Sunday, June 13, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स भविष्य वाचण्याची कसरत

भविष्य वाचण्याची कसरत

बालपण ही ज्या अर्थाने व्यक्तीसाठी शोकांतिका आहे तसंच समाजासाठी सदैव इतिहासमग्न असणं ही शोकात्म वाट आहे. गाडी चालवताना सतत आरशात पाहिलं तर समोर धडकण्याची भीती असते. फक्त समोरच पाहिलं तर मागून एखादं वाहन धडकण्याचीही शक्यता असते. वर्तमान, भूत आणि भविष्य या काळाच्या पटाचा संदर्भ लावून हे लक्षात घेतलं तर इतिहासाला पूर्णपणे न नाकारता, मात्र त्याचं सम्यक आकलन करत पुढं जाणं हे अधिक योग्य ठरतं. इतिहासाचं भूत जर नेहमीच मानगुटीवर बसलं तर वर्तमानाची मान आवळली जाईल. भविष्याची चिंता सतत उरात असेल तर वर्तमानात श्वास कोंडला जाईल.

Related Story

- Advertisement -

‘Man’s tragedy is that once he was a child’ नित्शे या प्रसिद्ध विचारवंताचं हे वाक्य मी वाचलं फॅनॉनच्या ‘ब्लॅक स्किन व्हाइट मास्कस’ या पुस्तकात. माणूस कधीतरी बाल्यावस्थेत होता, हीच शोकांतिका आहे! कृष्णवर्णीय आणि गौरवर्णीय लोक आपापल्या इतिहासाच्या कथांमध्ये कसे बंदिस्त झाले आहेत, या संदर्भात मांडणी करताना वापरलेल्या या वाक्याने मी विचारात पडलो.

आपण वयानं मोठे होतो, पण बालपणातल्या आठवणी तळाशी असतात. त्या आठवणी सुखद असतील तर आपण ‘लहानपण देगा देवा’ म्हणत पुन्हा पुन्हा स्मरणरंजन करत राहतो. आठवणी त्रासदायक असतील तर त्या टाळण्याचा, पुसून टाकण्याचा प्रयत्न करतो. त्या आठवणींची उजळणी करा किंवा त्या टाळा, त्या गुपचूप वहात असतात आपल्या धमन्यांतून.
बालपण हा प्रौढ माणसाचा इतिहास असतो. प्रौढपणातील त्याची/ तिची दृष्टी घडते बालपणातल्या असंख्य गोष्टींमधून. आठवणींची उजळणी आणि अन्वयार्थ लावला जातो तो प्रौढपणात विकसित झालेल्या दृष्टीतून. प्रौढ माणसातही एक लहान मूल दडलेलं असतंच. त्या सगळ्यातून नवं जग उलगडत असतं.

- Advertisement -

मोठेपणी आपण आयुष्यात जे काही करतो त्याचा एक धागा नेहमीच बालपणात अडकलेला किंवा जोडलेला असतो. उदाहरणार्थ अनुराग कश्यप यांच्या सिनेमातील हिंसा, प्रेम या सार्‍यावर त्यांच्या बालपणातील अनुभवांचा काही प्रमाणात ठसा आहे. अशी असंख्य उदाहरणं सांगता येतील.

बालपण हा प्रौढ माणसाचा इतिहास हे मान्य केलं तर या इतिहासात किती काळ बंदिस्त व्हायचं, किती काळ तिथेच अडकायचं, हा कळीचा मुद्दा आहे. एका व्यक्तीसाठी जसा बालपण हा इतिहास आहे तसंच समूहांचंही बालमानस आहे. त्यांची हरेकाची इतिहासाची वेगवेगळी धारणा आहे. जितके समूह तितक्या ऐतिहासिक आख्यायिका. फॅनॉन हे विचारवंत याविषयी प्रश्न उपस्थित करतात. गौरवर्णीयांनी आणि कृष्णवर्णीयांनी आपापल्या या कथानकांना ओलांडून यातून मुक्त झालं पाहिजे, अशी आग्रही मांडणी करतात.

- Advertisement -

नित्शे यांचं आणखी एक विधान आहे ते असं only something that has no history can be defined! ज्याला इतिहास नाही अशाच बाबींची व्याख्या केली जाऊ शकते. व्याख्या ही ठाम स्वरूपाची असते. सापेक्षतेला त्यात कमी वाव असतो. ज्या बाबीला इतिहास नाही तिची व्याख्या होऊ शकते, कारण इतिहास आला की वेगवेगळ्या ‘व्हर्जन्स’ आल्या ! तिथे पूर्वग्रह, धारणा, गृहीतकं या सार्‍या बाबी येतात आणि मग ठोस, नेमकी व्याख्या करता येत नाही.

अमेरिकेसारख्या देशाला फार मोठा इतिहास नाही आणि म्हणून अमेरिका पुढे झेपावली, असा एक युक्तिवाद केला जातो. या युक्तिवादावर मतमतांतरं असू शकतात. मुळात अशा प्रकारचा युक्तिवाद केला जातो. कारण इतिहासाचं अवजड ओझं नसल्यानं ती मढी उकरुन त्यावर वादंग निर्माण करण्यापेक्षा पुढं झेपावणं अधिक महत्त्वाचं मानलं जातं. इतिहासाचा छोटा पट अमेरिकेसाठी ‘ट्रम्प’ कार्ड आहे, असाही दावा केला जाऊ शकतो.

इतिहासाविषयी आपण ठाम, ठोस भूमिका घेऊन अस्मिता तयार करु लागतो तेव्हा अधिक गंभीर आणि गुंतागुंतीच्या समस्या निर्माण होतात. कल्पना करा, एका चौकात दोन गाड्यांचा अपघात घडला. चौकात उभे असणारे, वाहन चालवणारे आणि ज्यांचं त्यावेळी या घटनेकडं लक्ष नव्हतं अशा प्रत्येकाची काही एक व्हर्जन असू शकते. त्यातून पूर्ण अंशाने सत्य कळेलच असं नाही. ही गोष्ट जर काही वेळापूर्वी घडलेल्या अपघाताबाबत घडू शकते तर पाचशे वर्षांपूर्वी अमुक कोणी आक्रमण केलं होतं आणि काहीतरी उद्धध्वस्त केलं होतं, हे ठामपणे आपण कोणत्या आधारे म्हणू शकतो ?

अकिरा कुरासोवा दिग्दर्शित ‘राशोमान’ या सिनेमात अशीच वेगवेगळ्या व्हर्जन्सची गंमत सांगितली आहे. त्यावरुन ‘राशोमान इफेक्ट’ असा शब्दप्रयोगही रुढ झाला. ‘सत्य’ नेमकं काय, ते आपल्याला कुठं ठाऊक असतं ! ‘हत्ती आणि सात आंधळे’ या गोष्टीतल्याप्रमाणे प्रत्येकाचा हत्ती वेगळा. हा शोध घ्यायला हवा.

आपण माझीच व्हर्जन खरी आहे, अंतिम आहे, असा हेकेखोरपणा करतो तेव्हा ऐतिहासिक सत्यापासून तर आपण दूर जातोच, पण सोबतच समजून घेण्याच्या नव्या शक्यतांच्या वाटाही बंद करतो. अनेकदा आपलंच म्हणणं खरं आहे, असं म्हणताना तर्काऐवजी आपण भावनेला अधिक महत्व देत असतो. श्रद्धेला सत्य आणि धारणांना तथ्य म्हटलं तर बुद्ध होण्याऐवजी हतबुद्ध व्हायची वेळ येते.

बालपण ही ज्या अर्थाने व्यक्तीसाठी शोकांतिका आहे तसंच समाजासाठी सदैव इतिहासमग्न असणं ही शोकात्म वाट आहे. गाडी चालवताना सतत आरशात पाहिलं तर समोर धडकण्याची भीती असते. फक्त समोरच पाहिलं तर मागून एखादं वाहन धडकण्याचीही शक्यता असते. वर्तमान, भूत आणि भविष्य या काळाच्या पटाचा संदर्भ लावून हे लक्षात घेतलं तर इतिहासाला पूर्णपणे न नाकारता, मात्र त्याचं सम्यक आकलन करत पुढं जाणं हे अधिक योग्य ठरतं. इतिहासाचं भूत जर नेहमीच मानगुटीवर बसलं तर वर्तमानाची मान आवळली जाईल. भविष्याची चिंता सतत उरात असेल तर वर्तमानात श्वास कोंडला जाईल. वर्तमानाला भूत आणि भविष्यापासून पूर्णपणे तोडणं तर शक्यच नाही, पण त्या दोहोंची वर्तमानात कितपत लुडबूड असावी, हे आपल्याला समूह म्हणून ठरवायला हवं. सामूहिक स्मरणरंजनाच्या झंझावातात आपल्या वर्तमानाचं तारु भरकटणार का, हा खरा सवाल आहे. विंदा करंदीकर यांनी एका कवितेत म्हटलं आहेः

इतिहासाचे अवजड ओझे
डोईवर घेऊनि ना नाचा
पदस्थल करुनि त्याचे
वरती चढूनि भविष्य वाचा

इतिहासाचं ओझं डोक्यावर घ्यायचं की इतिहासातून काही शिकायचं ? अस्मितेचे जलसे काढायचे की दीर्घ ऐतिहासिक परंपरेतलं संमिश्र संस्कृतीचं सारं समजावून घ्यायचं ? इतिहासातून द्वेष करायला शिकायचं की ‘गंगा जमनी तहजीब’ संस्कृतीचा, प्रेमाचा उद्घोष करायचा? एकमेकांच्या विरोधात तलवारी काढायच्या की हातात पुस्तकं घ्यायची ?
उत्तरं आपल्या समोर आहेत. आपल्याला योग्य ते निवडावं लागेल. प्रत्येक दिवस ऐतिहासिक ठरत असताना इतिहासातून योग्य ते निवडता आलं तरच जगण्यात काही राम आहे. आपापल्या रंगांचे चष्मे फेकून देऊन इतिहास नीट समजून घेतला तरच भविष्य वाचण्याची कसरत आपल्याला जमेल.

-श्रीरंजन आवटे

- Advertisement -