घरनवरात्रौत्सव 2022खान्देशातील ‘दारुबंदीवाली ताई ’

खान्देशातील ‘दारुबंदीवाली ताई ’

Subscribe

धुळ्यातील गीतांजली कोळी यांची दारुबंदी मोहिमेमुळे आज सर्वत्र ‘दारुबंदीवाली ताई’अशी ओळख निर्माण झाली आहे. समाजसेवेची आवड असल्यामुळे त्यांनी सुरुवातीला ‘विरांगणा झलकारीबाई स्त्री शक्ती’ नावाची स्वत:ची संस्था सुरु केली. या संस्थेद्वारे त्यांनी गरजू महिलांना किराणामाल वाटप करण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवला. त्या ब्युटी पार्लर चालवून आपले कुटुंब चालवतात. हा व्यवसाय करत असतानाच त्यांना महिलांच्या अनेक समस्या निदर्शनास आल्या. कुटुंबप्रमुख दारुच्या व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे या समस्या निर्माण झाल्या होत्या, हे त्यांच्या लक्षात आले.

कुठलेही व्यसन आरोग्यासोबतच एखाद्याचे कुटुंबही उद्ध्वस्त करण्यास कारणीभूत ठरते. त्यात ते व्यसन जर दारुचे असेल तर मग बोलायलाच नको.या दारुच्या व्यसनामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत आणि होत आहेत. हिच ‘दारु’ जर कायमची बंद केली तर अनेकांची कुटुंबे उद्ध्वस्त होण्यापासून वाचतील. असाच विचार एका सर्वसामान्य महिलेने केला आणि तो पूर्णत्वासही नेला. त्यासाठी तिने दारूबंदीच्या विरोधात चळवळ उभारली. ती महिला म्हणजे धुळ्यातील सौ. गीतांजली कोळी.

धुळ्यातील गीतांजली कोळी यांची दारुबंदी मोहिमेमुळे आज सर्वत्र ‘दारुबंदीवाली ताई’अशी ओळख निर्माण झाली आहे. समाजसेवेची आवड असल्यामुळे त्यांनी सुरुवातीला ‘विरांगणा झलकारीबाई स्त्री शक्ती’ नावाची स्वत:ची संस्था सुरु केली. या संस्थेद्वारे त्यांनी गरजू महिलांना किराणामाल वाटप करण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवला. त्या ब्युटी पार्लर चालवून आपले कुटुंब चालवतात. हा व्यवसाय करत असतानाच त्यांना महिलांच्या अनेक समस्या निदर्शनास आल्या.

- Advertisement -

कुटुंबप्रमुख दारुच्या व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे या समस्या निर्माण झाल्या होत्या, हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे समस्येचे मूळ असलेल्या दारुलाच हद्दपार केले पाहिजे, असा निश्चय त्यांनी केला. त्यासाठी त्यांनी मंत्री, लोकप्रतिनिधी, प्रशासक या सर्वांना निवेदन देणे सुरु केले. मात्र दिलेल्या निवेदनांचा काहाही उपयोग न झाल्याने त्यांनी स्वत: महिलांना संघटित करून २३ जुलै २०१७ रोजी गटारी अमावस्येला ‘संपूर्ण महाराष्ट्र दारुबंदी महिला मोर्चा’ची स्थापना करुन दारुबंदीचा एल्गार पुकारला. मात्र ज्या महिलांना संघटित करुन त्यांनी हा एल्गार पुकारला होता त्या सर्व महिलांनी आपआपल्या कुटुंबांच्या दबावाला बळी पडून गीतांजली यांची साथ सोडली. तरीही त्या डगमगल्या नाहीत. त्यांनी खंबीरपणे एकटीने दारूबंदीचा लढा पुढे चालू ठेवला.

अशातच त्यांना त्यांच्या एका मैत्रिणीचा सोनेवाडी तालुका शिंदखेडा येथून फोन आला. पतीच्या दारुच्या व्यसनामुळे त्रस्त असलेल्या महिलांच्या मदतीसाठी काही तरी कर, असे ती म्हणाली. गीतांजली यांनी तिथे जाऊन दारुबंदीची पहिली सभा घेतली. त्यांच्या सभेला अगदी बोटावर मोजण्याइतक्याच महिला होत्या. त्या महिलांना दारुड्यांकडून होऊ शकणार्‍या संभाव्य त्रासाची कल्पना दिली. तरीसुद्धा त्या महिलांनी त्यांना साथ देण्याचे वचन दिले. महिलांचा पक्का निर्धार बघून त्यांचाही आत्मविश्वास वाढला.

- Advertisement -

महिलांची संख्या कमी असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने त्यांनी तेथील स्थानिक प्रशासनाची मदत घेण्याचे ठरवले. त्यानुसार त्यांनी तत्कालीन पोलीस निरीक्षक रत्नपारखी यांची मदत घेतली. त्यांनी गीतांजली यांना सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास आणखीनच वाढला. त्यानंतर त्या जोमाने कामाला लागल्या. त्यांनी लगेचच गावात सभा घ्यायला सुरुवात केली. या सभा त्या ठराविक जागी ठरवून तर घेतच होत्या, सोबतच जिथे जिथे महिलांचा समूह दिसायचा तिथे जात. एखाद्या बस स्टॉपवर किंवा अशाच काही ठिकाणी त्या महिलांना भेटत. दारुबंदी किती महत्त्वाची आहे हे त्यांना पटवून देत.

त्यांच्या या प्रयत्नाला यश मिळू लागले. दारुबंदी चळवळीत महिलांचा सहभाग वाढू लागला. त्याचे फलित म्हणून त्यांनी १५ ऑगस्ट २०१७ रोजी सोनेवाडीच्या ग्रामसभेत पहिला दारुबंदीचा ठराव केला. तो ठराव मंजूर होताच त्यांनी कामाचा धडाका लावत शिंदखेडा तालुक्यातील काही गावे, धुळे तालुक्यातील काही गावे, साक्री तालुक्यातील काही गावे आणि नंदुरबार तालुक्यातील काही गावे असे मिळून एकूण ४० गावांमध्ये दारुबंदीच्या सभा, कार्यशाळा घेतल्या. यातील अर्ध्यापेक्षा जास्त गावांमध्ये १०० टक्के दारुबंदी केली.

हे सर्व करत असताना गीतांजली यांनी स्वत: घटनास्थळी हजर राहून पोलिसांच्या मदतीने दारुचे अड्डे उद्ध्वस्त केले. अनेक गावांत रस्ता नसल्यामुळे प्रसंगी त्या पायपीट करत प्रवास करतात आणि तेथील ग्रामस्थांमध्ये दारुबंदीबाबत जागृती करतात. त्यांच्या या कामाचे सर्वत्रच कौतुक होत असून त्यांचे नाव अनेक पुरस्कारांसाठी नामांकित करण्यात आले. परंतु त्यांनी कुठलाही पुरस्कार स्वीकारला नाही. जोपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात दारुबंदी होत नाही तोपर्यंत मी कुठलाही पुरस्कार स्वीकारणार नाही, असा निश्चय त्यांनी केला आहे. त्यांच्या सभेत कुठलाही बडेजाव नसतो. गावागावात फिरुन त्या स्वत: महिलांना घराघरातून बोलावून त्यांच्याशी संवाद साधतात.

आता दारुबंदीच्या चळवळीला त्यांनी सोशल मीडियाचीही जोड दिली आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून त्या ही चळवळ समर्थपणे चालवत आहेत. त्यांच्या या चळवळीला आता गावागावातील महिला, तरुण, स्थानिक पोलीस आणि माध्यमांची मदत मिळत आहे. त्यांच्या या कार्याला दीप अमावस्येला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या चळवळीतील महिला आणि तरुणांचा सत्कारही केला. जोपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात दारुबंदी होत नाही, तोपर्यंत आपण आपले कार्य थांबवणार नसल्याचे त्या सांगतात. त्यांचे कार्य म्हणजे आजच्या महिलांसाठी खरोखरच प्रेरणादायी असेच आहे.

जेव्हा कुटुंबप्रमुख व्यसनाच्या आहारी जातो तेव्हा त्या घरातील स्त्री आणि मुलांचे काय आबाळ होतात, हे मी चांगल्या तर्‍हेने जाणून होते. त्यातच पार्लरनिमित्त येणार्‍या महिलांच्या व्यथा सतत ऐकत होते. त्यामुळे यावर काहीतरी कायमचा उपाय करायला हवा असे सारखे वाटत होते. त्यातच एकदा वृत्तपत्रातील एक घटना वाचून मन खूप सुन्न झाले होते. एका विवाहितेने दारुड्या पतीच्या छळाला कंटाळून पोटच्या तीन मुलांसह आत्महत्या केली होती. त्या विवाहितेच्या प्रेताजवळ ठेवलेल्या त्या तीन चिमुकल्यांची प्रेत बघून मन हेलावून गेले. त्याच क्षणी मी मनाशी निर्धार केला की, आपण दारुबंदी करायचीच. ही घटनाच मला दारुबंदीच्या चळवळीला चालना देणारी ठरली. दारुमुळे कित्येक घरातील कर्ते पुरुष, तरुण मुलांचे मृत्यू झालेत. कित्येक स्त्रियांचा छळ झाला. पूर्वी हुंडाबळी असायचे, आता मात्र दारुमुळे बळी जातोय. त्यामुळे आता हुंडाबंदीची गरज नसून दारुबंदीची खरी गरज आहे.

अध्यक्ष- संपूर्ण महाराष्ट्र दारूबंदी महिला मोर्चा -गीतांजली कोळी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -