घरफिचर्सपुन्हा मोहेंजोदडोच्या दिशेने...

पुन्हा मोहेंजोदडोच्या दिशेने…

Subscribe

महाड, चिपळूण आणि पश्चिम महाराष्ट्रात जो पूर आला त्यावरून वर्षापूर्वीच्या एका मानवसंस्कृतीचे स्मरण झाले. आपणही प्रत्येकाने शालेय जीवनात कधीतरी त्याचा उल्लेख ऐकलेला आहे. सिंधू नदीच्या खोर्‍यात येऊन वसलेल्या टोळ्यांनी मस्त सुपिक जमीन व नदीचे भरपूर पाणी बघून, तिथेच वस्ती केली आणि त्यांची संस्कृती तिथे भरभराटली. मग काही काळानंतर सिंधू नदीला महापूर आला आणि त्या पुराच्या पाण्यात ती संस्कृती बुडाली. जी काही शहरे वसाहती होत्या, त्या महापुरासोबत आलेल्या गाळात बुडून गेल्या. त्यांचे नामोनिशाण शिल्लक राहिले नाही. त्यानंतर काही वर्षे व काळ उलटला आणि आणखी कुठल्या टोळ्यांनी येऊन तिथेच आपले बस्तान मांडले.

सुपिक जमीन व नदीच्या पाण्याने संपन्न असलेला प्रदेश त्यांना आकर्षित करून गेला आणि त्यांच्याही काही पिढ्या तिथे सुखवस्तू होऊन पुढारल्या. त्यांचीही संस्कृती उभी राहिली आणि पुन्हा एका महापुराने त्यांनाही गाडून टाकले. असा सिलसिला चालूच राहिला आणि इसवीसनाच्या आरंभापूर्वी वा आरंभी सिंधू नदीच्या खोर्‍यातील त्या अत्यंत पुढारलेल्या संस्कृतीचे नामोनिशाण शिल्लक राहिले नाही. शंभर सव्वाशे वर्षांपूर्वी कुणा संशोधकाला उत्खनन करताना या संस्कृतीचे अवशेष सापडले आणि जितका हा संशोधक ‘खोलात’ गेला, तितके त्याला अधिकच अवशेष मिळत गेले. एकाखाली एक अशी सात नगरे गाडली गेलेली सापडली. त्याला मोहंजोदडो नावाने ओळखले जाते. हे कसे झाले व का होऊ शकले, त्याचाही शोध व अभ्यास अजून चालू आहे. इतकी पुढारलेली संस्कृती व त्यातली माणसे नष्ट होऊन गेली, त्यामागची कारणे शोधण्याचे काम चालू आहे. पण ते करताना आपणही त्यांच्याच पद्धतीने जगत आहोत, याचा विचार कोणाच्याही मनाला शिवत नाही, ही बाब धक्कादायक नाही काय? मोहेंजोदडोची संस्कृती का नष्ट झाली? एकाखाली एक सात नगरे गाडली का गेली?

- Advertisement -

पहिल्या टोळीचा विनाश कशामुळे झाला, त्याचा पुढल्या टोळीने विचार केला नाही, की शोध घेतला नाही. समोरच्या संपन्नतेला भुलून त्या टोळ्या वा त्यांच्या म्होरके नेत्यांनी तिथे वस्त्या केल्या. पण भविष्यात काय वाढून ठेवले आहे किंवा पायाखाली काय गाडलेले आहे, त्याची कुणालाही फिकीर करावी असे वाटले नाही. मोहेंजोदडोची ही समस्या होती. आज इतक्या हजारो वर्षानंतर आपणच त्या पूर्वजांपासून काही शिकलो आहोत काय? विभिन्न काळातील सात टोळ्यांनी आपापली नगरे नव्याने उभी करताना आधी काय झाले व त्यातले धोके टाळण्याचा विचार केला नाही. आज आपण तरी आधी आलेली संकटे वा नैसर्गिक कोपाची मीमांसा करून, त्यावरचे उपाय वगैरे शोधण्याच्या फंदात पडतो काय? २००५ सालात अतिवृष्टीने मुंबईच्या नाकातोंडात पाणी गेलेले होते.

म्हणून आपण काही करू शकलो काय? तेव्हा मुंबईची एकमेव नदी मानल्या जाणार्‍या मिठी नदीचे पात्र रुंद करून, पाण्याच्या निचर्‍याचा विषय युद्धपातळीवर सोडवण्याचा निर्णय झालेला होता. त्याची आज बारा वर्षानंतर अवस्था काय आहे? तिथले अतिक्रमण निकालात निघाले आहे काय? रायगड आणि पश्चिम महाराष्ट्रातील समस्या थोड्याथोडक्या नाहीत. तेथील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक शेकडो समस्या अंगाखांद्यावर खेळवित जगत असतो. त्याला सभोवताली वा पायाखाली काय जळते वा नासलेले आहे, त्याकडे बघायला वेळ नाही. सिंधू नदीच्या खोर्‍यात सुपिक जमीन होती आणि रायगड पश्चिम महाराष्ट्र पैशाच्या बाबतीत सुपिकतेच्या दिशेने जाऊ पहात आहेत.  त्या मोहात तेथे भकास विकास होत आहे.

- Advertisement -

महाड आणि चिपळूण हे सह्याद्रीच्या खोर्‍या आहेत.  तेथे नागरी वस्ती आणि कारखाने वसवण्याच्या हेतूने पर्यावरणाचा नाश झाला, याची कोणीतरी फिकीर करतो आहे काय? अतिवृष्टी म्हणजे चोवीस तासात काही इंच पाऊस कोसळला. याचा अर्थ तरी गेल्या दोन दिवसात कोणी समजावण्याचे कष्ट घेतलेले आहेत काय? तेथील नद्या इतका मोठा पाऊस पचवण्यास सक्षम आहेत का, याचा विचार कोणी केला आहे का. पडलेले पाणी उतार पकडून वाहत असते. पुढे ते समुद्रात जमा व्हायला हवे असेल, तर वस्ती व शहराची जमीन समुद्र सपाटीपेक्षा अधिक उंचीवर असायला हवी. अन्यथा आभाळातून पडणारे जादा पाणी समुद्रात जाऊ शकत नाही. ते पडेल तिथेच ठाण मांडून रहाते. त्यातल्या त्यात जिथे म्हणून सखल भाग मिळेल तिथे सरकू लागते. परिणामी सखल भागात पाण्याचा तलाव तयार होतो. नद्या आपले पात्र सोडून मानवी वस्तीत घुसू लागतात.

मुंबईचेच उदाहरण द्या. चारसहा दशकात मुंबईच्या परिसरातील कुलाबा ते डहाणू व ठाणे ते अलिबाग अशा परिसरातल्या बहुतांश खाड्या व दलदलीचे भाग भराव घालून बुजवण्यात आलेले आहेत. त्यातून नवनव्या आधुनिक आलिशान वसाहती उभ्या राहिल्या आहेत. ज्यांना तिथे घर घेणे परवडत नाही, त्यांनी आपल्या कुवतीवर किंवा कुणा गुंड वा भ्रष्ट अधिकार्‍यांच्या मदतीने, अशा प्रदेशात झोपड्या उभारून आपला निवारा शोधलेला आहे. सरकारने चटईक्षेत्र वाढवून देतानाही अशा निर्णयाच्या दुष्परिणामांचा विचार केलेला नाही. त्यातून मूळ मुंबईचे बेट सखोल प्रदेश व नवी भर घातलेला भाग तीनचार फूट उंच झालेला आहे. सागरी पाण्याची पातळी त्यामुळे जमिनीपेक्षाही उंच वा बरोबरीची होत गेली आहे. त्यात भरतीची वेळ आली, म्हणजे तिथलेही पाणी खाडी नसल्याने मुंबईच्या जमिनीकडे धावू लागलेले आहे. दोनतीन इंच पावसाचे पाणी सामावून घेण्याची सागराची क्षमता संपली, मग उरलेले पाणी मुंबईलाच बुडवू लागते आहे.

आज महाड, चिपळूणची परिस्थिती वेगळी नाही. येथील नद्यांमध्ये गाळ साचला आहे. नद्यांची पात्रं अरुंद झाली आहेत. सह्याद्रीवर पडणारा पाऊसाचे पाणी महाड, चिपळूणच्या दिशेने येताना ते वाहून नेता येईल, इतकी क्षमता या नद्यांची नाही. त्यातच भरीस भर म्हणजे महाड, चिपळूणमध्ये अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामे झाली आहेत. काही बांधकामे तर नदीचे पात्र दुसरीकडे वळवून करण्यात आली आहेत. हजारो वर्षांपूर्वी मोहेंजोदडोच्या टोळ्या वा त्यांच्या म्होरक्यांपाशी आज उपलब्ध असलेले तंत्रज्ञान वा साधने नव्हती. अन्यथा त्यांनी काळजी घेतली असती. पण आजच्या युगात सर्व साधने व धोक्याचे इशारे देणार्‍या यंत्रणा असूनही, आपण मोहेंजोदडो काळापेक्षाही मागास मनोवृत्तीने जगत असतो. कुठल्याही समस्या प्रश्नातील आपली जबाबदारी ओळखणे दूर राहिले.

अन्य कुणावर खापर फोडण्यात आपण धन्यता मानत असतो. त्या संस्कृतीमध्ये एकाखाली एक नगरे गाडली गेलेली होती आणि आधीच्या टोळ्यांचे अनुभव पुढल्या पिढी वा टोळ्यांना मिळू शकलेले नव्हेत. आपल्यापाशी सर्व अनुभव व त्यांच्या नोंदी आहेत. पण त्यातून धडा घेण्यापेक्षा आपण समस्या व प्रश्नांचीच मोहेंजोदडो संस्कृती बनवून टाकलेली आहे. कुठला प्रश्न वा समस्या सोडवण्यापेक्षा त्यांना नव्या समस्या प्रश्नांखाली गाडून, नवी भूमी निर्माण करण्यात आपण गर्क आहोत. विज्ञान साधने देते मनोवृत्ती देत नाही ना? आपण आधुनिक मोहेंजोदडोचे प्रणेते आहोत ना?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -