मुलींच्या आंतरजातीय विवाहास संमती दिली. अखेरच्या दिवसांत कामाच्या ताणाने त्यांची प्रकृती अधिक क्षीण झाली. दार्जिलिंग येथे ते विश्रांतीस गेले आणि तेथेच ह्रदयविकाराच्या झटक्याने मरण पावले.

Nityanand Bhise
Nityanand Bhisehttps://www.mymahanagar.com/author/bnityanand/
राष्ट्रीय भावना अधिक असलेला तितकाच सामाजिक जाणिवांबाबत हळवा असलेला मी धर्म, देव, श्रद्धा या बुरसटलेल्या, थोतांड गोष्टी मानणार्यामधला नाही, मी पुरोगामी नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -