घरक्रीडामॅग्नफिसेन्ट मेरी!

मॅग्नफिसेन्ट मेरी!

Subscribe

‘दिल ये जिद्दी है-जिद्दी है, दिल ये जिद्दी है’, हे मेरी कोम या चित्रपटातील लोकप्रिय गाणं. मात्र, हे फक्त गाणं नसून ही मेरीच्या आयुष्याची कहाणी आहे. मेरीने अगदी आयुष्याच्या सुरुवातीपासूनच सर्व आव्हानांना ‘फाईट’ देत आपल्यातील प्रतिभा जगाला दाखवून दिली.

‘दिल ये जिद्दी है-जिद्दी है, दिल ये जिद्दी है’, हे मेरी कोम या चित्रपटातील लोकप्रिय गाणं. मात्र, हे फक्त गाणं नसून ही मेरीच्या आयुष्याची कहाणी आहे. ईशान्य भारतातील मणिपूर येथील एका छोट्याशा गावात जन्मलेल्या मेरीने अगदी आयुष्याच्या सुरुवातीपासूनच सर्व आव्हानांना ‘फाईट’ देत आपल्यातील प्रतिभा जगाला दाखवून दिली. आव्हानात्मक परिस्थितीवर वारंवार मात करणार्‍या मेरीसमोर प्रतिस्पर्ध्यांचा बॉक्सिंग रिंगमध्ये निभाव लागणे जरा अवघडच होते. मात्र, अजूनही जागतिक स्पर्धेत विक्रमी पदकांची कमाई करणार्‍या मेरीने हे यश मिळवण्यासाठी किती मेहनत घेतली आणि किती त्याग केले, याची बर्‍याच लोकांना माहिती नाही.

आपल्या उदरनिर्वाहासाठी शेतीवर अवलंबून असणार्‍या गरीब घरात मेरीचा जन्म झाला. त्यामुळे लहान वयातच मेरीला आपल्या आई-वडिलांना मदत करणे भाग होते. मेरीला सुरुवातीपासूनच अभ्यासापेक्षा खेळांमध्ये जास्त रुची! त्यामुळे ती शाळेत आपोआपच अ‍ॅथलेटिक्स, धावणे, भालाफेक यांसारख्या खेळांकडे वळली. मात्र, १९९८ साली एशियाड स्पर्धेत मणिपूरच्याच डिंको सिंग यांनी बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक पटकावल्यामुळे मणिपूरमधील बर्‍याच युवकांप्रमाणे १५ वर्षीय मेरीला बॉक्सिंगकडे वळावेसे वाटले. खेळांची आवड, त्यातच मेहनत करण्याची तयारी यामुळे मेरीला बॉक्सिंगचे बारकावे शिकण्यासाठी वेळ लागला नाही. बॉक्सिंगवर थोडी पकड आल्यानंतर तिने इंफाल येथे प्रशिक्षक नरजीत सिंह यांच्या मार्गदर्शनात सराव करण्यास सुरुवात केली.

- Advertisement -

हळूहळू तिच्या बॉक्सिंगमध्ये सुधारणा होत होती, पण आपण बॉक्सिंग करत आहोत ही गोष्ट ती वडिलांना सांगू शकली नाही. बॉक्सिंगमुळे चेहरा विद्रुप होईल आणि तिचे लग्न होणार नाही, अशी चिंता तिच्या वडिलांना होती. मात्र, २००० साली तिने राज्य अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धा जिंकल्यामुळे तिचा फोटो वर्तमानपत्रात आला आणि मेरीच्या वडिलांना मुलगी बॉक्सिंग करत असल्याचे कळलेच. ही गोष्ट त्यांना फारशी आवडली नाही. मात्र, मेरीने हार न मानता बॉक्सिंग करत राहण्याचा निर्णय घेतला.

राज्यस्तरीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय अशा विविध स्तरांवरील स्पर्धांमध्ये तिने पदकांचा सपाटा लावला. तिने २००१ साली जागतिक स्पर्धेतील आपले पहिले पदक (रौप्य) मिळवले, तर २००२ साली तिने पदकाच्या रंगात बदल करत सुवर्णपदकाची कमाई केली. या उल्लेखनीय कामगिरीमुळे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत होता. मुलीला संपूर्ण देशाचे प्रेम मिळत असताना वडिलांचा राग तरी फार काळ कसा टिकला असता! त्यांनी मेरीची माफी मागत तिला बॉक्सिंग करण्यासाठी पाठिंबा दिला. कुटुंबाचे आणि देशवासीयांचे पाठबळ मिळाल्याने मेरीची कामगिरी आणखीच उंचावली. याचदरम्यान करुंग ओनखोलर (ओनलर) या मूळच्या ईशान्य भारतातील, पण दिल्ली युनिव्हर्सिटीत शिकणार्‍या मुलाशी तिची मैत्री झाली आणि हळूहळू या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. २००५ साली त्यांनी विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला.

- Advertisement -

मेरीचा हा निर्णय तिच्या प्रशिक्षकांना आवडला नाही. लग्न झाल्यामुळे मुलं होणार आणि त्यामुळे मेरीच्या बॉक्सिंग कारकिर्दीला पूर्णविराम मिळेल अशी त्यांना भीती होती. मेरीने मात्र २००५ आणि २००६ साली जागतिक स्पर्धेत आणखी दोन सुवर्णपदके पटकावत आपली विजयी घोडदौड सुरूच ठेवली. २००७ साली तिने जुळ्या मुलांना जन्म दिला, ज्यामुळे तिच्या कारकिर्दीला ब्रेक लागला. अनेकांना वाटले, मेरी संपली. मात्र, थांबेल ती मेरी कसली. एकीकडे मुले आणि कुटुंब, तर दुसरीकडे बॉक्सिंग अशी तारेवरची कसरत ती करत होती. तिला ओनलरची खूप साथ लाभली. तिने जिद्दीने, मेहनतीने रिंगमध्ये पुनरागमन केले. मुलांमुळे माझ्यातील ताकद कमी झाली नाही, तर दुप्पट झाली आहे, हे मेरीला जणू जगाला दाखवून द्यायचे होते.

२००८ साली तिने आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत रौप्यपदक मिळवले. २००८ आणि २०१० साली तिने दोन सुवर्णपदके पटकावत जागतिक स्पर्धेतील सुवर्णपदकांची संख्या ५ वर नेली. २०१२ साली ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदा महिलांच्या बॉक्सिंगचा समावेश करण्यात आला. मात्र, ऑलिम्पिकमध्ये ४८ किलो वजनी गट नसल्याने मेरीला ५१ किलो वजनी गटात खेळावे लागले. परंतु, याचा तिच्या खेळावर फारसा परिणाम झाला नाही. तिला लंडन येथे झालेल्या या स्पर्धेत कांस्यपदक मिळवण्यात यश आले. ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी ती पहिली महिला बॉक्सर ठरली. या कामगिरीमुळे तिला पद्मभूषण हा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान मिळाला. तसेच तिला विविध राज्यांनी रोख पारितोषिकेही प्रदान केली.

२०१३ मध्ये तिने तिसर्‍या मुलाला जन्म दिला. आता तीन मुलांची आई झाल्यानंतर आणि तिशीत असणारी मेरी पुनरागमन करू शकेल का, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र, तिने राष्ट्रकुल, एशियाड आणि जागतिक स्पर्धा यांमध्ये सुवर्ण कामगिरी करत पुन्हा सर्वांची तोंडं बंद केली. नुकतेच तिने रशिया येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत विक्रमी आठवे पदक पटकावले. ही कामगिरी ना आधी कोणाला जमली होती आणि भविष्यातही अशी कामगिरी कोणी करेल याची शक्यता कमीच आहे. बॉक्सिंग हा खेळ खेळण्यासाठी लागणारी मेहनत, शारीरिक आणि मानसिक फिटनेस, प्रतिस्पर्ध्याने केलेला हल्ला पचवत आपला खेळ करत राहणे या गोष्टी १७-१८ वर्षे करत राहणे, या गोष्टीचे कौतुक करावे तितके कमी आहे. मणिपूरच्या एका छोट्याशा गावातील मुलगी ते सहा वेळची विश्वविजेती, हा मेरीचा प्रवास फारच प्रेरणादायी आहे. तिच्यासारखी खेळाडू पुन्हा होणे नाही, असे म्हणणे वावगे ठरू नये.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -