घरफिचर्ससजीव नागरिक आणि निर्जीव विषाणू

सजीव नागरिक आणि निर्जीव विषाणू

Subscribe

वांद्रे येथे 15 एप्रिल रोजी झालेल्या गर्दीच्या कारणांचा शोध घ्यायलाच हवा. अशीच गर्दी ठाण्याच्या मुंब्रा भागातही झाली. ही गर्दी नियोजनबद्ध होती का, ही गर्दी या ठिकाणी होण्यामागे कुणाची चिथावणी होती, या प्रश्नांच्या उत्तरांचा शोध पोलीस घेत आहेतच. लॉकडाऊनमुळे घरातल्या संगणकावरून हवं ते पसरवायला आता अनेकांकडे वेळच वेळ आहे. अशा परिस्थितीत अफवा, चुकीची माहिती, अतिरंजित वृत्त टाळण्याची गरज आहेच कोणाला, आपलं वाचलं गेलं पाहिजे, मग ते कितीही धोकादायक का असेना, त्यानं सनसनाटी निर्माण झाली पाहिजे, चर्चा झाली पाहिजे, सामाजिक आरोग्य धोक्यात येतंय, कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होईल, जीव धोक्यात घालून आपलं रक्षण करणार्‍या पोलिसांचा ताण आपण आणखी वाढवत आहोत, हे समजून घ्यायची जबाबदारी आपल्यावर नाहीच मुळी, आपण नावाला नागरिक आहोत, सिनेमा थिएटरात राष्ट्रगीत सुरू झाल्यावर उभं राहून देशप्रेम दाखवण्यापुरतंच आपलं नागरिकत्व मर्यादित असतं....

सोशल मीडिया हातागणिक हाताळला जातो, त्यामुळे त्यावर नियंत्रण कठिण आहे. सूज्ञ समाजमाध्यमांवरील माहितीला प्रमाण मानत नसतात, अशा जबाबदार नागरिकांचीही संख्या मोठी आहे. समाजमाध्यमांची ही दुधारी तलवार वापरण्याची प्रगल्भता इथल्या लोकांना येण्यासाठी अवकाश आहे. अशा परिस्थितीत अधिकृत प्रसारमाध्यमांंचे काम वाढलेले असते. जबाबदारीची ही पोकळी अशा अधिकृत प्रसारमाध्यमांकडून भरून काढण्याची गरज असते.

एप्रिल महिन्याच्या 15 तारखेला मुंबईतील वांद्रे स्टेशनवर झालेल्या गर्दीच्या कारणांचा शोध घेण्याची गरज आहे. एका वृत्तवाहिनीने याविषयी बातमी दिल्याने स्टेशनवर कामगारांची गर्दी झाल्याचा आरोप झाला. या वृत्तवाहिनीच्या बातमीनुसार या तारखेपासून लांब पल्ल्याच्या काही रेल्वे गाड्या सोडण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली होती. लॉकडाऊनच्या काळात मुंबईत अडकलेल्या कामगारांनी गावाकडे जाण्यासाठी वांद्रे स्टेशनजवळ गर्दी केल्याची चर्चा आहे. केवळ एका बातमीमुळे ही गर्दी झाली असे जरी गृहीत धरले तरी स्टेशनवर गोळा झालेल्या कामगारांची संख्या ही हजारोंच्या घरात होती. एकाच वेळेस हजारो कामगार या ठिकाणी संचारबंदी आणि लॉकडाऊनच्या काळात जमलेच कसे, हा प्रश्नही महत्त्वाचा आहे. म्हणजेच झाल्या प्रकाराला केवळ एक बातमीच जबाबदार असल्याची शक्यता नाही. 15 तारखेनंतर लॉकडाऊन संपणार असल्याची अफवा जाणीवपूर्वक पसरवण्यात आली होती का, हा लॉकडाऊन संपला नाही तर, कामगारांनी काय करायला हवे, याचे धोकादायक सल्ले कुणी दिले होते, याचा शोध घ्यायलाच हवा.

- Advertisement -

या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आणि त्याची चौकशी केली. बेलगाम समाजमाध्यमांना हाताळणार्‍या काही हातांची कुठलीही नियमावली नसते, लोकशाही, कायदा अशी कुठलीही बांधिलकी त्यांना नसते. समाज, धर्म, जात, जमातवादी गाढवांच्या झुंडींना एका माऊसच्या क्लिकवर नियंत्रित करणारे जिवंत विषाणू कोविड 19 च्या संसर्गापेक्षा जास्त धोकादायक आहेत. कोविड 19 ला नियंत्रणात आणण्यासाठी ठोस उपाय आहेत. या आजाराचा विषाणू लपून राहत नाही. तो षड्यंत्रही करत नाही, तो माणसांना भावनिक करत नाही, त्याला जमातवादी अस्मितांचे काहीही पडलेले नाही. करोना विषाणूचा कुठलाही जात धर्म नाही. त्यामुळे गटवाद धोक्यात आल्याची आरोळी ठोकून तो रस्त्यावर उतरलेला नाही. या विषाणूचा कुठलाही झेंडा नाही, अजेंडा नाही, विचार किंवा अविचार नाही, तसेच हा विषाणू धर्मशाही, हुकूमशाही, लोकशाही, राजेशाही अशा कुठल्याही शाहीचा समर्थक नाही, त्यामुळे हा विषाणू उन्मादी तर नाहीच नाही तो सत्तापिपासूही नाही.

या विषाणूला जीवही नाही. त्यामुळे स्वतःची पैदास वाढवण्यासाठी किंवा स्वार्थ, भीतीतून आलेली लोकसंख्या समाजवाढीची चिंता, हक्क अधिकार, तसेच सत्तेची लालसा कोविड 19 या विषाणूला नाहीच. या विषाणूला इतर आजारांशी स्पर्धा करण्याची इर्ष्या असेल तर तसेही नाही, अब तक छप्पन सिनेमाप्रमाणे आपण घेतलेल्या बळींची संख्या वाढवण्याची इच्छा माणसांना असू शकते. हिटलरच्या गॅस चेंबरचे कौतूक वाटणारे माणसासारखे दिसू शकतात. रक्ताळलेल्या तलवारी नाचवण्याची भेसूर इच्छा माणसांना असू शकते. कोविड 19 च्या विषाणूला यापैकी कशाचीच गरज वाटत नाही. हा स्वतःच्या अन्नासाठी कुणाची शिकारही करत नाही. आपल्यापेक्षा कमकुवत प्राण्याचा बळी घेऊन आपली भूक भागवण्याची गरज या विषाणूला नाही, तरीही हा विषाणू माणसांना मारत सुटला आहे.

- Advertisement -

चीनमध्ये, जर्मनीत, अमेरिकेत, इटलीतून भारतात दाखल झालेल्या करोनाच्या तावडीत इथं जमावच्या जमाव सापडू शकतात, हे या विषाणूला माहीत असण्याची शक्यता नाही. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी कसाबची चौकशी करताना त्याने छत्रपती शिवाजी टर्मिनसवर केलेल्या गोळीबारामध्ये माणसांना मारत असताना झालेल्या विकृत आनंदाची कबुली दिल्याचे नाना पाटेकरच्या सिनेमात दाखवले होते. या विषाणूला त्याच्या कुठल्याही ध्येय्यामुळे असा विकृत आनंद होईल, त्याला काही कारण नाही. कुठल्याही सामाजिक बंधनात कोविड 19 ने स्वतःला गुंतवलेले नाही. त्याला म्हातार्‍या माणसांविषयी दया नाही, लहान मुलांवर त्याचे प्रेम नाही, लिंगभेदाबाबतही त्याला कुठलाही फरक पडत नाही. कुठल्या वर्तनाचा, परिस्थितीचा या विषाणूवर काहीही परिणाम होत नाही. त्याला पसरण्यासाठी साम्राज्याच्या सीमा वाढवण्याचे कारणही नाही; पण तो पसरत आहे. त्याला पसरवण्यामागे त्याचा स्वतःचा हात, हेतू किंवा उद्देशही नाही. मग त्याला पसरवलं कोणी, त्याचा पसरण्याला माणसंच जबाबदार आहेत.

ही इथली माणसंच करोना पसरण्यासाठी जबाबदार आहेत. कोविड 19 विषाणूने भारतात येण्यासाठी व्हिसा, पासपोर्ट अर्ज केल्याचे ऐकिवात नाही, त्याने उघड उघड विमान किंवा परदेशातून येणार्‍या जहाजांमध्ये, सीमेपलिकडून घुसखोरीही केलेली नाही. त्याला इथं आणलं माणसांनीच त्यांच्या श्वासात भरून. विमान प्रवासाआधी यातील काही माणसांनीच हा विषाणू देहावर दिसूच नये म्हणून या विषाणूला लपवणार्‍या गोळ्या खाल्ल्या होत्या, आपल्या शरीरातील भागात लपवून हिरे, सोने, अंमली पदार्थ ने-आण करणारे कॅरिअर्स त्यांना तस्कर म्हटलं जातं. कायद्यानुसार हा गुन्हा आहे. माणसांना मारणार्‍या विषाणूला जाणीवपूर्वक स्वतःमधून आणणार्‍यांच्या बेजबाबदारीचं काय…, दिल्लीच्या एका इलाख्यात धार्मिक कार्यक्रम घेण्यात आला. त्यातून करोनाचा विषाणू देशभर फैलावण्याचा धोका खरा ठरला. मात्र, याहीवेळेस कोविड 19 सोबत लढण्यापेक्षा या आजारांनी घर केलेल्या माणसांच्या देहांनाच लक्ष्य केलं गेलं. या देहांनीही आपल्या मूर्खपणाने ही भीती खरी असल्याचे सिद्ध केलं होतंच. त्यामुळेच तर धर्मस्थानात लपून राहणे, क्वारंटाईन केल्यावर पळून जाणे, सरकारी आणि पोलिसांच्या सूचनांचे पालन न करणे, करोनाच्या आडून आपल्या जमातवादाची भीती दाखवणे, पोलीस, डॉक्टरांवर हल्ले करणे, असले हिडीस प्रकार अशा काही देहांनी केले.

हे असं सुरू असताना सरकारी यंत्रणांनी आणि सुरक्षा, पोलीस, डॉक्टर्सनी दाखवलेला संयम आणि अशा तणावातही केलेले काम सोन्यासारखे उजळून निघाले. त्यामुळेच महाराष्ट्र अद्याप कोरोनाच्या तिसर्‍या अशा धोकादायक टप्प्यापासून दूर राहिलेला आहे. अशा परिस्थितीत या यंत्रणांचे कौतूक करून त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे काम अधिकृत प्रसार माध्यमांचे होते. प्रिंट माध्यमे काही काळाकारता बंद झाली असताना न्यूज चॅनेल्सची जबाबदारी वाढलेली होती. समाजमाध्यमांवरील अफवांच्या गर्दीत दिलासा देणार्‍या अधिकृत बातम्या देतानाच, सरकार, पोलीस, डॉक्टर्स आणि आपत्कालीन यंत्रणांचे मनोधैर्य वाढवण्याची गरज होती. अशा नाजूक स्थितीत एखादे बेजबाबदार वृत्त धोकादायक ठरू शकते. 15 एप्रिल रोजी वांद्रे आणि मुंब्रा येथे झालेल्या गर्दीच्या कारणांचा तपास लागेलच. माझ्यामुळे माणसं मरत आहेत, हे त्या निर्जीव कोविड 19 ला माहितच नाही. त्यामुळे त्या निर्जिव विषाणूपेक्षा बेजबाबदार जिवंत माणसं जास्त धोकादायक आहेत. ही माणसं कोण आहेत, याचा शोध घ्यायला हवा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -