घरफिचर्सबिग बॉस माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट - शर्मिष्ठा राऊत

बिग बॉस माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट – शर्मिष्ठा राऊत

Subscribe

‘माय महानगर’च्या ‘महानगर आणि मी’ या स्पेशल शोमध्ये कला, मनोरंजन क्षेत्रातील विविध मान्यवरांना आमंत्रित करण्यात येतं. यावेळी सध्या 'सुखाच्या सरींनी हे मन बावरे', या कलर्सवरील कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रेक्षकांना भेटणारी अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत हिला बोलावण्यात आलं होतं. त्यावेळी तिने सर्वच प्रश्नांना अगदी मनमोकळेपणाने उत्तरं दिली.

‘बिग बॉस हा प्लॅटफॉर्म तुम्हाला खूप काही शिकवतो. एक माणूस म्हणून डेव्हलप व्हायला तुम्हाला मदत करतो. खरं सांगायचं तर बिग बॉस मराठी हा माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट ठरला’, अशी मनापासून प्रतिक्रिया अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतने दिली आहे. mymahanagar.comच्या फेसबुक लाइव्हवर ‘महानगर आणि मी’ या स्पेशल शोमध्ये शर्मिष्ठा राऊतला आमंत्रित करण्यात आलं होतं. यावेळी ती बोलत होती. यावेळी बिगबॉसमधले विशेष अनुभव, पडद्यामागच्या गोष्टी आणि अभिनय क्षेत्रातली तिची वाटचाल, याविषयी शर्मिष्ठाने मनमोकळेपणाने गप्पा मारल्या.

बिग बॉसमध्ये आधी स्पर्धा, नंतर मैत्री

यावेळी बोलताना शर्मिष्ठाने बिग बॉसमधल्या तिच्या प्रवेशाविषयी सांगितलं. ‘बिग बॉसमध्ये तुम्हाला नवीन काहीही करायचं नसतं. तुम्ही चांगलं वागण्याचा खोटा प्रयत्न ४ दिवस करू शकता, पण नंतर तुम्ही समोर यायला लागता. त्यामुळे जसे आहात, तसेच वागायला हवं. तसेच प्रेक्षकांना आवडलात तर फायदा. मला बिग बॉसमुळे माणूस म्हणून डेव्हलप व्हायला फार मदत झाली. तो माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट ठरला’, असं ती म्हणाली. त्याच वेळी मेघा धाडेसोबतच्या मैत्रीविषयीची ती बोलली. ‘मी मेघाला आधीच सांगितलं होतं, की तू मला बिनधास्त नॉमिनेट कर. त्यासाठी मनात गिल्ट आणू नकोस. मी माझ्या सख्ख्या बहिणीबरोबर कॅरम खेळताना तिला क्वीन जिंकू देणार नाही. पण याचा अर्थ माझं तिच्यावर प्रेम नाही, असं नाही. त्यामुळे हा गेम म्हणून खेळणं गरजेचं आहे’, असं ती म्हणाली.

- Advertisement -
Sharmishtha Raut FB Live
अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत

बिग बॉसमध्ये जायला आई-बाबांचा नकार होता!

दरम्यान, बिग बॉसमध्ये जायला आई-बाबांचा नकार होता असं शर्मिष्ठा म्हणाली. ‘बाबांनी थेट मला सांगितलं होतं की जायचं नाही. आपल्याला सुप्रसिद्धी हवीये, कुप्रसिद्धी नकोय. हिंदीमधली भांडणं पाहून ते म्हणाले असली भांडणं करायची नाहीयेत. आई तर म्हणायची हिंदीमध्ये मी पाहिलं आहे, तिथे गेल्यावर ते अफेअर करावे लागतात. सगळे लफडी करतात. अजिबात जायचं नाही. मी नुकतीच एका फॅमिली ट्रॉमामधून बाहेर आले होते. त्यामुळे त्यांचा कन्सर्न योग्यच होता. पण मला म्हणूनच तिथे जायचं होतं. स्वत:ला सिद्ध करण्यासाठी. तेव्हा मग आई-बाबा तयार झाले. त्यामुळेच पहिल्याच दिवशी मी बाकीच्या चर्चा टाळण्यासाठी माझा पर्सनल प्रॉब्लेम आणि माझा बिगबॉसमध्ये येण्याचा हेतू क्लिअर करून टाकला होता’, असं शर्मिष्ठाने यावेळी बोलताना सांगितलं.

ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून करिअरची सुरुवात

शर्मिष्ठाने ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. यावेळी बोलताना तिने त्या आठवणींना उजाळा दिला. या क्षेत्रात काम करायचा प्लॅनच नव्हता, असं शर्मिष्ठा म्हणाली. ‘मला शिक्षण करून ९ ते ६ असा जॉब करायचा होता. पण सगळं उलटंच झालं. सो सुरुवातीला ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून काम करायचे. सुबोध भावे आणि आदिती सारंगधरची वादळवाट नुकतीच संपली होती. तेव्हा दुसऱ्या सीरीअलमध्ये आदितीच्या मागे २५ ते ३० मुलींमधली एक होते. उरूस या फिल्ममध्येही बॅकशॉटमध्ये काम केलं. तेव्हा योगेश फुलपगरकडून एका सीरीअलमध्ये लीडसाठी ऑफर आली. त्यांना लीड बदलायची होती. तेव्हा बाबांनी सपोर्ट केला. होकार दिला’, असं ती म्हणाली. त्यातून पहिल्यांदा जेव्हा कॅमेरा फेस केला, तेव्हा दिग्दर्शकाने सांगितलेलं कसं काहीच कळत नव्हतं, आणि ती कशी गोंधळून गेली, हेसुद्धा शर्मिष्ठाने यावेळी सांगितलं.

पहिला ब्रेक कसा मिळाला?

महेश कोठारेंची ‘मन उधाण वाऱ्याचे’ या सीरिअलला शर्मिष्ठा तिचा पहिला ब्रेक मानते. त्याच सीरिअलमध्ये दुसऱ्या एका कॅरॅक्टर रोलसाठी ती आधी ४ वेळा रिजेक्ट झाली होती. मात्र, नंतर अभिजित केळकरच्या सांगण्यावरून ती पुन्हा ऑडिशनला गेली आणि तिला तो रोल मिळाला, अशी आठवण यावेळी शर्मिष्ठाने सांगितली.

- Advertisement -

‘ताई-काकू माझ्यातून जातच नव्हती’

उंच माझा झोकामधली शर्मिष्ठाची ताई-काकू ही भूमिका विशेष लोकप्रिय ठरली. याविषयी बोलताना तिने सीरिअल संपली तेव्हाची आठवण माय महानगरशी शेअर केली. ‘तुम्ही खूप इन्व्हॉल्व्ह होता एखाद्या कॅरॅक्टरमध्ये. ताई काकू सीरिअलमध्ये थोड्या आधी वारल्या. त्यामुळे टीमने माझा सेण्ड ऑफ केला. सगळे गेले. पण मी एका स्पॉटबॉयला थांबवून ठेवलं होतं. सगळे गेल्यावर मी अक्षरश: त्या घरातल्या, कीचनमधल्या वस्तूंना हात लावून पाहात होते. ताई काकू माझ्यातून जातच नव्हत्या’, असं सांगताना शर्मिष्ठा नॉस्टॅल्जिक झाल्याचं पाहायला मिळालं.

‘मन बावरे’मधली संयोगिता शर्मिष्ठापेक्षा वेगळी कशी?

यावेळी सध्या सुरू असलेल्या ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ या मालिकेविषयी शर्मिष्ठा भरभरून बोलली. या सीरिअलमधली संयोगिता ही शर्मिष्ठाच्या मूळ स्वभावापेक्षा थोडी वेगळी असल्याचं तिने सांगितलं. ‘मी वेस्टर्न आऊटफिट घालत नाही. पण संयोगिता घालते. संयोगिताने एखाद्यावर जीव लावला तर खूप जीव लावते. शर्मिष्ठाही तशीच आहे. संयोगिताला कधीकधी प्रश्न पडतो की काय करावं? ती थोडी उथळ आहे. पण शर्मिष्ठा तशी नाही’, असं ती म्हणाली.

Sharmishtha Raut
फेसबुक लाइव्हमध्ये अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत

आणि त्या आजीबाईंनी शर्मिष्ठाला थोबाडीत मारली!

दरम्यान, यावेळी बोलताना शर्मिष्ठाने तिच्या प्रेक्षकांविषयीचा एक भन्नट अनुभव शेअर केला. ‘बायका बोचकारतात, चिमटे काढतात. आम्ही कार्यक्रमांना पाहुणे म्हणून जातो, तेव्हा गर्दी असते. तेव्हा बायका चिमटे काढतात. मी ‘उंच माझा झोका’ मालिका करत होते. तेव्हा एकदा मुंबईहून पुण्याला जात असताना फूड मॉलला थांबले, तर एका कुटुंबाने मला ओळखलं. माझ्याशी गप्पा मारल्या. त्यांच्यातल्याच एका ७०-७२ वर्षांच्या आजींना त्यांनी मला भेटवलं. पण त्यांनी जवळ घेत साटकन थोबाडीत लावली. वर मला म्हणाल्या, असं कधी वागतात का घरात? पण अर्थात ती माझ्या कामाची पावती असते. त्यामुळे मी ते त्या अर्थाने घेते’, असं शर्मिष्ठाने सांगितलं.

‘मला हिरोईन नाही व्हायचं, अभिनेत्री व्हायचंय’

आपल्या प्रवासाबद्दल यावेळी शर्मिष्ठा राऊतने संवाद साधला. ‘मी आधीपासून ठरवलं होतं की मला हिरोईन नाही व्हायचंय, अभिनेत्री व्हायचंय. त्यामुळे माझ्या अभिनयाचे वेगवेगळे पैलू मला दाखवता आले. कधी गंभीर, कधी कॉमेडी, कधी नाटक, कधी सिनेमा. लीड रोल नाही मिळाला तरी हरकत नाही. मी या क्षेत्रात जरा उशिरा आल्यामुळे तसं झालं असेल. पण मला त्याचं दु:ख नाही. कॅरेक्टर रोलला तुम्हाला वेगवेगळे पैलू देता येतात’, असं ती म्हणाली. तसंच ‘पण एक आहे, मला एक मॅच्युअर्ड लव्हस्टोरी करायची आहे. मग हिरो कुणीही असला तरी चालेल, पण लव्हस्टोरी हवीये’, असं सांगायला देखील ती विसरली नाही.

‘तुम्हाला साईड बिझनेस असायला हवा’

‘या क्षेत्रात काम करताना तुम्ही पूर्णपणे कमाईसाठी यावरच अवलंबून राहू नये. तुम्हाला साईड बिझनेस असायला हवा. त्यामुळे तुम्हाला कोणाच्या दबावाखाली येण्याची वेळ येत नाही’, असं शर्मिष्ठा यावेळी म्हणाली. मीटू प्रकरणावर बोलताना तिने ही प्रतिक्रिया दिली. ‘जसे तुम्ही असता, तसं तुम्हाला मिळतं. तुम्ही तशी हिंट देता, वागता म्हणून तसं होतं. त्यामुळे तुम्ही स्पष्टवक्ते असणं गरजेचं आहे. तुम्ही दुसऱ्याच्या दबावाखाली न येणं गरजेचं आहे’, असं ती म्हणाली.

शर्मिष्ठाला ‘या’ गोष्टीचा माज आहे!

दरम्यान यावेळी बोलताना आपल्याला एका गोष्टीचा माज आहे असं शर्मिष्ठाने ठासून सांगितलं. ‘मला अभिनय येत नसेल, बाकी काही येत नसेल, पण मला जेवण उत्तम बनवता येतं, या गोष्टीचा मला माज आहे. बिग बॉसच्या घरात देखील मी मेघा आणि आऊसोबत जेवण बनवायचे. मी ७०-८० पोळ्या लाटायचे एका वेळी. त्यामुळे मला तिथून निघताना सगळ्यांनी अन्नपूर्णा म्हणून कॉम्प्लिमेंट दिली होती’, असं तिने सांगितलं.

आयुष्यात एक रेस्टॉरंट उघडण्याचं आपलं स्वप्न असल्याबद्दल देखील तिने यावेळी सांगितलं. ‘मी युट्यूबवर सुद्धा एखादं कुकरी शोचं चॅनल सुरू करण्याचा विचार करत आहे. त्यासोबतच मला प्रोड्युसर सुद्धा व्हायचं आहे. त्या दृष्टीने मी प्रयत्न सुरू केले आहेत. व्हायाकॉमचची खटला-बिटला ही फिल्म येतेय. त्याचं दिग्दर्शन परेश मोकाशी यांनी केलं असून त्यात एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून मी काम केलंय’, असं ती यावेळी म्हणाली.

पाहा संपूर्ण मुलाखत

अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतसोबत धमाल गप्पा!

#LIVE : अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतसोबत धमाल गप्पा! कॉमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारा आणि थेट फेसबुक लाइव्हमध्ये त्यांची उत्तरं मिळवा… | #MyMahanagar

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Friday, January 25, 2019

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -