घरफिचर्सगावागावांतल्या मुलींचे लॉकडाऊन!

गावागावांतल्या मुलींचे लॉकडाऊन!

Subscribe

कोरोना महामारीविषयी आता आपल्याला काही वेगळी प्रस्तावना देण्याची गरज नाही. जगभरात त्या महामारीने घातलेल्या थैमानामुळे सध्या जळी-स्थळी-काष्टी-पाषाणी हा एकच विषय व्यापून उरलाय. या महामारीत माणसांचे जीव जातायत, त्यावर उपाय करण्यासाठी आरोग्य यंत्रणेची ओढाताण होतेय. ह्याचे माणसांच्या आरोग्यावर होणारे परिणाम आता आपल्यासाठी प्राधान्याचे असले तरी ह्याचे होणारे सामाजिक परिणाम हे दूरगामी असणार आहेत. आतापर्यंत या सामाजिक परिणामांचीसुद्धा अनेक माध्यमांत अंगांनी चर्चा सुरू झालीय. मी ग्रामीण भागातील तरुण आणि किशोरवयीन मुलींसोबत काम करते. या मुलींच्या आयुष्यावर या सगळ्या महामारी आणि त्यामुळे झालेल्या टाळेबंदीचा मोठा परिणाम झाला आहे. आणि येत्या काळात तो आणखी नवे प्रश्न उभे करणारा आहे. त्यांच्या आयुष्यात आता घडणार्‍या घडामोडी पाहता येऊ घातलेल्या प्रश्नांची समज त्याआधारे तयार होतेय. तीच समज आणि या मुलींच्या आयुष्यात काय चाललंय हे मांडण्याचा प्रयत्न म्हणून हा लेख.

मला खूप शिकायचंय, स्वतःच्या पायावर उभं राहून आईवडिलांचा सांभाळ करायचाय आणि माझी सगळी स्वप्नंसुद्धा पूर्ण करायचीयेत, असं म्हणणार्‍या नाशिक जिल्ह्यातल्या गावातल्या एका चंचल मुलीने काही दिवसांपूर्वी अचानक व्हॉट्सअ‍ॅपवर लग्नाची पत्रिकाच पाठवली. मला धक्का बसला. मी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरादाखल समाधानकारक कारणंसुद्धा तिच्याकडून मिळाली नाहीत. किंवा तिला ती उत्तरंच देता आली नाही. हे लग्न तुझ्या संमतीने होतंय का? कुणाचा कसला दबाव तर नाही ना? या सगळ्या प्रश्नांवर तिने वरवर पाहता सगळं ‘नॉर्मल’ वाटावं अशी उत्तरं दिली. माझी संमती आहे आणि मला आता हे लग्न करायचंय ऐकून मला आणखी जास्त प्रश्न पडले. वरवर पाहता हे सगळं तिच्या संमतीने होतंय असं ती म्हणतेय आणि आपल्याला सगळ्यांना तसं दिसतंयसुद्धा. पण संमती हा विषयच इतका निसरडा आहे आणि मुलींच्या बाबतीत ती कशी मिळवली जाते ह्याचे काही अनुभव असल्यामुळे या विषयावर जेव्हा गावातल्या इतर अनेक मुलींशी बोलणं झालं तेव्हा कळलं की, आता लॉकडाऊनमध्ये मुलींच्या लग्नाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. मुलगी लहान असल्यापासून आईवडिलांवर तिच्या लग्नाचे आणि लग्नासाठीच्या आर्थिक खर्चाचे दडपण असते. पै पै करून असे पैसे जमवणारे पालक आम्ही गावात बघतो. मुलींच्या शिक्षणावर पैसे खर्च करण्यापपेक्षा लग्नावर करणं त्यांना जास्त महत्वाचं वाटतं. पण आता तर कमी माणसं बोलावून लग्न करण्याची परवानगी लॉकडाऊनमध्ये मिळालीय. त्यामुळे अतिशय कमी खर्चात ही लग्न होतात.

ही लॉकडाऊनमध्ये लग्नांची सोय तर पालकांसाठी संधीच आहे. कमी पैशात, कमी माणसांना बोलावून डोक्यावरचा हा भार उतरवण्यासाठी सार्‍यांची घाई सुरु आहे. आपल्या आईवडिलांना आपल्या लग्नासाठी कर्ज काढावे लागू नये आणि त्यांचा भार वाढू नये म्हणून स्वतःच्या स्वतंत्र आयुष्यासाठी आतापर्यंत जिद्दीने लढणार्‍या या मुली सरळ सरळ एका आठवड्याच्या आत लग्नाला तयार होतायत. फक्त 50 लोकांना आमंत्रण देण्याची मर्यादा सोडली तर इतर कुठलीच मर्यादा इथे पाळली जात नाही. लग्नाचं वय पूर्ण झालेलं असलं-नसलं तरीही अशी लग्नं आता सर्रास होतायत. आणि मुली आपल्या पालकांवरचा भार उतरवण्यासाठी अशा लग्नांना सहज तयार होताय. हे सगळं ऐकल्यानंतर माझी संमती आहे आणि मला आता हे लग्न करायचंय असं म्हणणार्‍या तिच्या या शब्दांचा अर्थ मला उमगला. मुलींच्या शिक्षणासाठी, त्यांच्या स्वप्नांसाठी, त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्याच्या प्रयत्नांसाठी हा साथीचा काळ किती मोठा अडथळा आहे हे कळलं. मी अभिव्यक्ति मिडिया फॉर डेव्हलपमेंट या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील तरुण मुलींसोबत संशोधनाचे काम करते. मुलींचे शिक्षण, रोजगाराच्या संधी, त्यांचे हक्क आणि अधिकार अशा विषयांवर कोरोनापूर्व काळात आम्ही करत असलेले काम आणि आता त्या सगळ्या विषयांना कोरोना काळात आलेले आणि कोरोनोत्तर काळात येऊ घातलेले अनेक पैलू पाहता या साथीचा मुलींच्या आयुष्यावर किती दूरगामी परिणाम होणार आहे, किंबहुना तो परिणाम व्हायला सुरुवात झालीय हे लक्षात येतं. कोरोनामुळे सगळ्यांचे आरोग्य धोक्यात आले असले तरी हा विषाणू या ग्रामीण भागातील मुलींच्या आयुष्यावर एक कायमचा व्रण ठेऊन जाणार आहे हे नक्की!

- Advertisement -

लॉकडाऊनची सुरुवातच शाळा आणि महाविद्यालयं बंद होण्यापासून झाली. ग्रामीण भागातल्या या मुलींसाठी शाळेत किंवा कॉलेजात जाणं किंवा ते टिकवून ठेवणं अजिबात सोपं नसतं. आधीच त्यांच्या शिक्षणासाठी गावात, घरात असलेल्या प्रतिकूल वातावरणाशी झगडून शाळेत जाण्यासाठी त्यांना किती ऊर्जा खर्च करावी लागते! किती हिंमत दाखवावी लागते! आजारपणाचे चार दिवस किंवा मासिक पाळीचे चार दिवस शाळेत गेलं नाही तर नाही गेलं शाळेत तर काय बिघडतं? अशा आशयाच्या चर्चांचे परिणाम म्हणून त्यांची शाळा कायमचीच सुटते. अशा या वातावरणात कोरोनामुळे अनियमित कालावधीसाठी बंद झालेल्या शाळा म्हणजे मुलींच्या शिक्षणाची मृत्यूघंटाच! आता पुन्हा शाळा, कॉलेजेस सुरु झाल्यानंतर आपलं शिक्षण सुरळीत सुरु करणं आणखी जास्त अवघड असणार आहे. या मधल्या काळात मुलींच्या आयुष्यातल्या इतक्या गोष्टी बदलल्या किंवा बदलत आहेत की, या सगळ्या नव्या प्राधान्यक्रमात त्यांच्या शिक्षणाचा क्रमांक हा खूप खाली गेलाय.

यावर सहज हा प्रतिवाद होऊ शकतो की, ऑनलाईन शिक्षणाची सोय आता सरकार आणि शाळा, कॉलेजेस करतायत. म्हणून कसं लॉकडाऊन काळातही शिक्षण सुरु आहे अशा चर्चा खर्‍या असल्या तरी त्या सगळ्यांसाठी खर्‍या नाहीत. ग्रामीण भागातल्या या मुलींकडे स्मार्टफोन नसतो, स्मार्ट फोन काय साधा फोनही नसतो. वडिलांकडे किंवा भावाकडे घरात असलेला एखादा फोनसुद्धा मुलींनी वापरायचा नसतो. कारण मुलींचा फोनचा वापर आणि घराण्याची इज्जत ह्याचे खूप थेट संबंध तिथे असतात. मोबाईल फोन वापरून मुली कुणाशीतरी बोलतील, त्यांची मैत्री होईल, प्रेम होईल या सगळ्यातून वडिलांच्या इज्जतीतर प्रश्नचिन्ह उभं राहील अशा या गणिताचा मुख्य उद्देश तर मुलींच्या लैंगिक स्वातंत्र्यावर स्वतःचा अंकुश ठेवणं हाच असतो. आपण तंत्रज्ञानाच्या काही कक्षा ओलांडल्या असल्या तरी या सामाजिक भीती आणि गैरसमाजांच्या चौकटी त्यालाही काळी किनार म्हणून चिकटलेल्या आहेतच.

- Advertisement -

मग मुलींना फोनचा किंवा संगणकाचा गंध नसल्याने ऑनलाईन जगाशी त्यांचा संपर्कच उरत नाही. म्हणून ऑनलाईन शिक्षण ही संकल्पना त्यांच्यासाठी कुचकामीच ठरते. होमस्कूलिंग, अनस्कूलिंग, डीस्कूलिंगच्या चर्चांचे वारे असताना मी पुन्हा पुन्हा शाळा आणि शिक्षण याभोवती रेंगाळतेय ते अनावधानाने नाही. शिक्षण फक्त शाळेपुरतं मर्यादित नाही, शिक्षणाच्या कक्षा व्यापक करण्यासाठी हे सगळे प्रयोग कौतुकास्पद आणि स्वीकारार्ह असले तरी ते आताच्या परिस्थितीचा विचार करता सर्वसमावेशक नाही. या गावातल्या, पाड्यावरच्या पोरींच्या आजूबाजूला त्यांच्या औपचारिक शिक्षणाबद्दलच कमालीचे प्रतिकूल वातावरण असताना त्यांच्यासाठी शाळेत टिकून राहणं म्हणजेच शिक्षणाच्या प्रवाहात राहणं असं समीकरण असतं. जर या मुली शाळेपासून दुरावल्या तर त्यांचे आयुष्य पुन्हा चूल-मुल-शेत-विहीर-नदी याभोवतीच फिरते. म्हणून या सगळ्या संदर्भात शाळा बंद होणं म्हणजे या सगळ्या पोरींच्या औपचारिक शिक्षणाला घरघर लागणं!

जशा मुलींच्या शाळा बंद आहेत तशीच घरातील इतरांची कामंसुद्धा बंद आहेत. स्वयंपाक-स्वच्छता-लहान मुलांचा, वृद्धांचा सांभाळ करणं, त्याची काळजी घेणं अशा जबाबदार्‍या वाढल्याने मुलींवरच्या कामाचे ओझे वाढले आहे. ऑनलाईन शिक्षणासाठी त्या साधनांची उपलब्धता नसणं हे एक कारण असलं तरी दुसरं कारण घरातील कामाच्या वाढलेल्या जबाबदार्‍या हे सुद्धा आहे.

आता पावसाळा सुरु झालाय पण लॉकडाऊनचा बराचसा काळ उन्हाळ्याचा होता. या काळात गावात पाण्याची प्रचंड टंचाई असते. पाण्यासाठी घराघरातल्या बायका-पोरींना साधारण 3-4 किमी पायी हुडकत जावं लागतं. या लॉकडाऊनमध्ये शाळा बंद असल्याने आणि मजुरीची कामंसुद्धा बंद असल्याने कामाजोग्या झालेल्या किंवा न झालेल्या मुलीसुद्धा दोन हंडे आणि हातात कळशीचं ओझं घेऊन लांबून पाणी आणताना दिसत होत्या. त्यात कोरोनापासून वाचण्यासाठी सतत हात धुण्याची सूचना म्हणजे या पोरींसाठी पाण्याच्या 2 जास्तीच्या खेपा!

संकटकाळात, आपत्तीकाळात होणारा सामाजिक परिणाम हा समाजातील दुर्बलांवर जास्त तीव्रतेने होतो हे आपल्याला आतापर्यंतच्या घटनांनी दाखवून दिलंय. 2014 मध्ये तीन आफ्रिकी देशात आलेली इबोलाची महासाथ, 2015-16 मध्ये आढळून आलेला झिका व्हायरस व त्यानंतरची सार्स, स्वाइन फ्लू, बर्ड फ्लू साथ संपल्यानंतर त्याच्या सामाजिक परिणामांची तीव्रता बायका आणि मुलींवर जास्त होती. या कोरोना विषाणूच्या साथीमध्ये आणि नंतरही आपल्याला हेच होताना दिसतंय.

सगळं सुरळीत सुरू असतानादेखील आपल्याकडे मुली आणि बायकांची जेवणाची पंगत सगळ्यात शेवटी बसते. सगळ्यांची जेवणं झाल्यानंतर उरलेलं अन्न त्यांना आवश्यक ते पोषण देऊ शकत नाही. मग अशा संकटकाळात जिथे लोकांचे रोजगार गेल्याने सगळ्यांच्याच भुकेचा मोठा प्रश्न तयार झाला आहे, सरकारकडून काही प्रमाणात धान्य तात्पुरती भूक भागवण्यासाठी मिळत आहे. अशा काळात उपलब्ध असलेल्या अन्नावर मुलींचा अधिकार सर्वात शेवट असणार हे नक्की. म्हणून भुकेचे संकट जरी आपल्याला सगळ्यांसाठी महत्वाचे दिसत असले तरी महिलांसाठी आणि तरुण वयातल्या मुलींसाठी ते आणखी काटेरी आहे.

आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याकडे आधीच मुलींसाठी रोजगाराच्या संधींची वानवा आहे. ज्या संधी उपलब्ध आहेत त्या मिळवणं सुद्धा त्यांच्यासाठी तितकं सोपं नाही. फक्त शिक्षण घेऊन त्या रोजगारासाठी पात्र ठरणं भारतात पुरेसं ठरत नाही. तुम्ही मुलगी असाल आणि त्यातही अनेक अर्थांनी वंचित राहण्याचे निकष तूम्हाला लागू असतील तर त्या संधीपर्यंत पोहचायला अनेक सामाजिक आणि ‘परंपरा’ या सुरक्षित नावाखाली स्वीकारलेल्या पूर्वग्रहांचे दगड ओलांडून पुढे जावे लागते. आणि अर्थातच या प्रवासात त्या रोजगाराच्या संधीपर्यंत पोहचणार्‍या मुलींची संख्या गळती होत होत खूपच कमी असते. मग अशाच मुलींच्या गोष्टी आपण यशोगाथा म्हणून पुढे आणतो, पण असे असले तरी अशा गोष्टी ‘सामान्य’ होण्याकडे समाज म्हणून आपला कल अजूनही दिसून देत नाही. या कोरोनाने आता सगळ्यांसाठीच रोजगाराच्या संधींचा तुटवडा तयार केला आहे. या काळात आधीच कमी संधी असलेल्या मुली तिथपर्यंत तरी पोहचू शकतील का हा मोठा प्रश्नच आहे. आता कोरोनानंतरच्या काळात उपलब्ध असलेल्या रोजगारांच्या गरजा आणि अपेक्षासुद्धा बदलणार आहेत.

बर्‍याचशा गोष्टी ऑनलाईन होतील. हे ऑनलाईन प्रकरण किंवा नव्या रोजगारासाठी हवी असलेली नवी कौशल्य, नवं तंत्रज्ञान या गावातल्या- आदिवासी पाड्यातल्या मुलींकडे नाही. ते शिकणं आणि त्यासाठी पात्र होणं जरी गरजेचं असलं तरी तसं वातावरण आता त्यांच्याभोवती नाही. त्यामुळे रोजगाराच्या या नव्या प्रवाहातून मुली आणि विशेषत: ग्रामीण भागातील मुली बाहेर फेकल्या जातील ही मोठी भीती आहे. अतिशय नगण्य प्रमाणात वर्कफोर्समध्ये असणार्‍या मुलींमुळे कदाचित देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात फारसा फरक पडत नसेल, पण मुलींच्या आयुष्यात एक रोजगाराची संधी खूप गोष्टी बदलते आणि बदलू शकते. मुलगी चार पैसे कमावत असेल तर तिची घरातली पत वाढते, निर्णयप्रक्रियेत तिचा सहभाग वाढतो, तिला तिच्या अधिकारांविषयी जाण तर येतेच पण त्यासाठी लढण्याची हिंमतसुद्धा मिळते. कुटुंबात-गावात-वस्तीत तिची वेगळी ओळख तयार होते, किंवा सोप्या शब्दात तिचं एक स्वतंत्र माणूस म्हणून अस्तित्व मान्य करण्यासाठीची प्रक्रिया निदान सुरु तरी होते. म्हणून एक रोजगाराची संधी मुलींच्या सक्षमीकरणात मोठी भूमिका बजावते. पण येत्या काळात कदाचित हे चित्र असं असणार नाही.

आपल्या आई-वडिलांशी भांडून जिद्दीने ज्या गावांतल्या मुली नाशिक शहरात किंवा आजूबाजूच्या जवळच्या शहरात नोकरी आणि काम करत होत्या त्या सगळ्या आता या लॉकडाऊनमध्ये परत आपल्या गावी आल्या आहेत. मुलगी काहीच करत नाही, घरात आहे म्हटलं की, पहिला विषय निघतो तो लग्नाचा. आणि अशा टाळेबंदीच्या काळात घरी आलेल्या कितीतरी मुलींची एका आठवड्यात लग्न झाली, कितीतरी मुली आता जवळच्या शेतात-कंपनीत मिळेल ते मजुरीचे काम करत आहेत. आताची वेळ निभावण्यासाठी त्या जरी ते काम करत असल्या तरी हा साथीचा काळ संपल्यानंतर त्यांना पुन्हा त्यांच्या जुन्या कामावर रुजू होता येणार नाही, असा एक नकारात्मक विश्वास या मुलींना आहे. दिंडोरी तालुक्यातील कोचरगावातली ताई नावाची मुलगी. हॉटेल मॅनेजमेंटचा छोटासा कोर्स करून आता लातूरमध्ये एका हॉटेलात काम करते. स्वतःच्या आयुष्याचं नियंत्रण स्वतःकडे घेण्याची संधी तिला या नोकरीने दिली. ताई म्हणते लॉकडाऊनमध्ये घरी आल्यापासून आईवडील लग्नासाठी मागे लागले आहेत. मी ही नोकरी करण्यासाठी त्यांची परवानगी नसतानासुद्धा हट्टाने गेले होते, मोठ्या शहरात राहणं अवघड होतं. जिद्दीने ते सगळं केलं. पण आता त्या सगळ्यावर पाणी फिरेल की, काय अशी भीती मला वाटतेय. लॉकडाऊन कधी एकदा संपेल आणि मी माझ्या नोकरीच्या ठिकाणी परत जाईन असं होतंय.

या लॉकडाऊनमुळे घराबाहेर पडायचं नाही असे दंडक सगळ्यांनाच होते/आहेत. पण इतर सगळ्यांचं काहीकाळ घरात थांबणं आणि या तरुण मुलींचं घरात थांबणं यात मोठा फरक आहे. टाळेबंदीचे नियम संपताच इतर सारे घराबाहेर पडून आपापल्या कामांमध्ये रमतील पण मुलींनी काही काळापासून घराबाहेर पडण्यासाठी केलेला संघर्षसुद्धा आता पुन्हा शून्यावर आलाय. मागे एका लेखात मी शोधिनी प्रकल्पातून सुरु केलेल्या वाचनालयांविषयी लिहिलं होतं. त्या वाचनालयांमध्ये मुलींना आणणं सोपं नव्हतं. त्यांच्यावर असलेली बंधनं आणि त्यामुळेच घरात राहण्याची लागलेली सवय तोडून त्यांना सार्वजनिक वर्तुळात पुन्हा आणण्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागले होते. अजूनही ते पूर्णपणे शक्य झालं नसलं तरी काही प्रमाणात त्यात यश आलं होतं. आता पुन्हा कोषात गेलेल्या या मुलींना सार्वजनिक वर्तुळात आणणं अवघड असणार आहे. सार्वजनिक जीवनात मुलींना मिळालेली व्हिजीबीलीटी याने कमी होणार हे नक्की!

टाळेबंदीच्या काळात सगळे घरात असल्यामुळे वाढलेल्या कौटुंबिक हिंसाचाराविषयी आपण ऐकतोय. अशा हिंसाचाराच्या घटना मुलींबाबतही घडत आहेत. हिरडी गावातल्या ललिता ताई म्हणतात की, लॉकडाऊनमध्ये दारूची दुकानं बंद होती तेव्हा गावात आणि घरात भांडणाचं प्रमाण कमी झालं होतं. पण आता दारूची दुकानं उघडली आणि दारू पिऊन बायकांना-मुलींना मारण्याचं प्रमाण वाढलं आहे. आता गावात रोज भांडणं होतात.

हे सगळं सांगण्याचा उद्देश फक्त मुलींसोबतच कसं वाईट घडतंय आणि परिस्थिती किती वाईट आहे हे दाखवून देणं नाही तर ग्रामीण भागातील, गरीब, किशोरवयीन-तरुण मुलींचं भविष्य आधीच खूप असुरक्षित असताना या महामारीच्या काळात ती असुरक्षितता आणखी वाढली आहे हे सांगणं होता. लॉकडाऊननंतर या मुली पुढच्या काळासाठी आणखी बंदिस्त होण्याची कशी शक्यता आहे हे दाखवून देणं होता. या तरुण, किशोरवयीन मुलींची गणती महिलांच्या गटातही होत नाही आणि लहान बालकांच्यासुद्धा नाही. त्यामुळे त्यांचे विषय वेगळे मांडण्याची आणि समजून घेण्याची गरज असते. या महामारीत सगळ्यांचाच संघर्ष तगून राहण्यासाठीचा आहे. या मुलींसाठीही तो असला तरी त्याला पितृसत्तेची गडद किनार आहे. आपल्याला या मुलींच्या आयुष्याचा दर्जा वाढवण्यासाठी पुढच्या काळात करावे लागणारे प्रयत्न मोठे आहेत, त्यासाठी दिशा हवी, ऊर्जा हवी आणि इच्छाशक्तीही!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -