घरफिचर्समहाराष्ट्र का स्वॅग अलग है...

महाराष्ट्र का स्वॅग अलग है…

Subscribe

महाराष्ट्राची गंमत अशी की हे राज्य ना धड उत्तरेत ना दक्षिणेत. ढोबळमानाने द्रविड-आर्य अशा संस्कृतीचा संगम असलेलं. शाहू-फुले-कर्वे-आंबेडकर-आगरकर आदींचा वारसा असलेलं, पण त्याच वेळी हेडगेवार-मुंज्यांपासून ते आताच्या भागवतांपर्यंत कर्मठ अजेंडाही याच मातीत. पुरोगामी ही गुळगुळीत झालेली संज्ञा पुन्हा पुन्हा वापरताना इथल्या फुल्यांच्या पुण्यात नव्या नथुरामाने दाभोलकरांची हत्या केलेली असते तर शाहूंच्या कोल्हापुरात कॉ. पानसरेंना संपवलं गेलेलं असतं. पुरोगामी आणि प्रतिगामी प्रवाहांनी संमिश्र असा हा महाराष्ट्र आहे.

तुला काय वाटतं, काय होईल? पहाटे आठ वाजता अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी पाहून मित्राने फोनवर विचारलं. सूर्यदेवतेचा अपमान न करण्याचे व्रत घेतलं असल्यानं मी साखरझोपेत होतो. रात्रीच्या गर्भात उद्याचा उषःकाल, काय झाला आहे, हे मला काहीच माहीत नव्हतं. ‘येशील येशील पहाटे पहाटे येशील, साखरझोपेत चुंबन देशील’ आदी गाणी स्वप्नात येत असतानाच तिच्याऐवजी ‘मी पुन्हा येईन’ म्हणणा-या भयप्रद आवाजाने एन्ट्री करून महाराष्ट्राची झोप उडवली असल्याचं कळलं. टीव्ही लावला तर मित्र सांगत होता ते खरं होतं. ऐन लग्नाच्या मांडवातून नवरीने प्रियकरासोबत ( प्रियकराच्या धमक्यांमुळे वगैरे) पळून जाऊन आणाभाका घ्याव्यात, तसा हा शपथविधीचा प्रकार झाला होता. चहा घेतला तोच त्याचा पुन्हा फोन- काय होईल? तुझा काय अंदाज?

अजून आपण अंदाज करू शकतो? आपण ज्योतिषी नाही, गोविंदबागेशी आपला काही संपर्क नाही आणि छप्पन इंची छाती आपल्यापाशी नाही. त्यामुळे मी विचार करणं बंद केलंय. मी उत्तर दिलं.सांग काहीतरी. तू तर राज्यशास्त्र शिकवतोस बे. काहीतरी विश्लेषण वगैरे कर की मित्र म्हणाला. आठेक दिवसांपूर्वीचा माझा माझ्या मित्रासोबतचा संवाद. काहीही आकळू नये असं सारं घडत होतं.अखेरीस संविधान दिनादिवशी चोरपावलांनी पुन्हा येणा-या देवेंद्रांना राजीनामा द्यावा लागला आणि काकांपुढे पुतण्या शरणागत झाला वगैरे.

- Advertisement -

गेल्या महिनाभरात महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर जे घडलं त्याचं वर्णन करायला कोणतीही संज्ञा अपुरी पडेल. कुठल्याही नाटककाराच्या नाटकात इतकं ‘नाट्य’ नसेल किंवा कादंबरीकाराच्या कादंबरीत इतके ‘ट्विस्ट्स’ नसतील. ‘आतल्या गोटा’तल्या पत्रकारांचे अंदाज कधीही इतके चुकले नसतील किंवा प्रथमच दस्तुरखुद्द आमदारांना पुढे काय होणार, याची कल्पना नसेल. महाराष्ट्रात जे घडलं ते अभूतपूर्व आहे. निवडणुकीच्या निकालापेक्षाही त्यानंतर झालेल्या बाबींनी जी धमाल उडवून दिली आहे त्यातून या काळाचं चरित्र स्पष्ट झालं आहे. विचित्र कोलाज झालेल्या या काळात ‘लोक’ नावाची गोष्ट ‘नागरिक’ होण्याच्या कुठल्यातरी मधल्या टप्प्यावर अडकले आहेत.

कोण कोणाच्या संपर्कात आहे, हे सांगणार्‍या बातम्यांचा पूर आलेला; पण सत्ता आणि नागरिक परस्परांच्या संपर्कात नाहीत, अशी अवस्था असल्याचं या निमित्तानं अधोरेखित झालं. आम्ही मतदान केलं खरं; पण आता कुणीही कुठेही चाललं आहे, हे पाहून मतदार अस्वस्थ झाले आणि प्रातिनिधिक लोकशाहीच्या मर्यादा सुस्पष्ट झाल्या. आम्ही आमचे प्रतिनिधी निवडून देऊ; पण ते आमचेच प्रतिनिधी राहतील, याची शाश्वती आहे कुठं ! भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यापासून अत्यंत असभ्य स्वरुपाची राजकीय संस्कृती आकाराला आली आहे. द्वेष हा या राजकीय संस्कृतीचा पाया आहे. सूडबुद्धी हा तिचा ड्रायव्हिंग फोर्स आहे. हिंसा हे तिचं साधन आहे. खोटारडेपणा ही या संस्कृतीची शैली आहे. सामदामदंडभेद हे तिचं ब्रीदवाक्य आहे.

- Advertisement -

म्हणून तर गुजरातचे माजी आयपीएस अधिकारी संजीव भट यांना अटक होते आणि कोणी विकृत प्रज्ञा संसदेत नथुरामायण गाताना दिसते. दिवसाढवळ्या झुंड हत्या करते. मारेकर्‍यांचा केंद्रीय कॅबिनेट मंत्री सत्कार करतात. नोकरशाही पोखरली जाते. स्वायत्त संस्था पोकळ होतात आणि बरंच काही. अशा वेळी भाजपला दूर करत सेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तीन पक्ष एकत्र येतात. खरं तर राष्ट्रवादी-भाजप आघाडी असो किंवा सेना-काँग्रेस-राष्ट्रवादी महाविकास आघाडी, या दोन्ही आघाड्या तशा अनैसर्गिकच; तरीही लोकांनी महाविकास-आघाडीचं सरकार स्थापन होताच आनंद व्यक्त केला. याचं कारण नक्की काय ? याचं एक कारण तर सरळ आहे. अमर्याद दमनशाहीला लोक कंटाळतात. त्याला प्रत्युत्तर देतात. मुक्त श्वास घेण्याचा अवकाशच जेव्हा संपतो तेव्हा लोक त्याविरुद्ध बंड पुकारतात. घोषित असो की अघोषित, आणीबाणीला लोक उत्तर देतात. असंतोषाला वाट करुन देणारे नायक अशा वेळी जरुरीचे असतात.

महाराष्ट्राची गंमत अशी की हे राज्य ना धड उत्तरेत ना दक्षिणेत. ढोबळमानाने द्रविड-आर्य अशा संस्कृतीचा संगम असलेलं. शाहू-फुले-कर्वे-आंबेडकर-आगरकर आदींचा वारसा असलेलं, पण त्याच वेळी हेडगेवार-मुंज्यांपासून ते आताच्या भागवतांपर्यंत कर्मठ अजेंडाही याच मातीत. पुरोगामी ही गुळगुळीत झालेली संज्ञा पुन्हा पुन्हा वापरताना इथल्या फुल्यांच्या पुण्यात नव्या नथुरामाने दाभोलकरांची हत्या केलेली असते तर शाहूंच्या कोल्हापुरात कॉ.पानसरेंना संपवलं गेलेलं असतं. पुरोगामी आणि प्रतिगामी प्रवाहांनी संमिश्र असा हा महाराष्ट्र आहे. संत परंपरेपासून ते प्रबोधनकर्त्यापर्यंतचा वारसा एका बाजूला आहेच; पण सोबतच कर्मठ जातीसंस्थेची विषवल्ली रोवणाराही हा समाज आहे.

सेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या तिघाडीत हा विरोधाभास सुस्पष्टपणे राजकीय स्वरूपात प्रतिबिंबित झाला आहे. राजकारणाची प्रक्रिया ही काही काटेकोर राजकीय सिद्धांतांवर, विचारांवर चालते, यात अजिबातच तथ्य नाही; मात्र व्यवहारी राजकारणाच्या चौकटीतून परिवर्तनाच्या दिशेने दोन पावलं पुढं टाकण्याचा प्रयत्न होतो आहे. देशभरात भयंकर परिस्थिती ओढवलेली असताना भाजपच्या रथाला रोखण्याचा हा खास महाराष्ट्राचा पॅटर्न देशाने राबवला आणि वैचारिकदृष्ठ्याही संघ-भाजपला उत्तर दिलं तर ख-या अर्थाने मोठा बदल होऊ शकतो. सत्तेच्या सारीपाटाहूनही सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात दोन क्षण आनंदाचे येतील, असा भवताल घडवणं अधिक जरुरीचं असतं. सारेच राजकारणी वाईट आहेत, सब चोर है असा धुरळा उडवत आपली गुन्हेगारी रेटू पाहण्याच्या या काळात मूल्यांवरचा विश्वास अबाधित ठेवत आणि व्यावहारिक बाजू सांभाळत महाराष्ट्राला पुढे जाता येईल. दिल्लीच्या तख्तासमोर महाराष्ट्र झुकत नाही, हे छानच; पण दिल्लीच्या तख्ताचं वैचारिक अधिष्ठान बदलवू शकतो का, हा खरा प्रश्न आहे. जर हे करण्यात महाराष्ट्र यशस्वी झाला तर ‘महाराष्ट्र का स्वॅग अलग है’, असं म्हणता येईल.

– श्रीरंजन आवटे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -