घरफिचर्समहाडची भयानता संपता संपेना...

महाडची भयानता संपता संपेना…

Subscribe

ज्या भागांतून पाण्याचा नैसर्गिक प्रवाह वाहतो अशा भागांमध्येच बेकायदेशीर प्रचंड मातीचे भराव करण्यात आले आहेत. शहराला दिवसेंदिवस पुराचा धोका वाढत असण्यामागचं हे एक कारण. गेल्या काही वर्षात नदीमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साठल्याने नदीचं पात्र उथळ झालं. हा गाळ काढण्याची अनेकदा मागणी झाली. पण येरे माझ्या मागल्या... शहराजवळच्या नदी पात्रांमध्ये खासगी जमिनींची काही बेटं आहेत. ही बेटं काढण्याची आवश्यकता गेल्या अनेक वर्षांपासून व्यक्त होत होती. पण त्याकडे लक्ष देण्यात आले नाही. त्याचे परिणाम सामान्य माणसांना सोसावे लागत आहेत.

महाड हे सावित्री नदीने वेढा दिलेलं शहर. ऐतिहासिक वारसा असलेलं हे शहर गेली अनेक वर्षे सावित्री नदीच्या पुराने संपूर्ण जगभरात गाजत आहे. नेमेची येतो.. असं म्हणत महाडकर यावेळीदेखील गाफील राहिले. दिवसभर असलेली पाण्याची पातळी कमी होईल असं वाटत असतानाच अचानक महाडमध्ये सावित्री, गांधारी, आणि काळ नदीने महाडमध्ये केलेली एन्ट्री काळजाचा थरकाप उडवणारी ठरली. आपलं घर शाबूत राहील याची खात्री मनातून निघून गेली. हा हा म्हणता महाडमध्ये किमान वीस फुटांची पाण्याची पातळी दुसर्‍या मजल्यापर्यंत जाऊन पोहोचली. महाडच्या या पुराची भयानता आज अनेकांनी देखल्या डोळ्यांनी पहिली. वारंवार येणार्‍या पुरावर दूरदृष्टी असलेले शरद पवार यांनी महाड शहराचा विस्तार आता झाला पाहिजे असं मत उगाचच व्यक्त केलं नव्हतं. बशीसारख्या आकारात वसलेल्या महाडमध्ये झालेले मातीचे भराव, परिसरात झालेलं अनन्वित उत्खनन आणि प्रकल्पांसाठी देण्यात येणार्‍या वारेमाप मंजुर्‍या यामुळे दिवसेंदिवस महाडचं संकट अधोरेखित होत होतं.

महाड शहराला ऐतिहासिक वारसा आहे तसा तो पुराचादेखील वारसा आहे. या शहरामध्ये सरकारी नोंदीप्रमाणे सन १८९६, १९०९, १९१२, १९२३, १९३४, १९४१, १९५८ त्या नंतर सन २००० पर्यंत दरवर्षी शहरात पुराचं पाणी शिरलं आहे. सन २००५ च्या महापुरामुळे महाड आणि पोलादपूर तालुक्यामध्ये प्रचंड जीवितहानी बरोबरच मोठी वित्तहानीही झाली होती. २५ आणि २६ जुलै २००५ रोजी तालुक्याला नैसर्गिक आपत्ती आणि महापुराचा फार मोठा फटका बसला. या दोन दिवसांमध्ये दासगावात दरड कोसळून ५२ जण मातीच्या ढिगार्‍याखाली गाडले गेले. याशिवाय कोडीवतेमध्ये ५४, जुईमध्ये ९४, आणि रोहण गावात १५ अशा एकूण १९५ जणांना आपला जीव गमवावा लागला. वरंध परिसरात पारमाची याठिकाणीदेखील दरड कोसळून मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली होती. वाढत्या पावसात प्रतिवर्षी सावित्रीचा पूर आणि दरड हे समीकरण जुळलं गेलं आहे. महाबळेश्वरमध्ये उगम पावणार्‍या कृष्णा नदीच्या पाच भगिनींपैकी पश्चिमेकडे सत्तर किलो मिटरचा प्रवास करुन समुद्राला मिळणार्‍या सावित्री नदीच्या उत्तर काठावर महाड शहर वसलं आहे. बाणकोटच्या खाडीला मिळणार्‍या सावित्री नदीत येणारं भरतीचं पाणी महाड शहरापर्यंत पोहोचतं. सुमारे पन्नास-साठ वर्षांपूर्वी नदीतून भरतीच्या प्रवाहात मोठाले मचवे (मालवाहू होड्या) बंदरामध्ये येत असत. कालांतराने नदी गाळाने भरली आणि बंदर बंद पडलं.

- Advertisement -

सावित्रीच्या गांधारी, काळ, नागेश्वरी नद्यांचा उपयोग ग्रामीण भागात खूप होतो. शंभर वर्षांहून अधिक काळ या शहरामध्ये दरवर्षी पुराचं पाणी शिरत असल्याची सरकारी दप्तरी नोंद आहे. आजच्या पिढीला २००५ चा प्रलयंकारी महापूर ठावूक असावा. या पुरामुळे तालुक्यामध्ये प्रचंड हानी झाली. गेल्या काही वर्षात शहरांमध्ये झालेले बदल या सगळ्याला सर्वाधिक कारणीभूत आहेत, हे आता उघडपणे बोललं जाऊ लागलं आहे. शहराचा मूळ ढाचा आणि त्यात उभारल्या जात असलेल्या प्रचंड इमारती आणि मातीचे भराव या पुराला कारणीभूत बनले आहेत. महाड नगरपालिकेकडून आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून इमारतीचं बांधकाम करताना दिली जाणारी परवानगी अनेकवेळा संशयाच्या भोवर्‍यात सापडली आहे. ज्या भागांतून पाण्याचा नैसर्गिक प्रवाह वाहतो अशा भागांमध्येच बेकायदेशीर प्रचंड मातीचे भराव करण्यात आले आहेत. शहराला दिवसेंदिवस पुराचा धोका वाढत असण्यामागचं हे एक कारण. गेल्या काही वर्षात नदीमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साठल्याने नदीचं पात्र उथळ झालं. हा गाळ काढण्याची अनेकदा मागणी झाली. पण येरे माझ्या मांगल्या… शहराजवळच्या नदी पात्रांमध्ये खासगी जमिनींची कांही बेटं आहेत. ही बेटं काढण्याची आवश्यकता गेल्या अनेक वर्षांपासून व्यक्त होत होती. आता महामार्गाचं चौपदरीकरण याला निमित्त झालं ही त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट. तरी देखील शहरात येणारं पाणी कृत्रिम उपाय अडवू शकलेले नाहीत. नैसर्गिक अडथळे आहेतच. पण मानवनिर्मित अडथळ्यांनी त्यावर मात केली. मानवनिर्मित अडथळे सातत्याने वाढत असल्याने पुराच्या पाण्याचा धोका वर्षागणिक वाढतच आहे.

महाड आणि परिसरात सण २००५ नंतर शासनाने भूगर्भशास्त्र विभागाकडून पाहणी करून जवळपास ४२ गावे दरडसंभाव्य यादीत टाकली होती. या गावांना दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नोटीस देऊन सुरक्षित स्थळी स्थलांतर होण्याचे आदेश काढले जातात. नोटीसा पाठवल्या की प्रशासनाचं काम संपतं. पुढे त्याचं काय होतं, हे प्रशासनातल्या संबंधितांनाही ठावूक नसतं. तालुक्यात जमीन खरेदी-विक्री व्यवहार मोठ्या प्रमाणात होत असून, जमीन विकत घेणारा नैसर्गिक संपत्तीचं नुकसान करत जमिनीचं सपाटीकरण करतो. डोंगर दर्‍या आणि तेथील भौगोलिक परिस्थितीचा अंदाज न बांधताच खोदकाम केलं जातं. पूर परिस्थिती आणि दरड कोसळण्याच्या संकटाची जाणीव असूनही स्थानिक प्रशासन परवानग्या देताना अफूच्या गोळ्या घेतल्यागत झोपा काढतं. यामुळे आजकाल होणार्‍या या घटना वरवर नैसर्गिक वाटत असल्या तरी त्या प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे होतात हे उघड सत्य नाकारता येत नाही. महाड तालुक्यात ज्या कोंडीवते गावात दरडीने जीवितहानी झाली होती त्याच कोंडीवतेमध्ये वृक्षतोड आणि जमिनीच्या सपाटीकरणाला मर्यादा राहिलेली नाही.

- Advertisement -

सावित्री नदीचं पाणी भोईघाट, स्मशानभूमी परिसरात तर गांधारी नदीचं पाणी नातेरोड, दस्तुरीनाका या परिसरांमध्ये शिरल्यानंतर शहरभर पसरतं. दस्तुरी नाक्यावर पाण्याची पातळी वाढल्यानंतर प्रमुख बाजारपेठेत पाणी शिरण्यास सुरवात होते. समुद्राच्या भरतीची वेळ असल्यास बाजारपेठेमध्ये पाण्याची पातळी तीन ते चार फुटापर्यंत वाढते. यावेळी मात्र हा सुमार वाढला आणि शहरातील एकही कानाकोपरा शिल्लक राहिला नाही. परिसरात असलेल्या लाडवली, दादली, राजेवाडी, कोलोसे, आसनपोई, बिरवाडी, काळीज, आकले, या गावातील नागरिकांनीदेखील कधी नव्हे तो महापूर अनुभवला. महाड शहरातील उंच भागातही पुराचं पाणी शिरलं. आपत्कालीन यंत्रणा, जलसंपदा विभागाचं हवामान केंद्र, सन २००५ प्रमाणे याहीवेळी नागरिकांना सतर्क करण्यात असमर्थ ठरली. महाड तालुक्यात जलसंपदा विभागाचं हवामान केंद्र आहे. मात्र हे केंद्र कायम धूळ खात पडलेलं असतं. स्थानिक पातळीवरील संपर्क यंत्रणादेखील कुचकामी ठरल्या. पूर आल्यानंतर मोबाईल कंपन्यांचे मोबाईल, लँडलाईन, इंटरनेट यंत्रणा ठप्प झाल्या. गेल्या अनेक वर्षांचा पुराचा इतिहास पाहता शासकीय यंत्रणांनी काही शिकायचं नाही असंच ठरवलेलं दिसतं. ज्यांनी आपलं संपूर्ण घर, दुकान पुराच्या पाण्यात जाताना पाहिलं त्यांच्या व्यथा कुठल्याच मदतीने भरून निघणार्‍या नाहीत. आज पक्षांचे बॅनर, झेंडे लावून मदतीचे ट्रक धावत आहेत. मंत्र्यांचे दौरे झडत आहेत. डोळ्यादेखत उभा केलेला संसार, व्यवसाय पुन्हा उभा करण्यास किमान दहा वर्षे लागतील तोपर्यंत खायचेे काय, असा प्रश्न महाडच्या सामान्य माणसाला पडला आहे…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -