घरफिचर्सनव्यांच्या गळ्यात जुनाच काळ!

नव्यांच्या गळ्यात जुनाच काळ!

Subscribe

परवा चॅनेल सर्फिंग करता करता कुठल्याशा मराठी चॅनेलवर स्थिरावलो तर दहा-बारा-चौदा वयोगटातली मुलं गाणी गात होती. रिअ‍ॅलिटी शो होता तो. चिमण्यापाखरांसारखी गोजिरवाणी मुलं होती ती, पण त्यांच्या कंठांतून चिऊकाऊची गाणी निघत नव्हती. त्या इटुकल्यापिटुकल्यांना गाण्यातल्या तालासुरांची, भावनांची अत्यंत छान, प्रगल्भ समज होती. त्यातल्या बहुतेकांना आजच्या ऑडिओ-व्हिज्युअल जमान्यात गाणं कसं सादर करायचं, याचीही कला अवगत होती. मागच्या काळातल्या मोठमोठ्या गायक गायिकांनी अजरामर करून ठेवलेली गाणी ही चिमणीपाखरं गात होती. गाणं ऐकताना खरोखरच मजा येत होती. मी त्या चॅनेलवर इतका स्थिरावलो, इतका एकाग्र झालो की माझ्या हातातला रिमोट मला बाजूला ठेवणं भाग पडलं.

जेव्हा टीव्ही आसमंतात अवतरला नव्हता आणि रेडिओ हेच मनोरंजनाचं साधन होतं. तेव्हा गाणं हे फक्त ऐकलं जात होतं. आता गाणं हे आधी पाहिलं जातं आणि मग त्यातून सवड मिळाली तर ऐकलं जातं. आता गाणार्‍याला मी गातो कसा, यापेक्षा कधी कधी मी दिसतो कसा याचीही काळजी घ्यावी लागते. या अशा काळात ती लहानगी मुलं समरसून गात होती याचं मला जास्त कौतूक वाटत होतं. बरं, गाणीही कोणती तर ’घनघनमाला नभी दाटल्या कोसळती धारा’, ’सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या’, ’ऋतू हिरवा ऋतू बरवा’ अशी त्यांच्या कोवळ्या गळ्याला सहसा न झेपणारी, गाताना सुरात खूप कलाकुसर, अणकुचीदार नक्षीकाम असणारी. पण मुलं ती गाणी सहज पेलत होती. मला त्या सगळ्याची गंमत वाटत होती ती अशासाठी की ही मुलं आज वेगळ्याच काळातली आहेत, त्यांचा सगळा भोवताल त्या गाण्यांच्या पार पुढे निघून गेलेला आहे. त्यांच्या काळातलं संगिताचं तंत्र, फॅशन पूर्ण बदललं गेलं आहे, पण तरीही ही मुलं ही जुनीच नव्हे तर ’जुनाट’ गाणी गाताहेत? काय बरं खरं कारण असेल या मागचं? कारण तसं फार जटिल वगैरे नव्हतं. सोपं आणि पटकन उमगणारं होतं.मला आठवतंय, 2000 सालातली गोष्ट आहे. काही काळापुरतं उगवून काही काळातच मावळलेल्या एका चॅनेलच्या अशाच एका रिअ‍ॅलिटी शोच्या लेखनाचं काम माझ्याकडे आलं होतं.

ते करताना काही नवतरुण मंडळींंना गाण्यासाठी कोणती गाणी घ्यावीत याचंही त्या रिअ‍ॅलिटी शोच्या दिग्दर्शकाच्या विनंतीनुसार मी काम करायचो.त्यावेळी बर्‍याचदा मी त्यांना विचारायचो, ‘तुम्ही कोणतं गाणं गाल?‘ ती तरुण मुलं म्हणायची, ‘सर, जुन्या काळातलं जरा चॅलेंज आणि फीलिंग्ज असलेलं गाणं सुचवा ना?‘ मी म्हणायचो, ‘तुम्हाला माहीत नाहीत का त्यापैकी काही गाणी?‘ ती म्हणायची, ‘इतकी माहीत नाहीत हो सर…तुम्हीच सुचवा ना! ही गाणी जन्माला आली तेव्हा या तरुण मुलांचा जन्म झाला नाही, हे वास्तव मला माहीत होतं. पण तरीही काही प्रश्न मला सतत सतावायचे की या मुलांना या रिअ‍ॅलिटी शोमध्ये यांच्या काळातल्या गाण्यांचं इतकं वावडं का आहे? आणि यांना माझ्या काळातली जुनीच गाणी पेश करायला का आवडतात? कारण स्पष्ट होतं – त्या मुलांना आपल्या गाण्यातलं कलाकौशल्य, आपली गायकी नव्या गाण्यांतून दाखवता येत नव्हती, त्यासाठी जुन्या गाण्यांचा त्यांना भरभक्कम आधार वाटत होता तर नव्या गाण्यांच्या मर्यादा जाणवत होत्या.

- Advertisement -

‘मला शोच्या अंतिम फेरीत जायचं असेल तर हे नवं गाणं गाऊन नाही चालणार हो!‘ असं ती मुलं मला तोंडावर सांगायची. म्हणजे आपल्या काळातली गाणी कामचलाऊ आहेत आणि आपल्या काळातलं संगीत ठिसूळ आहे याची या नव्या काळातल्या मुलांना जाणीव होती. परवा त्या चॅनेलवरचा तो रिअ‍ॅलिटी शो बघताना त्या चिमण्यापाखरांच्या तोंडून मी जी गाणी ऐकत होतो त्यापैकी नव्वद टक्के गाणी जुन्याच काळातली असल्याचं मला आढळून येत होतं.  एका अर्थी हा नव्या काळातल्या संगिताचा आणि संगीतकारांचा पराभव नव्हता का? जुन्या काळातल्या संगितातली कलाकुसर जर या इटुकल्या पिटुकल्यांना गाण्यासाठी मोहवत असेल तर नव्या काळातली गाणी हे इटुकलेपिटुकले फक्त भेंड्या खेळण्यासाठी गातात की काय?…आणि त्यातही काळाचा महिमा म्हणा किंवा काव्यगत न्यायं कसा आहे तो पहा – ही इटुकली पिटुकली जुन्या काळातली, जुन्या संगीतकारांची, जुन्या गायक गायिकांची गाणी पेश करत असताना त्यांचे गाणं कसं वाटतंय, हे सांगायला त्यांचे परीक्षक कोण तर आजच्या काळातले तरुण संगितकार आणि तरुण गायक…ज्यांची गाणी ही चिमणीपाखरं औषधालाच गात होती! मनात एक पुसटसा विचार येऊन गेला की आपली गाणी ही चिमणी पाखरंही गात नाहीत याची थोडीशी तरी खंत, थोडीशी तरी वेदना या स्टार परीक्षकांच्या मनाला अधूनमधून होत असेल का?…की टीव्हीवर चमकून घेण्याच्या नादात आजच्या काळाप्रमाणे कुणालाच कशाची पडलेली नसेल?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -