घरफिचर्समराठी कादंबरीच्या रचिताचे आकलन

मराठी कादंबरीच्या रचिताचे आकलन

Subscribe

सामाजिक-सांस्कृतिक नजरेतून मराठी कादंबरीचे वाचन करणारी समीक्षेची परंपरा सुरूवातीपासून होतीच; परंतु तिचे स्वरूप क्षीण असेच होते. ही परंपरा या काळात अधिक ठळक झाली. याच दृष्टीने मराठी कादंबरीच्या आशय-आविष्काराचा अन्वयार्थ दत्ता घोलप यांनी ‘मराठी कादंबरी: आशय आणि आविष्कार’ या समीक्षाग्रंथातून लावला आहे. कादंबरी निर्मितीची आशयसामुग्री ही सामाजिकतेशी निगडित असते. सामाजिक व्यवस्थांचे तळकोपरे कादंबरीमधून उजागर होत असतात.

कादंबरी हा विस्तृत सामाजिक-भाषिक अवकाशाला कवेत घेणारा वाङ्मयप्रकार आहे. सांस्कृतिक जीवनाशयाचा अन्वयार्थ लावणारा दस्तावेज आहे. अन्य कोणत्याही वाङ्मयप्रकारापेक्षा अधिक समाजलक्ष्यी असणारा हा प्रकार म्हणूनच अलिकडच्या काळात जीवनार्थ प्रकटणाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरलेला आहे. मराठी कादंबरीला सामाजिकतेचे भान साठोत्तरी काळानंतर अधिक तीव्रतेने येत गेले. जीवनवास्तवाला जाणीवपूर्वक कादंबरीचा आशय बनवले गेले. कादंबरीच्या आशयातून त्याच्या रूपालाही आकार प्राप्त होत असतो.

प्रयोगशीलताही आशयभारितच असते. कादंबरीचा आशय आणि आविष्कार यांचा सुटा-सुटा विचार करता येत नाही, याचे भानही मराठी समीक्षेला साठोत्तरीनंतरच आले. कलावाद की जीवनवाद हा वाद येथे निकाली निघाला. सामाजिक-सांस्कृतिक नजरेतून मराठी कादंबरीचे वाचन करणारी समीक्षेची परंपरा सुरुवातीपासून होतीच; परंतु तिचे स्वरूप क्षीण असेच होते. ही परंपरा या काळात अधिक ठळक झाली. याच दृष्टीने मराठी कादंबरीच्या आशय-आविष्काराचा अन्वयार्थ दत्ता घोलप यांनी ‘मराठी कादंबरी: आशय आणि आविष्कार’ या समीक्षा ग्रंथातून लावला आहे.

- Advertisement -

कादंबरी निर्मितीची आशयसामुग्री ही सामाजिकतेशी निगडित असते. सामाजिक व्यवस्थांचे तळकोपरे कादंबरीमधून उजागर होत असतात. त्यातून व्यक्तिमन आणि समाजमनाची स्पंदने व्यक्त होतात. कादंबरी ज्या अनुभवाचे दर्शन घडवते, त्या अनुभवाला त्या-त्या समुहाच्या संस्कृतीचा स्पर्श झालेला असतो. समाजावकाशातील जीवनतत्त्वे आणि जीवनरीतीच्या आविष्काराबरोबरच कादंबरी ही कोणत्या तरी विशिष्ट भूमीवर उभी असते. हा दृष्टीकोन या ग्रंथातील समीक्षेतून ध्वनित होतो. त्यातून मराठी कादंबरीतील आशयसूत्रे आणि रूपबंधाच्या घडणीचे विवेचनही आलेले आहे. दोन विभागात विभागलेल्या या ग्रंथात एकूण चौदा लेख आहेत.

पहिल्या विभागातील सहा लेख कादंबरी आणि सांस्कृतिकता, प्रयोगशीलता, वर्तमान, नेमाडे प्रभाव-आविष्कारविशेष नि ग्रामीणता या सूत्राद्वारे मराठी कादंबरीची दीर्घ स्वरूपी मांडणी केली आहे. कादंबरीचा आकृतिबंध आणि समाज यांच्या परस्परसंबंधाचा घेतलेला शोध वैशिष्ठ्यपूर्ण आहे. दुसर्‍या विभागातील आठ लेख कबीरा खडा बाजार में, हिंदू: जगण्याची समृध्द अडगळ, आगळ, ब-बळीचा, उजव्या सोंडेच्या बाहुल्या, इन्किलाब विरूध्द जिहाद, बगळा आणि चारीमेरा या एकेका कादंबर्‍यांचे विवेचन करणारे कादंबरी केंद्रित लेख आहेत. या कादंबर्‍यांतील अंतरंगातून सामाजिक वास्तव कशाप्रकारे प्रकटले आहे याचे मूल्यमापन केले आहे.

- Advertisement -

या ग्रंथातून एकूण मराठी कादंबरीच्या व्यापक पटाचा अवकाश विश्लेषणात सामावून घेत महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली असली तरी या विवेचनाचा मुख्य रोख जागतिकीकरणोत्तर काळातील कादंबरीवर राहिलेला आहे. चौदापैकी अकरा लेख नव्वद नंतरच्या मराठी कादंबरीची मीमांसा करणारे आहेत. पैकी ‘आजची मराठी कादंबरी: सांस्कृतिक परिप्रेक्ष्य’, ‘1990 नंतरच्या मराठी कादंबरीतील प्रयोगशीलता’ व ‘कादंबरी: वर्तमानाचे नवे रचित’ हे तीन लेख या काळातील मराठी कादंबरीची स्वरूपमीमांसा करणारे महत्त्वाचे लेख आहेत. यातून दूरगामी प्रभाव करणार्‍या अनेकविध पातळीवरील बदलाने घडवलेल्या या काळाच्या संवेदनस्वभावाचे कोणते चित्र मराठी कादंबरीतून उमटले आहे, याचा मर्मज्ञ शोध घेतला गेला आहे.

सामाजिक-सांस्कृतिक आणि प्रयोगशीलतेच्या अंगाने केलेली ही पाहणी तसेच आशयाविष्काराचे वर्तमान घटितांशी असणार्‍या नात्याचा लावलेला अन्वय मूलगामी आणि दिशादर्शक आहे.

साहित्य आणि संस्कृतीमधील अंतरसंबंधातील सेंद्रियत्व आणि त्याचा कादंबरीतील आशय नि रूपबंधाशी असणार्‍या जैवसंबंधाचा अनुबंध मांडत केलेली कादंबर्‍यांची तपासणी व्यामिश्र सांस्कृतिक पर्यावरणाचे विश्लेषण करणारी आहे. काळाला प्रभावित करणार्‍या सामाजिक, आर्थिक, राजकीय घडामोडींचा निर्देश करत वेगवेगळ्या सामाजिक स्तरातील व महाराष्ट्रातील विस्तृत भू-प्रदेशातील पोटसमूह-पोटसंस्कृतीतून आलेल्या लेखकांच्या कादंबरीगत संस्कृती संवेदनाचा समर्पक वेध यातून घेतलेला आहे. जागतिकीकरणाचे प्रभावसंचित, वास्तववादी समूहसंस्कृती प्रक्रियेचा मूल्यशोध, कृषिकेंद्रित वास्तव आणि मूल्यव्यवस्था, ऐतिहासिक-पौराणिक आशयाचे समकालीन पर्यावरण, स्रीकेंद्री अनुभव विश्वाचे स्वरूप, भाषिक क्षेत्र चित्रण या परिप्रेक्ष्यात केलेली कादंबर्‍यांतील संस्कृतिचिकीत्सा अर्थशील आहे.

कादंबरी ही फक्त रूपविषयक घटकांनी आकारत नाही तर सामाजिक आशयातून तिला ललितकृतीचे कलात्मक स्वरूप लाभत असते. कादंबरीतील जीवनानुभव आणि आविष्कार शैलीमधील विशेष यात ठराविकता नसते. रूपदृष्ठ्या ती सतत प्रयोगशील होत असते. या दृष्टीने गेल्या पंचवीस वर्षातील मराठी कादंबरीचे रूप कसे बदलत गेले. कोणती आवाहनक्षमता नि आविष्कारशक्यता तीमधून ध्वनित झाल्या, तसेच समाजवास्तवाचे कोणते स्वरूप प्रकट झाले, याचा चिकित्सक शोध घेतला आहे. कादंबरीच्या संकेतव्युहातील बदल, तीमधील रूपविस्तार, काळाने कादंबरीला दिलेला प्रतिसाद आणि काळ संरचनेत सामावताना निर्माण झालेल्या प्रयोगक्षम वाटांचा वेध प्रयोगशीलतेच्या अंगाने 1990 नंतरच्या कादंबरी संदर्भाने घेतला आहे. हा वेध घेताना प्रारंभीच प्रयोगसिध्दांतन करून कादंबरी संरचनेतील लवचिकता आणि त्यामुळे निर्माण होत असलेल्या प्रयोगाच्या शक्यतांचा निर्देश केला आहे. साहित्य प्रकाराच्या विकासवाढीस उपयुक्त ठरणार्‍या प्रयोगमूल्याच्या अनुषंगाने केलेली मराठी कादंबरीची ही तपासणी मराठीतील प्रयोगसमीक्षेत महत्त्वाची ठरणारी आहे.

भालचंद्र नेमाडे हे गेल्या अर्धशतकातील महत्त्वाचे कादंबरीकार म्हणून सर्वपरिचित आहेत. त्यांनी आजमावलेल्या कादंबरी निर्मितीच्या आविष्कारशक्यता आणि देशीवादाची मराठीत केलेली मांडणी यामुळे नवे चर्चाविश्व आकाराला आले. त्यांचा जसा वाचकांचा चाहता वर्ग निर्माण झाला; तसाच त्यांच्या लेखनाचे अनुकरण करणारा, प्रभावात असणारा आणि त्यांच्या साहित्यविचाराची बाजू घेणारा मोठा वर्गही निर्माण झाला. त्यालाच ‘नेमाडपंथ’ असेही संबोधले गेले. त्यांच्या साहित्याची आरोप-प्रत्यारोपी स्वरूपाची वा एकांगी अशी विपुल समीक्षा झाली; पण या साहित्याचे तटस्थ आणि मर्मग्राही मूल्यमापन फारच थोड्या लोकांनी केल्याचे लक्षात येते. त्यात दत्ता घोलप यांचा समावेश करणे योग्य ठरेल. या संदर्भाने ‘नेमाडे प्रभावातील मराठी कादंबरी’, ‘भालचंद्र नेमाडे यांच्या कादंबर्‍यांचे आविष्कारविशेष’ व ‘हिंदू जगण्याची समृध्द अडगळ: सांस्कृतिक परिप्रेक्ष्य’ हे तीन लेख या ग्रंथात समाविष्ट आहेत. या लेखांतून नेमाडे यांच्या कादंबरीलेखनाचा प्रभावसंबंध तपासात आविष्कारविशेषांचा घेतलेला वेध त्यांच्या कादंबरीलेखनाची सामर्थ्यस्थळे अधोरेखित करणारा आहे.

दत्ता घोलप यांनी या ग्रंथातील ‘स्वातंत्र्यपूर्व मराठी ग्रामीण कादंबरी’ आणि काही कादंबर्‍यांवरील स्वतंत्र लेखांच्या माध्यमातून केलेली ग्रामीण कादंबरीची समीक्षा काहीएक भूमिका घेऊन कादंबरीचा अन्वयार्थ लावू पाहते. मराठी ग्रामीण कादंबरीच्या प्रारंभ काळातील निर्मिती, वाटचाल आणि स्थित्यंतराचा वेध या प्रवाहाचा आरंभ शोधत घेतला आहे. 1888 च्या ‘बळीबा पाटील’ या कादंबरीच्या निर्मितीपासून ते 1950 पर्यंतच्या कालखंडातील मराठी ग्रामीण कादंबरीचे स्वरूप यातून उलगडले आहे. या काळातील कादंबरी आणि कादंबरीकार यांची सामाजिक-सांस्कृतिक अवकाशात इतिहासाचे पुनर्वाचन करत ऐतिहासिकदृष्ठ्या विस्ताराने नोंद घेतली आहे.

म.फुले यांच्या विचारविश्वाने प्रभावित झालेल्या कृष्णराव भालेकर यांच्या ‘बळीबा पाटील’ या कादंबरीचे प्रथमच यथोचित विश्लेषण करून त्यांच्या कादंबरी वाड्मयाचे योगदान घोलपांनी साधार अधोरेखित केले आहे. या कादंबरीचे पहिलेपण आणि कादंबरीपणाची चिकित्सकपणे मांडणी करत तिचे विषद केलेले महत्त्व ग्रामीण साहित्य समीक्षेत नवी भर घालणारे आहे. प्रारंभापासून ते स्वातंत्र्यापर्यंतच्या ग्रामीण कादंबरीचे रचनाविशेष नोंदवत आढावा घेतल्यानंतर दत्ता घोलप यांनी या कालखंडातील कादंबरीचे निष्कर्षात्मक स्वरूप सांगितले आहे. स्वातंत्र्यपूर्व ग्रामीण कादंबर्‍यांच्या मर्यादांसह घेतलेला हा आढावा या काळातील ग्रामीण कादंबरीकडे पाहण्याची नवी दृष्टी देणारा आहे.

मराठी कादंबरी निर्मितीच्या तुलनेत ज्या गतीने समीक्षा व्हायला पाहिजे होती ती झालेली दिसत नाही. इतर साहित्यप्रकारही त्याला अपवाद नाही. मराठी कादंबरीच्या प्रारंभापासून ते आजतागायत ही स्थिती बदललेली नाही. अलिकडच्या काळात समीक्षालेखन करणार्‍या नव्या समीक्षकांची संख्या वाढते आहे. पण त्यात नुसतीच शेरेबाजी किंवा कुणाची वकिली तरी केलेली असते. वाचन-अभ्यास-चिंतन-व्यासंग आढळत नाही. जे काही थोडे लोक गांभीर्याने समीक्षा व्यवहाराकडे पाहतात, त्यात दत्ता घोलप यांचे नाव घ्यावे लागेल. प्रामुख्याने मराठी कादंबरीची त्यांची समज आणि अभ्यास प्रस्तुत समीक्षा ग्रंथ वाचला की लक्षात येतो. या ग्रंथात त्यांनी मराठी कादंबरीच्या रचिताचे मांडलेले आकलन आणि नोंदवलेली निरीक्षणे मराठी कादंबरी समीक्षेत मोलाची ठरणारी आहे.

-केदार काळवणे , सहायक प्राध्यापक, मराठी विभाग, शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय, कळंब, जि.उस्मानाबाद. पिन : 413507, ईमेल:घशवरी.ज्ञरश्रुरपश.28सारळश्र.लेा मो : 7020 634 502

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -