घरफिचर्सआत्मसन्मान जपणारी मानिनी

आत्मसन्मान जपणारी मानिनी

Subscribe

पं. महादेवशास्त्रींना कथा सुचली आणि त्यांनी ती लिहून तिला ‘मानिनी’ असे नाव दिले. शास्त्रीबुवांच्या प्रसन्न शैलीमुळे ही गोष्ट वाचकांना खूपच आवडली. 1950-60 च्या दशकात कौटुंबिक चित्रपटांना बहर आला होता, तेव्हा त्या दशकाच्या अखेरीला, अनंत माने यांनी तमाशाला प्राधान्य असणारा, ‘सांगत्ये ऐका’ हा चित्रपट तयार केला होता. त्याला अभूतपूर्व यशही मिळाले. मग तमाशापटांची लाट आली. अशा वेळीच माने यांनी ‘मानिनी’ या चित्रपटाची घोषणा केली.

शुक्रवारची कहाणी माहीत नाही असा मराठी माणूस, शोधून काढायचा म्हटले, तरी मिळणे बहुधा अशक्यच. त्या कहाणीतली बहीण गरीब असूनही ताठ मानेने जगते. आजकाल याला आत्मसन्मान म्हणतात. एकदा भावाकडे ऐन जेवणाच्या वेळी गरिबीमुळे अपमान झाल्यावर ती तडक उठून, निमूट निघून जाते. नंतर तिच्यावर लक्ष्मीचा वरदहस्त आल्यावर भाऊ तिला आवर्जून जेवायला बोलावतो. तेव्हा प्रत्यक्ष जेवणाच्या वेळी, ती आपले दागिने मांडून त्यावर एक एक घास ठेवायला सुरुवात करते. अचंबित झालेला भाऊ विचारतो, हे काय करते आहेस? त्यावर ती म्हणते, मला माहीत आहे, हे आमंत्रण मला नसून माझ्याकडे आलेल्या लक्ष्मीला आहे. त्यामुळे तिला भरवतेय इ.इ. कहाणी सर्वांना बोध देऊन जाते.
बहुधा याच कहाणीवरून पं. महादेवशास्त्रींना कथा सुचली आणि त्यांनी ती लिहून तिला ‘मानिनी’ असे नाव दिले. शास्त्रीबुवांच्या प्रसन्न शैलीमुळे ही गोष्ट वाचकांना खूपच आवडली. 1950-60 च्या दशकात कौटुंबिक चित्रपटांना बहर आला होता, तेव्हा त्या दशकाच्या अखेरीला, अनंत माने यांनी तमाशाला प्राधान्य असणारा, ‘सांगत्ये ऐका’ हा चित्रपट तयार केला होता. त्याला अभूतपूर्व यशही मिळाले. मग तमाशापटांची लाट आली. अशा वेळीच माने यांनी ‘मानिनी’ या चित्रपटाची घोषणा केली.

हा एक धक्काच होता. पण माने यांनी दुसरा धक्का दिला, या चित्रपटाची नायिका जयश्री गडकर असेल, असे सांगून. त्यामुळे खुद्द शास्त्रीबुवाही त्यामुळे थोडे अस्वस्थ झाले होते. माने हा चित्रपट कसा बनवणार, अशी शंकाही शास्त्रीबुवांकडे बर्‍याच जणांनी व्यक्त केली होती. पण शास्त्रीबुवांनी मोठ्या विश्वासाने त्यांना आपल्या कथेवर चित्रपट बनण्याची परवानगी दिली, तुम्ही कराल ते योग्यच असेल, असेही म्हटले. मात्र त्यावेळी जयश्री गडकरला हे कितपत जमेल, अशी शंकाही त्यांनी बोलून दाखवली. त्यावर माने म्हणाले होते की, तुम्ही काळजी करू नका. तुमच्या कथेला पूर्ण न्याय देण्याची जबाबदारी माझी. आणि खरोखरच माने यांनी कथेला पुरेपूर न्याय दिला, हे मान्य करून शास्त्रीबुवांनी मालती (मालू) साकार करणार्‍या जयश्री गडकरचे कौतुक केले. माझा सुखद अपेक्षाभंग केलास, असे ते तिला म्हणाले.

- Advertisement -

माधव हा एक गरीब शिक्षक. त्याच्या परिस्थितीची कणव येऊन मालूच्या वडिलांनी त्याला आश्रय दिलेला असतो. मालू आणि त्याचे प्रेम जमते. ते विवाह करण्याचा निर्णय घेतात. वडिलांना हे मान्य नसते. ते नवविवाहितांना आशीर्वाद देतात, तोही बायकोच्या सांगण्यावरून. माधव, मी कोणत्या हेतूने आश्रय दिला होता, पण तू मला फसवलेस, तू अस्तनीतला निखारा आहेस, असे म्हणतात. तुला धड नोकरी नाही, घर नाही, माझ्या मुलीला कसा सांभाळशील, या त्यांच्या प्रश्नावर माधव गप्पच राहातो. घर सोडताना मालू रडायला लागते. आई म्हणते, रडू नको मुली. मुलींना कधी ना कधी माहेरचे घर सोडण्याची वेळ येतेच. त्यावर मालू सांगते की, तिला घर सोडायचे नाही, तर आईला सोडून जाण्याच्या कल्पनेने रडू येतेय.
दोघेही तेथून निघून माधवचा मित्र श्यामरावकडे येतात. तो त्यांचे स्वागत करतो. जागा मिळेपर्यंत येथे रहा म्हणतो. पण त्याच्या बायकोला हे पसंत नसते. दोघे फिरायला म्हणून जातात. परत येतात तेव्हा त्यांना नवरा बायकोचा वाद ऐकू येतो. ते तेथे न थांबण्याचे ठरवतात. मित्राचेही ऐकत नाहीत. दुसर्‍याच दिवशी टांगा करून स्टेशनकडे निघतात. मालू तिच्या घराकडे टांगा न्यायला सांगते. पण टांगा तेथे थांबल्यावर मात्र तशीच टांग्यात बसून राहते. माधव घरी जाऊन यायला सांगतो, पण ती नको, म्हणून टांगेवाल्याला स्टेशनकडे न्यायला सांगते. गाडीतून ते गावाकडे निघतात.

गाडीतून स्टेशनवर उतरल्यावर गावी जाण्यासाठी बैलगाडी ठरवायला जातात. पण गाडीवान जे पैसे सांगतो ते ऐकल्यावर नको, आम्हाला परवडणार नाहीत, असे मालू सांगते. मग तो गाडीवान त्यांना सांगतो, तुम्हाला वाटतील तेवढे द्या. ते खुशीने गाडीत बसतात. गाडी चालवतानाच गाडीवान गावात तुमचे कोण आहे, असे विचारतो, त्यावर माधव कुणीच नाही. आमचं घर मात्र आहे, तुम्हाला दादा देशपांडे माहीत आहेत का, त्यांच्या घरी जायचंय, असं म्हणतो. ते तर आता नाहीत, आणि घरही पार मोडलेय, असे गाडीवान सांगतो. मग गाडीवान तू कोण असा प्रश्न करतो. त्यावर मी त्यांच्या मुलीचा मुलगा, त्यांचा नातू. म्हणजे तू चंद्रकलाचा मुलगा, अरे मी तर तुमच्याकडं काम करायचो. असं सांगतो. त्यांचे सूर जुळतात.

- Advertisement -

घर म्हणजे दाराची चौकट आणि पडलेल्या भिंती असतात. तरीही माधव गाडीवानाकडून मापटंभर तांदूळ आणून मालतीला माप ओलांडून गृहप्रवेश करायला सांगतो. मग ते गाडीवान आणि त्याची पत्नी तानीबाई यांच्या मदतीने छानसे घर बनवतात. अंगण साफ करतात. मालू आता बाग करायची, मला फुले फार आवडतात, असे म्हणते. माधवच्या नोकरीचे मात्र अद्याप जमत नसते. त्याला नकारच मिळत असतो. त्यामुळे ते घरामागच्या मोठ्या वावरात पीक घ्यायची तयारी करतात. त्यांना गाडीवान मका करा, कणसे विकून पैसा मिळेल, असे सांगतो. त्यांच्या श्रमांना यश येते. माधव कणसे घेऊन स्टेशनवर विकतो. तेव्हा आलेल्या गाडीतून त्याला हाक येते. तो कणसाचा हारा घेऊन डब्याजवळ जातो, त्याला हाक मारणारा मालूचा भाऊ सखारामच असतो. तो माधवला ओळखतो, माधवही मीच तो असे सांगून परततो. सखाराम घरी येताच सारे आईवडिलांना सांगतो. वडील तिनंच हे ओढवून घेतलेय असे म्हणतात. काही काळाने मालूच्या बहिणीचे लग्न ठरते. तिला आमंत्रणही येते. माधव तिला जाऊ नको असे म्हणतो, ती निराश होऊन रडू लागते. तिचा मुलगा माधवला तू तिला रागवलास का असे विचारतो. त्यावर तो नाही, असे सांगतो. शेवटी सारेजण लग्नाला जातात. तिथे मालूच्या बहिणीची नथ हरवते. ती मालूवरच संशय घेते. वडीलही तिला साथ देतात. मालू ते ऐकते आणि स्वतःच आपली बॅग आणून तपासायला सांगते. बॅगमध्ये नथ सापडत नाही. पण या अपमानाने व्यथित होऊन मालू ताबडतोब परत जायला निघते. ती भेटवस्तू घ्यायचेही नाकारते. आई तिची समजूत घालण्यात यशस्वी होत नाही. मालू परत गेल्याचा धक्का बसून ती अंथरूण धरते.

गावात सुधारणेचे वारे येते. लोकांच्या सहकार्याने कामे होऊ लागतात. सर्वांना काम मिळते. माधव आणि मालूदेखील शाळेत शिकवायचे काम करतात. त्यांची परिस्थिती सुधारते. आईची तब्येत मात्र बिघडतच जाते. ती औषध घ्यायलाही नकार देते. शेवटी मालूचे बाबा तिला आग्रह करतात तेव्हा, ती सख्याचे लग्न करून द्या मला सून बघायचीय असे म्हणते. त्यावर ते कबूल होतात व ती औषध घेते. लग्न होते. पण त्यासाठी मालू येत नाही, या धक्क्याने तिचा आजार अधिकच बळावतो. ती निधन पावते. त्याआधी सख्याकडून मालूचा मान राखीन, तिची काळजी घेईन असे वचन घेते. तिकडे मालू रात्री देवापाशी बसलेली असताना अचानक दिवा विझतो. ती दचकते.

ती दिवा लावायला उठते तोच तिला कुणीतरी आल्याची चाहूल लागते. ती दिवा घेऊन येते, असे सांगते आणि दिवा लावते. तिला तिची आईच आलेली पाहून आश्चर्य वाटते. केवळ तुला भेटायलाच आले असे आई सांगते. त्या दोघी खूप गप्पा मारतात, रडतातही. तेवढ्यात आई म्हणते, जावईबापू आले वाटतं, त्यांना दार उघड. मालू जाते. माधव आलेला असतो. त्याला ती आई आल्याचे सांगते. ते लगबगीने आत जातात. पण आत कोणीच नसते. दोघेही आश्चर्यचकित होतात. तुला भास झाला असेल, असे माधव म्हणतो. पण मालू म्हणते, खरंच सांगते, आई आली होती आम्ही खूपखूप बोललो, रडलो. तिनं मला एवढा अभिमान बाळगू नकोस, असे सांगितले.

नंतर आईच्या मृत्यूची बातमी देणारे पत्र येते. आईला वचन दिल्यानुसार सखा मालूकडे येतो. तिला भेट स्वीकारायला सांगतो. त्यावर आता मला कुणाचाच राग नाही आणि अभिमानही नाही. ज्या माणसावर रागावण्याचा मला हक्क होता, तेच आता सोडून गेले आहे, असे सांगून ती भेट स्वीकारते. तेवढ्यात माधव आणि तिचे वडील येतात आणि आता सारे काही विसरून जा, मीही यातून बरंच काही शिकलो आहे, असे म्हणतात आणि घार हिंडते आकाशी लक्ष तिचे पिलापाशी, या ओळींच्या नादावर चित्रपट संपतो.

जयश्री गडकरने समरसून काम केले आहे. चंद्रकांत गोखलेंनी सहज काम केले आहे. इंदिरा चिटणीसांची प्रेमळ आई लक्षात राहते. एरवी बर्‍याचदा त्या खाष्ट सासूच्या वगैरे भूमिकांत असत. त्यामुळे हा बदल चांगला वाटतो. दादा साळवी यांनी वडिलांचा ताठा आणि अखेरीला कोमलपणाही परिणामकारकपणे दाखवला आहे. रमेश देवची लहान भूमिकाही ध्यानात राहाते तीच गोष्ट शरद तळवलकर, वसंत शिंदे आणि हंसा वाडकर यांची. या सर्वांप्रमाणेच दिग्दर्शक अनंत माने यांनाही दाद द्यायला हवी. आणि वसंत पवारांच्या संगीताला. बहिणाबाई चौधरी आणि ग. दि. माडगुळकर यांच्या गीतांना त्यांनी सुरेख चाली दिल्या आहेत. आशा भोसले आणि सुमन कल्याणपूर यांनी त्या अविस्मरणीय बनवल्या आहेत. साठ वषार्र्ंनंतरही त्यांची गोडी अजिबात कमी झालेली नाही, त्याचप्रमाणे मानिनी’ या चित्रपटाचीही!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -