Wednesday, August 4, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर फिचर्स लोकमान्य बाळ गंगाधर टिळक

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक

Related Story

- Advertisement -

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक भारतीय स्वांतत्र्य चळवळीतील आघाडीचे नेते, भगवद्गीतेचे आधुनिक भाष्यकार व प्राच्यविद्या पंडित. त्यांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरीला झाला. त्यांचे जन्मनाव केशव, परंतु बाळ हेच नाव पुढे रूढ झाले. टिळक कुटुंबाचे मूळ गाव चिखलगाव (ता. दापोली, जि. रत्नागिरी). चिखलगावची खोतीदारी त्यांच्याकडे होती. पणजोबा केशवराव यांनी पेशव्यांच्या काळात मानाची जागा मिळवली होती. आजोबा रामचंद्रपंत यांनी उत्तर आयुष्यात संन्यास घेतला. टिळकांचे वडील गंगाधरपंत व आई पार्वतीबाई. गंगाधरपंतांना कौटुंबिक अडचणीमुळे इंग्रजी शिक्षण सोडून पुण्याहून गावी जावे लागले. पुढे त्यांनी मराठी शाळेत शिक्षकाची नोकरी केली. बाळ गंगाधर टिळकांचे पारंपरिक संस्कृत अध्ययन घरातच झाले. १८६६ मध्ये गंगाधरपंतांची बदली पुण्याला झाल्यामुळे टिळक आपल्या मातापित्यांबरोबर पुण्याला आले. टिळक १८७६ मध्ये बी.ए. पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले. एम.ए. मात्र होऊ शकले नाहीत. अखेर त्यांनी एल. एल.बी. ही पदवी घेतली.

डेक्कन कॉलेजमध्येच टिळक आणि आगरकर यांचा स्नेह जमला. दोघांनी देशकार्याला वाहून घेण्याचा संकल्प केला. याच सुमारास निबंधमालाकार विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी सरकारी नोकरी सोडून शाळा काढण्याचे ठरविले होते, तेव्हा टिळक व आगरकर दोघेही त्यांना मिळाले. १ जानेवारी १८८० रोजी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना झाली. टिळकांनी विनावेतन शिक्षकी पेशा पत्करला. चिपळूणकर, टिळक व आगरकर यांनी १८८१ मध्ये आर्यभूषण छापखाना काढला आणि ‘केसरी’ (मराठी) व ‘मराठा’ (इंग्रजी) ही दोन वृत्तपत्रे सुरू केली. प्रारंभी आगरकर केसरीचे व टिळक मराठाचे संपादक होते.

- Advertisement -

वृत्तपत्रीय जीवनाच्या प्रारंभीच कोल्हापूर संस्थानचे दिवाण माधवराव बर्वे यांच्यावर केसरी व मराठातून अनेक लेख प्रसिद्ध झाले. त्यांच्या गैरकारभारावर तसेच इंग्रज सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराजांसंबंधीच्या वर्तणुकीवर त्यांनी कडाडून टीका केली. स्वतंत्रतेचा किंवा राष्ट्रीयत्वाचा अभिमान म्हणून जो काही जोम आहे, तो जोपर्यंत जाज्वल्य व जागृत आहे तोपर्यंत समाजरचना कशीही असली, तरी त्यातील दोष राष्ट्राच्या उन्नतीस अथवा भरभराटीस आड येत नाहीत, अशी टिळकांची भूमिका होती. स्वाभिमान, उत्साह, स्वराज्यनिष्ठा हाच राष्ट्राचा खरा आत्मा किंवा जीव आहे आणि हा जिवंतपणा जेथे वसत आहे, त्या ठिकाणी सुईच्या मागोमाग जसा दोरा तद्वतच सामाजिक सुधारणाही मागोमाग येत असतात, अशी इतिहासाची साक्ष आहे असे ते आग्रहपूर्वक प्रतिपादीत.

टिळकांच्या खर्‍या कारकीर्दीला आणि अखेरपर्यंत चालविलेल्या त्यांच्या स्वातंत्र्य संग्रामाला १८९९ नंतरच अधिक तेज चढले. त्यांनी लॉर्ड कर्झन याच्या कारकीर्दीवर, विशेषतः त्याने लादलेल्या शिक्षणसंस्थांवरील बंधनांवर टीका केली. शिवाय वसाहतवादाच्या धोरणावर कडाडून हल्ला केला. केसरीच्या अग्रलेखात इंग्लंडचा नैतिक व बौद्धिक अधःपात होत आहे, असे निक्षून सांगितले. याच वेळी त्यांनी राष्ट्रसभेच्या कार्याविषयी नवीन विचार मांडले. जनतेत प्रचंड चळवळ उभारून सर्व राष्ट्राची शक्ती राष्ट्रसभेच्या मागण्यांच्या मागे उभी केली पाहिजे, असे त्यांचे मत होते. अशा या महान नेत्याचे १ ऑगस्ट १९२० रोजी निधन झाले.

- Advertisement -