घरफिचर्सनाटककार राम गणेश गडकरी

नाटककार राम गणेश गडकरी

Subscribe

राम गणेश गडकरी यांचा आज जन्मदिन. (26 मे 1885-23 जानेवारी 1919). गडकरी हे श्रेष्ठ नाटककार, विनोदकार आणि कवी होते. त्यांनी कवितालेखन ‘गोविंदग्रज’ ह्या नावाने केले. विनोद लेखन ‘बाळकराम’ ह्या नावाने केले. जन्म गुजरात राज्यातील नवसारी येथे झाला. शिक्षण दामनगर (सौराष्ट्र), कर्जत आणि पुणे येथे महाविद्यालयीन पहिल्या वर्षापर्यंत (1912) झाले. त्यापूर्वी काही काळ त्यांनी किर्लोस्कर नाटक कंपनीच्या नाटकांत कामे करणार्‍या मुलांचे मास्तर म्हणून काम केले. तेथे काही मतभेद झाल्यानंतर विदर्भातील बाळापूर ह्या गावी ते काही दिवस शिक्षक होते. पुण्याच्या ज्ञानप्रकाशात काही काळ उपसंपादकाची नोकरी केली (1909-10). तसेच पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षकाचे काम केले. 1910 मध्ये किर्लोस्कर नाटक मंडळीशी नाटकासाठी पदे रचण्याच्या निमित्ताने त्यांचा पुन्हा एकदा संबंध आला. त्यानंतर त्यांनी सर्वस्वी लेखानावरच आपला चरितार्थ चालविला.

वयाच्या सतराव्या वर्षी लिहिलेले मित्रप्रीती हे त्यांचे पहिले नाटक अनुपलब्ध आहे. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर ह्यांच्या नाटकांचा आणि विनोदी लेखनाचा प्रभाव त्यांच्यांवर संस्कारक्षम वयातच पडला. नाट्यविनोदाच्या संदर्भात ते श्रीपाद कृष्णांना आपले गुरू मानीत असत. त्यांचे पहिले पुस्तक कोल्हटकरांच्या नाटकांतील उतार्‍यांचे आहे (1907). वेड्यांचा बाजार (लेखनकाळ 1906-07) हे त्यांचे अपूर्ण नाटक महाराष्ट्रातील एक विख्यात नट आणि गडकर्‍यांचे एक निकटचे मित्र चिंतामणराव कोल्हटकर ह्यांनी पूर्ण केले व ते 1923 मध्ये प्रकाशित झाले.

- Advertisement -

काव्यलेखानाच्या बाबतीत ते स्वतःस केशवसुतांचे ‘कट्टे चेले’ म्हणवीत. त्यांच्या काव्याची प्रकृती मात्र केशवसुतांच्या काव्याहून भिन्न आहे. ‘अल्लड प्रेमास’ (1909) ही गडकर्‍यांची प्रसिद्ध झालेली पहिली कविता. मासिक मनोरंजनात ती प्रसिद्ध झाली. ह्याच मासिकातून 1913-15 मध्ये त्यांचे विनोदी लेख प्रसिद्ध झाले. हे लेख पुढे रिकामपणाची कामगिरी (1921) ह्या नावाने प्रसिद्ध झाले. रंगभूमी ह्या मासिकात ‘सवाई नाटकी’ ह्या टोपण नावाने आणि कधीकधी निनावी लेखन गडकरी करीत असत.

प्रेमसंन्यास (1913) हे त्यांचे रंगभूमीवर आलेले पहिले नाटक. त्यानंतरची त्यांची नाटके अशी : पुण्यप्रभाव (1917), एकच प्याला (1919), भावबंधन (1920) व राजसंन्यास (1922, अपूर्ण). वाग्वैजयंती (1921) ह्या नावाने त्यांच्या कविता संगृहीत केलेल्या आहेत. त्यांचे समग्र विनोदी लेख संपूर्ण बाळकराम (1925) ह्या नावाने प्रसिद्ध झाले. ह्यांशिवाय गडकर्‍यांचे बराच काळ अप्रकाशित राहिलेले साहित्य अप्रकाशित गडकरी (1962) ह्या नावाने प्रल्हाद केशव अत्रे ह्यांनी संपादित केले आहे. गडकर्‍यांच्या लेखनसंकल्पांची त्यावरून कल्पना येते. मृत्युसमयी ते विदर्भातील सावनेर ह्या गावी होते. ते क्षयाने आजारी होते. वयाच्या ३४ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. भावबंधन ह्या नाटकाचा अखेरचा प्रवेश लिहिल्यानंतर थोड्या वेळाने त्यांचे प्राणोत्क्रमण झाले. गडकर्‍यांचे साहित्य अल्प असले, तरी मराठी मनावरील त्यांचा प्रभाव मात्र अपूर्व असून तो त्यांच्या मृत्यूनंतरही टिकून आहे. त्यांच्या कवितेत भावोत्कटता व कल्पनाचमत्कृती ह्यांचा एकाच वेळी प्रत्यय येतो.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -