मालक

Subscribe

एका गजबजलेल्या स्टेशनजवळचं एक गजबजलेलं हॉटेल.
वाचून वाचून नव्हे तर बघून बघून एखादी कविता पाठ व्हावी तसा बघून बघून पाठ झालेला त्या हॉटेलचा तो मालक. सत्तरी गाठलेला किंवा नुकतीच सत्तरी पार केलेला. कधी पाय वळतात म्हणून हॉटेलच्या काऊंटरवर उभा राहणारा तर कधी पाय वळतात म्हणूनच गुबगुबीत खुर्चीवर बसणारा. कधी फुलाफुलांचा मार डाला स्टाइल शर्ट घालणारा तर कधी जाड्याभरड्या कापडाचा पांढरा शुभ्र सफारी घालणारा.

आपलं संपूर्ण आयुष्य, संपूर्ण आयुष्यातला प्रत्येक दिवस ह्या हॉटेलात व्यतित करणार्‍या ह्या हॉटेल मालकाला हॉटेलच्या बाहेर कुणी कधीच खात्रीने पाहिला नसेल! हॉटेलमध्ये उदरभरण केल्याचं बिल घेऊन येणार्‍या ग्राहकाच्या बिलावरच्या आकड्यांकडे बहिर्गोल भिंगाच्या जाड्याजुड्या चष्म्यातून नजर टाकणं आणि त्यानुसार गल्ल्यातल्या नोटांची चाळवाचाळव करणं इतकंच त्याचं जिवितकार्य. इतकाच त्याच्या जगाचा परीघ आणि त्याच परिघाच्या आत सकाळपासून मध्यरात्रीपर्यंत घुटमळत राहणं हा इतकाच त्यांच्या उभ्या आयुष्यातला त्यांचा छंद.

- Advertisement -

छंदाचा विषय निघाला आहे म्हणून सांगायला हवं, अखंड दिवस हॉटेलच्या गल्ल्यावर काढणार्‍या ह्या हॉटेल मालकाचा चेहराच इतका कोरा असतो की त्यावर एखाद्या छंदाची, एखाद्या रसिकतेची सुरेल रेघ उमटणं निव्वळ कठीण. जगात संगीत नावाचा मानवी मनाला रिझवणारा कोणी एक प्रकार आहे ह्याची त्याला तशी कल्पना आहे, पण ती कल्पना पुसट आहे. म्हणजे प्राचीन काळी मल्हार राग आळवून पाऊस पडायचा, दीप राग गाऊन दिवे प्रज्वलित व्हायचे वगैरे आश्चर्य त्याच्या उभ्या आयुष्यात त्याच्यापर्यंत कधीच पोहोचलं नाही. त्यानेही ते आपल्यापर्यंत पोहोचू देण्याचा संकल्प एखाद्या नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशीही कधीच सोडला नाही. खेळातलं एखादं महान व्यक्तिमत्वही आता सगळेच लोक त्याला महान बोलतात म्हणून त्याला माहीत असतं. त्यातही एखाद्या राखीव खेळाडूचं नाव त्याला माहीत असणं म्हणजे तर त्या राखीव खेळाडूच्या आयुष्यातला दुग्धशर्करा, अमृतसिद्धी, मणिकांचन योगच म्हणावा लागेल.

माणसाच्या ज्ञानेंद्रियांना सुखावणार्‍या साहित्य, शास्त्र, विनोद, संगीत, क्रीडा, नृत्य, चित्र, शिल्प ह्या सगळ्या गोष्टींपासून जन्मत:च मुक्ती मिळवणार्‍या ह्या मालकाला सुखावणारी जगात एकच गोष्ट उपलब्ध आहे ती म्हणजे हॉटेलचा गल्ला. मंत्रिमंडळातून काढून टाकल्यावर काही मंत्री जसे आपला सरकारी बंगला सोडता सोडत नाहीत तसं मालकाने आपल्या गल्ल्याला आजन्म चिकटून बसण्याचं व्रत स्विकारलं आहे.

- Advertisement -

मालक भल्या सकाळचं, टळटळीत दुपारचं, कातरवेळचं, अध्यात्माचं, शब्दकोड्याचं, लफडीकुलंगड्यांचं, पैशापाण्याच्या गुंतवणुकीचं असं कोणतंही वर्तमानपत्रं वाचत नाहीत. हातातसुद्धा धरत नाहीत. अठरा अठरा तास हॉटेलात असल्यामुळे तो कोणत्या न्यूज चॅनेलच्या वाट्याला जाण्याचा तर प्रश्नच नाही. जगात, राजकारणात, समाजकारणात, रानात-माळरानात काय घडतं ते त्याला उडत उडत कळतं तेवढंच, त्यासाठी त्याच्या माहितीचा स्रोत असतो ते त्याच्या हॉटेलातल्या टेबलावर इडली-वडा खाणार्‍यांच्या टाइमपास गप्पा. त्यांच्या गप्पांमधून त्याला दर सेकंदाला जगात काहीतरी चालू असतं, काहीतरी घडत असतं ह्याचा साक्षात्कार होतो आणि इडली-वडा फेम ग्राहकांच्या गप्पा संपल्या की त्याच्या ज्ञानाचा, माहितीचा स्रोत बंद होतो. असा हा हॉटेल मालक ‘आपल्याला काय करायचं आहे कुणाशी’, ‘जगाशी आपल्याला काही देणं-घेणं नाही’, ‘आपण कुणाच्या अध्यामध्यात नाही’, ‘आपल्याला देवाने भरभरून दिलं आहे’, ‘आपलं हॉटेल भलं, आपण भले, आपल्याला कशाला हवी दुनियादारी’ अशा छापाचं तत्वज्ञान गल्ल्यावर कुणी फार बोलायला आला तर बोलून दाखवतो. बोलून दाखवतो म्हणजे बोलायला येणार्‍याला हे बोलून सहज कटवतो.

ना कसल्या पुण्याबद्दल सुख, ना कसल्या पापाबद्दल दु:ख वाटणार्‍या ह्या विरक्त, कोरड्याशुष्क मालकाच्या आयुष्यात एक दिवस मात्र असा येतो की त्यादिवशी तो काही तास हॉटेलच्या गल्ल्यावर बसत नाही. तो दिवस असतो मतदानाचा दिवस. लोकशाहीतला आपला पवित्र हक्क बजावण्याचा दिवस. त्या दिवशी तो गल्ल्यावर हॉटेलातल्या इतर कुणा वेटरला बसवतो आणि मतदान करायला खुल्या वातावरणात बाहेर पडतो. कोणत्याही वर्तमानपत्रात, कोणत्याही न्यूज चॅनेलमध्ये ढुंकूनही न पाहणारा, जगातली कोणतीही माहिती स्वत:हून न मिळवणारा, स्वत:च्या गल्ल्यापलिकडचं जग कायम अनोळखी ठेवणारा असा हा मालक कुणाला मतदान करत असेल? कोणत्या निकषावर मतदान करत असेल? असे बरेच प्रश्न कुणालाही पडू शकतात. …पण लोकशाही अशा कोरड्या माहितीमुक्त माणसांच्या आधारावर टिकून आहे हासुद्धा लोकशाहीचा विजय आहे. लोकशाहीचाही…आणि मालकशाहीचाही.

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -