घरफिचर्समहाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण

महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण

Subscribe

यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांचा जन्म १२ मार्च, १९१३ रोजी सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे या गावी झाला. त्यांचे वडील यशवंतराव लहान असतानाच वारले. त्यांच्या आई विठाबाई, त्यांचे बंधू ज्ञानदेव यांनी कष्ट करून घर चालवले. यशवंतराव या पुत्राने खूप शिकावे ही त्या माऊलीची इच्छा. यशवंतरावांनी शालेय जीवनात वक्तृत्व स्पर्धेत पारितोषिके पटकावली. त्यांनी संगीत, भजन-कीर्तन यांचाही स्वाद घेतला; कराड येथे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, लोकमान्य टिळक, ना. गोखले यांची भाषणे ऐकली. त्यांनी सालसेत असताना सत्याग्रहात भाग घेतला म्हणून त्यांना अठरा महिन्यांची शिक्षा झाली.

ते येरवडा तुरुंगात असताना आचार्य भागवत, एस.एम. जोशी यांच्यासारखे नेते तेथे होते. तुरुंगामध्ये राजकीय, सामाजिक विषयांवर चर्चा होत. यशवंतरावांना त्या वयातच विचारवंत, साहित्यिक यांच्या ग्रंथांसंबंधी आकर्षण वाटू लागले. त्यांनी कोल्हापुरातील राजाराम महाविद्यालयामध्ये असताना त्याचा व्यासंग वाढवला. ना.सी. फडके यांच्यासारखे नामवंत साहित्यिक प्राध्यापक होते. त्यांनी बी.ए., एल.एल. बी. या परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर १९४२ मध्ये स्वातंत्र्यलढ्यात भूमिगत होऊन कार्य केले.

- Advertisement -

ते रसिक व साहित्यिकही होते. युगांतर, सह्याद्रीचे वारे, कृष्णाकाठ, ऋणानुबंध ही त्यांची साहित्यसंपदा आहे. १९५६ मध्ये स्थापन झालेल्या द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड झाली. तसेच मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर (१ मे, १९६०) महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणूनही त्यांचीच निवड झाली. १९६२ मध्ये चीन युद्धाच्या काळात तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनी यशवंतरावांची नेमणूक देशाच्या संरक्षणमंत्रीपदावर केली. हा त्यांच्या कारकीर्दीचा सर्वोच्च बिंदू म्हणता येईल.

पुढील काळात त्यांनी उपपंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, अर्थमंत्री, संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री ही पदे यशस्वीरीत्या भूषविली. केंद्रात जनता पक्षाचे सरकार असताना (१९७७-७८) ते विरोधी पक्षनेते होते. तसेच पुढे ते आठव्या केंद्रीय वित्त आयोगाचे अध्यक्षही झाले. यशवंतराव चव्हाण यांचे आर्थिक विचार प्रामुख्याने शेती, उद्योग, सहकार, समाजवाद, आर्थिक विषमता, विकासातील समस्या आणि नियोजनाचे महत्त्व इत्यादीशी निगडित आहेत.

- Advertisement -

यशवंतराव चव्हाण यांनी कृषिविषयक विचार मांडताना शेतीच्या मालकीहक्काचा प्रश्न, भूमिहीनांचा प्रश्न व कृषी विकासासाठी उपाय यावर अधिक भर दिला. त्यांच्या मते, जमीन कसणारा शेतजमिनीचा मालक असावा. यशवंतरावांनी सामाजिक क्षमता व सामाजिक न्यायाच्या दृष्टीकोनातून शेतीचा विचार केला. भारतात शेती क्षेत्रात भूमिहीनांची संख्या अधिक आहे. म्हणून वाजवीपेक्षा अधिक जमिनी असणार्‍या लोकांनी त्यांच्या जमिनीतील एक ते दोन टक्के जमीन त्यांना द्यावी.

तसेच जमीन अविकसित असल्याने ती अनुत्पादक व पडीक राहिली आहे. अशा जमिनी लागवडीखाली आणणे आवश्यक आहे. शेती व्यापारी तत्वाने केली पाहिजे. शेतीच्या आधुनिकीकरणाच्या मार्गातील अडथळे दूर केले पाहिजेत. नद्यांच्या पाण्याचा शेतीसाठी वापर केला पाहिजे. नद्यांवर धरणे बांधली पाहिजेत. धरणे बांधल्याने विस्थापित होणार्‍या लोकांचे पुनर्वसन केले पाहिजे. शेतकर्‍यांनी कृषीशास्त्राचा अभ्यास केला पाहिजे, असे विचार त्यांनी मांडले. अशा या महान नेत्याचे 25 नोव्हेंबर 1984 रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -