घरताज्या घडामोडीनाटककार हिराबाई पेडणेकर

नाटककार हिराबाई पेडणेकर

Subscribe

हिराबाई पेडणेकर या पहिल्या स्त्री नाटककार, गायिका, संगीतकार होत्या. त्यांचा जन्म २२ नोव्हेंबर १८८६ रोजी सावंतवाडीमध्ये संगीत, नृत्याची जाण असणार्‍या घराण्यामध्ये झाला. हिराबाई या गोव्यातील गोमंतक मराठा समाजाच्या. गोवा, सिंधुदुर्ग, कारवार परिसरातील अनेक मोठ्या देवळांच्या परिसरात कलावंत, देवळी, भावीण, पेरणी, बांदे, फर्जंद, चेडवा अशा देवळात सेवा देणार्‍या पोटजातींच्या समूहाला ‘देवदासी’ असे नाव मिळाले. या समाजातही स्त्रियांना देवाला वाहण्याचा सेषविधी होता. पण तो प्रत्येक बाईला बांधील नव्हता. या समाजात नृत्य, संगीतात मुली वाकबगार असत. या देवदासी समाजातील सर्व पोटजातींमध्ये ऐक्य घडवण्याचा प्रयत्न झाला. त्यातून या समाजाचे नाव नाईक मराठा समाज आणि शेवटी गोमंतक मराठा समाज ठरले. हिराबाई पेडणेकर हा सगळा वारसा घेऊन जन्मल्या, त्यातूनच त्यांच्या ठायी असलेल्या लेखन व इतर ललित कलांना प्रेरणा मिळाली. हिराबाई वारांगना नव्हत्या. त्या फक्त बैठकीचे गाणेच करायच्या.

मुंबईतील मिशन स्कूलमध्ये त्या शिकल्या. हिराबाईंचे शिक्षण अवघे सातवीपर्यंतच झाले. धनिक प्रेमचंद रायचंद यांच्या घरात त्या वाढल्या, त्या मावशी भीमाबाईमुळे. मावशीने या भाचीला मुंबईत आणून शिक्षण दिले. न. चिं. केळकर, चिंतामणराव वैद्य, गोविंद बल्लाळ देवल, राम गणेश गडकरी, वि. सी. गुर्जर, रेंदाळकर, बालकवी ठोंबरे, मामा वरेरकर हे याच गांजावाला चाळीचा जिना चढले ते हिराबाईंचे गाणे ऐकायला. तेही श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांच्या आग्रहामुळेच. हिराबाईंना मराठी व संस्कृत उत्तमरीत्या येत होते. त्याशिवाय हिंदी, बंगाली, इंग्लिश या भाषांचा काही अभ्यास त्यांनी केला होता. त्या उत्तम कविताही करत असत. ‘मनोरंजन’ आणि ‘उद्यान’ या दोन प्रसिद्ध साप्ताहिकात हिराबाईंच्या कविता प्रसिद्ध होत असत. त्यात त्यांनी ‘माझे आत्मचरित्र’ नावाची जी लघुकथा लिहिली होती. हिराबाईंनी गाण्याचे अधिक शिक्षण पं. भास्करबुवा बखले यांच्याकडून घेतले.

- Advertisement -

हिराबाईंनी लिहिलेल्या नाटकांपैकी ‘जयद्रथ विडंबन’ (१९०४) व ‘संगीत दामिनी’ (१९१२) या नाटकांचा विशेष बोलबाला झाला. एका पौराणिक कथानकाच्या आधारे त्यांनी जयद्रथ विडंबन हे नाटक लिहिले होते व त्यावर देवल शैलीच्या नाट्यलेखनाचा प्रभाव होता. स्त्रीशिक्षणाविषयी हिराबाईंना विलक्षण कळकळ होती. ‘संगीत दामिनी’मध्ये त्यांच्या या विचारांचे प्रतिबिंब दिसते. या नाटकात एकूण बहात्तर पदे आहेत, हेही एक वैशिष्ठ्य. हिराबाई पेडणेकरांनी लिहिलेली ‘कवी जयदेवाची पत्नी’, ‘मीराबाई’ ही नाटके मात्र तेवढीशी गाजली नाहीत. हिराबाई पेडणेकर हा मराठी नाट्यसृष्टीतील असा आविष्कार होता की, जो काही काळच तेजाने तळपला व नंतर प्रसिद्धीच्या झोतापासून इतका दूर गेला की, त्यांची आठवणही खूप कमी लोकांनी राखली. अशा या कर्तृत्ववान स्त्री नाटककाराचे १८ ऑक्टोबर १९५१ रोजी निधन झाले.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -