घरफिचर्ससंगीत देवबाभळी आणि अनन्या : दोन मास्टर पीसेस!

संगीत देवबाभळी आणि अनन्या : दोन मास्टर पीसेस!

Subscribe

या वर्षात व्यावसायिक रंगभूमीवर काही चांगली नाटके आली असली तरी, निर्विवादपणे यशस्वी म्हणावीत अशी दोन नाटके दिसतात. एक भद्रकालीचे ‘संगीत देवबाभळी’ आणि दुसरे, सुयोग/ऐश्वर्या/आर्य निर्मित ‘अनन्या’. दोन्ही नाटके अनेक स्पर्धांमध्ये नामांकित झालीत. त्यांना भरघोस प्रेक्षक साथही मिळते आहे. या दोन व्यावसायिक नाटकाच्या यशाचे विश्लेषण आपल्याला आजच्या प्रेक्षकांची नाटकाकडून काय अपेक्षा आहे, हे सांगेल.

व्यावसायिक नाटक हे प्रेक्षक शरण असते, असा आरोप अनेकदा होतो. त्यात अगदीच तथ्य नसते, असेही नाही. पण आपला विषय प्रेक्षकांपर्यंत त्यांना भावेल अशा रितीने पोहोचवणे, म्हणजे व्यावसायिक नाटक. देवबाभळी आणि अनन्या नेमके हेच करतात. या दोन नाटकांतील साम्य आणि फरक पाहत त्यांचे यश समजून घेण्याचा हा प्रयत्न.

कथानक

एका सामान्य मुलीची असामान्य कहाणी, हे अनन्याचे कथानक. संत तुकाराम यांची पत्नी आवलीच्या पायात रूतलेला काटा विठुराय काढतो आणि ती बरी होताना रखुमाई तिची काळजी घेते, ही दंतकथा हे देवबाभळीचे उगमस्थान. दोन्ही नाटके आधी एकांकिका म्हणून गाजलेली. अनन्या हे घटनाप्रधान, तर देवबाभळी हे एकाच मध्यवर्ती घटनेशी बांधलेले. एक सिनेमॅटिक दृश्यांच्या सहाय्याने दृश्यात्मक विस्तार केलेले. तर दुसर्‍यात दंतकथेतील काही दृश्य चमत्कृती साकारलेल्या. देवबाभळी संगीत नाटकांच्या परंपरेत नवी वाट स्वीकारणारे. अनन्या शरीराच्या बायो-मेकॅनिक्सचा वापर करत प्रेक्षकाला थक्क करणारे. म्हणजे प्रायोगिक नवता हा निकष अनन्या आणि देवबाभळी, दोन्ही नाटकांत सिद्ध होतो. दोन्ही नाटके स्त्रीकेंद्री असून, आजच्या स्त्रीसंघर्षाशी नाते जोडतात.

- Advertisement -

दिग्दर्शन

दोन्ही नाटकांचे लेखक हेच दिग्दर्शक आहेत. याअर्थी ती लेखकाच्या संकल्पनेतून दिग्दर्शित झालेली नाटके आहेत. त्यावर झालेले दिग्दर्शकीय संस्कार, म्हणूनच संहितेला पूरक ठरतात. दोन्ही नाटके व्यवस्थित संपादित आहेत, देवबाभळी तर प्रिसाइजली एडिटेड आहे. म्हणजे लेखकच दिग्दर्शक झाल्यास संहितेचे संपादन नीट होत नाही, ही वदंता इथे खोटी ठरते. उलट लेखकाच्या कल्पनेतील दृश्यात्मकता प्रयोगात जास्तीत जास्त उतरते. अनन्या तीन सेट्स अधिक बाह्य दृश्यांचे प्रोजेक्शन करत चौकट रंगमंचाच्या बंधनातून प्रेक्षकाला सिनेमॅटिक अनुभव देते. देवबाभळी कलात्मक आराखडा आखून बनलेले नाटक आहे. दोन्ही नाटकांवर अनेकदा संस्कार (खर्डा) झालेले असले, तरी त्यात आशय पूरक दृश्य संगती होत राहते. प्राजक्त देशमुख आणि प्रताप फड हे दोघेही यामुळे कौतुकास पात्र ठरतातच; पण निर्मिती मुल्यांत तडजोड न करणार्‍या निर्मात्यांचेही अभिनंदन करायला हवे.

कलाकार

देवबाभळी हे दोनच कलाकारांचे नाटक. ते दोन तास मोनोटोनस होण्याचा धोका होता. ते मंचावर साकारतात मानसी जोशी आणि शुभांगी सदावर्ते. दोघीही उत्तम गायिका. फार अनुभवी नाहीत, शुभांगीचे हे पहिलेच नाटक. पण प्रत्येक प्रयोगागणिक त्या नाटकावर पकड वाढवत गेल्या आणि आता त्यांची हुकूमत चालते. त्यांचा अभिनय, संवाद आणि गायन रंगमंचावर पाहणे हा एक मोठा अनुभव होतो. अनन्यामध्ये ऋतुजा बागवे अप्रतिम शरीरभाषा वापरते. त्यासाठी तिने नव्वद दिवस तालीम आणि प्रशिक्षण घेतले आहे. प्रमोद पवार यांनी अनन्याचे बाबा उत्तम साकारले आहेत. सिद्धार्थ बोडकेंचा जय दीक्षित त्याच्या आगाऊपणासहित आकर्षक होतो. प्रेक्षक त्याचे प्रत्येक वाक्य उचलून धरतात. अनघा मगरेची मैत्रिण आणि विशाल मोरेचा भाऊ या व्यक्तिरेखाही चोख उतरल्यात.

- Advertisement -

दोन्ही नाटकांत लेखकाचे उत्तम संवाद हे बलस्थान ठरते.

तंत्रज्ञ

देवबाभळीची दृश्य रचना प्रदीप मुळे यांची आहे. अनेक स्थळे एकातून एक निर्माण करत त्यांनी देवबाभळीचा पट विशाल केला आहे. यातील स्त्रोत प्रकाश योजना आणि स्थल रचना सुंदर आहे. संगीत हा देवबाभळीचा युएसपी. त्यात तुकोबांचे आणि प्रजाक्तने नव्याने लिहिलेले अभंग प्रभावी आहेत. यांना आनंद ओक यांचे संगीत एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवते. या सर्वातून एक सर्वांगीण सकस नाट्यानुभव देवबाभळी देते. अनन्यामध्ये संदेश बेंद्रे यांचे अनेकस्थळी नेपथ्य आणि दृश्य प्रोजेक्शन एक भव्य सिनेमाच आपल्यासमोर उभा करते. भूषण देसाईंची भावपोषक प्रकाशयोजना आणि समीर सप्तिस्कर यांचे पार्श्वसंगीत अनन्याचा परिणाम गडद करतात. दोन्ही नाटके टोटल टीमवर्क आणि उत्कृष्ट सादरीकरण यामुळे पहायलाच हवीत अशी झालीत.


– आभास आनंद

(लेखक नाट्य अभ्यासक आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -