घरफिचर्स...साथी हाथ बढाना!

…साथी हाथ बढाना!

Subscribe

माझ्या मोबाईलवर असाच मजल-दरमजल करत तो व्हिडिओ आला. तो व्हिडिओ पाहताना त्या एका क्षणी का कुणास ठाऊक, मला ‘नया दौर’ मधलं ते गाणं आठवलं...‘साथी हाथ बढाना, एक अकेला थक जायेगा मिल कर बोझ उठाना.’ हे गाणं सुरूवातीपासून शेवटापर्यंत मजुरांच्या मनातली भावना सांगतं. अंग अक्षरश: मोडून काम करणार्‍यांची ते गाणं ही एक कैफियत आहे...आणि त्याच कैफातलं ते गाणं आहे. ह्या गाण्याच्या दुसर्‍या अंतर्‍यात साहिरनी लिहिलं आहे - मेहनत अपनी लेक की रेखा, मेहनत से क्या डरना...कल गैरों की खातिर की, आज अपनी खातिर करना.

ती एका मजुराची मुलगी. असेल सात-आठ वर्षांची. काळीसावळी, पण निरागस. पायपीट करत चाललीय. वैशाखातलं भाजून काढणारं ऊन. अशा उन्हात तो लहानगा जीव मजुरांच्या त्या तांड्याबरोबर चाललाय. तांडा ज्या वाटा धुंडाळत चाललाय त्यांच्याबरोबर त्या वाटेने ती चाललीय. चालता चालता एक अशी वेळ येते की त्या जीवाला, त्या लहानग्या पोरीला मजुरांच्या त्या तांड्याच्या चालण्याचा वेग झेपणं जड होत चाललंय. तांडा पुढे आणि ती मागे असं आता होऊ लागलंय. शेवटी मजुरांच्या त्या तांड्याला आपला वेग कमी करावा लागलाय. पुढे तर तिचा कसनुसा चेहरा बघून मजुरांच्या सगळ्या तांड्याला एका ठिकाणी थांबावंं लागतंच. ती साफ दमछाक झालेली मुलगी एका ठिकाणी हळूच बसते. आपल्यामुळे सगळ्यांना हा स्वल्पविराम घ्यावा लागला ह्याचा थोडा ओशाळवाणा आणि बराचसा अपराधी भाव त्यातही तिच्या चेहर्‍यावर दिसतो.

शिळेसारख्या एका दगडावर ती बसते न बसते तोच तिचे हात तिच्या थकल्या-भागल्या तळपायांकडे जातात. आपल्या तळपायांवर ती हळुवारपणे आपले इटुकले हात फिरवत राहते. लहानग्या वयातली तिची ती अदा, जगाकडून खूप काही शिकलेल्या अनुभवी बाईसारखी वाटते …आणि नेमक्या त्याच वेळी कोणत्या तरी चॅनेलचा तो रिपोर्टर तिच्याजवळ पोहोचतो. मजुरांच्या वाटेवर तो आधीच दबा धरून बसलेला असतो.

- Advertisement -

त्याला तिचा बाइट घ्यायचा असतो. तो तिला लाडानेच विचारतो, ‘क्या हुवा, जो यहाँ रूक गयी, बैठ गयी?’
तिच्या चेहर्‍यावर अजूनही ओशाळल्याची भावना असते. आपल्यामुळे आपल्या आईवडिलांना, आपल्या अख्ख्या तांड्याला मध्येच असं थांबावं लागलं ह्याचं अपराधीपण तिच्या चेहर्‍यावरून अजूनही पुसलं गेलेलं नसतं. ती त्या अपराधी सुरातच त्या रिपोर्टरला उत्तर देते, म्हणते, ‘चलते थे, थक गये.’
तिच्या बोलण्यातही कमालीचा थकवा ऐकू येत असतो…आणि तो ऐकू येण्यापेक्षा जास्त डोळ्यांनी दिसतो.
रिपोर्टरच्या सहकार्‍याचा कॅमेरा तिच्या तळपायांवर रोखला जातो. तिचे इटुकइवले काळेसावळे पाय धुळमातीने माखलेले दिसतात. तिच्या पायाखाली तिची अंगठा तुटून लोंबणारी तुटकीफुटकी चप्पल दिसते.
तो रिपोर्टर तिला पुन्हा प्रेमाने, पण खोदून प्रश्न विचारतो, ‘ऐसे कैसे चलते चलते थक गये?’
ती आणखी ओशाळते, म्हणते, ‘चलते जो थे, थक गये.’
तिच्या त्या पोरवयात तिच्याकडे त्याच्या पुढचं स्पष्टीकरण नसतं. तिचा आपल्या तळपायांवरचा हात तळपायांपासून दूर होऊ शकत नसतो.

माझ्या मोबाईलवर असाच मजल-दरमजल करत तो व्हिडिओ आला. जितक्या वेळा तो व्हिडिओ मी पाहिला तितक्या वेळा तो व्हिडिओ पाहताना आणि विशेषत: त्या मुलींचं त्या अपराधी भावनेतलं ‘चलते जो थे, थक गये’ हे आर्जव ऐकताना काळीज पिळवटून गेलं. तुमच्यामाझ्या घरातल्यासारखीच ती केवढी तरी लहान पोर!…माणसाच्या जीवावर बेतलेल्या कुठल्या तरी एका भयंकर आजाराच्या काळात आपल्या मजूर आईबापाचा एक परका मुलुख सोडून आपल्या सख्ख्या मुलुखात जायचं आहे इतकंच त्या क्षणी तिच्या गावी आहे. विस्तवासारख्या वास्तवाच्या गावातली ती पोर तळपायाला जाणवणारी मुकी वेदना जिथे एकट्यादुकट्या शब्दापलीकडे सांगू शकत नाही तिथे एखादा रिपोर्टर आणखी खोदून खोदून तिला काय विचारणार!

- Advertisement -

तो व्हिडिओ पाहताना त्या एका क्षणी का कुणास ठाऊक, मला ‘नया दौर’ मधलं ते गाणं आठवलं…‘साथी हाथ बढाना, एक अकेला थक जायेगा मिल कर बोझ उठाना.’ हे गाणं सुरूवातीपासून शेवटापर्यंत मजुरांच्या मनातली भावना सांगतं. अंग अक्षरश: मोडून काम करणार्‍यांची ते गाणं ही एक कैफियत आहे…आणि त्याच कैफातलं ते गाणं आहे. ह्या गाण्याच्या दुसर्‍या अंतर्‍यात साहिरनी लिहिलं आहे – मेहनत अपनी लेक की रेखा, मेहनत से क्या डरना…कल गैरों की खातिर की, आज अपनी खातिर करना.

आज लॉकडाऊनच्या काळात मजुरांची जी कोंडी आणि कोंडमारा झाला आहे तो पाहता ‘कल गैरों की खातिर की, आज अपनी खातिर करना’ हे शब्द माझ्या शहरी मनाला फारच डागण्या देऊन जाताहेत. डागण्या देण्याचं कारणही तसंच आहे – साहिरजी म्हणतात त्याप्रमाणे आमच्या शहरात येणार्‍या मजुरांनी ‘गैरों की खातिर’ केलीच असेल तर ती हीच की ह्या शहरातल्या आभाळाला डोकं टेकवणार्‍या आलिशान इमारती बांधल्या, त्यासाठी हाडाची काडं करून विटा रचल्या, पण ती इमारत राहण्याजोगी झाल्यावर त्यांनी कधीच म्हटलं नाही की ही इमारत बांधण्यात आमचा सहभाग होता, पण ढेरपोट्या बिल्डरांनी मात्र छाती पुढे काढून सांगितलं की ही इमारत हे आमचं उत्पादन आहे. साहिरजींनी लिहिलेल्या त्या गाण्यातली मजुरांची ‘गैरों की खातिर’ नेमकी हीच आहे. जे फक्त भूमीपूजनासाठी अवजड कुदळ हातात घेतात आणि ज्यांचा जन्मच मुळी कुदळफावडं अंगावर वागवण्यासाठी होतो त्यांच्या जीवनातला हा ढळढळीत फरक आहे. एकवेळ हे बिल्डर संघटित असतात, पण हे मजूर असंघटित असतात हे वास्तव तो फरक आणखी पुढे नेत असतं.

पूर्वी त्यांच्या जगण्याची गोष्ट घेऊन मुख्य प्रवाहातले सिनेमे बनायचे. त्यात दिलीपकुमार, राज कपूर वगैरे आघाडीचे नट पडद्यावर मजूर साकारायचे. पुढे सिनेमा रंगीत झाला आणि त्यानंतर डिजिटल चंगळवादात उभाआडवा लडबडून निघाला. अशा वेळी बिचार्‍या मजुरांचं जगणं किमान पडद्यावर किंवा व्हर्च्युअली जगायला कोण तयार होणार?…आणि ते कळकट-मळकट जगणं विकत बघायलाही कोण जाणार? कामगार कायदे जिथे भस्मसात झालेत तिथे त्यांच्या जगण्याचीही वासलात लागली आहे. त्यांच्यासाठी काम करणार्‍या लाल रंग ल्यायलेल्या पक्षांनी इतरांसारख्या तत्वशून्य तडजोडी न केल्यामुळे क्षीण होत चालले आहेत. त्यांचा कैवार घेणार्‍यांची कुणी दखल घेत नाहीय. अशा वेळी कुणाच्या तरी नवकवितेतल्या सैबेरियन पक्ष्यांच्या थव्याप्रमाणे त्यांचा तांडाही स्थलांतरित होतोय.

…अशा वेळी तो आवाज सारखा ऐकू येतोय…‘चलते जो थे, थक गये.’…पण हा थकवा आज तितका खोल, तितका आत कुणाला कळणार आहे का?…साहिरसारख्यांना तेव्हा नक्की कळला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -